राघव चढ्ढा : केजरीवालांचे रणनीतीकार, 'आप'चे तरुण खासदार ते 'मोदींना घाबरतात'चे आरोप
फोटो स्रोत, Getty Images
आम आदमी पक्षाने (आप) राघव चढ्ढा यांच्या जागी पक्षाच्या राज्यसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी अशोक कुमार मित्तल यांच्याकडे दिली आहे.
यानंतर शुक्रवारी (3 एप्रिल) राघव चढ्ढा यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. "मी सातत्याने जनहिताचे मुद्दे उपस्थित करत आलो आहे, पण यामुळे आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं?" असा सवाल त्यांनी केला आहे.
याला उत्तर देताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक व्हीडिओ जारी केले.
त्यामध्ये त्यांनी राघव चढ्ढा यांच्यावर पक्ष आणि देशहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगल्याचा आणि भाजपला घाबरल्याचा आरोप केला.
अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा राघव चढ्ढा लंडनमध्ये होते. यावरूनही 'आप'च्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले.
दुसरीकडे, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग वारिंग यांनी एकतर 'राघव चढ्ढा आम आदमी पक्ष सोडतील किंवा त्यांची हकालपट्टी होऊ शकते', असं म्हटलं आहे.
काँग्रेसशिवाय इतर विरोधी पक्षही राघव चढ्ढा प्रकरणी आम आदमी पक्षाला कोंडीत पकडत आहेत.
आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं?
राघव चढ्ढा यांच्याऐवजी अशोक कुमार मित्तल यांना पक्षाचे उपनेते बनवण्यात यावं, असं पत्र राज्यसभा सचिवालयाला लिहिण्यात आलं आहे. तसेच, पीटीआयच्या वृत्तानुसार, आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये अशी विनंती केली आहे.
शुक्रवारी राघव चढ्ढा यांनी एक व्हीडिओ जारी केला आणि म्हटलं की, "जेव्हा जेव्हा मला संसदेत बोलायची संधी मिळते तेव्हा मी जनतेचे मुद्दे मांडतो. कदाचित असे मुद्दे जे सामान्यतः संसदेत मांडले जात नाहीत. पण जनतेचे मुद्दे मांडणे, त्यांच्या समस्या सांगणे हा गुन्हा आहे का?"
राघव चढ्ढा म्हणाले की, राज्यसभेत मला बोलायला परवानगी देऊ नये, असं 'आप'ने राज्यसभा सचिवालयाला सांगितलं आहे.
"मला बोलण्यापासून का थांबवलं जात आहे?", असा प्रतिसवाल त्यांनी केला.
राघव चढ्ढा म्हणाले, "मी जे मुद्दे मांडले, त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा झाला. पण आम आदमी पक्षाचं काय नुकसान झालं? मग मला बोलण्यापासून का थांबवलं जात आहे? माझा आवाज का बंद करायचा आहे?"
"ज्यांनी आज संसदेत माझा बोलण्याचा अधिकार हिसकावून घेतला आणि मला गप्प केलं, मला त्यांनाही काही सांगायचं आहे, माझं मौन माझा पराभव समजू नका, मी ती नदी आहे जी वेळ आल्यानंतर पुरात बदलते."
फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
गुरुवारी (2 एप्रिल) एएनआयशी बोलताना अशोक कुमार मित्तल म्हणाले की, "राज्यसभा किंवा लोकसभेत पक्षाचे नेते किंवा उपनेते असतात. वेळोवेळी त्यात बदल होत असतो. राघवजी यांच्या पूर्वी एन. डी. गुप्ता हे उपनेते होते, आज मी झालो आहे, उद्या दुसरा कोणी तरी होईल."
त्यांनी म्हटलं, "आमचा पक्ष लोकशाहीवादी पक्ष आहे. आमच्या पक्षाला वेळोवेळी आम्हाला प्रशिक्षण द्यायचं असतं. त्याचबरोबर सर्वांच्या कौशल्यांना पुढे आणण्याचा त्यांच्याकडून प्रयत्नही केला जातो. याच पार्श्वभूमीवर मला ही जबाबदारी पार पाडता यावी आणि अधिक शिकता यावं यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे."
पक्षात सर्व काही ठीक आहे, असं त्यांनी म्हटलं. शुक्रवारी मात्र 'आप'च्या नेत्यांनी राघव चढ्ढा यांच्याविरोधात आघाडी उघडल्याचं दिसून आलं.
राघव चढ्ढा हे मोदींना घाबरले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अनुराग ढांडा यांनी केला.
एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "आम्ही केजरीवालांचे शिपाई आहोत. धैर्य, निडरता ही आमची ओळख आहे. जर कोणी मोदींना घाबरत असेल, तर तो देशासाठी कसं लढेल? पक्षाला संसदेत बोलायला थोडाच वेळ मिळतो, त्यात देश वाचवण्यासाठी संघर्ष करायचा की विमानतळाच्या कँटीनमध्ये समोसे स्वस्त करायचे."
अनुराग ढांडा यांनी पुढे लिहिलं, "गेल्या काही वर्षांत तुम्ही घाबरलात, राघव. मोदीविरुद्ध बोलायला तुम्ही घाबरता. देशाच्या खऱ्या, वास्तविक मुद्द्यांवर बोलायला घाबरता. जो घाबरला, तो…"
'आप' आक्रमक, तर विरोधकांचे चिमटे
राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी राघव चढ्ढांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "देशामध्ये गॅसची टंचाई आहे, बंगालमध्ये मतदारांविरुद्ध घोटाळा आणि पंजाबमध्ये पक्षाचे अधिकार हिसकावण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राघव काहीच बोलत नाहीत."
