अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध कधी संपेल? यामुळे किती नुकसान झालं?

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

वाचन वेळ: 9 मिनिटे

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत चालला आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात 28 फेब्रुवारीला इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला होता.

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं, आखातातील इस्रायल आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले करणं सुरूच ठेवलं आहे.

या हल्ल्यांची व्याप्ती आता बिगर-लष्करी लक्ष्यांपर्यंत वाढली आहे. यात नागरी ठिकाणं आणि ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.

हा संघर्ष आता अतिशय वेगानं वाढला असून तो लेबनॉनपर्यंत पोहोचला आहे. त्यातून दोन्ही बाजूला होत असलेली जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान वाढत चाललं आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

इराणमध्ये काय होतं आहे?

अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केला होता. त्यावेळेस त्यांनी तेहरान आणि इराणच्या इतर भागामधील क्षेपणास्त्रांच्या पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि नेतृत्वाला लक्ष्य केलं होतं.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, 1989 पासून इराणचं नेतृत्व करत होते. या हल्ल्यांच्या पहिल्या लाटेत खामेनी मारले गेले.

इस्रायलच्या लष्करानं सांगितलं की, इराणमधील शक्तिशाली इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (आयआरजीसी) अनेक वरिष्ठ अधिकारीदेखील या हल्ल्यात मारले गेले.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खामेनी यांच्या मृत्यूनंतर 8 मार्चला त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ 13 मार्चला म्हणाले की, इराणवर करण्यात आलेल्या नव्या हल्ल्यांमध्ये मोज्तबा खामेनी "जखमी झाले असून त्यांचं शरीर विद्रुप झालं असावं."

मोज्तबा खामेनी अलीकडच्या आठवड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

मात्र इराणनं पीट हेगसेथ यांचे दावे फेटाळले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले, "नव्या सर्वोच्च नेत्यांना कोणताही अपाय झालेला नाही."

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करणं सुरूच ठेवलं आहे. तर इराणनं मात्र त्यांचा अणु कार्यक्रम पूर्णपणे शांततामय असल्याचं वारंवार ठामपणे सांगितलं आहे.

अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी अलीकडच्या दिवसांमध्ये इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्लेदेखील तीव्र केले आहेत.

अमेरिकेनं इराणमधील खार्ग बेटावर लक्ष केंद्रित केलं आहे. खार्ग बेटावर इराणचं एक महत्त्वाचं टर्मिनल (कच्चे तेल जहाजात भरण्याचं ठिकाण) असून ते इराणच्या अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' असल्याचं मानलं जातं.

फोटो स्रोत, Gallo Images/Orbital Horizon/Copernicus Sentinel Data 2024

फोटो कॅप्शन, उपग्रहावरून घेतलेला खार्ग बेटाचा फोटो.

ह्युमन राईट्स ॲक्टिविस्ट इन इराण (एचआरएएनए) या अमेरिकेतील गटानं 14 मार्चला इराणमध्ये 3 हजार 40 लोक मारले गेले असल्याचं वृत्त दिलं आहे.

यात 1 हजार 122 लष्करी कर्मचारी आणि 1 हजार 319 नागरिकांचा समावेश आहे. नागरिकांमध्ये किमान 206 मुलं होती.

तर मारले गेलेले आणखी 599 जण नागरिक होते की लष्कराशी संबंधित होते याचं 'वर्गीकरण करण्यात आलेलं नव्हतं'.

त्याआधी 6 मार्चला इराणच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी सांगितलं होतं की, इराणमध्ये 1 हजार 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या दक्षिण भागातील आयआरजीसीच्या तळाजवळ असणाऱ्या मुलींच्या शाळेवर अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला हल्ला केल्याचा आरोप इराणनं केला आहे.

या हल्ल्यात जवळपास 110 मुलींसह 168 जणांचा मृत्यू झाल्याचं इराणनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेनं म्हटलं आहे की, ते या घटनेचा तपास करत आहेत. तर इस्रायलनं म्हटलं आहे की, त्या भागातील कोणत्याही लष्करी कारवाईची त्यांना 'माहिती नाही'.

तज्ज्ञांनी या घटनेच्या केलेल्या व्हीडिओ विश्लेषणातून दिसून येतं की, अमेरिकेच्या 'टॉमाहॉक' क्षेपणास्त्रानं लष्करी तळाजवळ असणाऱ्या शाळेवर हल्ला झाला होता, असं वृत्त बीबीसी व्हेरिफायनं दिलं होतं.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना आता या हल्ल्यातील अमेरिकेच्या संभाव्य सहभागाबद्दल डेमोक्रॅटिक प्रतिनिधींच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं आहे.

इराणमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकारांना मर्यादित प्रवेश आहे. तसंच इराणमधील इंटरनेट सेवा जवळपास पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आली आहे.

इराणच्या भूप्रदेशाबाहेर, अमेरिकेच्या एका पाणबुडीनं 4 मार्चला श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ हिंदी महासागरात इराणची एक युद्धनौकादेखील बुडवली होती. यात किमान 87 जणांचा मृत्यू झाला होता.

इराणनं कुठे हल्ले केले आहेत?

अमेरिका आणि इस्रायलनं केलेले हे हल्ले 'कोणत्याही कारणाशिवाय, बेकायदेशीर आणि अवैध स्वरुपाचे' असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणनं मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.

इराणच्या सैन्यानं (आयआरजीसी) म्हटलं आहे की, त्यांनी तेल अवीव आणि इस्रायलमधील इतर ठिकाणच्या सरकारी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं आहे.

आतापर्यंत म्हणजे 15 मार्चपर्यंत, इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, "युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व सामान्य नागरिक होते."

यातील सर्वात भीषण हल्ला 1 मार्चला जेरुसलेमच्या पश्चिम भागातील बेईत शेमेश शहरावर झाला होता. या हल्ल्यात 9 जण मारले गेले होते.

आखातातील ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत त्यांच्यावरही हल्ले झाले आहेत. यात कतार, बहारीन, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि कुवेत या देशांचा समावेश आहे.

तसंच अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या ओमान आणि सौदी अरेबियामध्येही हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये 13 मार्चपर्यंत, अमेरिकेचे 13 सैनिक मारले गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

इराणनं त्यांच्या हल्ल्यांची व्याप्ती वाढवून कच्च्या तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा, जहाजांची वाहतूक आणि दुबईतील हॉटेलसारख्या नागरी ठिकाणांसह इतर लक्ष्यांवरही हल्ले केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या युद्धात आतापर्यंत आखाती प्रदेशात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश जण सुरक्षा कर्मचारी किंवा परदेशी कामगार होते.

युएईमध्ये 6 जण मारले गेले आहेत, तर कुवेतमध्ये आणखी 6 जण मारले गेले आहेत. तर ओमान, सौदी अरेबिया आणि बहारीन या देशांनी देखील प्रत्येकी 2 मृत्यूंची नोंद केली आहे.

इराकमध्येही हल्ल्यांची नोंद झाली आहे. एरबिल विमानतळावर स्फोट झाल्यानंतर 6 मार्चला इराणनं आपल्यावर हल्ला केल्याचं इराकनं म्हटलं आहे.

उत्तर इराकमधील एका कुर्दिश लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका फ्रेंच सैनिकाचा मृत्यू झाला.

तसंच इराकमध्ये, पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेसनं (पीएमएफ) म्हटलं की, त्यांचे 27 सदस्य मारले गेले आहेत. पीएमएफची स्थापना गेल्या दशकात इस्लामिक स्टेट ग्रुपशी लढण्यासाठी करण्यात आली होती.

इस्लामिक रेझिस्टन्स इन इराक (आयआरआय) या छत्राखाली इराण सशस्त्र गटांना पाठिंबा देतो. हे गट पीएमएफचा भाग आहेत.

नाटोच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं त्यांच्या हवाई हद्दीत इराणची 3 क्षेपणास्त्र पाडली असल्याचं तुर्कियेनं म्हटलं आहे. अझरबैजाननं देखील एका विमानतळावर इराणनं ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

प्रतिहल्ला झाल्याचं वृत्त देणारे देश: इस्रायल, कुवेत, कतार, बहारीन, युएई, जॉर्डन, सायप्रस, इराक आणि सौदी अरेबिया

अमेरिका आणि त्यांच्या अरब मित्रराष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी करत इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

या निवेदनात म्हटलं, "नागरिकांना आणि शत्रू नसलेल्या देशांना लक्ष्य करणं हे अविवेकीपणाचं आणि अस्थिर वर्तन आहे."

गाझामध्ये कार्यरत असलेल्या हमास या सशस्त्र पॅलेस्टिनी गटानं 14 मार्चला इराणला आखाती देशांवरील हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं आहे.

हमासकडून त्यांचा महत्त्वाचा सहकारी असलेल्या इराणला करण्यात आलेलं हे दुर्मिळ आवाहन आहे.

दुसरीकडे, सायप्रसमधील एका ब्रिटिश लष्करी तळावर ड्रोननं हल्ला करण्यात आला, अशी माहिती युकेच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नंतर सांगितलं की, हा ड्रोन इराणमधून सोडण्यात आला नव्हता.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी 7 मार्चला इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर एक व्हीडिओ संदेश प्रसारित केला. यात त्यांनी शेजारच्या देशांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांची माफी मागितली होती.

पेजेश्कियान म्हणाले होते, "शेजारच्या देशांवर आक्रमण करण्याचा इराणचा हेतू नाही."

ते पुढे म्हणाले होते, नेतृत्वानं सशस्त्र दलांना आदेश दिला आहे की, 'आतापासून', लष्करानं 'शेजारच्या देशांकडून हल्ला होत नाही' तोपर्यंत त्यांच्यावर हल्ला करू नये.

लेबनॉनमध्ये काय घडतंय?

लेबनॉनमध्ये 2 मार्चला या युद्धाची एक नवीन आघाडी उघडली. इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाह या गटानं इस्रायलच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला.

हिजबुल्लाहनं म्हटलं आहे की, ते खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

इस्रायलनं या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हल्ले सुरू केले. त्यांनी बैरूत आणि लेबनॉनच्या दक्षिणेकडील काही भागांवर हल्ले केले.

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी 3 मार्चला सांगितलं की, हिजबुल्लाहकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलचं "भूदल पुढे जाईल आणि लेबनॉनमधील व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा भाग ताब्यात घेईल."

फोटो स्रोत, AFP via Getty Images

तेव्हापासून, इस्रायल दक्षिण लेबनॉन आणि दहिह या दक्षिण बैरूतमधील उपनगरावर नियमितपणे हल्ले करत आहे. याच भागात त्यांनी हिजबुल्लाहची कमांड सेंटर्स आणि शस्त्रास्त्र साठवण्याच्या केंद्रांवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे.

या हल्ल्यांची व्याप्ती मध्य बैरूतपर्यंत वाढली आहे. यात 2 हॉटेल आणि शहराच्या किनारपट्टीवर हल्ला झाला आहे. तिथे विस्थापित झालेले लोक झोपलेले होते.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं, 14 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार सांगितलं की, या हल्ल्यांमध्ये 826 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 106 मुलांचा समावेश आहे.

बीबीसीनं इस्रायलच्या हल्ल्यात उदध्वस्त झालेल्या एका घराच्या अवशेषांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. या घरात एकाच कुटुंबातील 8 सदस्यांचा मृत्यू झाला. यात 3 मुलांचाही समावेश आहे.

इस्रायलनं 11 मार्चला लेबनॉनच्या ईशान्य भागातील 'युनिन' शहरात केलेल्या हल्ल्यात हे लोक मारले गेले होते.

या हल्ल्यांमुळे जवळपास 2 लाख मुलांसह 7 लाखांहून अधिक लोकांना, त्यांची घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघानं दिली आहे.

इस्रायलच्या लष्करानंदेखील 8 मार्चपर्यंत त्यांचे 2 सैनिक मारले गेल्याची माहिती दिली आहे.

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला का केला?

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी 28 फेब्रुवारीला करण्यात आलेले हल्ले 'इस्रायलला असणारे धोके दूर करण्यासाठी' 'प्रतिबंधात्मक कारवाई' (प्री-एम्प्टिव्ह स्ट्राईक) म्हणून करण्यात आल्याचं सांगितलं आहे. मात्र, यावेळेस लष्करी कारवाई करण्याची आवश्यकता का होती, हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 2 मार्चला म्हणाले की, इस्रायल कारवाई करणार आहे, हे अमेरिकेला माहित होतं. त्याचा अर्थ, अमेरिकेच्या सैन्यावर इराणकडून अपेक्षित असलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेला 'प्रतिबंधात्मक उपाय' म्हणून कारवाई करावी लागली.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे (आयडीएफ) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी खुलासा केला की, त्यांनी गुप्तपणे अनेक महिने याचं नियोजन केलं आणि इराणची दिशाभूल केली. यामुळे इराणला धक्का बसला.

अमेरिकेत काही लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारकडे अमेरिकेनं युद्ध सुरू करण्यापूर्वी इराणकडून धोका असल्याचे पुरावे देण्याची मागणी केली आहे.

मात्र त्यामागे काही मूलभूत कारणंदेखील आहेत.

इस्रायल आणि अमेरिका हे एकमेकांचे जवळचे मित्रदेश आहेत. इराणमध्ये 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यापासून हे दोन्ही देश इराणचे कट्टर शत्रू आहेत.

इराणचं नेतृत्व सातत्यानं इस्रायलला नष्ट करण्याबद्दल बोललं आहे. तसंच त्यांनी अमेरिकेला त्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणत सार्वजनिकरित्या तीव्र टीका केली आहे.

अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराणच्या अणु कार्यक्रमाला असणाऱ्या पाश्चात्य देशांच्या विरोधाचं नेतृत्व केलं आहे.

इराण अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा या देशांनी केला आहे. इराणनं मात्र ठामपणे हा दावा फेटाळला आहे.

या देशांनी जून 2025 मध्ये इराणच्या अणुकेंद्रावर आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. ते युद्ध 12 दिवस चाललं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

तेव्हापासून, या देशांनी दावा केला आहे की, इराण त्याचा अणुकार्यक्रम पुन्हा उभारण्याचा आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेली क्षेपणास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे.

ही क्षेपणास्त्र कालांतरानं अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतात, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अर्थात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या मूल्यमापनातून या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.

दुसऱ्या बाजूला, इराण हा आपल्या अस्तित्वासाठी धोका असल्याचं इस्रायल मानतो. इस्रायलला इराणचा अणु कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम पूर्णपणे संपुष्टात आणायचा आहे. तसंच तिथे सत्ताबदल व्हावा असंही इस्रायलला वाटतं.

जानेवारी महिन्यात जेव्हा इराणच्या सुरक्षा दलांनी प्रचंड बळाचा वापर करून आंदोलकांवर कठोर कारवाई केली, तेव्हा अमेरिकेकडून पहिल्यांदा उघडपणे इराणवर संभाव्य हल्ला करण्याबाबत बोलण्यात आलं होतं.

असं असलं तरी, अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. या वाटाघाटींमध्ये प्रगती होत असल्याचंही दिसून आलं. मात्र 27 फेब्रुवारीला या वाटाघाटींबद्दल 'खूश नसल्याचं' ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर काही तासांमध्येच अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले सुरू केले.

इराण जोपर्यंत 'विनाअट शरणागती' पत्करत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी 'कोणताही करार' केला जाणार नाही, असं ट्रम्प 6 मार्चला म्हणाले होते.

नंतर 14 मार्चला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की, इराणला करार करायचा आहे. मात्र त्यांना स्वत:ला सध्या करार करायचा नाही. "कारण त्यासाठी असणाऱ्या अटी पुरेशा समाधानकारक नाहीत."

युद्धाचा अर्थव्यवस्था आणि इंधनाच्या किमतीवर कसा परिणाम होतोय?

पश्चिम आशियातील अस्थिरतेचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो आहे.

इराणने आखातामध्ये जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप होतो आहे. यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद झाली आहे.

हा एक अरुंद सागरी मार्ग असून त्यामधून जगातील जवळपास 20 टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते.

आखातातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रमुख केंद्रांवरही हल्ल्याची नोंद झाली आहे. यात ओमानमधील दुकम व्यापारी बंदर आणि युएईचं फुजैरा टर्मिनलचा समावेश आहे.

या हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे जगातील सर्वात मोठे उत्पादक असलेल्या काही देशांना उत्पादन थांबवावं लागलं आहे.

यात कतारमधील लिक्विफाईड नॅचरल गॅस (एलएनजी) केंद्र आणि सौदी अरेबियामधील सर्वात मोठ्या देशांतर्गत तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे.

यामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाली आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि राहणीमानावर होणाऱ्या परिणामांबद्दल इशारा देण्यात आला आहे.

कच्च्या तेलाची किंमत 9 मार्चला जवळपास 120 डॉलर (जवळपास 11 हजार 110 रुपये) प्रति बॅरलवर पोहोचली. मात्र ट्रम्प यांनी इराणविरुद्धचं युद्ध 'लवकरच संपेल' असं सांगताच किमतीत घसरण झाली होती.

मात्र नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, जर इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी कच्च्या तेलाची वाहतूक थांबवली, तर इराणवर '20 पट अधिक कठोर' हल्ला करण्याची धमकी दिली.

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अनेक मालवाहू जहाजांवर 'अज्ञात क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा ड्रोनसारख्या गोष्टीं'चा (प्रोजेक्टाईल) मारा झाल्याचं युकेएमटीओ या ब्रिटिश सागरी सुरक्षा एजन्सीनं म्हटलं आहे.

कुवेतच्या किनाऱ्याजवळ एका तेलवाहून जहाजावर 5 मार्चला एक 'मोठा स्फोट' झाला. यामुळे तेल गळती झाली, असं युकेएमटीओनं म्हटलं आहे.

इराकच्या उम्म कासर बंदराजवळ 12 मार्चला 2 परदेशी तेलवाहू जहाजांवर स्फोट झाल्यानं एकाचा मृत्यू झाला.

या प्रदेशात प्रवास करणं सुरक्षित आहे का आणि हे युद्ध किती काळ सुरू राहू शकतं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 9 मार्चला हे युद्ध कधी संपेल यासंदर्भात विविध वक्तव्यं केली.

सीबीएस न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, हे युद्ध "जवळपास संपलं आहे." ते पुढे म्हणाले, "आम्ही नियोजित वेळेच्या खूपच पुढे आहोत."

मात्र त्याच दिवशी नंतर त्यांनी सुचवलं की, अमेरिका "या युद्धात आणखी कठोर कारवाई करेल."

ते पुढे असंही म्हणाले की, अमेरिका ही 'सफर' पूर्ण करण्याच्या 'अतिशय जवळ' आहे.

या युद्धासाठीच्या एका व्यापक मोहिमेची रूपरेषाही ट्रम्प यांनी मांडली. अमेरिका, इस्रायल किंवा अमेरिकेच्या कोणत्याही मित्रदेशाला लक्ष्य करण्यासाठी इराणनं 'दीर्घकाळ' शस्त्रास्त्र विकसित करू नयेत, याची खातरजमा करणं हे त्यांचं उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

व्हाईट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी यापूर्वी असंही सूचित केलं होतं की, हे युद्ध 6 आठवड्यांपर्यंत चालू शकतं.

युद्धाच्या सुरुवातीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते, "जोपर्यंत आवश्यकता तोपर्यंत ही मोहीम सुरू राहील."

या युद्धामुळे जागतिक प्रवासातील कोरोनाच्या संकटानंतरचा सर्वात गंभीर व्यत्यय आला आहे. यामुळे हवाई क्षेत्र बंद झालं आहे. तसंच पश्चिम आशियातील हजारो विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे.

एतिहाद एअरलाईननं 6 मार्चला जाहीर केलं की, ते अबु धाबीहून मर्यादित उड्डाणं सुरू करणार आहेत.

प्रादेशिक हवाई क्षेत्र काही प्रमाणात पुन्हा उघडल्यानंतर, एमिरेट्सनं देखील काही उड्डाणं पुन्हा सुरू केली.

कतारमधील हवाई क्षेत्र 7 मार्चला अंशत: पुन्हा सुरू करण्यात आलं. त्यानंतर कतार एअरवेजनं सांगितलं की, रिपॅट्रिएशन फ्लाईट्स सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.

रिपॅट्रिएशन फ्लाईट्स म्हणजे संकट काळात एखाद्या देशाच्या परदेशातील नागरिकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी करण्यात येणारी उड्डाणं. कतार एअरवेजनं 8 मार्चला दोहा इथे येणारी आणि तिथून जाणारी मर्यादित उड्डाणं पुन्हा सुरू केली.

युके फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (एफसीडीओ)नं म्हटलं आहे की, पश्चिम आशियात प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणीही सल्ल्यासाठी त्यांची वेबसाईट पाहावी.

मॅलरी मोएन्च, राफी बर्ग, एमिली ॲटकिन्सन, ऑलिव्हिया आयर्लंड, रॉबर्ट ग्रीनॉल, हफ्सा खलिल, गॅब्रिएला पोमेरॉय आणि बीबीसी पर्शियन यांचं अतिरिक्त वार्तांकन.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)