मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील कोण आहेत? 2011 पासून आंदोलन ते आझाद मैदानावरचा आनंद

फोटो स्रोत, NITIN SULTANE

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन झाले.

मराठा समुदायाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात अध्यादेश काढून यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल त्यानुसार मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे हे घरोघरी पोहचले.

जालन्यातील अंतरवाली सराटीत एका वर्षापूर्वी (29 ऑगस्ट 2023) त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि या आंदोलनामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले होते.

सुरुवातीला फार मोठं नसलेलं हे आंदोलन त्यानंतर घडलेल्या घटनांनी मात्र घराघरात पोहोचलं आणि त्यानं मोठं रूप घेतलं. त्यानंतर सरकारशी अनेकदा चर्चा जीआर, पुन्हा आंदोलन, मुंबई दौरा असं बरंच काही घडलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील

काही वर्षांपूर्वी फारसे कोणाला माहिती नसलेले मनोज जरांगे पाटील हे नेमके आहेत कोण? आधी ते काय करत होते? मराठा आरक्षणासाठी त्यांनी नेमकं कसं आंदोलन केलं? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर या आंदोलनाचं नेतृत्व अनेकांनी केल आहे. पण या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील.

2011 मध्ये गाव पातळीवरून सुरू झालेला मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा प्रवास आज राज्यातील मोठ्या मराठा आंदोलनापर्यंत येऊन पोहोचला आहे.

फोटो स्रोत, Facebook

जन्मभूमी बीड, कर्मभूमी जालना

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विषय निघताच जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीचं नाव डोळ्यासमोर येतं. तेच त्यांचं मूळ गाव आहे असंही अनेकांना वाटतं. पण तसं नाही.

मनोज जरांगे पाटील यांचा जन्म बीड जिल्ह्यातल्या मातोरी या गावी झालेला आहे. नंतरच्या काळामध्ये ते जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील अंकुशनगर याठिकाणी राहू लागले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनोज जरांगे पाटील

जरांगे पाटील यांचं 10 वी पर्यंतचं शिक्षण मातोरीमधल्याच जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर गढी गेवराई याठिकाणी त्यांचं 12 वी पर्यंतचं शिक्षण झालं. शिक्षण सुरू असतानाच मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्यानं येणाऱ्या अडचणींमुळं हा मुद्दा त्यांच्या मनात घर करून बसला होता. वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती.

जरांगे पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुलं, आई-वडील चार भाऊ यांचा समावेश आहे. गावाकडं असलेल्या शेतीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

सामाजिक किंवा राजकीय कामामध्ये उतरण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी काही काळ आर्थिक गरजा भागवण्यासाठी हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणीही कामं केल्याचं त्यांचे सहकारी सांगतात.

उड्डाणपुलावरून उपोषणाची सुरुवात

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिक्षण सुरू असताना आणि त्यानंतरच्याही काही काळात आरक्षणाअभावी समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना येणाऱ्या अडचणींची जाणीव जरांगे पाटलांना होऊ लागली होती. त्यातूनच या कामासाठीच झोकून द्यायचं असं ठरवल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं.

मनोज जरांगे पाटील यांच्या सध्याच्या आंदोलनाची सगळीकडं चांगलीच चर्चा सुरू असली तरी त्यांच्या पहिल्या आंदोलनाचा किंवा पहिल्या उपोषणाचा किस्साही काहीसा रोमांचक असाच आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मते, त्यांनी पहिलं आंदोलन किंवा उपोषण हे अंबड तालुक्यात असलेल्या शहागड याठिकाणी केलं होतं. शहागडमध्ये असलेल्या उड्डाणपुरावरच मनोज जरांगे उपोषणाला बसले होते.

मनोज जरांचे यांचं हे आंदोलन जवळपास सहा दिवस चाललं. अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये एक प्रकारची शक्ती असते, याला प्रशासन किंवा जबाबदार लोक घाबरतात हे सहा दिवसांच्या उपोषणातून जरांगेंच्या लक्षात आलं होतं.

त्यानंतरच त्यांनी मराठा आरक्षणासाठी अशाच प्रकारच्या मार्गानं आंदोलनं करत राहण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगितलं. पुढं आरक्षणासाठी लहान मोठी आंदोलनं मनोज जरांगे पाटील करतच होते.

पहिला मोर्चा 40 हजारांचा

मुलाखतीत ते म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा हा समाजातील बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे जरांगेंच्या लक्षात आलं होतं. पण ते मिळवण्यासाठी काय करायचं हे नेमकं माहिती नव्हतं किंवा त्याबाबत त्यांना संभ्रम होता.

त्यावेळी म्हणजे 2013 च्या आसपास इतर काही समाजांचीही आरक्षणासाठी आंदोलनं सुरू होती. या समाजांकडून इतर मार्गांबरोबरच विविध सरकारी कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदनं दिली जात होती.

मनोज जरांगे यांनीही तेव्हाचे त्यांचे सहकारी किंवा ग्रामीण भागातील तरुण यांच्या साथीनं मोर्चा काढायचा निर्णय घेतला. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन द्यायचं त्यांनी ठरवलं होतं.

फोटो स्रोत, NITIN SULTANE

आसपासच्या गावातील तरुणांना गोळा करून मनोज जरांगे यांनी 2013 मध्ये हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये सुमारे 3400 गाड्या (जीप आणि इतर वाहने) भरून तरुण स्वतःच्या खर्चानं सहभागी झाले होते, असं ते सांगतात.

त्यांच्या मते, 40 हजारांच्या आसपास तरुण आरक्षणासाठीच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चाबद्दल काहीही माहिती नसल्यानं कुणाचंही नेतृत्व नसलेला असा हा मोर्चा होता.

त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं कुठल्या कार्यालयात निवेदन द्यायचं आहे याचीही माहिती नव्हती. लोकांना विचारून ते संबंधित ठिकाणी पोहोचले. पण त्यामागची आरक्षणाची भावना अत्यंत महत्त्वाची होती, असं जरांगे यांचं म्हणणं आहे.

कोरोना काळापासून खरी सुरुवात

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यानंतर सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी मधल्या काळामध्ये अनेक लहान-मोठी आंदोलनं केली.

पण, कोरोनाच्या काळात म्हणजे 2021 मध्ये साष्ट पिंपळगाव याठिकाणी झालेल्या आंदोलनापासून मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या आंदोलनाला खरी चालना मिळाली, असं पत्रकार कृष्णा पाटील यांनी सांगितलं.

साष्ट पिंपळगावमधलं त्याचं आंदोलन साडेतीन महिने चाललं. सुप्रीम कोर्टातून आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनोज जरांगे (संग्रहित छायाचित्र)

यानंतरही जरांगे पाटलांनी गोरीगंधारी, भांबेरी अशा ठिकाणीही आंदोलनं केली. पण त्यापैकी काही वेगळ्या मागण्यांसाठीही होती. त्यापैकी काही मागण्या मान्यही होत होत्या, त्यामुळं वेळोवेळी जरांगे पाटील आंदोलनं मागं घेत होते.

साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.

आंतरवालीमध्ये 123 गावे एकत्र

विविध आंदोलनं सुरू असताना आरक्षण मिळण्यासाठी नेमकं काय करायचं हा विचार कायम मनोज जरांगे यांच्या मनात होता. त्यामुळं त्यांनी थोडा अभ्यास करून पुढचे निर्णय घेतले, असं जरांगे मुलाखतीत सांगतात.

यापूर्वी झालेली आंदोलनं, त्यांचे यश अपयश यांची कारणं काय? याचा काहीसा अभ्यास त्यांनी केला. अनेकदा मराठा आरक्षणाचा तोंडाजवळ आलेला घास दूर जातो त्यामुळं मोठ्या पातळीवर आंदोलन करावं लागेल असं त्यांच्या लक्षात आलं.

मनोज जरांगे पाटील यापूर्वीपर्यंत 10-12 गावातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या साथीनं आंदोलनं करत होते. त्यामुळं त्यांची दखलही त्याप्रमाणातच घेतली जात होती. पण पुढच्या आंदोलनासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला.

आंतरवाली सराटी याठिकाणी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 123 गावांना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र केलं. त्यामुळं याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा त्यांना मिळाला.

परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण आणि आंदोलन सुरू केलं त्यावेळी त्यांची साथ देण्यासाठी त्याठिकाणी 3 लाख लोक जमल्याचा दावा केला जातो.

राजकीय पक्षांपासून दूर

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, जरांगेंनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. जेम्स लेन प्रकरणानंतर त्यांनी काँग्रेस सोडल्याचंही सांगितलं जातं.

पण स्थानिक पत्रकार संतोष अदमाने यांच्या मते, मनोज जरांगे यांनी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम केलं नाही. शिवाय त्या भागात काँग्रेसचं तेव्हा फारसं अस्तित्वच नव्हतं, त्यामुळं तशी शक्यता नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्याच्या काळातही कोणत्याही स्थितीत राजकारणात जाणार नाही, अशीच भूमिका ते मांडत असल्याचं पाहायला मिळतं.

2011 मध्ये त्यांनी शिबवा या संघटनेची स्थापना केली होती. त्यामाध्यमातून त्यांनी तरुणांना एकत्रित आणण्याचं काम सुरु केलं.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणी शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोपही झाले होते.

शेती विकली पण काम सुरुच

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकारचे आरोपही करण्यात आले आहेत. काही नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो, घर कसं चालतं असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका वाहिनीशी बोलताना जरांगे यांनी याबाबत उत्तर दिलं होतं. त्यांच्याकडं 5-6 एकर शेती होती. त्यापैकी 2-3 एकर शेती त्यांना हा संघर्ष सुरू असताना विकावी लागली.

पण त्यांची उर्वरित शेती गावाकडं असून त्यांचे वडील आणि भाऊ ही शेती सांभाळतात. त्यातून निघणारं उत्पन्न हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पुरेसं आहे, असं जरांगे सांगतात.

आमच्या गरजा कमी असल्यामुळं शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमचं भागतं, असं जरांगे पाटील सांगतात.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनात कुटुंबीयांचा शक्यतो समावेश नसतो. कुटुंबीयांना पाहिल्यानं भावनिक होऊन बळ कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळं कुटुंबीयांना ते सोबत नेत नाही.

आंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट 2023 पासून आंदोलन सुरू केलं तेव्हापासून घराचा उंबरा ओलांडला नसल्याचं जरांगे पाटील सांगतात. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय हा उंबरा ओलांडणार नाही, असा निर्धारच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

निवडणुकांत सहभाग टाळला

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं. अगदी मुंबईपर्यंत जाऊन जरांगे यांनी त्यांचं म्हणणं आणि मागण्या सरकारसमोर मांडल्या.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून लढायचं का याचा विचार केला होता. पण त्यावनेळी अनेक बाजुंनी विचार केल्यानंतर जरांगेंनी थेट राजकारणात उतरायचं नाही असं ठरवलं.

पण जरांगेंच्या मराठा आंदोलानाचा फटका या निवडणुकीत अनेक उमेदवारांना बसल्याचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्पष्ट झालं.

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जरांगे यांच्या आंदोलनाला वेग आला. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न झाला.

पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी पुन्हा एकदा निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं आहे. अगदी उमेदवार अंतिम करण्यापर्यंत तयारी केल्यानंतर जरांगेंनी ही भूमिका घेतली.

पण त्याचवेळी लोकांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून द्यायचं हे माहिती असल्याचंही जरांगेनी सांगितलं. त्यामुळं थेट राजकारणापासून दूर राहत आपला प्रभाव कायम ठेवण्यात जरांगे यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.

‘जरांगे पाटील हे अपघाती नेतृत्व’

मराठा आरक्षणासंदर्भात मधल्या काळात काही प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी माहितही नसलेले मनोज जरांगे पाटील अचानक आरक्षणाच्या या आंदोलनाचे नेते झाले.

राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांच्या मते अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जरांगेंना खूपच महत्त्व दिलं. भेटीगाठी-आश्वासनं दिली गेली. यामुळे लोकांची उत्सुकता वाढत गेली आणि त्यांना पाठिंबा मिळत गेला.

"जरांगे राजकारणातलं चलनी नाणं आहे हे लक्षात आल्यानं सर्वांनी त्यांना भाव दिला. अगदी मुख्यमंत्री शिंदेंनीही भरमसाठ आश्वासनं देऊन टाकली. पण आता ते सगळ्या नेत्यांच्या अंगलट आलं आहे," असंही संजीव उन्हाळे यांना वाटतं.

यापूर्वीही झालेली आंदोलनं फारशी मोठी झाली नाहीत. राजकारणी-पुढाऱ्याचे बटिक किंवा हस्तक असल्यासारखी ती आंदोलनं व्हायची. जरागेंबाबतही तसं करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात नेत्यांना यश आलं नाही, असंही त्यांना वाटतं.

"जरांगे हे अस्सल ग्रामीण भागातील व्यक्तीमत्त्वं आहे. त्यांनी केवळ एकच उद्देश समोर ठेवला आहे. त्यांचा राजकारणाशी सबंध नाही. शिवाय अनेक आजार असतानाही जीवाची तमा न बाळगता ते फक्त समाजासाठी आंदोलन करत आहेत."

अनेकांनी जरांगेंच्या पाठिशी कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. पण सर्वसामान्य मराठा समाजानंच त्यांना मोठं केलं आहे. त्यांच्या वेगळ्या काही महत्त्वकांक्षाही नाहीत. त्यामुळंच मनोज जरांगे पाटील हे म्हणजे अपघाती नेतृत्व आहे, असं संजीव उन्हाळे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)