ते म्हणाले, "राघव चढ्ढा यांना मी सांगू इच्छितो की, जे मुद्दे आम आदमी पक्षाचे आहेत, जसं की सीईसी विरोधात प्रस्ताव आला तेव्हा तुम्ही त्यावर स्वाक्षरी करत नाही, हे असे मुद्दे आहेत, ज्यांचं त्यांना उत्तर द्यावं लागेल."
खासदार राघव चढ्ढा हे भाजपला घाबरत असल्याचा आरोप दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे.
त्यांनी एक व्हीडिओ जारी करत म्हटलं की, "मी राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना प्रश्न विचारू इच्छिते की, तुम्ही भाजपला इतकं का घाबरता? तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला इतकं घाबरत का आहात? आज आमच्यासमोर निवडणूक आयोगाचा गैरवापर करून पश्चिम बंगालची निवडणूक चोरली जात आहे, पण तुम्ही त्यावर प्रश्न उपस्थित करत नाहीत."
त्या म्हणाल्या, "जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उभे राहून लढत होतो. पण तुम्ही (राघव चढ्ढा), तेव्हा लंडनमध्ये होता. पण आज माझ्या मनात प्रश्न येतो की, तुम्ही घाबरून लंडनला पळून गेला होता का?"
फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
आम आदमी पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले, "जेव्हा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते, त्यावेळी सरकारने त्यांना खोट्या प्रकरणात अटक केली. तेव्हा तुम्ही देशात नव्हता. तुम्ही कुठेतरी जाऊन लपला होता."
याशिवाय, सौरभ भारद्वाज यांनी राघव चढ्ढांवर संसदेत 'सॉफ्ट पीआर' करण्याचा आरोप करत म्हटलं की, "संसदेत एका छोट्या पक्षाला बोलण्यासाठी फारच मर्यादित वेळ मिळतो. आणि जर कोणी फक्त समोशांच्या गोष्टीवर बोलत असेल, तर त्यापेक्षाही देशाच्या मोठ्या मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे."
विरोधकांनीही आम आदमी पक्षामध्ये सुरू झालेल्या वादाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह वारिंग म्हणाले, "राघव चढ्ढा वेगळे आहेत आणि आम आदमी पक्ष वेगळा आहे. आम्हाला खूप आधीच कळलं होतं, जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, त्यावेळी ते लंडनला गेले होते.
"आता ते आम आदमी पक्षात राहणार नाहीत. ते कुठे जातील, मला माहीत नाही, पण लोकांच्या मनात असा समज तयार झाला आहे की, एकतर राघव चढ्ढा आम आदमी पक्ष सोडतील किंवा त्यांना काढले जाईल."
फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
भाजपचे खासदार रामवीर सिंह विधुडी म्हणाले, "जेव्हा मी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा राघव चढ्ढा हे आमदार होते. दिल्ली विधानसभेतही ते बोलत असत, त्यांचं भाषण ऐकायला छान वाटायचं. नंतर ते राज्यसभेत आले, तिथेही ते लोकहिताचे मुद्दे मांडत असतात."
ते पीटीआयला म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी राघव चढ्ढांच्या बोलण्यावर बंदी कशी घातली, हे माझ्या समजुतीपलीकडचे आहे. त्यांना उपनेतेपदी ठेवणे किंवा न ठेवणे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, पण जर एका ज्येष्ठ सदस्य आणि खासदाराला आम आदमी पक्षाने बंदी घातली असेल, तर ही लोकशाहीची हत्या, आहे, असं माझं मत आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्त्वाने याचा पुनर्विचार केला पाहिजे."
एकेकाळचे केजरीवाल यांचे विश्वासू रणनीतीकार
2013 मध्ये जेव्हा अण्णा हजारे यांचं इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात होतं, तेव्हा राघव चढ्ढा यांची अरविंद केजरीवाल यांच्याशी ओळख झाली होती.
व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेले राघव चढ्ढा त्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेऊन भारतात परतले होते.
डेली ओच्या वृत्तानुसार, राघव चढ्ढा यांचं पक्षातील पहिलं काम हे दिल्ली जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणारे वकील राहुल मेहरा यांना सहाय्य करण्याचं होतं. ही जबाबदारी त्यांना अरविंद केजरीवाल यांनी दिली होती.
राघव चढ्ढा हे पक्षाचे सर्वात तरुण प्रवक्ते बनले आणि अल्पावधीतच ते टेलिव्हिजनवर आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा बनले.
आम आदमी पक्षाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, राघव चढ्ढा हे 2013 मध्ये पक्षाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या टीमचे सदस्य होते. काही काळासाठी ते पक्षाचे कोषाध्यक्षही होते.
फोटो स्रोत, Kabir Jhangiani/NurPhoto via Getty Images
एक दशकापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या टीममध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेले राघव चढ्ढा आता त्यांच्या सर्वात विश्वासू रणनीतीकारांमध्ये गणले जात.
2019 मध्ये राघव चढ्ढा यांनी दक्षिण दिल्लीच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांना अपयश आले. त्यानंतर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिल्लीच्या राजेंद्र नगर मतदारसंघातून विजय मिळवला.
मार्च 2022 मध्ये राघव चढ्ढा आणि 4 इतर जणांना आम आदमी पक्षाने पंजाबकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. त्या वेळी राघव चढ्ढा अवघ्या 33 वर्षांचे होते आणि ते सर्वात तरुण खासदार झाले.
2022 मध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयामध्ये राघव यांची महत्त्वाची भूमिका होती, असं म्हटलं जातं. पंजाबमधील यश पाहून पक्षाने 2022 च्या अखेरीस त्यांना गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आणि त्यांना सह-प्रभारी बनवले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही