लघवी झाल्यानंतर पुन्हा थेंब पडतात? PMD ची लक्षणं आणि सोपे उपाय

फोटो स्रोत, Getty Images

लघवी केल्यानंतर काही सेकंदांनी किंवा शौचालयातून बाहेर पडल्यावर अचानक थेंब गळणं याला पोस्ट मिक्टुरिशन ड्रिबल (PMD) म्हणतात. हा त्रास दिसायला छोटा वाटला तरी अनेक पुरुषांच्या दैनंदिन आयुष्यावर, आत्मविश्वासावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो.

वय वाढलं की हा त्रास होतो असा समज सर्रास आढळतो, पण प्रत्यक्षात PMD तरुण पुरुषांमध्येही तितकाच सामान्य आहे. पेल्विक फ्लोअर स्नायूंची कमजोरी, मूत्रमार्गात अडकलेले थेंब आणि चुकीची लघवीची पद्धत ही यामागची प्रमुख कारणं असून योग्य व्यायाम व तंत्रांनी हा त्रास सहज नियंत्रित करता येतो.

PMD नक्की का होतो, कोणती लक्षणं महत्त्वाची, आणि कोणते उपाय खरोखर उपयोगी आहेत, हे जाणून घेणं हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे.

फोटो स्रोत, Getty Images

लघवी झाल्यानंतर काही क्षणांनी अचानक थेंब गळणं, अंतर्वस्त्र ओलं होणं किंवा शौचालयातून बाहेर पडल्यानंतर अस्वस्थता जाणवणं हा अनुभव अनेक पुरुषांना वारंवार येतो. हा त्रास तसा सामान्य असला, तरी याबद्दल बोलायला पुरुष अनेकदा कचरतात.

लाज वाटणं किंवा चेष्टा होईल याची भीती, 'हे तर वय वाढल्यावर होतंच' असा गैरसमज किंवा हा काही गंभीर मुद्दा नाही असं गृहीत धरणं या सर्व कारणांमुळे 'पोस्ट मिक्टुरिशन ड्रिबल' म्हणजेच PMD हा विषय अनेकदा दबलेला राहतो.

प्रत्यक्षात पीएमडी हा फक्त वृद्धांनाच होणारा त्रास नाही. अनेक तरुण पुरुषांनाही हा अनुभव येतो. लघवीचे अचानक थेंब गळल्यामुळे दिवसभर ओलसरपणा जाणवणं, कामाच्या ठिकाणी अस्वस्थ वाटणं, सतत कपड्यांकडे लक्ष देणं, बाहेर असताना किंवा प्रवासात तणाव वाढणं या सगळ्यामुळे दैनंदिन आयुष्यावर आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images

अनेक पुरुष हा त्रास थेट प्रोस्टेटशी जोडतात आणि अनाठायी भीती निर्माण करतात. काहीजण इंटरनेटवर चुकीची माहिती वाचून गोंधळतात, तर काहीजण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.

मात्र तज्ज्ञ सांगतात की पीएमडी हा गंभीर आजार नसून बहुतेक वेळा पेल्व्हिक फ्लोअर स्नायूंची ताकद कमी होणं, मूत्रमार्गात थोडं मूत्र अडकणं किंवा बसून राहण्याची सवय या कारणांमुळे होऊ शकतो.

योग्य व्यायाम, काही साधी तंत्रं आणि लघवी करण्याची योग्य पद्धत अंगीकारल्यास पीएमडी सहजपणे कमी होऊ शकतो.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

पीएमडीचा अनुभव अनेक पुरुषांना येतो. फक्त याबद्दल बोललं जात नाही. त्यामुळे या त्रासामागचं विज्ञान, कारणं आणि उपाय समजून घेणं हीच पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.

PMD म्हणजे काय?

पीएमडी म्हणजे लघवी केल्यानंतर मूत्रमार्गात अडकलेले थेंब नंतर बाहेर पडणे.

शौचालयातून बाहेर आल्यावर, काही सेकंदांनी किंवा काही मिनिटांनी अचानक थेंब गळणं, ही याची मुख्य लक्षणं.

