अंतराळात माणूस बाळ जन्माला घालू शकतो का? 'अवकाशवासी बाळ' नेमकं कसं असेल?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माणसाला जर खरंच पृथ्वीपल्याडचं विश्व पादाक्रांत करायचं असेल, तर अवकाशात अथवा परग्रहाचा फक्त दौरा करून ते साध्य होणार नाही.
वाचन वेळ: 8 मिनिटे

पुढच्या काही दशकात माणूस मंगळावर प्रवास करेल आणि तिथे राहू सुद्धा लागेल, असा दावा नासा ही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था काही दिवसांपासून करत आली आहे.

या मंगळग्रहाचा पिच्छा पुरवण्यामागे माणसाचा नेमका हेतू काय आहे? तर पृथ्वीशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणं आणि ती प्रत्यक्षात उतरवून दाखवणं. माणूस म्हटलं की, पृथ्वी हे समीकरण बदलून आपण एका ग्रहापुरती मर्यादीत असणारी प्रजाती नाही, हे मानवाला स्वतःलाच दाखवून द्यायचं आहे. त्यासाठीच हा सगळा खटाटोप चाललेला आहे.

माणसाला अवशकात लाखो किलोमीटरचा प्रवास करता येईल आणि तिथे जाऊन जिवंतही राहता येईल, असं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यात वैज्ञानिकांना बऱ्यापैकी यशही आलेलं आहे. त्यामुळेच आज सुनिता विल्यम्स सारखी अंतराळवीर तब्बल 9 महिने अवकाशाचा दौरा करून पृथ्वीवर सुरक्षित परत येऊ शकली.

पण माणसाला जर खरंच पृथ्वीपल्याडचं विश्व पादाक्रांत करायचं असेल, तर अवकाशात अथवा परग्रहाचा फक्त दौरा करून ते साध्य होणार नाही. त्यासाठी पृथ्वीवर ज्या गोष्टी माणूस सहज करत आलेला आहे त्या अवकाशतही साध्य करून दाखवाव्या लागतील. तेव्हा कुठे आपण परग्रहावर कब्जा करण्याची भाषा करू शकतो. उदाहरणार्थ माणूस अवकाशात प्रजजन करू शकतो का?

माणसाला जर खरंच मंगळावर आपली वस्ती निर्माण करायची असेल, तर तिथे पृथ्वीप्रमाणे राहता येण्याची सोय तयार करता आली पाहिजे. एखादी समस्या आली की, ती सोडवायला माणसाला परत उठसूठ मंगळावरून पृथ्वीवर परतणं शक्य होणार नाही.

मंगळापासून पृथ्वी तब्बल 2250 लक्ष किलोमीटर दूर आहे आणि हे अंतर पार करायला आपल्याला किमान 7 महिने लागतात. शिवाय मंगळावर मानवी वस्ती निर्माण करायची भाषा आपण करत असू तर मंगळावर उद्भवलेल्या समस्या मंगळावर राहूनच सोडवायची तरतूद आपण केली पाहिजे. त्याशिवाय पृथ्वीवासीय हा शिक्का आपल्याला खोडून काढता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माणसाला जर खरंच मंगळावर आपली वस्ती निर्माण करायची असेल तर तिथे पृथ्वीप्रमाणे राहता येण्याची सोय तयार करता आली पाहिजे.

खरंच जर माणसाला स्वतःला अवकाशवासी म्हणवून घ्यायचं असेल, तर त्याची एक मोठी कसोटी म्हणजे माणसाला अवकाशात प्रजजन करून दाखवता आलं पाहिजे. माणूस कधी अवकाशात/परग्रहावर मूल जन्माला घालून त्याला वाढवू शकेल काय?

अंतराळ ही माणसासाठी पृथ्वीप्रमाणे अनुकूल वातावरण असणारी जागा नाही. अंतराळातील वातावरणात मानवी शरीर तगून राहणं इतकं सोपं नाही. उदाहरणार्थ अवकाशातील किरणोत्सर्गाचं प्रमाण पृथ्वीपेक्षा बरंच जास्त आहे. या किरणोत्सर्गाचा प्रजननासाठी आवश्यक असणाऱ्या शुक्राणू आणि अंडाशयावर विपरीत परिणाम होतो.

हेच तपासण्यासाठी नासाने नुकतेच माणसाच्या शुक्राणूचे नमुने अंतराळात पाठवले. गोठवलेल्या अवस्थेतील हे शुक्राणू अवकाशात नेल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्यातील डीएनएमध्ये या किरणोत्सर्गामुळे बिघाड झाल्याचं आढळून आलं. तसंच त्यांच्या हालचालीतही बदल झालेला आढळला. याचाच अर्थ अवकाशात गेल्यानंतर अंडाशयाशी प्रक्रिया करून प्रजनन करण्याची शुक्राणुंची क्षमता कमी झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माणसाला स्वतःला अवकाशवासी म्हणवून घ्यायचं असेल तर त्याची एक मोठी कसोटी म्हणजे माणसाला अवकाशात प्रजजन करून दाखवता आलं पाहिजे.

असाच प्रयोग नासाने उंदरांसोबत केला. उंदराच्या शुक्राणूचे गोठवलेले नमुने देखील असेच अवकाशात प्रयोग म्हणून पाठवले गेले. अनेक महिने अवकाशात हे नमुने ठेवले गेले आणि पृथ्वीवर परत आणल्यानंतर तपासले तेव्हा मात्र सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.

अनेक महिने अवकाशात ठेवण्यात आलेल्या या उंदाराच्या शुक्राणूंनी पृथ्वीवर परतल्यानंतर निरोगी आणि सुदृढ अशा पिल्लांना जन्म दिला. या शुक्राणूंच्या डीएनएमध्ये देखील थोडाफार बिघाड झाला होता. पण प्रजननासाठी हे शुक्राणू अंडाशयासोबत मिळाले तेव्हा हा डीएनएतील बिघाड आपोआप सुरळीत झाला.

मात्र अवकाशात मानवी गर्भात अर्भकाची निकोप वाढ घडवून आणायची असेल, तर तिथल्या हानिकारक किरणोत्सर्गापासून त्याचा बचाव करणं क्रमप्राप्त असेल. कारण अशा किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यानंतर गर्भातील अर्भकाच्या शरिरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतील.

यामुळे अनुवांशिक उत्परिवर्तन घडून येऊन नवजात अर्भकाला जन्मजात कर्करोगासारखे गंभीर विकार बळावण्याचा धोका असेल.

या हानिकारक किरणोत्सर्गा व्यतिरिक्त सुद्धा आणखी बरीच मोठी आव्हानं अवकाशात जन्माला येऊ पाहत असलेल्या या मानवी जीवासमोर उभी ठाकलेली असतील.

उदाहरणार्थ पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण नसलेल्या अवकाशात व्यतित केलेला वेळ आणि या गुरुत्वाकर्षणाच्या अभावाचा मानवी जीवावर होणारा परिणाम.

अवकाशात राहिल्यानंतर तिथल्या गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे अंतराळवीरांच्या शरिराचे स्नायू कमजोर होतात, हे आपण जाणतोच. तसेच त्यांच्या शरिरातील हाडांची घनता देखील कमी होऊ लागते. म्हणजे हाडं ठिसूळ होतात.

शरिरातील रक्तप्रवाह देखील मंदावतो. या सगळ्यांचा सहाजिकच प्रतिकूल परिणाम अंतराळातील मानवाच्या शरिरावर होतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उंदराच्या शुक्राणूचे गोठवलेले नमुने अवकाशात प्रयोग म्हणून पाठवले गेले.

कमी गुरुत्वाकर्षणाचे शरिरावर काय परिणाम होतील?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पृथ्वीबाहेर अंतराळात जर कुठे मानवानं मूल जन्माला घातलं तर ते मंगळावर असेल. कारण मंगळ हा त्या अर्थानं पृथ्वीशी सर्वात जास्त साधर्म्य असलेला ग्रह आहे.

मंगळावरील गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या जवळपास 38 टक्के आहे. या घटलेल्या गुरुत्वाकर्षणाचा या बाळाच्या जन्म आणि वाढीवर निश्चितच परिणाम होईल. या कमी गुरुत्वाकर्षणाचे शरिरावर होणारे परिणाम नेमके काय असतील?

उदाहरणार्थ पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील एका अवकाश केंद्रात जिथे गुरुत्वाकर्षण बल कमी आहे अशा ठिकाणी बाळ जन्माला आलंय आणि त्याची वाढ होत आहे, अशी कल्पना करू. नवजात अर्भकाच्या शरीराची वाढ होण्यामागे पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण बलही मोठी भूमिका निभावतं. जसं की माणसाच्या शरीराच्या कानाच्या आतील रचना गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावातून आकाराला आलेली असते.

शरीराचा हा भाग माणसाला स्थिर राहण्यासाठी आणि दिशा व त्यानुसार आपल्या हालचालींचा अंदाज बांधण्यासाठी कामी येतो. ज्या उंदराच्या पिल्लांची गर्भातील वाढ अवकाशात झाली होती त्यांना पृथ्वीवर परतल्यानंतर वरची दिशा कोणती आणि खालची दिशा कोणती हेच नीट समजत नसल्याचं शास्त्रज्ञांना लक्षात आलं. म्हणजेच त्यांना दिशेचा अंदाज घेता येत नव्हता आणि त्यामुळे हालचाल नीट करता येत नव्हती.

अर्भकाची वाढ तर पुढची गोष्ट झाली. प्रत्यक्षात बाळ जन्माला घालण्याची प्रक्रिया देखील गुरुत्वाकर्षणाच्या अभावात अतिशय किचकट होऊन जाते. नैसर्गिक बाळंतपणात काही गुंतागुंत निर्माण झाल्यास आपल्याकडे नेहमीच सी - सेक्शनचा (शस्त्रक्रिया करून थेट पोटातून बाळ बाहेर काढणे) पर्याय हाताशी असतो. पण तो फक्त पृथ्वीवर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वीबाहेर अंतराळात जर कुठे मानवानं मूल जन्माला घातलं ते मंगळावर असेल. कारण मंगळ हा त्या अर्थानं पृथ्वीशी सर्वात जास्त साधर्म्य असलेला ग्रह आहे.

अवकाशात गुरुत्वाकर्षणाच्या अभावात मानवी शरीरावर शस्त्रक्रिया करणं मोठं जिकिरीचं काम असेल. शस्त्रक्रिया करताना शरिराला कापून उघडलं गेल्यामुळे अर्थातच जखम होते आणि तिथून रक्तस्राव होतो.

गुरुत्वाकर्षण नसलेल्या अवकाशात हा रक्तस्त्राव रोखून धरणं डॉक्टरांना शक्य होणार नाही. अनियंत्रित रक्तस्त्राव होऊन ते रक्त गुरुत्वाकर्षणाच्या अभावात चहूबाजूंनी शरिरातून बाहेर पडेल.

शस्त्रक्रिया पार पडण्याआधीच न रोखता येणाऱ्या या अनियंत्रित रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा मृत्यू होईल. कसाबसा हा रक्तस्त्राव समजा रोखलाच तरी गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे जखमेभोवती रक्त अशा पद्धतीनं जमा होईल की आत शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना शरिराच्या आतला तो भाग दिसणंच शक्य होणार नाही.

या सगळ्या संभाव्य अडचणींमुळे अवकाशात जाऊन मानवी शरीरावर शस्त्रक्रिया पार पाडणं माणसाला आजतागायत शक्य झालेलं नाही.

नाही म्हणायला वैद्यकीय तज्ज्ञांनी गुरुत्वाकर्षण कमी असलेल्या वातावरणात उंदीर आणि डुकरांवर छोट्या शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत‌. पण मानवी शरीरावर असा प्रयोग यशस्वी करू दाखवणं अजून तरी शक्य झालेलं नाही.

त्यामुळे आज समजा अवकाश मोहीमेवर गेलेल्या अंतराळवीराची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला / तिला शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्याला / तिला मोहिमेतून माघारी पाठवत परत पृथ्वीवर आणलं जातं आणि मग उपचार केले जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अवकाशात गुरुत्वाकर्षणाच्या अभावात मानवी शरीरावर शस्त्रक्रिया करणं मोठं जिकिरीचं काम असेल.

समजा माणसाने यदाकदाचित अवकाशात बाळाला यशस्वीपणे जन्म दिलाच, तरी कमी गुरुत्वाकर्षणात वाढलेलं बाळ हे पृथ्वीवर जन्मलेल्या आणि वाढलेल्या बाळापेक्षा वेगळं असेल. त्याचं दिसणं, हालचाल आणि वागणूकही वेगळी असेल.

उदाहरणार्थ पृथ्वीवरील लहान बाळ पहिल्यांदा पायाने रांगायला शिकतं. अवकाशातील लहान बाळ पहिल्यांदा हाताने हवेत तरंगायला शिकेल. या लहान बाळाच्या शरीराच्या खालच्या भागातली हाडं व स्नायू कमजोर व आकाराने लहान असतील तर शरीराच्या वरच्या भागातील हाडं व स्नायू मजबूत व आकाराने मोठे असतील.

कारण अवकाशातील गुरुत्वाकर्षणाच्या अभावात शरीराच्या वरच्या भागातील अवयवांची (जसे की हात) हालचाल शरीराच्या खालच्या भागातील अवयवांपेक्षा (जसे की पाय) जास्त होते.

अवकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणूस चालत नव्हे, तर हवेत तरंगत जातो. म्हणजेच पायापेक्षा हातांची हालचाल अवकाशात जास्त करावी लागते. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे या बाळांच्या शरीरातील द्रव्य शरीराच्या वरच्या भागाकडे (जसे की छाती व डोकं) जास्त वाहतील.

