पर्यावरण दिनाच्या उंबरठ्यावरच श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

फोटो स्रोत, EPA

वाचन वेळ: 2 मिनिटे

श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

5 जूनला पर्यावरण दिन आहे त्याच्या दोन दिवस आधी एक मोठं पर्यायवरणीय संकट उभं राहण्याच्या शक्यतेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

सिंगापूरमध्ये नोंदणी झालेल्या एक्स-प्रेस पर्ल नावाच्या या जहाजाला गेल्या दोन आठवड्यांपासून आग लागलेली होती.

आता यातून शेकडो टन इंजिन ऑईल बाहेर पडून ते समुद्राचं पाणी प्रदूषित करेल आणि सागरी जीवांना त्याचा धोका असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

श्रीलंका आणि भारताची नौदलं गेल्या काही दिवसांपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. आगीमुळे ते मोडून समुद्रात बुडू नये यासाठी हे प्रयत्न सुरू होते.

मात्र समुद्रातील जोरदार लाटा आणि मान्सून वाऱ्यामुळे या प्रयत्नांमध्ये अनेकदा अडथळे आले.

श्रीलंका नौदलाचे प्रवक्ते इंडिका सिल्वा बीबीसीला म्हणाले, "जहाज बुडत आहे. किनारवर्ती प्रदेशातील पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून बुडण्यापूर्वी त्याला खोल समुद्राच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे."

श्रीलंकेच्या नेगोम्बो शहराच्या जवळ या जहाजाचे तुटलेले काही भाग आणि तेल दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, EPA

मत्स्यपालन विभागाच्या राज्यमंत्र्यांनी नेगोम्बो खाडीमध्ये जहाजांना येण्यास मज्जाव केला आहे तसेच पानादुरा आणि नेगोम्बो या पट्ट्यामध्ये मासे पकडण्यास तात्काळ बंदी घातली आहे. हे जहाज सध्या ज्या ठिकाणी आहे तेथे ते बुडत असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

खाडीच्या आसपास जहाजाचे कोणत्याही प्रकारचे भग्नावशेष किंवा गळती झालेलं तेल यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सिंगापूरची एक्स-प्रेस शिपिंग कंपनीच्या मालकीचं हे जहाज आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांना या गळतीची माहिती होती असं या कंपनीने स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

आग लागेपर्यंत त्यांना भारत आणि कतारने जहाज सोडण्याची परवानगी दिली नव्हती असं कंपनीने सांगितलं आहे.

या दोन देशांनी परवानगी नाकारल्यावर श्रीलंकेनं त्याला आपल्या हद्दीत येण्यास परवानगी दिली. हे समजल्यावर श्रीलंकेतील सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी जहाजाच्या कप्तानाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कप्तान आणि जहाजाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यामध्ये वाचवण्यात आलं होतं. जहाजाच्या कप्तानाची आणि इंजिनियरची 14 तास चौकशी केल्याची माहिती श्रीलंका पोलिसांनी दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)