भारताच्या रणरागिणींनी इतिहास घडवला, वर्ल्डकप जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय महिला क्रिकेट संघ
वाचन वेळ: 6 मिनिटे

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 246 धावाच करता आला. यासह भारताने 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

भारताकडून दीप्ती शर्माने 9.3 षटकांत 39 धावा देत पाच विकेट्स घेतल्या, तर शेफाली वर्माने दोन विकेट्स घेतल्या.

त्याआधी, भारताकडून शेफालीनं सर्वाधिक 87 तर, दीप्तीनं 58, स्मृती मंधानानं 45 आणि ऋचा घोषनं 34 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या खाकानं 3 विकेट घेतल्या.

दरम्यान टॉसपूर्वी नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यामुळं चाहत्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं होतं.

पण पाच वाजता सामना सुरू झाल्यानं ओव्हर कमी करण्यात आल्या नाहीत. मैदानावर प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने भारताचं राष्ट्रगीत गायलं.

वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या महिला टीमनं विश्वचषकाची फायनल गाठण्याची ही तिसरी वेळ ठरली. याआधी 2005 आणि 2017 साली भारताला उपविजेतेपद मिळालं होतं.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून भारतीय संघानं विश्वविजेतेपद पटकावलं आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरनं या विजयाचं श्रेय प्रेक्षक, बीसीसीआय, निवड समिती आणि संघातील सदस्यांना दिलं आहे.

"मी प्रेक्षकांची आभारी आहे. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. या विजयाचं श्रेय बीसीसीआय, निवड समिती आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांना जातं.", हरमनप्रीतनं म्हटलंय.

या स्पर्धेत भारतीय संघाला लीग स्टेजमध्ये सलग तीन सामने गमवावे लागले होते. त्यावर, असे विचारले असता की, "महिला विश्वचषकाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे पुनरागमन आहे, कारण भारतानं सलग तीन सामने गमावलेले. अशा वेळी तुम्ही संघाला काय सांगितलेलं?"

फोटो स्रोत, Pankaj Nangia/Getty

फोटो कॅप्शन, वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर

त्यावर हरमनप्रीतनं म्हटलंय, "आमचा स्वतःवर विश्वास होता. आम्ही सलग तीन सामने गमावलेले पण आम्हाला माहित होतं की या संघात काहीतरी खास करण्याची क्षमता आहे. संघातील प्रत्येक सदस्याला याचं श्रेय जातं."

"त्या सकारात्मक राहिल्या, पुढील सामन्यांमध्ये आपल्याला काय करावं लागेल, हे त्यांना माहित होतं. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. हा संघ या विजयास पात्र आहे."

भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी भारतीय महिला संघानं दोन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दक्षिण आफ्रिकेची इनिंग

भारतीय बोलर्सनी दक्षिण आफ्रिकेच्या बॅटर्सना सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये कसून फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळं पॉवरप्लेच्या पहिल्या 5 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला फक्त 18 धावाच करता आल्या. रेणुका ठाकूर आणि क्रांती गौड दोघींनी चांगली गोलंदाजी केली.

त्यानंतर मात्र कर्णधार वुल्फार्ट आणि ब्रिट्स यांनी चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली.

पण 10 व्या ओव्हरमध्ये अमनज्योतने एक उत्कृष्ट थ्रो करत ब्रिट्सला रनआऊट केलं. त्यामुळं 51 धावांवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला.

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये श्रीचरणीनं बॉशला पायचित बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं.

15 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 78 धावा झाल्या.

त्यानंतर कर्णधार वुल्फार्ट आणि लूस यांनी गोलंदाजीवर हल्ला चढवला. वुल्फार्टनं 101 धावांची शतकी खेळी केली. पण हरमनप्रीतनं शेफालीला चेडू सोपवला आणि तिनं कामगिरी चोख बजावली.

तिनं आधी लूस आणि नंतर काप या दोघींना बाद करत, भारताला पुन्हा पुनरागमन करण्याची संधी दिली.

भारताची इनिंग

भारताच्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारताकडून फलंदाजीला सुरुवात केली.

मेरीजन कापने फायनलमध्ये पहिलीच ओव्हर मेडन टाकली. पावसामुळं खेळपट्टीतून सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळ स्मृतीनं अत्यंत शांतपणे पहिली ओव्हर खेळली. कारण कापनं सेमिफायनलमध्ये अत्यंत घातक गोलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं होतं.

मात्र, शेफाली वर्मान दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फटका लगावत चौकार खेचला आणि इरादे स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शेफाली वर्मानं फायनलमध्ये अर्धशतकी खेळी केली.

त्यामुळं पहिल्या पाच ओव्हरमध्ये भारतानं बिनबाद 31 धावा केल्या. सातव्या ओव्हरमध्ये स्मृती आणि शेफाली यांनी 50 धावांची भागिदारी केली. तर 10 ओव्हरमध्ये भारताच्या बिनबाद 64 धावा झाल्या होत्या.

ड्रिंक्सपर्यंत 16 ओव्हरमध्ये भारतानं बिनबाद 92 धावा केल्या होत्या. तर 18 व्या ओव्हरमध्ये भारतानं बिनबाद 100 धावांचा टप्पा गाठला. शेफाली आणि स्मृतीनं शतकी भागिदारी केली. पण ही भागिदारी 104 धावांपर्यंतच पोहोचली.

फोटो स्रोत, ANI

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चांगली भागिदारी होत असतानाच. स्मृती मंधाना 45 धावांवर बाद झाली. ट्रयॉनच्या गोलंदाजीवर विकेटकिपरच्या हातून ती झेलबाद झाली.

शेफाली वर्मानं मात्र अर्धशतकी खेळी करत, ऐनवेळी झालेली तिची निवड सार्थ ठरवली. 58 धावांवर शेफालीचा झेल सुटल्यानं तिला जीवनदानही मिळालं.

25 ओव्हरनंतर भारतानं 1 बाद 151 धावा केल्या होत्या. शेफालीनं जेमिबरोबरही अर्धशतकी भागिदारी केली. पण 87 धावांवर असताना खाकाच्या गोलंदाजीवर ती झेलबाद झाली.

त्यानंतर 30 व्या ओव्हरमध्ये भारताला आणखी एक धक्का बसला. जेमिमा 24 धावांवर बाद झाली. शेफाली आणि जेमिमा दोघींनाही खाकानं बाद केलं.

त्यानंतर दिप्ती आणि कर्णधार हरमनप्रीतनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हरमनप्रीत 20 धावांवर बाद झाली. त्यामुळं भारताची स्थिती 4 बाद 229 अशी झाली.

त्यानंतर अमनज्योतही 12 धावांवर बाद झाली.

ऋचा घोषनं अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केल्यामुळं भारताच्या धावा 6 बाद 298 पर्यंत पोहोचल्या. पण तिच्याशिवाय इतर बॅटर्सना अखेरच्या ओव्हर्समध्ये तशी आक्रमक फलंदाजी करता आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून खाकानं तीन तर मलाबा, डीक्लार्क आणि ट्रॅयॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मास्टर ब्लास्टरची उपस्थिती

भारताचामहान फलंदाज आणि क्रिकेट आयकॅान सचिन तेंडुलकरनंही महिला विश्वचषकाच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी हजेरी लावली.

सचिन विश्वचषक ट्रॉफी घेऊन येताच. स्टँडमध्ये चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला.

फोटो स्रोत, ANI

सचिन महिला क्रिकेटला वेळोवेळी पाठिंबा देत आला आहे. याही सामन्यात तो खेळाचा आनंद लुटताना आणि भारतीय टीमला पाठिंबा देताना दिसला.

सचिनशिवाय लिटिल मास्टर सुनील गावस्कर, हिटमॅन रोहित शर्मा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हेही महिला क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.

डीवाय पाटील महिला क्रिकेटचं होमग्राऊंड

नवी मुंबईत बदाबदा पाऊस कोसळत असतानाही चाहत्यांनी सामन्यासाठी गर्दी केली. तब्बल 45,000 क्षमतेचे स्टेडियम असतानाही ते काही दिवस आधीच 'हाऊसफुल' झालं.

अनेकजण तर सामना सुरू झाल्यावरही कुठे तिकिटं मिळतायत का हे पाहण्याच्या प्रयत्नात होते.

क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच महिलांच्या एखाद्या मॅचची तिकिटं मिळवणं एवढं कठीण बनलं होतं. महिला क्रिकेटला असा पाठिंबा मिळणं हे एकप्रकारे बदलाचं लक्षण आहे.

तसं मुंबईत कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी लोक एरवीही बऱ्यापैकी गर्दी करतात. पण नवी मुंबईत महिलांच्या मॅचसाठी लोक कुठून दूरदूरवरून आले, हे महत्त्वाचं आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण डीवाय पाटील स्टेडियम हे जणू भारतीय महिला टीमचं होमग्राऊंडच बनले आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अनेक सामन्यांची आयोजन याच मैदानात झालं होतं.

इथे नियमित येणाऱ्या चाहत्यांचे काही ग्रुप्सच झाले आहेत जे वेगवेगळ्या लयबद्ध घोषणा देत खेळाडूंचा उत्साह वाढवतात. या गटांच मुली आणि महिला चाहत्यांची संख्याही मोठी आहे आणि फायनलमध्येही त्या मोठ्या संख्येने आपल्या टीमला सपोर्ट करायला आल्या आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, वर्ल्ड कप कोण जिंकणार? फायनल मॅच पाहायला आलेले चाहते म्हणतात…

फायनलआधी कॅप्टन हरमनप्रीत काय म्हणाली?

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्या आधी कॅप्टन हरमनप्रीत कौरने असं म्हटलंय की, माझा आणि माझ्या टीमचा असा पूर्ण प्रयत्न असेल की शंभर टक्के देऊ आणि गेम एन्जॉय करू.

सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत हरमनप्रीतने म्हटलं की, "फायनलमध्ये खेळणं हा सर्वांसाठीच अभिमानास्पद क्षण आहे. आम्ही ज्या सामन्यात एन्जॉय केलंय आणि आमचं शंभर टक्के देऊ केलंय, तिथे आम्हाला पॉझिटीव्ह रिझल्ट्स मिळाले आहेत."

फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty

फोटो कॅप्शन, हरमनप्रीत

पुढे तिने म्हटलंय की, "इथेही आता आमची भूमिका अशीच राहील की, कोणतीही परिस्थिती असो, आम्हाला हा सामना एन्जॉय करायचा आहे."

भारतीय टीमला दोनवेळा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

तिसऱ्यांदा फायनल खेळण्याबाबतच्या प्रश्नावर हरमनप्रीतने म्हटलंय की, "हारल्यानंतर काय वाटतं, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, जिंकल्यानंतर कसं वाटतं, ते जाणून घेण्यासाठी आपण सगळेच प्रतीक्षा करतो आहोत."

"आशा आहे की, हा अंतिम सामन्याचा दिवस आमच्यासाठी स्पेशल असेल," असंही ती म्हणाली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या दरम्यान अंतिम सामना होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्डेडियममध्ये खेळला जाईल.

दोन्हीपैकी जो संघ हा सामना जिंकेल, तो पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनणार आहे.

उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनी शानदार विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली.

नवी मुंबईत डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतासमोर विजयासाठी 339 धावांचं भलं मोठं आव्हान होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रांती गौड, हिलीची विकेट साजरी करताना...

पण जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. जेमिमालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमनं धावांचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)