जगाचा अंत झालाच तर कसा होईल? 'या' आहेत तीन शक्यता
फोटो स्रोत, Fotograzia via Getty Images
- Author, आंद्रे बियरनॅथ
- Role, बीबीसी न्यूज, ब्राझील
- वाचन वेळ: 5 मिनिटे
दाट अंधारात, थंड आणि थोडासा कंटाळवाणा असा शेवट. किंवा एखादा अचानक, जोरदार आणि हिंसक अंत. किंवा कदाचित शेवट नसून, आणखी एक नवीन सुरुवात?
भविष्यात खूप दूर कधीतरी, ब्रह्मांड किंवा विश्वाचा अंत कसा दिसू शकतो, याबद्दलचे हे काही सिद्धांत किंवा कल्पना आहेत. कदाचित हे विश्व कधीच संपणार नाही, असंही होऊ शकतं.
या ब्रह्मांडाचं पुढे काय होणार? हा विज्ञानातील एक खूप गूढ प्रश्न आहे. इथे उत्तरांपेक्षा प्रश्नच खूप जास्त आहेत, हे तज्ज्ञही मान्य करतात.
पण हे सर्व कसं संपू शकतं हे समजून घ्यायचं असेल, तर आधी ते कसं सुरू झालं हे समजून घेतलं पाहिजे.
सुरुवात नेमकी कशी झाली?
'नासा'च्या म्हणण्यानुसार, ब्रह्मांड म्हणजे सगळंच. त्यात अवकाश, पदार्थ (ज्याला आकार आणि वस्तूमान असतं), ऊर्जा आणि अगदी वेळेचा देखील समावेश आहे.
विश्व कसं तयार झालं, याचं उत्तर खगोलशास्त्रज्ञांनी मांडलेल्या बिग बँग या सिद्धांतात (थिअरी) सापडतं.
या सिद्धांतानुसार, सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी विश्व खूपच उष्ण आणि अतिशय दाट अवस्थेत होतं, आणि ते तेव्हापासून सतत विस्तारतच आहे.
फोटो स्रोत, FlashMovie via GettyImages
विश्वाचा विस्तार होत राहिला, आणि खूप मोठ्या काळानंतर त्यातून आकाशगंगा, तारे आणि ग्रह यांसारख्या रचना तयार झाल्या.
आजही या विश्वाचा सतत विस्तार होत आहे. पण खरं तर, आपल्याला याबद्दल फारच कमी माहिती आहे.
ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सांता कॅटरिना येथील भौतिकशास्त्रज्ञ प्रा. अलेक्झांड्रे झाबोट म्हणतात की, "आमचं काम म्हणजे जणू एखाद्या नदीचा संपूर्ण प्रवाह आणि वर्तणूक पाहणं. पण त्यातून जाणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा नीट अभ्यास न करण्यासारखं आहे."
हळूहळू गोठत जाणारं विश्व (द बिग फ्रिज)
विश्वाचा असाच विस्तार होत राहिला, तर ऊर्जा इतकी पसरली जाईल की आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात राहतील.
शेवटी नवीन तारे तयार होणं थांबेल आणि आधीचे तारेही हळूहळू संपून जातील, असं ब्रिटनमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरी ग्रीनविचने स्पष्ट केलं आहे.
यानंतर अब्जावधी वर्षांनंतर, विश्व हळूहळू अधिक अंधारमय होईल आणि शेवटी थंड, काळोखाने भरलेलं आणि जवळपास रिकामं होऊन जाईल.
या कल्पनेला म्हणजेच गृहितकाला 'बिग फ्रीझ' किंवा 'हिट डेथ' म्हणून ओळखलं जातं.
फोटो स्रोत, Arctic Images via Getty Images
या कल्पनेनुसार, एक वेळ अशी येईल की विश्वातील सगळ्या गोष्टींचं तापमान सर्वत्र सारखं होईल, आणि मग रॉयल इन्स्टिट्यूशनने सांगितल्याप्रमाणे सगळं हळूहळू थांबून जाईल.
ब्राझीलमधील साओ पावलो विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ सहयोगी प्राध्यापक राऊल अब्रामो म्हणतात की, "या सर्व गोष्टी पाहता, विश्व हळूहळू अधिक रिकामं, अधिक थंड आणि एकमेकांपासून दूर जात जाईल."
ते पुढे म्हणतात, "आकाशगंगा एकमेकांपासून अधिकाधिक दूर जातील, तारे वृद्ध होतील आणि नष्ट होतील. शेवटी विश्व जणू एखाद्या स्मशानासारखं शांत आणि रिकामं होईल."
सगळं तुटून विखुरणारं विश्व (द बिग रिप)
जर हे तुम्हाला रूचत नसेल, तर आणखी एक कल्पना आहे, पण ती थोडी अधिक धक्कादायक आहे.
ही कल्पना असं सांगते की, विश्व आपला विस्तार अजून जलद करत आहे, हे प्रामुख्याने डार्क एनर्जीमुळे (एक गूढ अदृश्य शक्ती, जी विश्वाचा विस्तार वेगाने वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.) होतं.
जर असंच चालू राहिलं, तर विश्व इतकं वेगाने पसरू शकतं की गुरुत्वाकर्षण काहीही एकत्र धरू शकणार नाही, असं रॉयल म्युझियम्स ग्रीनविच सांगतं.
या गृहीतकाला 'बिग रिप' किंवा 'ग्रेट रप्चर' म्हणून ओळखलं जातं.
'नासा'च्या मते, गुरुत्वाकर्षण ही ताकद आहे जी एखाद्या ग्रह किंवा इतर शरीर वस्तूंना केंद्राकडे खेचते.
ही ताकद ग्रहांना सूर्याभोवती फिरवते, पृथ्वीला एकत्र धरून ठेवते आणि मानवांना जमिनीवर धरते, म्हणजे तो अवकाशात वाहून जाणार नाही. गुरुत्वाकर्षण हेच तारे, सौरमाला, आकाशगंगा आणि आकाशगंगा समूह (क्लस्टर्स) यांसारख्या सर्व प्रणाली एकत्र ठेवते.
प्रा. झाबोट स्पष्ट करतात की, डार्क एनर्जी हे अजून गूढ आहे आणि त्याचा परिणाम गुरुत्वाकर्षणाच्या उलट आहे, असं दिसतं. "आपल्याला अजून माहिती नाही ते कशापासून बनलेलं आहे, पण हे ठरलंय की ती वस्तूंना दूर सारते, जणू काही गुरुत्वाकर्षणविरोधी (अँटीग्रॅव्हिटी) आहे."
डार्क एनर्जीमुळे विश्वाचा विस्तार अजून वेगाने होत आहे, असं नासा सांगते. त्यांच्या माहितीनुसार, सुमारे 68.3 टक्के ते 70 टक्के विश्व डार्क एनर्जीने बनलेलं आहे.
आणि हे फक्त 1990 च्या शेवटी शोधलं गेलं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
हे इतक्या काळापर्यंत शोधलं गेलं नाही, कारण गुरुत्वाकर्षण मानव, ग्रह किंवा आकाशगंगेसारख्या छोट्या प्रमाणात जास्त प्रभावी असतं. डार्क एनर्जी फक्त खूप मोठ्या, आकाशगंगांपेक्षा (इंटरगॅलेक्टिक) मोठ्या जागेत दिसते.
प्रा. झाबोट म्हणतात, "जितकं विश्व वाढतं आणि जास्त जागा व्यापतं, तितकीच डार्क एनर्जीची वस्तूंना दूर सारण्याची ताकद वाढते. कदाचित विश्व जास्त मोठं होत असल्याने, डार्क एनर्जी आता अगदी छोट्या प्रमाणावरही महत्त्वाची होऊ लागते."
नासाच्या मते, जर डार्क एनर्जी अस्थिर असेल, तर ती बिग रिप घडवू शकते, म्हणजे विश्व इतक्या जोरात पसरू लागेल की तारे, ग्रह आणि अणू सगळं एकत्र राहणार नाहीत, जणू सगळं 'अनियंत्रित' (अनग्लूड) होईल.
प्रा. झाबोट म्हणतात, "म्हणून या सिद्धांताच्या इंग्रजी नावाचे दोन अर्थ आहेत. त्याला बिग रिप म्हणतात, ज्याचा अर्थ फाटणे, तुटणे किंवा व्यत्यय येणे होतो. पण रिप म्हणजे रेस्ट इन पीस (शांतीत विश्रांती) असंही सांगितलं जातं."
विश्वाचा शेवट: पुन्हा एकत्र होणं (द बिग क्रंच)
आणखी काही भीषण शक्यताही आहेत, ज्या विचारात आणल्या गेल्या आहेत.
नासाच्या मते, जर डार्क एनर्जी कमजोर पडली आणि तिचा परिणाम उलटा झाला, तर गुरुत्वाकर्षण विश्वाला एका ठिकाणी एकत्र खेचेल. यामुळे बिग क्रंच होईल, म्हणजे ब्रह्मांड आतून कोसळून एकत्र होईल.
दुसरा सिद्धांत असा आहे की, विश्वाचं पुन्हा एका बिंदूवर आकुंचन होईल, आणि नंतर दुसरा बिग बँग होऊन नवीन विश्व म्हणजेच ब्रह्मांड जन्मेल. याला बिग बाउन्स म्हणतात. यानुसार, आपलं विश्व आणि भविष्यातील विश्व सतत आकुंचन आणि विस्ताराच्या एका अखंड चक्रात अडकलेले असतील.
अब्रामो म्हणतात, "पण हे पूर्णपणे एक विचित्र मॉडेल आहे, ज्यासाठी आपल्याकडे कोणताही डेटा किंवा पुरावा नाही."
तर, विश्वाचा किंवा ब्रह्मांडाचा अंत कधी होईल याचा अंदाज लावणे शक्य आहे का?
"नाही, भविष्यात मोठी फूट पडेल किंवा मोठी पडझड होईल, असे कोणतेही संकेत नाहीत," असं अब्रामो यांनी सांगितलं.
तर झाबोट पुढे म्हणतात, "या अंताविषयीचे काही अंदाज अब्जावधी वर्षांचे आहेत, तर काही त्याहूनही जास्त काळाचा विचार करतात."
फोटो स्रोत, Fotograzia via Getty Images
जर ब्रह्मांड किमान 13.8 अब्ज वर्षांचं असेल, तरीही ते एक ट्रिलियन वर्षांपर्यंत पोहोचायला 986.2 अब्ज इतकी वर्षे बाकी आहेत.
नेदरलँडमधील रॅडबॉड युनिव्हर्सिटीच्या अलीकडील अभ्यासानुसार, विश्वाचा अपेक्षेपेक्षा वेगाने क्षय होत आहे. संशोधकांनी मोजलं की, शेवटचे तारे नष्ट होण्यासाठी सुमारे 10^78 वर्षे (संख्या 1 नंतर 78 शून्य) लागू शकतात.
आपल्या प्रजाती कदाचित हा शेवट पाहायला नसतील.
जेव्हा सुमारे 6 अब्ज वर्षांनी सूर्य लाल विशाल तारा बनेल, पृथ्वी कदाचित त्यापूर्वीच नष्ट होईल.
"खरं सांगायचं तर, आपल्याला अजूनही विश्वविज्ञानाबद्दल फारच कमी माहिती आहे. आज उपलब्ध मर्यादित साधनेमुळे विश्वाचे अचूक मोजमाप करणं खूप कठीण आहे," असंही अब्रामो स्पष्ट करतात.
आणि यामुळे आणखी कल्पनिक सिद्धांतांचा शोध घेण्याची शक्यता निर्माण होते. उदाहरणार्थ, मल्टीवर्स - म्हणजे एकापेक्षा जास्त विश्व अस्तित्वात असू शकतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही