दिंडोरी अपघात : स्नेहसंमेलनावरून येताना कार विहिरीत कोसळली, 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

    • Author, प्रविण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

दिंडोरी शहरावर शुक्रवारी रात्री (3 एप्रिल) झालेल्या 9 जणांच्या अपघाती मृत्यूने शोककळा पसरली.

स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अनियंत्रित कार रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली.

या दुर्घटनेत 6 विद्यार्थ्यांसह पालकांचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री 11 च्या सुमारास घडला.

विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. दरम्यान, दोन क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला इंदोरे येथील सुनील दत्तात्रेय दरगोडे हे आपल्या कुटुंबतील मुलांना घेऊन आले होते.

कार्यक्रम आटोपल्यानंतर दरगोडे कुटुंबीय कारने घरी परतत असताना कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, नगरपंचायतीचे अग्निशामक दल, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. यावेळी दोन क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली.

घटनास्थळी एनडीआरएफची टीमही दाखल झाली होती. संपूर्ण बचावकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनेची वार्ता पसरताच घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती.

व्हीडिओ कॅप्शन, दिंडोरीत भीषण अपघात : कार विहिरीत कोसळल्याने 6 लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू

9 जणांना बुडून मृत्यू

गाडीतून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एक मुलगी गाडीतून बाहेर पडून विहिरीत बुडाल्याने तिचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

स्नेहसंमेलनासाठी परिधान केलेले वेशभूषेतील लहान मुलांचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

मृतांमध्ये सुनील दत्तात्रेय दरगोडे (वय 34) यांच्यासह त्यांच्या पत्नी रेशमा सुनील दरगोडे (30), मुलगी राखी उर्फ गुणवंती (10) आणि दोन पुतण्या माधुरी अनिल दरगोडे (13) व श्रावणी अनिल दरगोडे (11), आशा अनिल दरगोडे (32) यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे (11), मुलगी श्रुष्टी अनिल दरगोडे (14) आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे (7) यांचा समावेश आहे.

दिंडोरी पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल - गिरीश महाजन

मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातातील मृतांबद्दल दु:ख व्यक्त केले.

ते म्हणाले, "अतिशय गंभीर घटना आहे. आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की, जवळपास 100 फूट इतका मोठा काँक्रिटचा रस्ता असताना त्याच्या मधोमध विहीर कशी काय असू शकते? त्यातही तिला कठडा किंवा सुरक्षासंबंधित कोणतीही व्यवस्था का करण्यात आली नाही?"

"या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी देखील दाखल घेतली आहे, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची ही गंभीर चूक आहे. याप्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे", असं मंत्री महाजन यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)