हे विमान सुमद्रकिनाऱ्यावर कसं आलं? त्यामधील प्रवासी पाण्यातून का चालत आहेत?

फोटो स्रोत, Aussom

वाचन वेळ: 2 मिनिटे

सोमालियातील एका एअरलाइननं त्यांच्या एका वैमानिकाचं कौतुक केलं आहे. विमानात तांत्रिक अडचणी आल्यानंतर या वैमानिकानं ते विमान अतिशय कौशल्यानं एका समुद्रकिनाऱ्यावर उतरवलं होतं. त्यानंतर एअरलाइन कंपनीनं वैमानिकाचं कौतुक केलं आहे.

या विमानात 5 कर्मचारी आणि 50 प्रवासी होते. या विमानानं सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशू इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या एका समुद्रकिनाऱ्यावर आपत्कालीन लँडिंग केलं. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवासी सुरक्षित आहेत.

उड्डाण केल्याबरोबर तांत्रिक बिघाड

सोमाली सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीनं (सीएए) म्हटलं आहे की फॉकर 50 विमानानं मंगळवारी (10 फेब्रुवारी) सकाळी मोगादिशूतून उड्डाण केलं. त्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे विमान परत वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे विमान धावपट्टीवर उतरलं. मात्र ते धावपट्टी ओलांडून त्याच्या जवळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन थांबलं, असं सीएएचे संचालक अहमद मगलिन हसन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Starsky Aviation

विमानात काय समस्या निर्माण झाली होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओंमध्ये विमानातील प्रवासी, विमानातून उतरताना दिसत आहेत. हे विमान हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर उभं आहे. समोर आलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे की, विमानातील कोणालाही दुखापत झालेली नाही.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

तांत्रिक बिघाडाचा तपास सुरू

सोमालियातील आफ्रिकन युनियन मिशनचं सांगितलं आहे की, बचाव कार्यात मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि आफ्रिकन युनियनचं सैन्य 'लगेच तैनात' करण्यात आलं आहे. एक्सवर वृत्त देण्यात आलं आहे की सौमालियाचे वाहतूक मंत्रीदेखील घटनास्थळी पोहोचले होते.

फोटो स्रोत, Starsky Aviation

"विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. ज्या तांत्रिक बिघाडामुळे विमान आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आलं, त्याबाबतचा तपास सुरू आहे," असं स्टारस्कायचे प्रतिनिधी हसन मोहमद एडन यांनी सांगितलं.

एडन म्हणाले, "वैमानिकानं योग्य वेळी आणि शांतपणे घेतलेल्या निर्णयानं विमानातील सर्वांचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ही परिस्थिती त्यानं ज्या कौशल्यानं हाताळली, ते कौतुकास्पद आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.