चेहऱ्याच्या भोवती जास्त द्रव्य साठल्यामुळे त्यांचा चेहरा पृथ्वीवरील बाळांच्या / लोकांच्या तुलनेत अधिक सुजलेला दिसेल. जसा की अंतराळ मोहिमेवरून परतलेल्या अंतराळवीरांचा दिसतो.

त्यामुळे अवकाशात जन्मलेलं आणि वाढलेलं बाळ कदाचित त्याला पृथ्वीवर आणल्यानंतर जगू शकणार नाही. त्याला पृथ्वीवर चालणं, उभं राहणं इतकंच काय श्वास घेणंही कठीण जाईल. त्याचं शरीर पृथ्वीवरील अधिकच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने विकसितच झालेलं नसेल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, समजा माणसाने यदाकदाचित अवकाशात बाळाला यशस्वीपणे जन्म दिलाच तरी कमी गुरुत्वाकर्षणात वाढलेलं बाळ हे पृथ्वीवर जन्मलेल्या आणि वाढलेल्या बाळापेक्षा वेगळं असेल.

पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे मानवी जीवनाशी इतकं जोडलेलं आहे की, त्याशिवाय मानवी जीवाची कल्पना करणं अवघड आहे. ही गुरुत्वाकर्षण शक्ती मानवाची ओळख बनून गेलेली आहे. लाखो वर्षांपासून पृथ्वीवरील या गुरुत्वाकर्षण बलाची माणसाला सवय जडलेली आहे.

हे गुरुत्वाकर्षणच नसलेल्या अवकाशात जन्मलेला व वाढलेला माणूस हा पृथ्वीवरील माणसापेक्षा इतका वेगळा असेल की कदाचित त्याची वेगळी प्रजाती म्हणून गणना करावी लागेल. ही विशिष्ट मानवी प्रजाती फक्त अवकाशात जगू शकणारी असेल.

या झाल्या अवकाशात मानवी शरिराला भेडसावणाऱ्या समस्या. अवकाशवासी माणूस घडवण्यात या शारीरिक आव्हानांशिवाय इतर प्रकारची आव्हानं देखील तितकीच मोठी असतील.

उदाहरणार्थ परग्रहासारख्या विभक्त आणि विपरीत वातावरणात वाढल्याचा त्या लहान बाळावर काय मानसिक परिणाम होईल? कदाचित या प्रयोगासाठी त्या लहान बाळाच्या पालकांची परवानगी घेता येईल‌ही. पण स्वतः बाळाच्या इच्छेचं काय?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे मानवी जीवनाशी इतकं जोडलेलं आहे की त्याशिवाय मानवी जीवाची कल्पना करणं अवघड आहे.

अशा प्रयोगात सहभागी व्हावं की नाही हे ठरवण्याची निर्णयक्षमता त्याच्याकडे नसताना त्याला अवकाशात पाठवणं है नैतिकदृष्ट्या देखील चुकीचं ठरेल. सज्ञान नसलेल्या बाळाची यासाठी संमती तरी कशी मिळवणार?

शिवाय एकदा अवकाशात पाठवलं आणि तिथे तो लहानाचा मोठा झाला, तर तिथल्या वातावरणाची सवय जडल्यामुळे तो व्यक्ती परत पृथ्वीवर कधी परतूच शकणार नाही.

पृथ्वीसाठी बनलेल्या एका जीवाला कायमसाठी पृथ्वीपासून परकं करणं हे अमानुषच ठरेल. त्यामुळे अवकाशात प्रजजन करणं आणि वास्तव्य करणं थोडक्यात अवकाशवासी बनण्याच्या या मोहिमेतील भौतिक अडचणी तर मोठ्या आहेतच, पण यातले नैतिक पेच देखील तितकेच क्लिष्ट आहेत.

अवकाशात जाऊन प्रजनन करणं आणि तिथेच अर्भकाची वाढ करणं ही आता आपल्याला एखादी परिकल्पना वाटते. या कल्पनेवर बरीच खलबतं माणसानं विज्ञान कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांच्या रुपात रचली आहेत.

प्रत्यक्षात ही कल्पना प्रत्यक्षात राबवण्यात मोठा अडचणींचा डोंगर माणसाला अजून पार करावा लागणार आहे. पण विश्वाचा अनंत पसारा उलगडून पृथ्वीच्या बाहेरील जगावर आपली छाप माणसाला सोडायची असेल तर हे कोडं सोडवणं त्याला भाग आहे.

या अवकाशात मानवी जीव जन्माला घालून त्याला वाढवून दाखवणं ही या समग्र विश्व पादाक्रांत करण्याच्या मानवी महत्वाकांक्षेच्या पूर्ततेची आदर्श सुरुवात असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)