ट्रॅफिकजवळ उभं राहिल्यावर शरीरात काय होतं? रक्तात दिसले प्रदूषणाचे काळे कण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, इन्साईड हेल्थ प्रेझेंटर, बीबीसी रेडिओ 4
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

शहराच्या गर्दीच्या रस्त्यावर, सतत धावणाऱ्या वाहनांच्या मधोमध काही मिनिटं उभं राहिलं तरी श्वास जड झाल्यासारखा वाटतो हवेचा वास बदलतो, तोंड कोरडं पडतं, आणि डोक्यावर एक अदृश्य थर चढल्यासारखं जाणवतं. ही अनुभूती आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली आहे. पण या काही मिनिटांच्या 'एक्सपोजर'नंतर जर तुमच्या रक्ताचा नमुना तपासला तर काय दिसेल…?

सूक्ष्मदर्शकाखाली लाल रक्तपेशींवर चिकटलेले काळे, अतिसूक्ष्म प्रदूषणकण दिसतात कार्बनचे ते कण, जे शहरातील प्रदूषित हवेत तरंगत असतात. म्हणजे आपण श्वासात घेतलेलं प्रदूषण फुफ्फुसातच थांबत नाही; ते थेट रक्तप्रवाहात मिसळतं आणि शरीरभर फिरत राहतं. हवेतील अदृश्य धोका शरीरात किती आतपर्यंत शिरतो, याचं हे पहिलं आणि अस्वस्थ करणारं दृश्य पुरावा आहे.

फोटो कॅप्शन, जेम्स गॅलाघर हे जगातील अशा पहिल्या लोकांपैकी एक आहेत ज्यांनी वायू प्रदूषणामुळे त्यांच्या शरीराचे कसे नुकसान झाले आहे हे पाहिले.

माझं शरीर दूषित झाल्यासारखं वाटतं आहे.

मी प्रयोगशाळेतील एका सूक्ष्मदर्शकाखाली माझं रक्त पाहतो आहे. शुद्ध किंवा मूळ स्थितीतील लाल रक्तपेशीऐवजी दिसण्याऐवजी त्यातील काही पेशींवर काळ्या खुणा दिसत आहेत.

शरीरात वायू प्रदषूणाचा परिणाम कसा होतो आहे, हे पाहणारा मी आता जगातील पहिल्या व्यक्तींपैकी एक आहे.

एक तासापेक्षा कमी वेळापूर्वी मी लंडनच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीच्या 4 लेनच्या ट्रॅफिकमध्ये उभा होतो. हा असा रस्ता आहे, जिथे तुम्हाला हवेचा वास येतो आणि तोंड कोरडं पडतं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

प्रदूषित हवेतील घटकांचा शरीरात रक्तासह सर्वत्र संचार

वायु प्रदूषणाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची कशी हानी होते आहे हे जाणून घेण्याच्या प्रयोगाचा भाग मी तिथे 10 मिनिटं उभं राहण्यास तयार झालो होतो. तिथे उभं राहून मला घाणेरड्या हवेत श्वास घ्यायचा होता.

युकेमध्ये, खराब किंवा प्रदूषित हवेमुळे दरवर्षी 30,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचं मानलं जातं. तसंच अशा हवेमुळे गर्भाशयातील बाळांना अपाय होतो आणि दम्यापासून ते डिमेंशियापर्यंतचे आजार वाढतात.

श्वासावाटे माझ्या शरीरात जात असलेलं बहुतांश वायू प्रदूषण ट्रॅफिकमधून आलं होतं. ते एक्झॉस्ट पाईपमधून अदृश्य स्वरूपात बाहेर पडत होतं. मात्र त्याचबरोबर हे प्रदूषण टायर आणि ब्रेकची झीज झाल्यामुळे देखील बाहेर पडतं.

फोटो स्रोत, Tom Bonnett

फोटो कॅप्शन, प्रयोगादरम्यान प्राध्यापक ग्रिग हवेच्या गुणवत्तेचे नमुने घेताना

लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठातील प्राध्यापक जोनाथन ग्रिग या जागेला 'एक्सपोजर चेंबर' म्हणतात.

