सिंधू संस्कृती : हजारो वर्षांपूर्वीच्या 'या' अद्भुत आणि रहस्यमय शहरांचा अंत कसा झाला?
फोटो स्रोत, DEA / W Buss via Getty Images
- Author, डेजी स्टीफन्स
- Role, बीबीसी न्यूज
- वाचन वेळ: 5 मिनिटे
बहुमजली विटांची घरं, एकसारखे रस्ते आणि आधुनिक नाल्यांची सोय म्हणजेच प्रगत ड्रेनेज सिस्टिम, अगदी फ्लश टॉयलेटसह. हे वर्णन तुम्हाला ओळखीचं वाटतंय का?
हे वाचताना आपल्याला आधुनिक शहराची आठवण येते, पण खरंतर हे हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीच्या प्राचीन शहरांचं वर्णन आहे.
ही संस्कृती खूप प्रगत, अत्याधुनिक अशी होती आणि प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमियाबरोबरच अस्तित्वात होती. तरीही आपल्याला तिच्याबाबत तुलनेनं फार कमी माहिती आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे रहस्य अंशतः त्याचा अजूनही अर्थ न लावता आलेल्या म्हणजे न समजलेल्या लेखनामुळे आहे. कदाचित त्यांच्या समाजात त्या काळातील इतर समाजांपेक्षा जास्त समता होती.
सिंधू संस्कृतीची सर्वात विकसित अवस्था सुमारे इ. स. पूर्व 2600 ते इ. स. पूर्व 1900 दरम्यान होती. परंतु, तिचा विकास त्यापेक्षा खूप आधीपासून सुरू झाला होता. साधारण इसपूर्व 4000 पूर्वी, असं यूकेच्या ऑक्सफर्ड आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील व्याख्याते डॉ. संगारलिंगम रमेश सांगतात.
ही संस्कृती सिंधू नदीच्या आसपास वसली होती. आता ती पाकिस्तान आणि भारतात आहे. यात शेती करणारी गावं, तसेच 1400 पेक्षा जास्त शहरं होती. यामध्ये सर्वात मोठ्या हडप्पा आणि मोहेंजोदडो यांचा समावेश होता.
ही संस्कृती प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमियापेक्षा मोठी होती. सुमारे 80 हजार वस्त्यांमध्ये सुमारे 10 लाख लोक राहायचे, असं डॉ. रमेश यांनी सांगितलं.
आणि त्यांना काही कारणांसाठी विशेषही मानलं जातं.
प्रगत शहर नियोजन
डॉ. रमेश म्हणतात की, सिंधू खोरे ही पहिल्या संस्कृती किंवा सभ्यतांपैकी एक होती जिने विटांपासून घरं बांधली, आणि त्यांनी विटांच्या एकसारख्या आकारमानांचा वापर केला.
"शहरं सरळ रस्त्यांसह आणि एकमेकांना कोनात जुळणाऱ्या रेषांमध्ये बनवली होती," अशी माहिती त्यांनी दिली.
"शहरांमध्ये विहिरी होत्या, घरांमध्ये शौचालयं होती आणि रोमन लोकांपेक्षा 2 हजार वर्षे आधीच अस्वच्छ पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची व्यवस्था होती."
डॉ. रमेश म्हणतात, नाले आणि स्नानगृहे पाहिल्यानंतर लक्षात येतं की या संस्कृतीला आजारांची माहिती होती आणि त्यांनी 'स्वच्छतेवर भर दिला होता'.
शहरांमध्ये लोक जास्त असल्याने सामान पोहोचवणं सोपे झाले, आणि त्यामुळे व्यापारालाही परवानगी मिळाली.
डॉ. रमेश सांगतात की, "त्यांनी प्राचीन मेसोपोटेमियाशी व्यापार केला. त्यात प्रामुख्याने लाकूड, मणी, तांबं, सोनं आणि सुती कापड यांसारख्या कच्च्या मालाचा व्यापार केला."
सामूहिक शासन व्यवस्था
शहरांचे नियोजन आणखी बरंच काही दाखवून देतं, असं डॉ. रमेश म्हणतात.
"शहरातील रस्ते, नाले आणि इतर सोयीसुविधा आणि त्याची देखभाल पाहता त्यावेळी तिथे चांगलं काम करणारं नागरी प्राधिकरण होतं, हे दिसून येतं," असं ते सांगतात.
"त्यांची शासनाची पद्धत जास्त प्रगत होती, एकत्रित निर्णय घेतले जात, आणि राजवाडे किंवा उच्चवर्गाचे दाखलेही दिसत नाहीत."
फोटो स्रोत, Leemage/Corbis via Getty Images
त्यांच्या मते, हीच गोष्ट सिंधू खोऱ्यातील संस्कृतीला त्या काळातील इतर समाजांपेक्षा वेगळं करते.
"इथल्या अवशेषांवरून दिसून येतं की, सिंधू खोऱ्यात इजिप्शियन फारो किंवा मेसोपोटेमियाप्रमाणे एखादा राजा किंवा भव्य राजवाडे नव्हते."
डॉ. रमेश म्हणतात की, "तिथल्या इतर प्राचीन सभ्यतांमध्ये सत्ता एका व्यक्तीकडे केंद्रित होती, आणि त्यांच्या राजवाडे व इमारतीवरून ही सत्ता दिसून येत असत."
तुलनेनं समान आणि शांततापूर्ण
सिंधू खोऱ्यात काही सामाजिक उतरंड असल्याचे पुरावे आहेत. परंतु, त्या काळातील इतर समाजांइतके फार स्पष्ट दिसत नाही.
"इजिप्त आणि मेसोपोटेमियात समाजातील भिन्न स्तर स्पष्ट दिसून येतात. परंतु, सिंधूमध्ये घरांच्या आकारामध्ये थोडा फरक आहे, आणि तो जास्त स्पष्ट नाही," असं डॉ. रमेश म्हणतात.
पुरातत्व शास्त्रज्ञांना काही मानवी सांगाडे सापडले. या सांगड्यावर हिंसाचाराचे काही पुरावे दिसून येतात. परंतु, काही तज्ज्ञांच्या मते सिंधू संस्कृती इतर समाजांपेक्षा अधिक शांत होती.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
डॉ. रमेश सांगतात की, "येथे युद्धाशी संबंधित चिन्हं फार नाहीत. शस्त्रांनी भरलेल्या उच्चवर्गीय ठिकाणांची संख्याही कमी आहे. आणि काही सांगाड्यांवरच्या जखमा प्राचीन निअर ईस्टच्या तुलनेत कमी आहेत."
याचा अर्थ असा नाही की ते हिंसक नव्हते. कदाचित ते न जपल्यामुळे पुरावे कमी असू शकतात, असंही डॉ. रमेश म्हणतात.
त्यांच्या मते, "जर एखाद्या समाजाने युद्धाची स्मारकं दाखवली नाही किंवा ग्रंथाद्वारे इतिहासात त्याचे पुरावे ठेवले नाहीत, तर आपण चुकून ते शांत होते, असा समज करून घेऊ शकतो."
प्राचीन रहस्यांचा उलगडा
परंतु, सिंधू संस्कृतीबद्दल आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत.
याचं एक कारण म्हणजे त्यापैकी बऱ्याच गोष्टींचं अजून उत्खनन झालेलं नाही, असं डॉ. रमेश सांगतात.
"पश्चिम भारतात अजूनही अशा साइट्स सापडत आहेत, आणि ही सभ्यता अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली होती. तिथली परिस्थिती पाहता सध्या जास्त उत्खनन करता येत नाही," असं डॉ. रमेश म्हणतात.
कदाचित हे त्यांनी कसं बांधलं होतं आणि त्यांनी कोणत्या पद्धती वापरल्या यामुळे देखील असू शकतं.
डॉ. रमेश म्हणतात की, "इजिप्त आणि मेसोपोटेमियाने मजबूत दगडी स्मारकं उभी केली, तर सिंधू खोऱ्यातील लोक प्रामुख्याने मातीच्या विटा (मडब्रिक) आणि भाजलेल्या विटा वापरून बांधकाम करत असत."
फोटो स्रोत, DEA / G Nimatallah via Getty Images
"मोठी दगडी मंदिरं, राजवाडे किंवा राजेशाही समाधी नसल्यामुळे सिंधू राज्य समजून घेणं कठीण आहे."
पण आणखी एक कारण आहे, प्राचीन मेसोपोटेमियातील क्यूनिफॉर्मसारख्या (सर्वात प्राचीन ज्ञात लेखन प्रणाली) लेखनपद्धतीच्या उलट, आपण अजूनही सिंधू खोऱ्याची लिपी उलगडू शकलेलो नाही किंवा ते लेखन वाचू शकलेलो नाही.
