इराण युद्धामुळे भारतात बाटलीबंद पाणी आणि बिअर महाग होण्याची शक्यता का आहे?

    • Author, शेरीलॅन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतात काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता असताना, भारतीय लोक उन्हाळ्यासाठी सज्ज होत आहेत.

मात्र इराण युद्धामुळे भारतातील 6 अब्ज डॉलर्सचा (अंदाजे 55,608 कोटी रुपये) बाटलीबंद पाण्याचा उद्योग आधीच तणावाखाली आला आहे. कारण उत्पादकांना महत्त्वाचा कच्चा माल मिळवताना अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे.

गेल्या महिन्यात 'बिसलेरी' या बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेतील आघाडीतील कंपनीनं त्यांच्या उत्पादनाच्या म्हणजे पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीत 11 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे 1 लिटर पाण्याच्या 12 बाटल्यांचा बॉक्स 24 रुपयांनी महाग झाला.

तर बेली आणि क्लिअर प्रीमियम वॉटर यासारख्या ब्रँड्सनी देखील त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत वाढ केली असल्याची माहिती, रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

डेटा फॉर इंडियाच्या एका अभ्यासानुसार, जवळपास 15 टक्के शहरी आणि 6 टक्के ग्रामीण कुटुंबं त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहेत.

बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहणं ही महागडी गोष्ट आहे. विशेषकरून ग्रामीण भागातील लोकांसाठी ते महाग ठरतं आहे. मात्र भारताच्या अनेक भागात स्वच्छ पाणी मिळणं, विशेषकरून उन्हाळ्यात, हे एक आव्हान राहिलं आहे.

यासाठी पाण्याची टंचाई, भूजलातील प्रदूषण आणि पायाभूत सुविधांची कमतरता यासारखी विविध कारणं कारणीभूत आहेत.

इराण युद्धामुळे इंधन महागलं

युद्ध दीर्घकाळ चालल्यास अनेक भारतीयांसाठी ही अत्यावश्यक वस्तू महाग होत त्या ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याचा धोका असल्याचा इशारा, ब्रँड्स आणि बाटली उत्पादकांनी दिला आहे.

जगातील जवळपास 20 टक्के कच्चे तेल आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे द्रव स्वरुपातील नैसर्गिक वायूची वाहतूक होर्मुझच्या अरुंद सामुद्रधुनीतून होते. मात्र ही वाहतूक आता इराणनं जवळपास पूर्णपणे रोखली आहे. सागरी वाहतुकीतील या अडथळ्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

देशांतर्गत गरजांची पूर्तता करण्यासाठी भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या दबावाला सामोरं जातो आहे.

विजयसिंह दुब्बल, महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी सध्याची परिस्थितीत स्पष्ट करताना सांगितलं की, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होणं, हे बाटलीबंद पाणी महाग होण्यामागचं मुख्य कारण आहे. हे पाणी प्रामुख्यानं प्लास्टिकच्या बाटल्यांमधून विकलं जातं.

या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रेंड क्रूड ऑईलची किंमत 119 डॉलर प्रति बॅरलवर (अंदाजे 11 हजार 29 रुपये) पोहोचली होती. इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धाची सुरुवात झाल्यापासूनच्या तेलाच्या सर्वोच्च पातळीजवळ ही किंमत होती.

बाटल्यांना लागणारं पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेट महागलं

प्लास्टिकच्या बाटल्या, पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेटपासून (पीईटी किंवा पेट) बनवल्या जातात. त्याला आपण सामान्यपणे प्लास्टिक असं म्हणतो.

पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेटच्या रेझिनचे पेलेट्स म्हणजे दाणे कच्च्या तेलापासून बनवले जातात. हे ग्रॅन्युल्स किंवा दाणे गरम करून बाटल्या बनवण्याच्या साच्यांमध्ये टाकले जातात. तिथे पीईटी प्रीफॉर्म्स तयार होतात. हे प्रीफॉर्म्स प्लास्टिकच्या टेस्ट ट्युब म्हणजे परीक्षा नळ्यांसारखे दिसतात.

मग हे पॉलीइथिलिन टेरेफ्थॅलेटचे प्रीफॉर्म्स विविध ब्रँड्स आणि बाटली उत्पादकांना विकले जातात. तिथे या प्रीफॉर्म्सचं रुपांतर हव्या असलेला आकाराच्या आणि मापाच्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये होतं.

"या प्रीपॉर्म्सची किंमत 115 रुपये प्रति किलोवरून वाढून 180 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तसंच या प्रीफॉर्म्सच्या पुरवठ्यातही टंचाई निर्माण झाली आहे," असं दुब्बल म्हणाले.

बाटल्यांच्या वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर पडण्याची शक्यता

त्यांनी पुढे सांगितलं की, महाराष्ट्रातील जवळपास 20 टक्के बाटली उत्पादकांनी त्यांच्या कारखान्यांमधील कामकाज तात्पुरतं बंद केलं आहे.

काही कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या असल्या, तरी अनेक ब्रँड्स आणि विक्रेत्यांनी आतापर्यंत या वाढीव किमतीचा हा भार स्वत:च उचलला आहे. त्यामुळे ग्राहकांवर या दरवाढीचा बोजा पडलेला नाही, असं दुब्बल यांनी सांगितलं.

त्यामुळे, साधारणपणे 20 रुपयांना विकली जाणारी 1 लिटर पाण्याची बाटली किंवा साधारणपणे 60-70 रुपयांना विकली जाणारी 5 लिटरच्या बाटलीच्या किमतीत बहुतांशपणे कोणताही बदल झालेला नाही.

"मात्र वाढलेल्या किमतीचा भार कंपन्यांना दीर्घकाळ स्वत:च सहन करता येणार नाही. जर परिस्थिती आणखी चिघळली, तर ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे," असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर आलेला हा ताण अत्यंत प्रतिकूल वेळेस आला आहे. याच काळात म्हणजे ऐन उन्हाळ्याचे दिवस असलेल्या एप्रिल आणि मे महिन्यात, बाटलीबंद पाणी आणि बिगर मद्य श्रेणीतील बेवरेजेस किंवा पेयांच्या मागणीत भारतात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते.

संपूर्ण पॅकेजिंग उद्योगावर परिणाम

वैभव सरोगी, केमको प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. लि.चे संचालक आहेत. ही कंपनी भारतातील पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेट (पीईटी) प्रीफॉर्म्सच्या सर्वात मोठ्या पुरवठदारांपैकी एक आहे.

वैभव सरोगी म्हणाले की, प्रीफॉर्म्सच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम फक्त बाटलीबंद पाण्यावरच होणार नाही, तर संपूर्ण पॅकेजिंग उद्योगावर होईल.

भारतातील पॉलीइथिलीन टेरेफ्थॅलेट (पीईटी) पॅकेजिंगची बाजारपेठ 2024 मध्ये 1.5 अब्ज डॉलरची (अंदाजे 13 हजार 902 कोटी रुपये) होती. ही बाजारपेठ 2033 पर्यंत 2.2 अब्ज डॉलरवर (अंदाजे 20 हजार 390 कोटी रुपये) पोहोचण्याची अपेक्षा आहे.

बाटलीबंद पाणी आणि विविध पेयं (बेवरेजेस) याव्यतिरिक्त, पॉलीइथिलिन टेरेफ्थॅलेट (पीईटी) पॅकेजिंगचा वापर सौंदर्यप्रसाधनं, औषधनिर्मिती क्षेत्र, अगदी उपहारगृह आणि फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण आता ग्राहक सोय आणि परवडणारी किंमत यांना अधिक प्राधान्य देत आहेत.

काचेच्या बाटल्यांच्या उत्पादकांनादेखील युद्धाचा फटका बसतो आहे.

बिअर उत्पादकांसमोरील आव्हान

ब्रूअर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बिअर उत्पादकांची संस्था आहे. ती हायनेकेन आणि कार्ल्सबर्ग यासारख्या जगातील प्रमुख बिअर उत्पादक कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते.

ब्रूअर्स असोसिएशन ऑफ इंडियानं गेल्या महिन्यात रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, काचेच्या बाटल्यांची किंमत जवळपास 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे या संस्थेनं त्यांच्या सदस्य कंपन्यांना बिअरच्या किमतीत 12-15 टक्क्यांची वाढ करण्यासाठी राज्यांकडे संपर्क साधण्यास सांगितलं आहे. मद्याच्या किमतीचं भारतात वेगवेगळ्या राज्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे नियमन केलं जातं.

'कॉन्फडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपनीज'नं देखील किमतीत वाढ करण्यासंदर्भात राज्यांना पत्र लिहिलं आहे, अशी माहिती या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

विठोब शेट, विट्रम ग्लास या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विट्रम ग्लास ही अंबर काचेच्या बाटल्यांची आघाडीची उत्पादक आणि मार्केटिंग करणारी कंपनी आहे.

अंबर बाटल्या म्हणजे रंगीत किंवा रंगछटा दिलेल्या बाटल्या. यांचा वापर प्रामुख्यानं औषधनिर्मिती कंपन्या आणि मद्य उत्पादक कंपन्यांद्वारे केला जातो.

नैसर्गिक वायूच्या अनियमित पुरवठ्यामुळे ही दरवाढ झाली आहे, असं विठोब शेट म्हणाले.

'परिस्थिती गंभीर आहे'

काच उत्पादक कंपन्या त्यांच्या भट्ट्या चालवण्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर करतात. या भट्ट्यांमध्ये वाळू, सोडा ॲश, चुनखडी आणि पुनर्वापर केलेली काच या गोष्टी वितळवून त्यापासून वितळलेले काचेचे गोळे बनवले जातात. मग या गोळ्यांना आकार देऊन त्यापासून बाटल्या बनवल्या जातात.

मात्र युद्ध सुरू झाल्यापासून भारतानं नैसर्गिक वायूसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. घरगुती वापर आणि काही व्यावसायिक उद्योगांच्या पुरवठ्याला यात प्राधान्य देण्यात आलं आहे.

शेट म्हणाले की, नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात 20 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे काच उत्पादकांना त्यांच्या भट्ट्या सुरू ठेवणं कठीण झालं आहे.

विट्रम ग्लाससारख्या काही कंपन्या तुडवडा भरून काढण्यासाठी तेलाचा वापर करत आहेत. मात्र कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होते आहे.

देशातील ऊर्जा पुरवठा स्थिर असल्याची ग्वाही भारत सरकारनं दिली असली, तरीदेखील युद्धाची सुरुवात झाल्यापासून स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे देशभरातील अनेक व्यावसायिक उपहारगृहं बंद पडली आहेत.

ऊर्जेच्या पुरवठ्यातील या संकटाचा फटका भारतातील सिरॅमिक्स आणि खत उद्योगांना देखील बसला आहे. तर विमानाच्या इंधनाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे हवाई वाहतूक उद्योगाला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो आहे.

"परिस्थिती गंभीर आहे. पाणी आणि औषधांसारख्या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येतात. या वस्तूंच्या पुरवठ्यात अगदी किरकोळ स्वरुपात घट झाली, तरीदेखील त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात," असं शेट म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)