आयपीएल 2026 : पहिल्याच सामन्यात कोहलीची तुफान खेळी; RCB विजयी, माजी क्रिकेटर काय म्हणाले?

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विराट कोहलीने नाबाद 69 धावा केल्या.
वाचन वेळ: 4 मिनिटे

शनिवारी संध्याकाळी, जेव्हा आयपीएलच्या चालू सिझनमध्ये बंगळूरुमध्ये हैदराबाद आणि आरसीबीचे संघ मैदानावर उतरले, तेव्हा हा सामना देखील स्पर्धेतील नेहमीच्या सामन्यांसारखाच होईल, असं वाटलं होतं.

पण जेव्हा हा सामना संपला, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर आलं. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटप्रेमींनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतलं.

विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्तम काळात होता, तेव्हा त्याचं ज्या प्रकारचं कौतुक व्हायचं तसंच कौतुक या सामन्यानंतर होताना दिसलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला.

विराट कोहलीने आरसीबीकडून डावाची सुरुवात केली. कोहलीने अवघ्या 38 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावांची खेळी केली.

त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने दिलेले 200 हून अधिक धावांचं आव्हान अगदीच सहजसाध्य झालं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

कोहली नावाचं वादळ

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून 201 धावा केल्या.

हैदराबादकडून खेळताना इशान किशनने 38 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांसह सर्वाधिक 80 धावा केल्या.

एकीकडे, ईशानच्या धमाकेदार खेळीची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे, हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी बेंगळुरूचा संघ मैदानात उतरला.

कोहली फलंदाजीला आल्याबरोबर त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांतील फॉर्ममध्ये दिसत आहे.

त्याने खेळीत पाच चौकार आणि पाच शानदार षटकार ठोकले. देवदत्त पडिक्कलनेही बेंगळुरूसाठी 26 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या.

हैदराबादचा संघ या दोन फलंदाजांच्या रौद्ररूप वादळासमोर टिकू शकला नाही. आरसीबीने अगदी सोळाव्या षटकातच हा सामना खिशात घातला.

डावाची सुरुवात करायला आलेल्या कोहलीलाही हैदराबादच्या सहा गोलंदाजांपैकी कुणीही बाद करू शकलं नाही.

तो 69 धावा करून नाबाद राहिला.

कैफ आणि इरफान पठाणनं काय म्हटलं?

जवळपास आठ महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेला कोहली अशी खेळी खेळू शकेल, असा अंदाज त्याच्या चाहत्यांनाही नसावा.

पण क्रिकेटमध्ये असं म्हटलंच जातं की, 'फॉर्म इझ टेम्पररी, बट क्लास इझ पर्मनंट'. कोहलीनं नेमका हाच 'क्लास' दाखवून दिला.

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनंही विराट कोहलीच्या या शानदार खेळीचं खूप कौतुक केलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मोहम्मद कैफसह अनेक क्रिकेटपटूंनी विराट कोहलीच्या फॉर्मचे कौतुक केले आहे.

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफनं इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहिलंय, "कल्पना करा, ऑस्ट्रेलियामध्ये दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर लोक म्हणत होते की, आता कोहलीचा खेळ संपलेला आहे. पण ब्लॅक अँड व्हाईट क्रिकेटमधील त्याच्या गेल्या दहा डावांतील कामगिरी अशी आहे. 74, 135, 102, 65, 131, 77, 93 , 23, 124 आणि आता या सामन्यात 69."

हा सामना सुरू होण्यापूर्वी कैफनं दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, "उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली या हंगामात आणखी यश मिळवण्यासाठी किती आतुर आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल."

आरसीबी आणि विराट काय विलक्षण कामगिरी आहे. त्यांनी कधीही हार मानलेली नाही. ते सातत्यानं प्रयत्न करत राहिले. आयुष्य म्हणजे एक मॅरेथॉन आहे. संयम ठेवा, धावत राहा. तुम्ही तुमचं ध्येय नक्कीच गाठाल.

माजी ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाणनं लिहिलंय की, "विराट कोहलीपेक्षा धावांचा चांगलं रन चेस कोणीही करत नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवर 28 वे अर्धशतक. तो अप्रतिम खेळाडू आहे."

'विराट - रन मशीन कोहली'

माजी फलंदाज आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रानं लिहिलंय की, "कोहलीची सर्वात मोठी ताकद ही आहे की तो आपला अहंकार बाजूला ठेवतो. पडिक्कल उत्कृष्ट फलंदाजी करत असेल, तर तो आनंदाने त्याला पाठिंबा देतो.

त्यानं रजतसोबतही असंच केलं. आपल्या संघाला सामने जिंकून देण्याचं मोठं ध्येय तो कधीही नजरेआड होऊ देत नाही. एक चॅम्पियन खेळाडू."

आकाश चोप्रानं लिहिलंय, "विराट - रन मशीन कोहली".

फोटो स्रोत, Pankaj Nangia/Getty Images

फोटो कॅप्शन, आरसीबी आयपीएल 2025 च्या हंगामाचे विजेते आहेत.

विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने लिहिलंय की, धावांचा पाठलाग करणं हाच त्याचा खेळ आहे.

आरसीबीनं आपल्या पोस्टमध्ये एका आकडेवारीचा फोटो पोस्ट केलाय आणि लिहिलंय, 'टाटा आयपीएलमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना 4 हजार धावा'.

आरसीबीनं लिहिलं आहे, "व्वा, विराट कोहली, व्वा."

विराट कोहलीने आयपीएलचे 18 सिझन खेळले आहेत. 19 व्या सिझनच्या सुरुवातीला त्यानं दाखवलेल्या फॉर्मवरून तो या स्पर्धेतील एक महत्त्वाचा खेळाडू असल्याचं दिसून आलं आहे.

आयपीएलच्या या सिझनच्या दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता खेळला जाईल.

आयपीएलच्या 2026 च्या हंमामातील सगळ्या सामन्यांचे निकाल खाली देत आहोत.

सामना क्रमांक 01 - RCB vs SRH

स्पर्धेच्या शुभारंभाचा हा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम चिन्नस्वामी मैदानावर झाला.

प्रथम फलंदाजी करत एसआरएचनं आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं. ईशान किशननं 38 चेंडूत तडाखेबाज 80 धावा केल्या. आरसीबीसाठी डफी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

पण चेसमास्टर विराट कोहलीनं नेहमीप्रमाणं हे आव्हान अगदी सोपं करून दाखवलं. 69 धावांची नाबाद खेळी करत त्यानं 26 चेंडू शिल्लक ठेवत संघाला हा विजय मिळवून दिला.

पडिक्कलनं 26 चेंडूत 61 धावा करत विजय आणखी सोपा केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)