सिंधू खोऱ्यातील साईट्सवर सापडलेल्या मोहऱ्यांवर (सील्स) हे लेखन वापरण्यात आले होते.
हे "सर्वात जास्त प्रयत्न करूनही अद्याप न उलगडलेलं लेखन आहे," असं मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधील डॉ. निशा यादव गंमतीने म्हणतात.
त्या म्हणतात, "दर 10 दिवसांनी मला, मी सिंधू लिपी क्रॅक केली आहे, असं सांगणारा ई-मेल येतो."
परंतु, आतापर्यंत या लेखनाचे कोणतेही अर्थ शास्त्रीयदृष्ट्या सर्वांना मान्य झालेले नाहीत.
डॉ. यादव म्हणतात की, सिंधू लेखन वाचणं कठीण आहे. कारण ते खूप लहान आहे. प्रत्येक सीलवर फक्त 5 ते 14 चिन्हे असतात, आणि अद्याप त्यासाठी रोसेटा स्टोनसारखी वस्तू सापडलेली नाही.
रोसेटा स्टोनवर तीन लेखनपद्धतीचे उतारे होते- इजिप्शियन हायरोग्लिफिक, इजिप्शियन डेमोटिक आणि क्लासिकल ग्रीक - जो हायरोग्लिफ्सचा (चित्रलिपी) उलगडा करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
पण त्यांच्या स्वतःच्या संशोधनात, त्यांनी कॉम्प्युटरचा वापर करून चिन्हांमध्ये नमुने शोधले आहेत. लेखनात वाक्यरचना नियम आणि 'आंतरिक किंवा मुलभूत तर्क' (अंडरलाईंग लॉजिक) सापडल्याचे पुरावे दिसले आहेत.
त्या म्हणतात, "जर आपण हे वाचू शकलो, तर ते जणू एकाच चावीसारखे असेल, ज्यामुळे अनेक दरवाजे उघडतील."
"आणि प्रत्येक दरवाजातून ज्ञानाचा पूर येईल. तो आपल्याला त्या संस्कृतीच्या विविध पैलूंविषयी महत्त्वाची माहिती देईल."
डॉ. यादव म्हणाल्या की, हे लेखन संस्कृतीच्या विश्वासाबद्दल आणि जगाबद्दलच्या विचारांबद्दल माहिती देऊ शकते, तसेच त्यांच्या व्यापारावर आणि मोहऱ्यांच्या (सील) भूमिकेवरही अधिक प्रकाश टाकू शकेल.
सिंधू संस्कृतीचा अंत कसा झाला?
सिंधू खोऱ्यातील संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मुख्य सिद्धांतांपैकी एक म्हणजे पर्यावरणातील बदल.
डॉ. रमेश म्हणाले की, "इ.स.पूर्व 1900 च्या आसपास लोक हे ठिकाण सोडून जाऊ लागले. मान्सूनमधील बदल हे यामागचं मुख्य कारण असल्याचे पुरातत्व शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ सांगतात."
त्यावेळचे तिथले लोक पुराचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत होते, असे पुरावे मोहेंजोदडोमधील उत्खननात आढळून आले आहेत, अशी माहिती डॉ. रमेश यांनी दिली.
डॉ. रमेश म्हणतात की, ही परिस्थिती समजून घेणं आधुनिक समाजासाठी महत्त्वाचं आहे. कारण जर आज हिमालयातील हिमनद्या अधिक वेगाने वितळल्या तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
त्यांच्या मते, सिंधू खोऱ्यात समाजातील सर्वांनी मिळून निर्णय घेण्याची म्हणजे एकमत-आधारित पद्धत होती. ही पद्धत दीर्घकालीन विचार करण्यास मदत करत असत.
परंतु, ही पद्धत त्यांना वाचवू शकली नाही. पण आधुनिक समाजासाठी ही पद्धत उपयोगी ठरू शकते.
प्रत्यक्षात काय चाललं आहे, हे शोधण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे तंत्रज्ञान नव्हतं, असं डॉ. रमेश सांगतात.
"पण आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्याचा योग्य वापर करून आपण आपली संस्कृती टिकवून ठेवू शकतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही