पाकिस्तान अजूनही टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो, पण 'असं' घडलं तर...

वाचन वेळ: 3 मिनिटे

ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानची अवस्था एकसारखीच झालीय. दोन्ही संघांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

सुपर-8 फेरीत मंगळवारी (24 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने देखील भारताचा पराभव केलेला आहे.

अत्यंत अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने दोन विकेट राखून पाकिस्तानला पराभूत केलं आणि उपांत्य फेरी गाठली. आता पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडवर अवलंबून रहावं लागणार आहे.

पाकिस्तानने पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 164 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने सर्वाधिक 63 धावा केल्या. बाबर आझम आणि फखर झमानने प्रत्येकी 25-25 धावा केल्या.

पाकिस्तानने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेले इंग्लंडचे फलंदाज सुरुवातीलाच अडखळले पण नंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हॅरी ब्रुकने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला.

हॅरीने 51 बॉल्समध्ये 4 षटकार आणि 10 चौकार खेचून तडाखेबंद शतक झळकावलं आणि इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवलं.

पाकिस्तानवर विजय मिळवून इंग्लंड हा उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे.

माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?

इंग्लंडने सामना जिंकला असला तरी, पाकिस्तानने मागील सामन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आणि एक वेळ तरी अशी आली होती जेव्हा पाकिस्तान हा सामना जिंकेल असं वाटत होतं.

क्रिकेटच्या जाणकारांनी हॅरी ब्रुकच्या खेळीमुळे हा सामना इंग्लंडला जिंकता आला असं म्हटलं आहे. पाकिस्तानने त्यांना मिळालेल्या संधींचा फायदा केला नसल्याबाबत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने इंस्टाग्रामवर लिहिलं की, "फक्त तीन विशेषज्ञ गोलंदाज आणि फलंदाज असतानाही पाकिस्तानने सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात सर्वाधिक धाव करणाऱ्या उस्मान खानला इतक्या खाली फलंदाजी करायला पाठवण्यात आलं हे आश्चर्यकारक आहे. कर्णधार सलमान अली आगा गोलंदाजीही करत नाही आणि तो अचानक एक विशेषज्ञ फलंदाज कसा बनला हे अजूनही एक गूढ आहे. दुसरीकडे, फरहानची चमकदार फलंदाजी देखील व्यर्थ गेली."

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने पराभवासाठी पाकिस्तानी संघाच्या 'खराब पूर्वतयारी' ला जबाबदार धरलं.

ते म्हणाले, "मूलभूत गोष्टी योग्य न करता आधुनिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नर्सरीमध्ये न शिकता सरळ दहावीत बसण्यासारखे आहे."

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी कर्णधार हॅरी ब्रूकचे कौतुक केले आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

ते म्हणाले, "ब्रूकच्या खेळीवरून हे सिद्ध होतं की इंग्लंड संघात आमच्याकडे एक अत्यंत गुणवान खेळाडू आहे."

पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शहजाद म्हणाला की इंग्लंड त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसतानाही, पाकिस्तान त्यांना पराभूत करण्यात अपयशी ठरला.

शहजादने इंस्टाग्रामवर लिहिलं, "खराब नियोजन, चुकीचे शॉट निवड आणि गोंधळलेल्या प्लेइंग इलेव्हनमुळे पाकिस्तानने ही सुवर्णसंधी हुकवली."

शहजादने पराभवासाठी बाबर आझमची संथ फलंदाजी, सॅम अयुबचे अपयश आणि शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानची कमकुवत गोलंदाजी यांना जबाबदार धरले.

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी हॅरी ब्रूकच्या खेळीचा संदर्भ देत म्हटलं, "निःसंशयपणे, हे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम शतकांपैकी एक शतक हे आहे. हॅरी ब्रूकच्या कारकिर्दीतला हा मैलाचा दगड ठरेल."

पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का?

पत्रकार फैझान लखानी म्हणाले की, "पाकिस्तानसाठी ही परिस्थिती 'करो या मरो' अशीच आहे."

या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचा पुढचा प्रवास आता त्यांच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तानचा मार्ग अवघड झाला असला तरी पाकिस्तानी चाहत्यांनी न्यूझीलंडच्या सामान्यवर त्यांचं लक्ष केंद्रीय केलं आहे.

पाकिस्तानचे आता दोन सामने बाकी आहेत. आणि आता पाकिस्तानसाठी न्यूझीलंडची कामगिरी जास्त महत्त्वाची असणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचायचं असेल तर पाकिस्तानला त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील.

पहिला मार्ग : न्यूझीलंडने दोन्ही सामने गमावले पाहिजेत

जर न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही सामने गमावले तर पाकिस्तानचा मार्ग सोपा होईल.

श्रीलंकेविरुद्धचा विजयच पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचवू शकतो. प्रत्येक पाकिस्तानी चाहता याच समीकरणासाठी प्रार्थना करत आहे.

दुसरा मार्ग : न्यूझीलंडचा एका सामन्यात विजय आणि एकात पराभव

असं झालं तर रोमांच वाढेल. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला केवळ श्रीलंकेला हरवणेच नाही तर त्यांचा नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने जिंकणे देखील आवश्यक आहे. हा असा टप्पा आहे जिथे प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट अत्यंत महत्त्वाची असेल.

तिसरा मार्ग : न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले तर?

जर असं झालं तर पाकिस्तानचा प्रवास इथेच संपेल. ते विश्वचषकातून बाहेर पडतील. आणि असा निकाल कोणत्याही पाकिस्तानी चाहत्याला नको असेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.