बिग बॉस हिंदी: मराठी बिग बॉस-2चा विजेता शिव ठाकरे आता झळकणार सलमानसोबत
फोटो स्रोत, Colors Facebook
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सुरू झाला आहे. त्याआधी बिग बॉस हिंदीचाही नवा सीझन सुरू झाला आहे. त्यामध्ये अमरावतीचा शिव ठाकरे हा देखील स्पर्धक आहे. शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता आहे. त्यामुळे आता तो बिग बॉस हिंदीमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
2019 मध्ये झालेल्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात शिव ठाकरेनी बाजी मारली होती.
या सोहळ्यात प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर शिवनं सीझन-2च्या विजेत्याचा किताब पटकावला होता. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळाली होती.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे आणि आरोह वेलणकर पोहोचले होते. घरातला 100 दिवसांचा प्रवास या सदस्यांनी पूर्ण केला होता.
शिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे अगदी शेवटपर्यंत घरात राहिलेले सदस्य होते. साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी अशी ओळख असलेल्या शिवला बिग बॉस विजेता म्हणून आता नवीन ओळख मिळाली.
"मी 'रोडीज' मध्ये जाण्यासाठी चार वर्षं प्रयत्न करत होतो. पाचव्या वेळेस मी 'रोडीज'मध्ये पोहोचलो. हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यासाठीही मी प्रयत्न केला होता. एरव्ही, प्रेस कॉन्फरन्स आणि ही ट्रॉफी हे सगळं मी टीव्हीवर पाहताना इमॅजिन करायचो आणि आता मी विजेता आहे," अशी प्रतिक्रिया शिवनं बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर दिली होती.
"मला चित्रपटही मिळाला आहे. 'अपना टाइम आयेगा' असं हे फीलिंग आहे. स्वप्नं पूर्ण होतातच," असं तो पुढे म्हणाला होताय
कोण आहे शिव ठाकरे?
मूळ अमरावतीच्या शिवने बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच आपली वेगळी छाप निर्माण केली होती. MTVच्या 'रोडीज'मधून शिव ठाकरे हा मराठमोळा स्पर्धक नावारूपास आला. 'रोडीज' त्या पर्वात त्याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.
फोटो स्रोत, Colors Facebook
इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत खूप संघर्षातून जावं लागलं, असं शिवनं 'बिग बॉस' मध्ये अनेकदा सांगितलं होतं.
घरची परिस्थिती बेताची असल्यानं भल्या पहाटे आपण दूध आणि पेपर टाकायचं काम देखील करायचो, असं त्यानं 'बिग बॉस'च्या घरात सांगितलं होतं.
अभिनेत्री वीणा जगतापसोबत असलेल्या त्याच्या खास मैत्रीमुळे तो या संपूर्ण पर्वात चर्चेत होता. प्रेक्षकांना त्याच्या खेळासोबतच त्याची आणि वीणाची केमिस्ट्री देखील आवडली.
शिव ठाकरेचा बिग बॉसच्या घरातला प्रवास
26 मे रोजी सुरू झालेलं हे बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व घरातील भांडणं, रोमान्स, टास्क, एकमेकांबद्दलचं गॉसिप यामुळे चांगलंच चर्चेत राहिलं. सर्व स्पर्धकांनी 100 दिवसात या स्पर्धेला रंगत आणली.
सुरुवातीला काहीसा शांत वाटणारा शिव नंतर खुलत गेला आणि मग त्याने आपला प्रभाव निर्माण केला तो शेवटपर्यंत.
फोटो स्रोत, Colors Facebook
या संपूर्ण प्रवासात त्याला वीणानं साथ दिली. ते एकमेकांत इतके गुंतले की वीकेंडला महेश मांजरेकरांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. पण आपण काही गैर करत नसल्याचं सांगत त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.
'बिग बॉस'नंतर आपण लग्न करणार असल्याचंही शिव आणि वीणा यांनी आधीच्या एका एपिसोडमध्ये जाहीर केलं होतं.
महेश मांजरेकरांनी दिली चित्रपटाची ऑफर
मराठी बिग बॉसचे होस्ट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेकर यांनी शिवला त्यांच्या 'वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. बिग बॉस मराठी-2 च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही