You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विजयालक्ष्मी पंडित-सय्यद हुसैन यांच्या प्रेमाची गोष्ट, जेव्हा दोघांनी गुपचूप विवाह केला होता
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इजिप्तची राजधानी कैरोमध्ये एक दफनभूमी आहे, 'अल-अराफा' ज्याला इंग्रजीत 'द सिटी ऑफ डेड' म्हणतात.
या दफन भूमीत एका भारतीयचे दफन केलं आहे. ते त्यांच्या काळातले एक महान विद्वान, पत्रकार आणि देशभक्त होते आणि वर्षानुवर्षे भारताबाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले.
सय्यद हुसैन असं या व्यक्तीचं नाव. त्यांचा जन्म 1888 मध्ये ढाका इथं झाला होता. हुसेन हे काही सामान्य व्यक्ती नव्हते.
एन एस विनोद त्यांच्या चरित्र ' अ फॉरगॉनटन अॅम्बेसेडर इन कैरो द लाइफ अँड टाइम्स ऑफ सय्यद हुसेन' मध्ये लिहतात, " सय्यद त्यांच्या काळातील एक अतिशय मोहक, विद्वान आणि सुसंस्कृत व्यक्ती होते. त्यांच्या भाषणांमध्ये लोकांना मोहित करण्याची अद्भुत क्षमता होती. ते एक विलक्षण लेखक आणि धर्मनिरपेक्ष देशभक्त होते."
विनोद लिहितात, "त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं गेलं कारण ते देशातील एक मोठ्या कुटुंबाच्या नाराजीचं कारण बनले होते. ते एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्याचं महान योगदान आणि कर्तृत्व असूनही त्यांना देश आणि इतिहासात त्यांना योग्य स्थान दिल गेलं नाही जे त्यांना द्यायला हवं होतं."
मोतीलाल नेहरू यांनी 'इंडिपेंडेंट' वृत्तपत्राचं संपादक केलं
अलिगढ विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर सय्यद हुसैन कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले, परंतु बॅरिस्टर होण्याऐवजी त्यांनी पत्रकार होण्यास प्राधान्य दिलं.
सय्यद हे 5 फूट 10 इंच उंचीचे होते आणि त्यांना चांगले कपडे घालण्याचा शौक होता. इंग्रजी भाषेवर त्यांचं इतक प्रभुत्व होतं की, इंग्लंडमधील अनेक स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नसतं.
इंग्लंडमध्ये सात वर्षांच्या वास्तव्यानंतर सय्यद नोव्हेंबर 1916 मध्ये भारतात परतले आणि एका महिन्यांनंतर त्यांनी मुंबईच्या 'बॉम्बे क्रॉनिकल' या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केलं.
त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लिहलेले लेख संपूर्ण भारतात मोठ्या आवडीनं वाचले गेले. मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी यांची नजर या लेखांवर पडली.
पण सय्यद हुसेन यांची खरी कहाणी जानेवारी 1919 मध्ये सुरु होते जेव्हा त्यांच्या लेखनाने प्रभावित होऊन मोतीलाल नेहरूंनी त्यांना 'इंडिपेंडंट' वृत्तपत्राचं संपादक होण्यासाठी अलाहाबादला बोलावलं.
सुरुवातीला या वृत्तपत्राचं कार्यालय मोतीलाल नेहरूंचं निवासस्थान असलेल्या 'आनंद भवन' मध्ये होतं. सय्यद यांना 1500 रुपयांच्या पगारावर नोकरीवर ठेवण्यात आलं. जो त्या काळातील खूप मोठा पगार होता.
सय्यद हुसैन यांनी विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी गुपचूप विवाह केला
जेव्हा सय्यद 'इंडिपेंडेंट' वृत्तपत्रांचे संपादक म्हणून आले तेव्हा सुरुवातीला ते 'आनंद भवना'त राहिले. त्याच दिवसांमध्ये मोतीलाल नेहरूंच्या कन्या विजयालक्ष्मी पंडित यांनी सरोजिनी नायडू यांची मुलगी पद्मजा नायडू यांना लिहिलेल्या पत्रात लिहलं होतं की, " सय्यद आमच्याकडे राहत आहे कारण प्रेसजवळ योग्य घर मिळालेलं नाही. "
'आनंद भवना'त राहिल्यामुळं सय्यद यांना नेहरू कुटुंबात मिसळण्याच्या अनेक संधी मिळाल्या.
तेव्हा विजयालक्ष्मी 19 वर्षांच्या होत्या. त्या खूप सुंदर होत्या. घरातील लोक त्यांना 'नान' म्हणून हाक मारायचे. सय्यद त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते तरी ते विजयालक्ष्मी यांच्यावर आकर्षित होण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. विजयालक्ष्मीही त्यांच्याकडे खेचल्या गेल्या.
त्या काळात इंगलंडमध्ये शिकलेले आकर्षक तरुण अलाहाबादसारख्या शहरात शोधूनही सापडत नव्हते. त्या दिवसांत लंडन इथं होणाऱ्या खिलाफत परिषदेसाठी सय्यद यांची निवड झाली.
एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद लंडनला जाण्यापूर्वी दोघांनी गुपचूप मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं.
एन.एस.विनोद लिहतात, " मोतीलाल नेहरूंना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांचा रागाचा पारा चढला होता. कुटुंबाच्या देखरेखीखाली असतानाही आपल्याच घरात असं कसं घडू शकते? याचा त्यांना राग आला होता. जवाहरलाल नेहरू ही आपल्या बहिणीवर कमी संतापले नव्हते. "
विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सय्यद हुसेन यांचा उल्लेख केला
विजयालक्ष्मी पंडित यांनी नंतर त्यांच्या 'स्कोप ऑफ हॅपिनेस' या आत्मचरित्रात कबुल केलं, " माझ्या किशोरवयात मी सय्यद हुसैन या तरुणाकडे आकर्षित झाले होते. माझ्या वडिलांनी त्याला 'इंडिपेंडेंट' वृत्तपत्राचं संपादक म्हणून नियुक्त केलं होतं."
त्या लिहतात, "ज्या काळात सर्वत्र हिंदू-मुस्लिम ऐक्याची चर्चा होती आणि मुस्लिम मित्र असलेल्या कुटुंबातील सदस्य म्हणून मला वाटलं की धर्माच्या बाहेत लग्न करणं काही वेगळं नाही.पण लग्नाच्या बाबतीत त्या काळात अजूनही परंपराना महत्व होतं, त्यामुळं असं करणं चुकीचं आहे हे मला समजवून सांगण्यात त्यांना यश आलं."
विजयालक्ष्मी पंडित यांची बहीण कृष्णा हाथी सिंह यांनीही त्यांच्या 'व्ही नेहरू' या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख त्या मुलाचं नाव न घेता त्यांनी केलेला दिसतो.
त्या लिहतात, "1920 मध्ये माझ्या बहिणीचं लग्न रणजीत सीताराम पंडित यांच्याशी ठरलं होतं. माझ्या वडिलांनी तिच्यासाठी वर शोधला होता, पण मी एका मुलावर प्रेम करते असं सांगून लग्नास नकार दिला होता."
त्यांनी लिहलं ,"माझ्या वडिलांचा विश्वास होता की मुलगा तिच्या लायक नाही. त्यामुळं माझे वडील आणि माझी नान (विजयालक्ष्मी) यांच्यात तणाव निर्माण झाला आणि गांधीजी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा यांच्यासोबत राहण्यासाठी ती साबरमती आश्रमात गेली. गांधीजी यांच्या प्रयत्नानंतर नान ( विजयालक्ष्मी) आणि त्यांच्या वडीलांचे संबंध पूर्ववत झाले."
