जर्मनी आणि बेल्जियममध्ये पुरामुळे हाहाःकार, 150 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

विक्रमी पावसामुळे जर्मनी आणि बेल्जियममध्ये नद्यांना पूर आलाय. पश्चिम युरोपमध्ये आतापर्यंत 150 जणांचा बळी गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत.

स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स या देशांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रूट यांनी दक्षिण भागात आणीबाणी जाहीर केली आहे.

युरोपीय नेत्यांनी या सगळ्यासाठी हवामान बदल कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. औद्योगिक काळानंतर जगाचं तापमान 1.2 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे.

जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांनी शनिवारी पुराचा फटका बसलेल्या भागांना भेट दिली. जर्मनीत आतापर्यंत पुरामुळे शंभरहून अधिकजणांचा मृत्यू झाला. पुराने या भागाची दुर्दशा झाली आहे. हजारो लोकांचं आयुष्य या पुराने उद्धस्त झालं आहे.

शुक्रवारी झालेल्या पुरामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांच्या मनात साशंकता आहे.

धुवाधार पावसामुळे फोनचं नेटवर्क कोलमडलं आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. लाखभराहून अधिक घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जर्मनीतील राइन वेस्टफालिया, राइनलँड पालाटिनेट, सारलँड या भागांना मोठा फटका बसला आहे.

राइनलँड-पालाटिनेट भागात 1300 जण बेपत्ता आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बचावकार्याने वेग घेतला असून, हा आकडा कमी होत आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

स्थानिक नागरिकांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, इथली परिस्थिती युद्धासारखी आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत. घर मोडकळीस आली आहेत. इथे मृतांचा आकडा वाढू शकतो असं बचाव अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बेल्जियममध्ये दहापैकी चार प्रांतांमध्ये लष्कराने बचावाचं कार्य सुरू केलं आहे. 20 जुलै राष्ट्रीय शोक दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

बेल्जियममध्ये पुरात वीस लोकांचा मृत्यू झाला आहे. नेदरलँड्सच्या लिमबर्ग प्रदेशात पुराचं पाणी वाढत चालल्याने लोक घर सोडून सुरक्षित भागात जात आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जोरदार पावसानंतर पूर आला आहे.

या देशांमधील परिस्थिती जाणून घेऊया फोटोंच्या माध्यमातून.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मुसळधार पावसामुळे जर्मनी आणि बेल्जियममधल्या नद्यांना पूर आला आणि नद्यांचं पाणी कालवे सोडून बाहेर आलं. अतिवृष्टीमुळे पुराचा जोर कायम आहे. यामध्ये आतापर्यंत किमान 80 जणांचा जीव गेलाय.

फोटो स्रोत, INA FASSBENDER/getty images

फोटो कॅप्शन, बहुतेक मृत्यू जर्मनीमध्ये झालेयत. तर बेल्जियममध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय अनेकजण बेपत्ता असल्याचं समजतंय.

फोटो स्रोत, FERDINAND MERZBACH/getty images

फोटो कॅप्शन, जर्मनीमधल्या ऱ्हाईनलंड - पॅलाटिनेट आणि उत्तर ऱ्हाईन - वेस्टफेलिया भागांना या अतिवृष्टीचा सर्वात वाईट फटका बसलाय. नेदरलँडमधली परिस्थितीही गंभीर आहे. शुक्रवारीही असाच मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान बदलांमुळे हे संकट आल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, FRANCOIS WALSCHAERTS/gettyimages

फोटो कॅप्शन, यापुढेही अशा नैसर्गिक आपत्ती हवामान बदलामुळे येत राहतील आणि म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीची पावलं अधिक प्रभावीपणे उचलण्याची गरज इथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, INA FASSBENDER/gettyimages

फोटो कॅप्शन, हवामान बदलांमुळे अशाप्रकारच्या नैसर्गिक घटना घडण्याची शक्यता असली तरी एका विशिष्ट घटनेचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी जोडणं योग्य नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, INA FASSBENDER/gettyimages

फोटो कॅप्शन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल सध्या अमेरिकेत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची त्या भेट घेणार आहेत. या नैसर्गिक संकटामुळे झालेला विध्वंस पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुरामुळे जीव गेलेल्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

फोटो स्रोत, Anadolu Agency

फोटो कॅप्शन, मर्कल म्हणाल्या, "माझ्या भावना तुमच्यासोबत आहेत. आमच्यावर विश्वास ठेवा, आमचं सरकार लोकांचे जीव सुरक्षित ठेवण्यासाठी, धोका कमी करण्यासाठी आणि हे संकट दूर करणयासाठी हरप्रकारे प्रयत्न करेल." जर्मनीत पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी पोलीस, हेलिकॉप्टर आणि शेकडो सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Anadolu Agency/gettyimages

फोटो कॅप्शन, पश्चिम जर्मनीमधल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. संपर्क साधनांवरही पावसाचा परिणाम झाला आहे.

फोटो स्रोत, Anadolu Agency/gettyimages

फोटो कॅप्शन, काही भागांना या पुराचा इतका वाईट तडाखा बसलाय की तिथे बोटीने पोहोचणंही कठीण झालंय. मायेनमधल्या 65 वर्षांच्या स्थानिक एन्मरी मुलर यांनी AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं,"कोणालाही याचा अंदाज नव्हता. इतका पाऊस आला कुठून? पाण्याचा आवाज इतका मोठा होता की असं वाटलं की आता दरवाजा फोडून पाणी आत येणार."

फोटो स्रोत, SEBASTIEN BOZON/gettyimages

फोटो कॅप्शन, अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून शुक्रवारीही मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ही पाणीपातळी वाढेल अशी भीती आहे. काही भागांमधली परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने लोकांना सोडवण्याची मोहीमही थांबवावी लागली आहे.

फोटो स्रोत, Anadolu Agency/gettyimages

फोटो कॅप्शन, नेदरलँडमध्ये अदयाप पावसामुळे कोणाच्या मृत्यूचं वृत्त नाही. पण नदीकिनारी असणाऱ्या गावं आणि शहरांतल्या हजारो लोकांना लवकरात लवकर आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलंय.

फोटो स्रोत, Getty Images

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)