You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात एकाचवेळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेची लाट; असं का घडतंय?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नागपूर
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट होतेय.
तर हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ असा भाग आहे जिथं उन्हाळ्यात तापमान 48 अंश सेल्सियसपर्यंत जातं. पण, गेल्या दोन वर्षांत कडाक्याचं उन तापणाऱ्या विदर्भात एप्रिल, मे महिन्यातच पाऊसही पडताना दिसतो आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू लागला आहे.
एकीकडे गारपीट, पाऊस आणि दुसरीकडे उष्णतेची लाट महाराष्ट्रात असं का घडतंय? ऐन उन्हाळ्यात विदर्भात पाऊस का पडतो? हवामानाचा पॅटर्न बदललाय का? या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात.
पण, त्याआधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला यावर एक नजर टाकूया.
गारपीट आणि उष्णतेची लाट
भारतीय हवामान विभागानं, 24 एप्रिलपर्यंत विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वाशिम, तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तविली होती.
तसंच 22 एप्रिलला नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.
त्यानुसार या जिल्ह्यातील काही भागात पाऊस कोसळला. नागपुरात सोमवारी दिवसभर ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. यामुळे फळबागांचं नुकसान झालं. वीज पडल्यामुळे वर्धा जिल्ह्य़ात एका महिलेचा मृत्यू झाला.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही विदर्भाला गारपिटीचा तडाखा बसला होता. यावेळीही पिकांचं नुकसान झालं होतं.
दुसरीकडे याच काळात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.
हवामान बदलाचा थेट फटका?
उन्हाळ्यात विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांचं तापमान 40 अंशाच्या वर जातं. कधी कधी 48 अंशापर्यंत पारा वर चढतो. त्यामुळे या काळात उष्णतेच्या लाटा येेणं नवं नाही.
पण मार्च महिन्यापासूनच पावासाला सुरुवात झाली. मार्च, एप्रिल महिन्यात गारपिटही झाली. असं का घडतं?
तर बंगालच्या उपसागरावरील हवेत वरच्या स्तरात अँटी सॉयक्लॉनिक सर्क्युलेशन (उलट्या दिशेनं चक्राकार फिरणारे वारे) तयार झालं, आणि तिथून थंड वारेे विदर्भाकडे वाहू लागले.
याउलट दुसरीकडे गुजरात आणि अरबी समुद्रावरील हवेच्या वरच्या स्तरातही अँटी सॉयक्लॉनिक सर्क्युलेशनमुळेे तिथले गरम वारे वाहू लागले.
हे दोन्ही वारे मध्य भारतात येऊन एकमेकांना भिडतात. त्यामुळे छत्तीसगडपासून तर आंध्रप्रदेशपर्यंत वाऱ्यांच्या प्रणालीवर परिणमाम होऊन इथेे पाऊस आणि गारपीट होत आहे, असं मध्य भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मोहनलाल शाहू सांगतात.
उन्हाळ्यात राजस्थानकडून उष्ण वारे विदर्भात वाहतात. त्यामुळे विदर्भातील तापमान उन्हाळ्यात जास्त असतं.
पण या राजस्थानकडून येणाऱ्या वाऱ्यांचं प्रमाण कमी जास्त झालं, की त्याचाही विदर्भातील वातावरणावर परिणाम होतो, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ, प्रविणकुमार बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, ‘’आपण याला हवामान बदलाचा परिणाम म्हणू शकतो. हा परिणाम आता जाणवू लागला आहे. विदर्भात मान्सूनचं आगमन देखील आठ दिवस उशिरानं होऊ लागलंय.’’
आपल्याला वाटतं हे अचानक उद्भवणारं आहे. पण, गारपीट होण्यासाठी जमीन तापणंही गरजेचं असतं.
मार्च ते मे मध्ये असा असतो पाऊस
महाराष्ट्रात वर्षभरात एकूण पडणाऱ्या पावसापैकी 88.4 टक्के, म्हणजेे बहुतांश पाऊस हा नॅऋत्य मान्सूनच्या तर 8.6% पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबर या ळात पडतो. तर 2.3 टक्के पाऊस मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत पडतो.
1971 ते 2020 या पन्नास वर्षांतल्या पावसाच्या आकडेवारीवरून ही सरासरी हवामान विभागानं काढली आहे.
आपण मागील 10 वर्षांत मे आणि एप्रिल महिन्यात किती पाऊस कोसळला आणि तापमान किती होतं यावर एक नजर टाकूया.
याबद्दलच हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं, "वादळी वाऱ्याच्या पावसाचा कालावधी हा मार्च ते मे महिना असतो. याच काळात वादळी पाऊस कोसळतो. पण, त्याची तीव्रता वाढली आहे का? हे अभ्यास करून तपासायला हवं."
तीव्र उन्हाळा आणि गारपीट एकाचवेळी कसं काय?
किनारी प्रदेशात 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान असेल आणि ते बराच काळ वर राहिलं तर उष्णतेची लाट समजली जाते, तर विदर्भ मराठवाड्यात पारा 45 अंशाच्या वर गेला तर त्याला उष्णतेची लाट समजली जाते.
उष्णतेची लाट किनारी प्रदेशात म्हणजे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमध्ये आहे आणि अवकाळी पाऊस हा विदर्भ, मराठवाड्यात (इन लँड प्रदेश) कोसळतोय. मग एकाचवेळी महाराष्ट्रात अशा दोन परिस्थिती निर्माण का झाल्या?
कारण कोकण आणि विदर्भ, मराठवाडा या दोन्ही भागांतली भौगोलिक स्थिती आणि वातावरण वेगवेगळं आहे. त्यामुळे दोन्ही भागाच्या तापमानात बदल दिसून येतात, असं शाहू सांगतात.
पर्यावरण तज्ज्ञ अतुळ देऊळगावकर यांच्या मते या पावसात हवामान बदलाचाही वाटा आहे. आधी अवकाळी पाऊस एखाद्या वेळी पडायचा. पण, आता सलग तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडताना दिसतोय.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 11 ते 15 एप्रिल असा सलग चार दिवस विदर्भात पाऊस कोसळला. मग पुन्हा सलग तीन ते चार दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचवेळी दुसऱ्या भागात उष्णतेची लाट होती.
देऊळगावकर सांगतात, "वाढत्या कार्बन उत्सर्जनाचा परिणाम म्हणून समुद्राचं तापमानही बदलतंय. समुद्र वेळी-अवेळी तापतो आणि त्यामुळे कधीही पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या लाटा येतात. पण आपला हवामान विभाग क्लायमेट चेंजमुळे हे होतं असं सांगत नाही. जागतिक पातळीवर मात्र याचा शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत."