You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रम्प यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या नव्या एप्स्टिन फाईलमध्ये नेमकं काय?
- Author, कायला एपस्टिन
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिकेची तपास संस्था एफबीआयच्या काही कागदपत्रांमध्ये एका महिलेच्या मुलाखतीचा सारांश नोंदवला आहे. या महिलेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते, मात्र ते आरोप सिद्ध झाले नव्हते.
आता ही कागदपत्रं अमेरिकेच्या न्याय विभागाने (डीओजे) जाहीर केलेल्या एपस्टिन प्रकरणातील फाइल्सचा भाग म्हणून समोर आणली आहेत.
ही कागदपत्रे पूर्वी न्याय विभागाच्या डेटाबेसमध्ये दिसत नव्हती, अशी माहिती समोर आल्यानंतर त्याबाबतच्या बातम्या आल्या. त्यानंतर डेमोक्रॅटिक नेत्यांनी अधिकाऱ्यांवर हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
न्याय विभागानं सांगितलं की, तपासणीच्या (पुनरावलोकन) प्रक्रियेदरम्यान या फाइल्स चुकून रोखल्या होत्या. कारण त्या चुकीच्या पद्धतीने आधीच असलेल्या कागदपत्रांची 'पुनरावृत्ती' (डुप्लिकेट) म्हणून नोंदवल्या गेल्या होत्या.
या नोंदींमध्ये 2019 मध्ये त्या महिलेच्या अनेक मुलाखतींचा उल्लेख आहे. त्या महिलेनं डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टिन यांच्याविरोधात काही आरोप केले. पण त्याबाबतचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
दुसरीकडे, दिवंगत लैंगिक गुन्हेगार एपस्टिनशी संबंधित आपण कोणताही गैरप्रकार केलेला नाही, असा दावा अध्यक्ष ट्रम्प सातत्याने करत आले आहेत.
ट्रम्प यांच्यावरील आरोप
तीन नोंदींपैकी (मेमो) एका नोंदीनुसार, त्या महिलेनं एफबीआय अधिकाऱ्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 1980 च्या दशकात, ती किशोरवयीन असताना जेफ्री एपस्टिनने तिची ओळख डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून दिली होती.
ती 13 ते 15 वर्षांची असताना या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा त्या महिलेचा आरोप आहे.
फाइल्सनुसार, या मुलाखतींनंतर एफबीआय अधिकाऱ्यांचा त्या महिलेशी पुढे कोणताही संपर्क झाला नाही.
त्या महिलेने सांगितलेल्या काळात ट्रम्प आणि एपस्टिन एकमेकांना ओळखत होते की नाही, हे अस्पष्ट आहे.
व्हाइट हाऊसने या आरोपांवर म्हटलं की, " हे आरोप 'पूर्णपणे निराधार' आहेत आणि त्यांना 'विश्वासार्ह असा कोणताही पुरावा' नाही."
ट्रम्प यांचा हजारोवेळा उल्लेख
प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या, "आम्ही आधीही असंख्य वेळा सांगितल्याप्रमाणे, एपस्टिन फाइल्स जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांच्यावरचे आरोप पूर्णपणे खोटे ठरले आहेत."
त्या पुढे म्हणाल्या की, जो बायडेन यांच्या आधीच्या प्रशासनाच्या काळातही न्याय विभागाने या आरोपांच्या आधारावर ट्रम्प यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. "कारण त्यांना माहिती होतं की, ट्रम्प यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही".
न्याय विभागाने जाहीर केलेल्या या फाइल्समध्ये ट्रम्प यांचा हजारो वेळा उल्लेख आढळून येतो. यात जेफ्री एपस्टिनने इतरांना पाठवलेल्या ई-मेल आणि पत्रव्यवहारातही ट्रम्प यांचं नाव आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या एपस्टिन प्रकरणातील पीडितांनी ट्रम्प यांच्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप केलेला नाही.
या फाइल्समध्ये 2019 मध्ये त्या अज्ञात महिलेच्या एफबीआय साक्षीदारांच्या मुलाखतींचा सारांश आहे. याशिवाय एफबीआयच्या नॅशनल थ्रेट ऑपरेशन सेंटरच्या टिप लाइनवर फोन करणाऱ्या लोकांनी ट्रम्प यांच्याविरोधात केलेल्या आरोपांच्या यादीचाही यात समावेश आहे.
या यादीमध्ये ट्रम्प, एपस्टिन आणि इतर काही हाय-प्रोफाइल व्यक्तींविरोधात केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या अनेक आरोपांचा उल्लेख आहे. मात्र यापैकी अनेक आरोप पडताळणी न झालेल्या माहितींवर आधारित आहेत आणि त्यासाठी ठोस अशा पुराव्यांचा समावेश नाही.
जानेवारीमध्ये एपस्टिन फाइल्स जाहीर केल्यानंतर न्याय विभागाने सांगितलं होतं की, या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात काही खोटे आणि खळबळजनक दावे केले आहेत, जे 2020 च्या निवडणुकीच्या अगदी आधी एफबीआयकडे पाठवण्यात आले होते.
"स्पष्ट सांगायचं तर हे आरोप किंवा दावे निराधार आणि खोटे आहेत. त्यात थोडासाही विश्वासार्हपणा असता, तर आतापर्यंत ते ट्रम्प यांच्या विरोधात नक्कीच वापरले गेले असते."
सर्व कागदपत्रं जाहीर करणं बंधनकारक
अमेरिकेच्या माध्यमांत या नोंदी सुरुवातीला जाहीर झालेल्या एपस्टिन फाइल्समध्ये चुकून रोखून ठेवण्यात आल्याची बातमी आली होती. त्यानंतर या तीन नवीन नोंदी आता सार्वजनिक करण्यात आल्या आहेत.
सर्वात आधी एनपीआरने ही माहिती दिली होती. फाइल्समधील क्रमांक आणि नोंदींवरून असं दिसतं की, एफबीआयने 2019 मध्ये त्या महिलेची चार वेळा मुलाखत घेतली होती.
ही चौकशी एपस्टिनची सहकारी गिलेन मॅक्सवेलच्या तपासाचा भाग होती. मॅक्सवेलला 2022 मध्ये सेक्स ट्रॅफिकिंग (लैंगिक तस्करी) प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
मात्र त्या मुलाखतींचे तीन सारांश आणि त्यासंबंधीच्या नोंदी, एकूण 50 पेक्षा जास्त पानं, न्याय विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध नव्हते. एनपीआर आणि न्यूयॉर्क टाइम्ससह इतर माध्यमांनी ही बाब समोर आणली होती.
एपस्टिन आणि ट्रम्प अनेक वर्षांपासूनचे मित्र होते, असं दिसतं. मात्र नंतर दोघांमध्ये मतभेद झाले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, हे 2000 च्या सुरुवातीच्या काळात घडलं होतं, म्हणजे एपस्टिनला पहिल्यांदा अटक होण्याच्या सुमारे दोन वर्षांपूर्वी.
या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील एका समितीने अटर्नी जनरल पाम बोंडी यांना समन्स (सबपोना) पाठवण्याचा निर्णय घेतला. एपस्टिन फाइल्स हाताळताना न्याय विभागाने काय केलं, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
प्रतिनिधीगृहाच्या ओव्हरसाइट समितीत रिपब्लिकन सदस्यांनीही डेमोक्रॅट्ससोबत मतदान करून त्यांना समन्स पाठवण्यासाठी मतदान केलं.
गेल्या नोव्हेंबरमध्ये काँग्रेसने एक कायदा मंजूर केला होता, ज्यामुळे न्याय विभागाला एपस्टिन प्रकरणाच्या तपासातील सर्व कागदपत्रं जाहीर करणं बंधनकारक झालं. त्यानंतर आतापर्यंत लाखो कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)