'तर मग ट्रॉफी चर्च, मशीद आणि गुरुद्वारातही नेणार आहात का?' कीर्ती आझाद यांच्या वक्तव्यावरुन का वाद पेटला?

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सूर्यकुमार यादव, जय शाह आणि गौतम गंभीर
वाचन वेळ: 5 मिनिटे

माजी क्रिकेटपटू आणि सध्या तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेले कीर्ती आझाद यांनी टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी मंदिरात नेण्यावरून टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेले कीर्ती आझाद म्हणाले की, विजेत्या संघात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन सर्वजण होते. पण ट्रॉफी मात्र मंदिरात नेली गेली. भारतीय संघाला याबद्दल लाज वाटली पाहिजे.

आझाद यांच्या या वक्तव्यानंतर चॅम्पियन संघातील ईशान किशनसह अनेक माजी खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

8 मार्च रोजी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला होता.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह अहमदाबादमधील एका हनुमान मंदिरात गेले होते. यावर कीर्ती आझाद यांनी भाष्य केलं होतं.

त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं, "टीम इंडियाला लाज वाटली पाहिजे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्ल्ड कप जिंकला होता. आमच्या संघात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख सगळे होते. आम्ही ट्रॉफी आमच्या मातृभूमी भारतात आणली. अखेर भारतीय क्रिकेटच्या ट्रॉफीला का ओढलं जात आहे?"

पुढे त्यांनी लिहिलं, "मग ही ट्रॉफी मशिदीत का नेली नाही? चर्चमध्ये का नेली नाही? गुरुद्वारात का नेली नाही? ही टीम भारताचं प्रतिनिधित्व करते, सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचं नाही."

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी मंदिरात नेल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

"सिराजने ही ट्रॉफी कधी मशिदीत नेली नाही, संजूने ती कधी चर्चमध्ये नेली नाही. ही ट्रॉफी 140 कोटी भारतीयांची आहे. ती एका धर्माच्या विजयाचा उत्सव नाही!"

गौतम गंभीरने काय म्हटले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कीर्ती आझाद यांच्या वक्तव्यावर निराशा व्यक्त केली आहे.

एएनआयच्या पॉडकास्टमध्ये गौतम गंभीर म्हणाले, "यावर मी काय बोलू? या प्रश्नाचं उत्तर देण्यातही काही अर्थ नाही. हा संपूर्ण देशासाठी मोठा क्षण आहे. माझ्या मते आपण वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद साजरा केला पाहिजे. अशा गोष्टी उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्यामुळे खेळाडूंच्या यशावर पाणी पडू शकतं."

"जर आपण त्या 15 खेळाडूंच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं, तर उद्या कोणीही उठेल आणि काहीही बोलत राहील आणि आपण ते गंभीरपणे घ्यायला लागलो, हे खेळाडूंसाठी योग्य नाही."

गौतम गंभीर म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर खेळाडूंवर खूप दबाव होता आणि तरीही ते चॅम्पियन झाले. अशा प्रकारची वक्तव्यं त्यांच्या यशाची किंमत कमी करतात.

"कल्पना करा, त्या खेळाडूंनी किती सहन केलं असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एक सामना गमावल्यानंतर त्यांच्यावर किती दबाव आला असेल. अशा वेळी असे वक्तव्य केल्याने आपण आपल्या खेळाडूंनाच आणि आपल्या संघालाच कमी लेखत आहोत. हे योग्य नाही."

ईशान किशन काय म्हणाला?

पाटणा येथे पोहोचल्यावर ईशान किशनने विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला कीर्ती आझाद यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, "आम्ही इतका मोठा वर्ल्ड कप जिंकलो आहोत. तुम्ही चांगले प्रश्न विचारा. कीर्ती आझाद काय बोलले यावर मी काय बोलू? काही चांगले प्रश्न विचारा."

काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "कीर्ती आझाद अगदी बरोबर बोलले आहेत. मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आपल्या देशात ट्रॉफी मंदिर, मशीद किंवा इतर धार्मिक ठिकाणी नेण्याची परंपरा नाही. ही चुकीच्या परंपरेची सुरूवात आहे."

अहमदाबादमधील हनुमान मंदिराचे महंत ईश्वरदास महाराज म्हणाले, "हे आमच्या श्रद्धा, भक्ती आणि आस्थेशी संबंधित आहे. पण ज्यांना हे समजत नाही, तेच यावर प्रश्न उपस्थित करतात."

फोटो स्रोत, Punit PARANJPE / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, ईशान किशनने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत 25 चेंडूत 54 धावा केल्या होत्या.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, "हे कोणी केलं मला माहीत नाही. पण भारताची ओळख सनातन परंपरेशी जोडलेली आहे. भारताची ओळख ख्रिश्चन किंवा मुसलमानांमुळे नाही."

शिवसेनेचे नेते कृष्णा हेगडे म्हणाले, "याला धर्माशी जोडणं योग्य नाही. भारतीय संघाला ट्रॉफी कुठे न्यायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यासाठी त्यांना कीर्ती आझाद यांच्या परवानगीची गरज नाही. अशा प्रक्षोभक वक्तव्यांमुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये."

टीम इंडियाचे माजी फिरकीपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंह म्हणाले की, भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षक मंदिरात गेले म्हणून त्यावर प्रश्न उपस्थित करू नयेत. ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे.

हरभजन सिंह म्हणाले, "त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. खेळ आणि राजकारण वेगळं ठेवायला हवं. तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही मंदिरात जा, गुरुद्वारात जा किंवा कुठेही जा. ते कुठे गेले असतील तर ती त्यांची इच्छा आहे."

कीर्ती आझाद कोण आहेत?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, उजव्या हाताने फलंदाजी करणारे आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करणारे कीर्ती आझाद यांनी भारतासाठी 7 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यांनी 135 धावा केल्या आहेत.

आझाद यांनी 1981 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत पर्दापण केलं होतं.

त्यांनी टीम इंडियाकडून पहिला वनडे सामना 6 डिसेंबर 1980 रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता.

त्यांनी 25 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी 269 धावा केल्या आहेत. नाबाद 39 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.

कीर्ती आझाद यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं यश मिळालं नाही. पण ते 1980 ते 1990 पर्यंत दिल्ली क्रिकेटचे प्रमुख खेळाडू होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीने 1991-92 मध्ये 16 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचे जेतेपद मिळवले होते.

एक योगायोग म्हणजे, दिल्लीने पाच वेळा रणजी ट्रॉफी जिंकली, त्या सर्व वेळी संघात खेळणारे कीर्ती आझाद हे एकमेव खेळाडू होते.

फोटो स्रोत, Sondeep Shankar/Getty Images

फोटो कॅप्शन, कीर्ती आझाद (डावीकडे) आपले सहकारी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांच्यासोबत. दोघेही 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचे सदस्य होते.

कीर्ती आझाद हे 2002 ते 2006 या काळात उत्तर विभागाकडून राष्ट्रीय निवड समितीचे सदस्यही होते.

हा तो काळ होता, जेव्हा एमएस धोनी, पार्थिव पटेल, लक्ष्मीपती बालाजी, आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर आणि श्रीशांत यांसारख्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

याशिवाय कीर्ती आझाद हे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) कठोर टीकाकारही राहिले आहेत.

त्यांनी आयपीएलवर टीका करत, ही फिक्सिंगला प्रोत्साहन देणारी स्पर्धा असल्याचं म्हटलं होतं. आयपीएलशी संबंधित वादांदरम्यान ते असंही म्हणाले होते की, बीसीसीआयशी असलेल्या संबंधाचा त्यांना रागही येतो आणि लाजही वाटते.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कीर्ती आझाद हे राजकारणात सक्रिय झाले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.