वाहनांच्या, हॉर्नच्या गोंगाटात ते मला मोठ्यानं सांगत होते की आपल्या नाकात आणि तोंडात वायू प्रदूषण रोखलं जातं किंवा तिथे फिल्टर होतं आणि नंतर आपल्या फुफ्फुसातून ते बाहेर काढलं जातं, असं बहुतांश लोक चुकीचं गृहीत धरतात.

ग्रिग म्हणतात, "या प्रयोगातून आपण पाहत आहोत की सर्वात लहान कण फक्त तुमच्या फुफ्फुसातच राहत नाहीत, तर तुमच्या रक्तप्रवाहातदेखील जातात आणि शरीरात इतरत्रही जातात."

प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसलं?

लंडनची हवा शरीरात घेतल्यानंतर, आम्ही प्रयोगशाळेत परत आलो. तिथे माझ्या बोटातून रक्ताचा नमुना तपासणीसाठी घेतला गेला.

सूक्ष्मदर्शकाखाली, आपल्याला शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल-डिस्कच्या आकाराच्या पेशी सहज दिसतात.

सूक्ष्मदर्शकातून पाहण्याला सरावण्यासाठी मला काही मिनिटं लागली. मात्र त्यानंतर मला पेशींमधील वायू प्रदूषण स्पष्ट दिसू लागलं. लाल रक्तपेशींना चिकटलेल्या छोट्याशा काळ्या ठिपक्यांसारखं ते दिसत होतं.

ते कार्बन आणि इतर रसायनांचे तुकडे होते. कोळसा अपूर्ण जळल्यानंतर तयार होतात तशा एका छोट्या गोळ्यासारखंच ते होतं. त्यांना पीएम 2.5 म्हणतात. कारण हे कण आकारानं 2.5 मायक्रोमीटर्सपेक्षा लहान आहेत.

फोटो स्रोत, Tom Bonnett

फोटो कॅप्शन, डॉ. नॉरिस लिऊ, जेम्स गॅलेघेर यांच्या रक्ताचा नमुना तयार करताना

मला ते वायू प्रदूषण पाहून आश्चर्य वाटलं नाही. त्यासाठीच तर तो प्रयोग केला जात होता. मात्र त्या प्रदूषणामुळे मला घाणेरडं, दूषित झाल्याची भावना टाळता येत नव्हती...त्यामुळे दूषित झाल्याची ती भावना होती.

संशोधक डॉ. नॉरिस लिऊ यांनी या अभ्यासाचा भाग म्हणून या सहभागी झालेल्या एक डझनहून अधिक लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.

सरासरी, दर 2 हजार ते 3 हजार लाल रक्तपेशींपैकी एका रक्त पेशीनं प्रदूषणाचा कण उचलला होता.

हे प्रमाण कदाचित जास्त वाटणार नाही. मात्र यात प्रौढ व्यक्तीमधील पूर्ण पाच लिटर रक्तापर्यंत वाढवल्यास, संशोधकांचा अंदाज आहे की आपल्या शरीरात प्रदूषण वाहून नेणाऱ्या 8 कोटी लाल रक्तपेशी असू शकतात.

प्रदूषित हवेतील घटक शरीरात फिरत राहतात

लिऊ म्हणतात, "हे पाहिल्यावर थोडीशी चिंता वाटतेय, नाही का? प्रत्येक वेळेस मी जेव्हा गर्दी असलेल्या रस्त्यावरून चालतो, तेव्हा मला मला वाटतं की यातील किती प्रदूषण माझ्या शरीरात फिरतं आहे...जास्त वेळ रस्त्यावर राहू नये असंच तुम्हाला वाटतं."

मी फक्त 10 मिनिटं रस्त्याच्या कडेला उभा राहिलो. तिथे गर्दी होते, मात्र ती काही खूपच टोकाची स्थिती नव्हती. तुमचं रक्तदेखील कदाचित असंच दिसत असेल.

लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठातील टीमनं असं दाखवून दिलं आहे की जवळपास 2 तास स्वच्छ हवेत श्वास घेतल्यानंतर रक्तातील वायू प्रदूषणाची पातळी पूर्ववत होते की प्रदूषणाची पातळी कमी होते.

रक्तातील ते वायू प्रदूषण इतकं स्पष्ट दिसत असल्याचं पाहून ग्रिग यांना 'चांगलाच धक्का' बसला होता. मात्र हे वायू प्रदूषण नेमकं कुठं जातं, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Tom Bonnett

फोटो कॅप्शन, एक अतिशय पातळ थर करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाच्या स्लाईडवर रक्त पसरवलं जातं
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे वायू प्रदूषण श्वासांद्वारे बाहेर टाकलं जात नाही. त्यातील काही मूत्रपिंडाद्वारे बाजूला करून बाहेर टाकलं जाऊ शकतं आणि ते मूत्रामार्गे शरीरातून बाहेर पडू शकतं. मात्र याचं सर्वात संभाव्य उत्तर म्हणजे, वायू प्रदूषणाचे हे कण "रक्तवाहिन्याच्या आत असलेल्या थर किंवा अस्तरातून फिरत राहतात आणि ते वेगवेगळ्या अवयवांमध्ये राहतात."

संशोधनातून हे स्पष्ट होतं आहे की फुफ्फुसांच्या विकारांच्या पलीकडेही अनेक गोष्टींशी वायू प्रदूषणाचा संबंध का जोडला गेला आहे. यात गर्भाशयात असलेल्या बाळांमधील समस्यांचा आणि मेंदूमधील आरोग्याच्या समस्यांचाही समावेश आहे.

वायू प्रदूषणातील कार्बनचे काळे साठे, मानवी शरीरात आढळून आले आहेत. यात जन्मानंतर विश्लेषण केलेल्या प्लेसेंटाही समावेश आहे.

लिऊ म्हणतात, "या कणांनी एका अवयवाऐवजी दुसऱ्या अवयवाची निवड करण्याचं कोणतंही कारण नाही. त्यामुळे ते शरीरात सर्वत्र असण्याची शक्यता आहे."

आणि वायू प्रदूषणाचे इतरही प्रकार आहेत. उदाहरणार्थ, नायट्रोजन ऑक्साईड. हे वायू असतात आणि ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसतनाही. मात्र त्यामुळे शरीराची हानी होते.

जगातील बहुतांश लोक वायू प्रदूषणाचा विळख्यात

जागतिक आरोग्य संघटनेचं (डब्ल्यूएचओ) म्हणणं आहे की जगातील 99 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत श्वास घेते. या प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांमुळे दरवर्षी 70 लाख जणांचा मृत्यू होतो. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सच्या एका अहवालात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की यामुळे युकेमध्ये दरवर्षी 30,000 मृत्यू होतात.

फोटो स्रोत, Tom Bonnett

फोटो कॅप्शन, एक अतिशय पातळ थर करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाच्या स्लाईडवर रक्त पसरवलं जातं

सर स्टीफन होलगेट यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार झाला. ते म्हणाले की वायू प्रदूषणामुळे आपल्या आरोग्याची हानी होते आहे, यात शंका नाही- "ते निश्चितपणेच होतं आहे". ज्या भागात वायू प्रदूषण कमी केलं जात होतं आणि त्याचे फायदे पाहिले जात होते, अशा भागातून याचे स्पष्ट पुरावे मिळत होते.

मात्र वायू प्रदूषण 'बहुतांशपणे अदृश्य' स्वरूपात आहे. ते भूतकाळातील धुकं आणि धुराच्या मिश्रणासारखं नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी हे माहित नसतं की आपण श्वासावाटे हे वायू प्रदूषण आत घेत असतो. "तसंच आपल्याला हे खरोखरंच समजत नाही की वायू प्रदूषणामुळे आपल्या शरीराची दररोज हानी होत असते," असं ते म्हणाले.

वायू प्रदूषणाचा संबंध संपूर्ण आयुष्यभर आपल्या आरोग्याच्या हानीशी आणि आपल्या संपूर्ण शरीराशी जोडला गेला आहे.

आरोग्यावर होणारे अनेक गंभीर परिणाम

प्रदूषित हवेमुळे आपल्या शरीरातील इतर अवयवांची अनेक प्रकारे हानी होऊ शकते. मात्र इफ्लेमेशन होणं हे मुख्य कारण मानलं जातं. दुखापत आणि संसर्गाच्या बाबतीत इन्फ्लेमेशन ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. मात्र त्यामुळे रक्तवाहिन्यांवरदेखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.

फुफ्फुसात झालेली इन्फ्लेमेशन कर्करोगाच्या सुप्त पेशींना जागृत किंवा सक्रिय करते असं दिसून आलं आहे. त्यामुळे नंतर प्राणघातक ट्यमुर तयार होतात. युकेमध्ये 10 पैकी एक फुफ्फुसाचा कर्करोग वायू प्रदूषणामुळे होतो असं मानलं जातं.

गर्भाशयात असतानादेखील, वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर वाढ होत असलेल्या बाळाच्या डीएनएच्या कार्यप्रणालीवर वायू प्रदूषणाचा परिणाम होतो, असं मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की जगातील 99 टक्के लोक प्रदूषित हवेत श्वास घेतात

"हा एक अतिशय संवेदनशील काळ असतो. याच वेळेस वायू प्रदूषणामुळे समस्या निर्माण होऊ शकते आणि नि:संशयपणे तसं होतं. बाळाची छोटी फुफ्फुसं, छोटं ह्रदय आणि मेंदूच्या वाढीतील काही समस्या त्यातून निर्माण होतात," असं सर स्टिफन म्हणतात.

तर आयुष्याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे वृद्धापकाळात, वायू प्रदूषणातील घटकांमुळे मेंदूच्या आत विषारी प्रथिनांचा तयार होण्यास मदत होऊन त्यातून डिमेन्शिया 'होण्याच्या प्रक्रियेला गती मिळत असल्याचं' दिसतं.

तुम्ही यासंदर्भात काय करू शकता?

वायू प्रदूषण आपल्या शरीरात कमीत कमी कसं जाईल किंवा त्याचा परिणाम कसा कमी करता येईल यासंदर्भात एक सल्ला आहे. तो म्हणजे शांत रस्त्यांवरून चालणं किंवा रस्त्याच्या कडेपासून दूर राहणं, म्हणजे तुम्ही ट्रॅफिकपासून दूर राहाल. रस्त्यांवरून बाळांना नेत असताना, त्यांना लहान मुलांसाठीच्या बाबा गाडीतून हे विशेष महत्त्वाचं ठरतं. कारण त्या एक्सॉस्ट पाईपच्या उंचीच्या खूप जवळ असतात.

ग्रिग यांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की घट्ट बसणारा एफएफपी2 मास्क घातल्यानं रक्तातील वायू प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं. मात्र "प्रत्येकानंच तो मास्क घालावा असं आम्ही सांगत नाही," असं ग्रिग म्हणतात.

ते पुढे म्हणतात, जे लोक वैद्यकीयदृष्ट्या जास्त असुरक्षित असतात किंवा ज्यांना आजार होण्याची लगेच शक्यता असते, ज्यात "ह्रदयविकारातून बरे होणारे किंवा दीर्घकालीन श्वसनाचे रोग असलेल्या लोकांचा" समावेश असतो. असे लोकांनादेखील खूप जास्त प्रदूषणाच्या भागात याचा फायदा होऊ शकतो.

मात्र वायू प्रदूषणाच्या बाबतीतील गुंतागुंतीची गोष्ट म्हणजे, इतर लोकांमुळे होणाऱ्या प्रदूषणात श्वास घेत असता. जर तुमचं घर गर्दीच्या किंवा ट्रॅफिक असणाऱ्या रस्त्यावर असेल, तर दुसरीकडे राहणं सोप नसतं.

कारमधील बदल - इलेक्ट्रिक वाहनांमुळे हवेची गुणवत्ता सुधारते आहे. मात्र त्याचबरोबर नवीन डिझेल आणि पेट्रोल इंजिनवरील उत्सर्जनाच्या मानकांमुळेदेखील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होते आहे.

मात्र ग्रिग म्हणतात, "मला वाटतं की हे परिणाम कसे होऊ शकतात, याची यंत्रणा आपण जितकी समजून घेऊ, तितकंच आपण धोरण ठरवणाऱ्यांवर, लोकप्रतिनिधींवर त्यासंदर्भात पावलं उचलण्यासाठी दबाव वाढवू शकतो. कारण शेवटी तेच त्यावरचं उत्तर आहे."

टॉम बॉनेट 'इनसाईड हेल्थ'चे निर्माते आहेत,

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.