कटरा इथे सय्यद हुसैन यांच्या घरी विवाह संपन्न
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना प्रसिद्ध लेखिका शीला रेड्डी यांनी त्यांच्या 'मिस्टर अँड मिसेस जिना' पुस्तकात लिहलं आहे की, मोतीलाल नेहरूंसारखा संसारी माणूस, ज्यानं इंग्लंडमध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलाला एखाद्या इंग्रज मुलीसोबत प्रेमसंबंध जोडण्यासाठीचा सल्ला दिला होता, त्यांनीचं आपली सुंदर मुलगी 'नान' हिला एका स्मार्ट, संवेदनशील आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाच्या तरुणासमोर कसं एकटं सोडलं."
त्या लिहतात," मोतीलाल नेहरूंना त्यांच्या घरात काय चाललंय हे लक्षात येईल तो पर्यंत त्यांनी अनौपचारिक विवाह ही उरकला होता. सय्यद हुसैन यांनी त्यांची मैत्रीण सरोजिनी नायडू यांच्याकडे ते कबूल केलं."
या विवाहाचं वर्णन पाकिस्तानी पत्रकार एचएम अब्बासी यांनी डेली न्यूजच्या 17 नोव्हेंबर,1971च्या अंकात प्रकाशित झालेल्या 'लव्ह लाइफ ऑफ मिसेस पंडित' या लेखात केलं आहे."
अब्बासी लिहतात, " मी माझे आजोबा हजरत मौलाना रशीद फाकरी यांच्या जवळ बसलो होतो. तेवढ्यात एका माणसानं त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. मौलाना लगेच उभे राहिले आणि म्हणाले, सय्यदने मला बोलवलं आहे. मी त्यांच्यासोबत सय्यद हुसैन यांच्या कटरामधील म्योर कॉलेज जवळील घरात गेलो."
त्यांनी लिहलं, जेव्हा मी तिथं पोहोचलो, तेव्हा त्यांच्या व्हरांड्यात सुमारे अर्धा डझन लोक उभे होते. सय्यद खूप अस्वस्थ दिसत होते. मिस पंडित जवळच बसल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर अस्वथ असल्याचे भाव दिसत नव्हते."
"हजर असलेल्यांमध्ये नवाब सर मोहम्मद युसूफ जे नंतर उत्तरप्रदेशातील मंत्री बनले. सय्यद असगर हुसैन होते. हे दोघेही सय्यदचे जवळचे मित्र होते. तेव्हाच मला कळलं की, सय्यद आणि विजयालक्ष्मी पंडित यांच लग्न होणार आहे. माझे आजोबा मौलाना रशीद फाकरी यांनी या दोघांचा 'निकाह' करून दिला होता."
नेहरूंनी फाईल जाळली
त्या काळातील प्रसिद्ध वकील के एल गौबा, ज्यांनी स्वतः एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं होतं, त्यांनी त्यांच्या " फ्रेंड्स अँड फोज या आत्मचरित्रात लिहलं आहे की, हिंदू-मुस्लिम रोमान्सचं एक ताज उदाहरण म्हणजे एक काश्मिरी स्त्री ही 'द इंडिपेंडेंट' वृत्तपत्राच्या मुस्लिम संपादकासोबत गेली होती.
" महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर मुलीचा घटस्फोट झाला. त्या नंतर ती गुजरातला जाऊन राहिली आणि खूप प्रसिद्ध महिला बनली."
लग्नाच्या कथेचा आणखी एक स्रोत म्हणजे नेहरूंचे सचिव एम.ओ.मथाई, जे त्यांच्या ‘रेमिनिसेंसेज़ ऑफ नेहरू' या पुस्तकात लिहतात, "गांधीजींच्या हत्येनंतर काही दिवसांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री झालेल्या राजकुमारी अमृत कौर यांनी गांधींच्या जवळ असलेली एक सीलबंद फाईल नेहरू जवळ पोहचवली होती."
ते लिहतात , " फाईल उघडल्यानंतर नेहरूंनी मला बोलावलं आणि म्हणाले, विजयालक्ष्मी या सय्यद हुसैन सोबत जाण्यासंबधीत ही फाईल आहे. तुम्ही ती जाळून टाका. मी त्यांना ही फाईल माझ्याकडे ठेवण्याची विनंती केली, पण त्यांनी ती मान्य केलं नाही. मी ती फाईल घेतली आणि थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या स्वयंपाकघरात गेलो आणि कागद राख होईपर्यंत तिथेच थांबलो. "
मोतीलाल नेहरू आणि गांधी यांनी सय्यद यांच्यावर दबाव आणला
या कथेला रंजक वळण मिळाले जेव्हा सय्यद हुसैन यांनी 18 डिसेंबर 1919 रोजी 'द इंडिपेंडेंट'च्या संपादकपदाचा अचानक राजीनामा दिला आणि त्याच दिवशी वृत्तपत्रात शेवटचं संपादकीय लिहलं.
22 डिसेंबर रोजी अलाहाबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये अनेकांनी सय्यद यांच्या राष्ट्रीय समस्यांवरील योगदान आणि त्यांच्या लेखनाची प्रशंसा केली. त्यानंतर लगेचच हुसैन खिलाफत कमिटी आणि काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी अमृतसरला गेले.
एन एस विनोद लिहतात, " गांधी आणि मोतीलाल यांनी अधिवेशना दरम्यान वेळ काढून सय्यद हुसैन यांच्या बेफिकीर कृत्याबद्दल विचारणा केली असेल आणि त्यांना लग्न मोडण्यासाठी राजी केलं असेल."
ते लिहतात," सय्यद यांचा इंग्लंडला जाण्याचा कार्यक्रम आधीच ठरला होता, त्यामुळं चतुर गांधींनी प्रकरण थंड होईपर्यंत त्यांना इंग्लंडमध्येच राहण्याची विंनती केली.सय्यद हे या दोन्ही मोठ्या सन्मानित गृहस्थांच्या शाब्दिक हल्लयांना तोंड देऊ शकले नाहीत आणि तरुण जोडप लग्न मोडण्यास सहमत झालं. "
जिना आणि सय्यद याच्या विवाहामध्ये अनेक साम्य आहेत
विजयालक्ष्मी पंडित यांनी नंतर 13 मार्च 1920 रोजी पद्मजा नायडू यांना लिहिलेल्या पत्रात निदर्शनास आणून दिलं की, गांधींनी त्यांची आणि सय्यदची भेट घेतली आणि वैवाहिक ‘मिसएडवेंचर’ बद्दल त्यांना फटकारलं.
लवकरच सय्यद लंडनला जाण्यासाठी मुंबईला निघून गेले आणि विजयालक्ष्मी यांना मन आणि आत्मशांतीसाठी गांधीजींच्या साबरमती आश्रमात पाठवण्यात आलं.
एन एस विनोद लिहतात, " पद्मजा आणि काही प्रमाणात त्यांची आई सरोजिनी नायडू या दोघी अशा नात्यात येण्याचं धाडस करणाऱ्या मुलीसाठी ‘अॅगनी आँट’( सल्ला देणारी) काम करत होत्या. पूर्वी त्या जिन्ना यांची पत्नी रतीची विश्वासू होती. नंतर विजयालक्ष्मी पंडित यांच्या विश्वासू बनल्या. "
ते लिहतात, " जिना आणि रती याच्या लग्नापासून प्रेरणा घेऊन सय्यद आणि विजयालक्ष्मी यांनी त्यांच्या लग्नाची योजना आखली नव्हती ना?, कारण दोन्ही लग्नांमध्ये साम्य होते. एक उच्च शिक्षित मुसलमान हा आपल्यापेक्षा वयानं खूप लहान असलेल्या पारशी मुलीशी लग्न करतो. तर दुसरीकडे एका चांगल्या कुटुंबातील मुस्लिम मुलाचं आपल्या पेक्षा वयानं कितीतरी छोट्या एका तरुण काश्मिरी ब्राम्हण मुलीशी लग्न करतो. "
विजयालक्ष्मी पंडित यांना गांधीजींच्या साबरमती आश्रमात पाठवलं
अमृतसरमधील काँग्रेस अधिवेशनानंतर महात्मा गांधी आनंद भवनात आले. आनंद भवनात असताना गांधीजींनी विजयालक्ष्मी यांना अहमदाबाद जवळील साबरमती आश्रमात काही दिवस आपल्यासोबत घालवण्याची सूचना केली.
विजयालक्ष्मी लिहतात, " माझ्या आईचा असा विश्वास होता की माझ्या पाश्चात्य संगोपनामुळं मी परंपरा सोडून विचार करायला लागली होती. म्हणून तिनं साबरमती आश्रमात जाण्याच्या गांधीजींच्या सूचनेचं स्वागत केलं. "
विजयालक्ष्मी यांना साबरमतीला जाणं पसंत नव्हतं. त्यांनी त्याच्या आत्मचरित्रात लिहलं आहे की, " ते ठिकाण बघता क्षणी मला आवडलं नाही, तिथली प्रत्येक गोष्ट डोळ्यांना अप्रिय होती. "
त्यांनी लिहलं, "आम्ही प्रार्थनेसाठी पहाटे 4 वाजता उठायचो आणि नंतर आमच्या खोल्या झाडायचो. कपडे धुण्यासाठी आम्ही जवळच्या नदीवर जायचो. जणू काही आमची जेवायची इच्छा होऊ नये असा आग्रह आश्रमानं धरला असावा.
आश्रमात उगवणाऱ्या भाज्या या मीठ, मसाला आणि तूप न घालता उकडले जायच्या. त्याच भाज्या आम्ही चपाती आणि भातासोबत खायचो.आश्रमात चहा किंवा कॉफी प्यायला दिलीय जात नव्हती."
विजयालक्ष्मी पंडित यांचा विवाह रणजित पंडित यांच्याशी झाला
मोतीलाल नेहरू यांनी राहण्या -खाण्याच्या पाश्चात्य पद्धतीचा अवलंब केला असेल, पण मनापासून ते पारंपरिक हिंदू होते, आपल्या मुलीनं एका मुस्लिम मुलाशी विवाह करावा याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.
दुसरीकडे,महात्मा गांधी हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल जाहीरपणे बोलत असतील, पण त्यांच्या मोतीलाल नेहरूंइतकाच परंपरांवर विश्वास होता.
हेच कारण होत की, त्यांनी 1926 मध्ये त्यांचा मुलगा मणिलाल याचा विवाह फातिमा या मुस्लिम मुलीशी करू दिला नव्हता. सय्यद लंडनला गेल्यानंतर काही महिन्यांनी विजयालक्ष्मी पंडित यांचा विवाह महाराष्ट्रातील सारस्वत ब्राह्मण रणजित पंडित यांच्याशी झाला.
त्यांचा विवाह 9 मे 1921 रोजी अलाहाबाद इथं झाला. या विवाहाला गांधीजीही उपस्थित होते.या लग्नात सरोजिनी नायडूही आल्या होत्या.
15 मे 1921 रोजी त्यांची मुलगी लैलामणि हिला लिहलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेलं, "बिचारा सय्यद, त्याच्यासाठी मला वेदना होताहेत, परंतु मी आभारी असेन की विजयालक्ष्मी हिला काही फरक पडला नाही, हा पण सय्यद हुसेन मात्र आयुष्यभर अविवाहित राहिले. "
सय्यद आणि विजयालक्ष्मी यांच्या लग्नाचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित करण्यात आला होता.
ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्येही या लग्नाचे पडसाद उमटले.
14 एप्रिल 1920 रोजी कंझर्वेटिव्ह खासदार कटबर्ट जेम्स यांनी भारतीय व्यवहार मंत्री एडविन मॉंटागू यांना लेखी विचारलं, " या देशात खिलाफत शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून दौरा करणारे सय्यद हुसेन यांच्यावर मोतीलाल नेहरू यांच्या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप आहे?"
एडविन मॉंटागू यांनी सांगितलं की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही.
सय्यद यांनी जेन्स यांना पत्र लिहून याचा निषेध केला की, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्या चारित्र्यावर गंभीर आणि निराधार टिप्पणी केली आहे. तुम्ही अशी बेताल गोष्ट कोणत्या आधारावर करता हे मला समजलं नाही? तुम्ही हे विधान मागे घ्या,आणि जाहीर माफी मागा.
जर तुमच्यात जरा जरी आत्मसम्मान असेल तर तुम्ही संसदेबाहेर बोलून बघा,मी त्याला योग्य उत्तर देईन. "
सय्यद पुढील 26 वर्षे ते भारतात परतले नाहीत
सय्यद हुसैन यांनी 1920 मध्ये भारत सोडला, तेव्हा पुढील 26 वर्षे ते भारतात परतले नाहीत. दरम्यान, 1937 मध्ये ते काही दिवसांसाठी भारतात आले.
त्यांनी प्रथम ब्रिटन आणि नंतर अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. या काळात, असहकार चळवळ, मुस्लिम लीगचा उदय आणि त्यांचे जुने मित्र मोहम्मद अली जिना यांची पाकिस्तान निर्मितीची चळवळ, नेहरूंच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आणि धर्माच्या आधारावर देशाची फाळणी यांसारख्या भारतात घडणाऱ्या घटनांशी त्यांचा थेट संबंध आला नाही.
सय्यद हुसेन हे लंडनच्या वास्तव्यादरम्यान भारतातील राष्ट्रवादी वृत्तपत्र 'इंडिया'चे संपादक होते. ऑक्टोबर 1921 मध्ये, ते लंडन सोडले आणि अमेरिकेत गेले जेथे ते 1946 पर्यंत राहिले.
या दरम्यान त्यांनी संपूर्ण अमेरिकेत फिरून भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने भाषणे दिली.
1924 ते 1928 या काळात ते 'द न्यू ओरिएंट' चे संपादक होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा गांधी, अल्बर्ट आईन्स्टाईन, खलील जिब्रान, सरोजिनी नायडू आणि बर्टरेंड रसेल यांचे लेख त्यांच्या वृत्तपत्रात आले.
यानंतर त्यांनी 'व्हॉइस ऑफ इंडिया' या आणखी एका मासिकाचे संपादन केले. त्यांनी नेहमीच भारताच्या सांस्कृतिक एकतेचा पुरस्कार केला. ते म्हणाले की, भारतीय संस्कृती हिंदू किंवा मुस्लिम नाही. तो पूर्णपणे भारतीय आहे.
त्या काळात ते कदाचित अशा मोजक्या लोकांपैकी होते ज्यांनी अविभाजित भारताचे स्वप्न पाहिले होते जेथे हिंदू आणि मुस्लिम दोघांना समान अधिकार असतील.
सय्यद हुसैन यांच्या भारतात परतण्याच्या निर्णयावर नेहरूंची प्रतिक्रिया
विजयालक्ष्मी पंडित 1945 मध्ये अमेरिकेला गेल्या तेव्हा 26 वर्षांनी त्यांची हुसैनशी भेट झाली.
1946 मध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहून भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु नेहरूंकडून त्यांना अतिशय थंड उत्तर मिळाले.
त्यांनी लिहिले की, "तुम्ही अमेरिकेत राहून भारतासाठी चांगले काम करू शकता."
एम.ओ. मथाई लिहितात, "विजयालक्ष्मी पंडित आणि सय्यद हुसैन पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता रोखण्यासाठी नेहरूंचे उत्तर होते आणि त्यांच्याबद्दलच्या चर्चा पुन्हा सुरू होतील. हे उघड होते की नेहरू हे 30 वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीचे असलेले प्रेमसंबंध विसरले नव्हते. "
नेहरूंनी विजयालक्ष्मी पंडित यांची सोव्हिएत युनियनमधील राजदूत आणि सय्यद यांची इजिप्तमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती केली.
नेहरू आणि गांधींकडून निराश होऊनही सय्यद हुसैन 1946 मध्ये भारतात परतले. त्यावेळी विजयालक्ष्मी पंडित या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.
दोन वर्षांपूर्वी त्यांचे पती रणजित पंडित यांचे निधन झाले होते. त्यावेळी जवाहरलाल नेहरू 17 यॉर्क रोड येथे राहत होते.
विजयालक्ष्मी लखनौहून दिल्लीला आल्यावर त्या आपल्या भावाच्या घरी राहायच्या.
एम ओ मथाई यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर, रिमलेस चष्मा घातलेले सय्यद हुसैन रोज सकाळी नेहरूंच्या घरी पोहोचायचा. त्याच्या पॅंटच्या मागच्या खिशात कोनयेकचा फ्लास्क ठेवला होता, ज्यातून ते वेळोवेळी कोनयेकचे घोट घेत असतं.
विजयालक्ष्मी पंडित आणि सय्यद हुसैन यांच्या भेटीची मालिका पुन्हा सुरू झाली.
नेहरूंनी विजयालक्ष्मी पंडित यांची सोव्हिएत युनियनमध्ये भारताच्या पहिल्या राजदूत म्हणून नियुक्ती केल्याचे बहुधा हेच कारण होते, जरी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी, विशेषत: लियाकत अली यांनी याला कडाडून विरोध केला.
विजयालक्ष्मी पंडित यांनी स्वत: त्यांच्या आत्मचरित्रात कबूल केले आहे की, तिला भावाचा हा निर्णय आवडला नाही.
दुसरीकडे सय्यद हुसैन यांना इजिप्तमध्ये भारताचे पहिले राजदूत म्हणून पाठवण्यात आले.
विजयालक्ष्मी आणि सय्यद हुसैन यांना इतक्या सहज भेटण्याची संधी मिळू नये हा यामागे नेहरूंचा हेतू असावा.
सय्यद हुसैन यांचा इजिप्तमध्ये मृत्यू झाला
3 मार्च 1948 रोजी सय्यद हुसैन यांनी इजिप्शियन सम्राट एमएम फारुख यांना त्यांची ओळखपत्रे सादर केली.
त्याला पारंपरिकपणे चार घोड्यांच्या गाडीतून इजिप्तच्या सम्राटाचा राजवाडा अब्दिन पॅलेस येथे नेण्यात आले.
त्याच्या मिरवणुकीत इजिप्शियन सैन्याचे सुमारे 100 घोडेस्वार चालत होते. राजवाड्यात पोहोचताच सम्राटाच्या अंगरक्षकांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
कैरोच्या वास्तव्या दरम्यान सय्यद घरी न राहता शेफर्ड हॉटेलमध्ये राहिले.
जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित आणि त्यांच्या मुली चंद्रलेखा आणि नयनतारा इजिप्तमध्ये असताना त्यांना भेटायला गेले. मात्र वर्षभरातच सय्यद हुसेन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 61 वर्षे होते.
त्यांना इजिप्तची राजधानी कैरो येथे पूर्ण लष्करी सन्मानाने दफन करण्यात आले.
इजिप्शियन सरकारने त्यांच्या नावावर रस्त्याचे नाव दिले.
भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मे 1949 मध्ये कैरोला गेले आणि त्यांनी सय्यद हुसैन यांच्या कबरीवर पुष्प अर्पण केले.
काही दिवसांनी विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी झाल्या.
न्यूयॉर्कला त्यांच्या अधिकृत भेटी दरम्यान, त्या अनेकदा कैरोमध्ये थांबायच्या आणि सय्यद हुसेन च्या कबरीवर फुले वाहायच्या.
एक मोठ्या कुटुंबाच्या नाराजीनं देशभक्त सय्यद हुसैन यांना इतिहासात योग्य स्थान दिल गेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)