You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केवळ एकाच नावाचा प्रस्ताव; कोण आहेत 'हे' नेते?
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी असलेल्या डॉ. के. लक्ष्मण यांनी अशी माहिती दिली आहे की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी फक्त नितीन नबीन यांच्या नावाचा प्रस्ताव आलेला आहे.
नितीन नबीन हे सध्या भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत.
डॉ. के. लक्ष्मण यांच्या माध्यमांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीच्या नामांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
डॉ. के. लक्ष्मण यांनी म्हटलं की, "राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नितीन नबीन यांच्या बाजूने एकूण 37 सेट नामांकन पत्र मिळाले आहेत. नामांकन पत्रांच्या तपासणीमध्ये ही सर्व नामांकन पत्रे आवश्यक त्या प्रारूपामध्ये आहेत तसेच ती वैध असल्याचं आढळलं आहे."
भाजपने आपला नवा अध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली आहे. सोमवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या पदासाठी कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नामांकनासाठीची प्रक्रिया पूर्ण केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुकीसाठीच्या रिटर्निंग ऑफिसर यांना नितीन नबीन यांचं नामांकन पत्र सुपूर्द केलं आहे.
या दरम्यान गृहमंत्री अमित शाह, रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, निर्मला सीतारमण आणि किरेन रिजिजू यांसारखे नेतेही उपस्थित होते.
जेपी नड्डा यांनी एक्सवर पोस्ट केलं आहे की, "आज भाजप मुख्यालय, नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी श्री नितीन नवीन जी यांचे नामांकन पत्र दाखल केलं आहे."
नितीन नबीन सध्या भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
बिहार सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नितीन नबीन यांना 14 डिसेंबर रोजी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं होतं.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रात म्हटलं होतं, "भाजपाच्या संसदीय बोर्डानं बिहार सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नितीन नबीन यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केलं आहे."
या पत्रानुसार, नितीन नबीन यांची नियुक्ती तत्काळ प्रभावानं लागू झाली.
नितीन नबीन बिहार सरकारमध्ये रस्ते निर्माण मंत्री आहेत, तसंच भाजपाचे छत्तीसगडचे प्रभारी होते. ते बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नितीन नबीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले होते.
ते म्हणाले होते, "हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम आहेत. मला वाटतं की कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते नेहमीच तुमच्यावर लक्ष देतात. मला जो आशीर्वाद मिळाला आहे. आम्ही मिळून काम करू."
पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं, "श्री नितीन नबीन जी यांनी एक कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. ते एक तरुण आणि मेहनती नेते आहेत. त्यांच्याकडे संघटनेचा चांगला अनुभव आहे."
"बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे. त्याचबरोबर लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी समर्पित होऊन काम केलं आहे."
"ते विनम्रपणे काम करण्यासाठी ओळखले जातात. मला पूर्ण खात्री आहे की त्यांची ऊर्जा आणि कटिबद्धता यामुळे येणाऱ्या काळात आमच्या पक्षाची ताकद आणखी वाढेल. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा."
2006 मध्ये बिहारमधील पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नितीन नबीन पहिल्यांदा आमदार झाले होते. 2010 ते 2025 पर्यंत ते सातत्यानं पाच वेळा बांकीपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत.
नितीन नबीन सध्या बिहारच्या एनडीए सरकारमध्ये रस्ते निर्माण आणि नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री आहेत.
निवडणूक आयोगाकडे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, नितीन नबीन यांच्या वडिलांचं नाव नवीन किशोर प्रसाद सिन्हा आहे. ते पाटण्यातील टेलर रोडचे रहिवासी आहेत.
त्यानुसार त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते दाखवलं आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर कोणतंही गुन्हेगारी प्रकरण नाही आणि कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं नाही.
नितीन नबीन 1996 मध्ये पाटण्यातील सेंट मायकल हायस्कूलमधून मॅट्रिक झाले आणि 1998 मध्ये त्यांनी दिल्लीतील सीएसकेएम पब्लिक स्कूलमधून इंटरचं शिक्षण पूर्ण केलं.
भाजप की आरएसएस, हा विजय कोणाचा?
भाजपच्या नवीन अध्यक्षाचे पद पक्षासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. विशेषतः पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर 2027 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भाजपमध्ये आजवर अध्यक्षपदासाठी कधीही मतदान झालेले नाही.
पक्षाची परंपरा अशी आहे की बीजेपी आणि संघातील नेते आपसात विचारमंथन करतात आणि पक्षाच्या गरजांचा विचार करून अध्यक्षाची निवड केली जाते.
ज्येष्ठ पत्रकार बृजेश शुक्ला सांगतात, "जेव्हा नितीन गडकरी यांना भाजपचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं, तेव्हा त्यांचीही राष्ट्रीय राजकारणात फार मोठी भूमिका नव्हती. आता मात्र, भाजप भविष्यासाठी आपले नेतृत्व तयार करत आहे, ज्यामध्ये काँग्रेस खूप मागे पडली आहे."
नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) जवळचे मानले जातात. तर नितीन नबीन यांचा संघाशी दुरावा नसला, तरी त्यांना संघाच्या जवळचे नेते मानले जात नाही.
बृजेश शुक्ला म्हणतात, "नितीन गडकरींचा काळ हा भाजपमधील संघाच्या जवळच्या सहकाऱ्यांचा काळ होता. सध्याचा काळ हा संघाच्या जवळच्या सहकाऱ्यांचा काळ राहिलेला नाही. आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचा काळ आला आहे."
असं मानलं जातंय की, नितीन नबीन आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीही कोणत्याही वादात अडकले नाहीत आणि म्हणूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
मात्र नचिकेता नारायण यांच्या मते, नितीन नबीन यांना नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून पाहिले जाऊ शकते.
याबाबत बोलताना त्यांनी एक घटना आठवून सांगितली. ते म्हणाले, "2010 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी बिहारची राजधानी पाटणा येथे आले होते. त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली होती. त्या जाहिरातीत नितीन नबीन आणि संजीव चौरसिया या दोन आमदारांचे फोटो छापण्यात आले होते."
ते म्हणतात, "त्या जाहिरातीतील फोटोच्या निषेधार्थ नीतीश कुमार यांनी भाजप नेत्यांसाठी आयोजित केलेला जेवणाचा कार्यक्रम रद्द केला होता. आपण असे म्हणू शकतो की राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींबद्दल राष्ट्रीय राजकारणात फारशी चर्चा नसतानाही नितीन नबीन यांचा कल मोदींकडे होता."
नचिकेता नारायण म्हणतात, "नितीन नबीन यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पक्षाच्या बाबतीत आरएसएसवर त्यांचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे."
कोण आहेत नितीन नबीन?
नितीन नबीन पाटण्यातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि बिहार सरकारमधील मंत्री आहेत.
ज्येष्ठ पत्रकार नचिकेता नारायण यांच्या मते, "नितीन नबीन यांनी 2006 मध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांना वारश्यात राजकारण मिळालं असंही म्हणता येईल. कारण त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हेही सुरुवातीच्या काळात अनेक वेळा भाजप आमदार होते. वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन या जागेवरून विजयी होत आहेत.
नितीन नबीन 2017-2018 मध्ये भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष होते. 2020 मध्ये त्यांना सर्वात आधी नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आलं होतं.
नचिकेता नारायण यांनी एका रंजक घटनेचीही आठवण करून दिली.
"नितीश कुमार यांनी एकदा ज्या फोटोविरोधात जेवणाचा कार्यक्रम रद्द केला होता, तो फोटो नितीन नबीन आणि संजीव चौरसिया या दोन आमदारांनी वर्तमानपत्रात छापून आणला होता. त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींबद्दल कोणतीही चर्चा नव्हती तेव्हापासून नितीन नबीन मोदींकडे झुकले होते, असं म्हणता येईल."
ही 2010 ची घटना आहे. तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी बिहारची राजधानी पाटण्यात आले होते.
त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली होती.
या जाहिरातीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र हातात हात धरून असल्याचं दाखवण्यात आलं होतं. गुजरात सरकारनं पुरात बिहारला कशी मदत केली याचं त्यात वर्णन केलं होतं.
त्यावर नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं होतं की, ही जाहिरात त्यांच्या परवानगीशिवाय प्रकाशित करण्यात आली आहे.
जाहिरातीमुळं संतप्त झालेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजप नेत्यांसोबतचा जेवणाचा कार्यक्रम रद्द केल्याची बरीच चर्चाही तेव्हा झाली होती.
नचिकेता नारायण यांच्या मते, "नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष का बनवण्यात आलं? हे लगेचच निश्चितपणे सांगणं सोपं नाही. पण भाजपचं सर्वोच्च नेतृत्व त्यांच्यावर विश्वास ठेवतं हे त्यावरून निश्चितपणे दिसून येतं."
भाजपने का केली कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती?
भाजपला दीर्घकाळापासून नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर निर्णय घेता आला नव्हता. त्याची राजकीय वर्तुळात आणि संसदेतही चर्चा होत होती.
"भाजपला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्षही निवडता आलेला नाही", अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संसदेत केला होता.
त्यावेळी, यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, "भाजप हा कुटुंबाचा नाही तर कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे, म्हणूनच विलंब होत आहे", असं उत्तर दिलं होतं.
भाजपनं अनेकदा जेपी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला आहे. त्यामुळं यावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या मते, "हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. जेपी नड्डा यांना जवळजवळ तीन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळं या मुद्द्यावरील प्रश्न टाळण्यासाठी भाजपनं कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले आहेत, असं दिसतं. पण या पावलामुळं प्रश्न आणखी वाढतील."
त्यांच्या मते, "लोक आता, भाजप आणि आरएसएसमध्ये काही मतभेद आहेत का? असंही विचारू शकतात. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वात एका नावावर एकमत नाही काय़ म्हणूनच त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्याऐवजी आता कार्यकारी अध्यक्षाचं नाव पुढे आले आहे का?"
रशीद किडवई म्हणतात की, एखादा नेता भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारतो तेव्हा राष्ट्रीय पातळीवर त्याला एक दूरदृष्टी असली पाहिजे. देशाच्या विविध भागातील लोकांच्या त्यांना बैठका घ्याव्या लागतात.
नितीन नबीन या पदावर किती दिवस राहतील हे सध्या निश्चित झालेलं नाही.
पण, अनेकदा असे पाहायला मिळतं की, पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व अशा व्यक्तीकडं पक्षाची जबाबदारी सोपवतं ज्यांच्याद्वारे सहजपणे काम होऊ शकेल.
पण भाजपच्या या निर्णयामुळं राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळणार? की विरोधक या मुद्द्यावर नवीन प्रश्न उपस्थित करणार? हेही आता पाहावं लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)