हा त्रास बहुतेक वेळा मूत्रमार्गाच्या खालच्या भागात (bulbar urethra) थोडंसं मूत्र अडकून राहिल्यामुळे होतो. पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत असणे, वाढलेला प्रोस्टेट, बसून राहण्याची सवय, लघवी योग्य पद्धतीने न करणं किंवा मूत्रमार्गातील स्नायूंचा समन्वय नीट न होणं, या कारणांनी पीएमडी वाढू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मूत्राशय (ब्लॅडर)

याबाबत डॉ. अकिल खान यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. ते KIMS हॉस्पिटल, ठाणे येथे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. खान म्हणतात, "पोस्ट मिक्टुरिशन ड्रिबल म्हणजे लघवी आटोपल्यानंतर, व्यक्ती शौचालयाबाहेर आल्यावर लागोपाठ काही थेंब गळणे. हे पारंपरिक 'यूरेनरी इनकॉन्टिनन्स'मध्ये मोडत नाही. हे 'वॉइडिंग डिसफंक्शन'च्या वेगळ्या श्रेणीत येतं, यामध्ये लघवी केल्यानंतर मूत्रमार्गात थोडं मूत्र अडकून राहतं आणि नंतर बाहेर पडतं."

हा त्रास जरी अस्वस्थ करणारा असला तरी योग्य व्यायाम आणि पद्धती अवलंबल्यास तो सहज नियंत्रणात येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे काय?

पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे पोटाखालील भागात असलेली स्नायू, टिश्यू आणि लिगामेंट्सची एक मजबूत पण लवचिक अशी थरासारखी रचना. ही संपूर्ण संरचना एक 'हॅमॉक' किंवा आधार देणाऱ्या जाळ्यासारखी कार्य करते आणि पेल्व्हिसमधील महत्त्वाचे अवयव मूत्राशय, मूत्रमार्ग, आतडी आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट यांना स्थिर राहाण्यासाठी आधार देते.

शरीर उभं असताना किंवा हालचाली करताना हे स्नायू अवयवांचा भार सांभाळतात आणि त्यांना योग्य स्थितीत ठेवतात.

फोटो स्रोत, Getty Images

या स्नायूंचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मूत्र आणि मल यांचं नियंत्रण ठेवणाऱ्या झडपांना (sphincters) योग्य आधार देणं. श्वासोच्छ्वास, खोकणं, शिंक, वजन उचलणं, व्यायाम या सर्व क्रियांदरम्यान पोटात दबाव वाढतो, तेव्हा हा ताण पेल्व्हिक फ्लोअर शोषून घेतो आणि अवयवांना योग्य स्थैर्य देतो.

त्यामुळे शरीराचं संतुलन, कोअरची ताकद आणि मूत्र‑मल नियंत्रण या सर्वांसाठी पेल्व्हिक फ्लोअर ही एक अत्यंत महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित राहणारी रचना आहे.

PMD कोणाला होतो आणि त्याचा प्रोस्टेटशी संबंध असतो का?

पीएमडी होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे पेल्व्हिक फ्लोअर स्नायू कमकुवत असणे किंवा त्यांचा समन्वय नीट न होणे. हेच स्नायू लघवीच्या शेवटच्या थेंबांना बाहेर टाकण्याचं काम करतात.

पेल्व्हिक फ्लोअर कमजोर असल्यास मूत्रमार्गात थोडं मूत्र अडकतं आणि नंतर बाहेर पडतं. हा त्रास फक्त वृद्धांमध्ये होतो, ही समजूत चुकीची आहे.

तरुण पुरुषांमध्येही बसून राहण्याची सवय, व्यायामाचा अभाव, स्थूलता किंवा लघवी योग्य पद्धतीने न करणं या कारणांमुळे पीएमडी होण्याची शक्यता वाढते.

फोटो स्रोत, Getty Images

पीएमडी चा प्रोस्टेटशी थेट संबंध आहे, हा आणखी एक सामान्य गैरसमज आहे. खरेतर काही प्रकरणांत वाढलेला प्रोस्टेट कारणीभूत असू शकतो; पण बहुतांश पुरुष विशेषतः तरुण यांना प्रोस्टेटचा कोणताही आजार नसतो. त्यांच्यातील पीएमडी हा संरचनात्मक समस्या नसून 'फंक्शनल' म्हणजे स्नायूंच्या कार्याशी निगडित असतो.

तज्ज्ञांच्या मते, PMD फक्त थेंबगळतीपेक्षा अधिक लक्षणांसोबत दिसत असेल तर तपासणी आवश्यक आहे. जसे लघवी करताना जळजळ होणे, लघवीचा प्रवाह कमजोर होणे, जोर लावून लघवी करावी लागणे, वारंवार लघवीची भावना येणे, लघवीत रक्त दिसणे किंवा पेल्विक भागात वेदना होणे. अशी लक्षणं दिसली तर मूत्रमार्गाचा संसर्ग, मूत्रमार्ग अरुंद होणे किंवा प्रोस्टेटमध्ये सूज यांसारख्या स्थितींची शक्यता तपासणं आवश्यक ठरतं.

निदान कसं करतात आणि पेल्व्हिक फ्लोअरच्या व्यायामाची भूमिका

हा आजार ओळखण्यासाठी लक्षणांचा इतिहास आणि साधी शारीरिक तपासणी उपयोगी ठरते. काहीवेळा युरोफ्लोमेट्री किंवा युरीन ॲनालिसिससारख्या चाचण्या सुचवल्या जातात. व्यवस्थापनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीने पेल्विक फ्लोअर व्यायाम करणे.

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. अकिल खान म्हणतात, "याचं निदान मुख्यतः क्लिनिकल असतं लक्षणांचा इतिहास आणि शारीरिक तपासणी यावर आधारित असतं. काही प्रकरणांमध्ये युरिन ॲनालिसिस किंवा यूरोफ्लोमेट्रीसारख्या चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो. व्यक्ती स्वतःही काही पॅटर्न्स पाहू शकतात, जसं की लघवी करून थांबल्यानंतरही सतत थेंबथेंब गळणं. पण कोणतंही गंभीर कारण नाही याची खात्री करण्यासाठी योग्य वैद्यकीय तपासणी आवश्यक असते."

डॉ. अकिल खान पुढं म्हणाले, " पीएमडीच्या व्यवस्थापनात पेल्विक फ्लोअर व्यायाम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 'यूरेथ्रल मिल्किंग' म्हणजे लघवी झाल्यानंतर स्क्रोटमच्या मागील भागावर हलका दाब देणे, यामुळे उरलेली लघवी बाहेर पडण्यास मदत होते. एक सामान्य चूक म्हणजे किगल व्यायाम चुकीच्या पद्धतीने किंवा अनियमितपणे करणं त्यासाठी. योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत संसर्ग किंवा प्रोस्टेटच्या वाढीसारखी संबंधित समस्या नसते, तोपर्यंत औषधांची गरज नसते."

PMD सोबत दिसणारी गंभीर समस्यांची लक्षणं

पीएमडी असूनही काही वेगळी लक्षणं दिसत असतील तर ती अधिक गंभीर समस्येची सूचक असू शकतात. मूत्रातून रक्त येणं, जळजळ, ताप, पेल्विक किंवा पेरिनियल वेदना, कमजोर प्रवाह किंवा वारंवार संसर्ग होणं ही लक्षणं तात्काळ तपासणीची गरज दर्शवतात. अशा अवस्थांमध्ये स्ट्रिक्चर, इन्फेक्शन किंवा ऑब्स्ट्रक्शनसारख्या गोष्टी घडलेल्या असू शकतात.

याबाबत डॉ. श्याम वर्मा यांनी अधिक माहिती दिली. ते मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात युरोलॉजिस्ट आणि रिनल ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. श्याम वर्मा सांगतात, "जर पीएमडीबरोबर लघवीतून रक्त, वेदना किंवा कमजोर प्रवाहासारखी लक्षणं दिसत असतील, तर ते केवळ पीएमडी नसतं. ती एक अंतर्गत समस्या असण्याची शक्यता असते आणि तपासणी गरजेची ठरते."

फोटो स्रोत, Getty Images

खालच्या मूत्रमार्गातील इतर तक्रारींसोबत पीएमडी अनेकदा दिसून येतो. ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर असताना आधीच वारंवारता आणि 'अर्जन्सी' जाणवते, त्यामुळे पोस्ट-वॉइड थेंब जाणं अधिक त्रासदायक वाटतात. स्ट्रिक्चरमुळे मूत्रमार्ग अरुंद झाल्यास त्यातला शेवटचा भाग नीट रिकामा न होणं सामान्य आहे. तर प्रोस्टायटिसमध्ये इन्फ्लमेशन आणि पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंचे वेदनादायक आकुंचन पीएमडीमुळे वाढू शकते. (पोस्ट वॉईड म्हणजे लघवी करून झाल्यानंतरचा वेळ किंवा अवस्था)

याबाबतीत डॉ. वर्मा सांगतात. "ब्लॅडरची अतिसंवेदनशीलता, स्ट्रिक्चर किंवा प्रोस्टायटिसमधील सूज या सर्वांचा परिणाम ड्रिब्लिंगवर दिसू शकतो, कारण अशा स्थितीत मूत्रमार्ग पूर्ण रिकामा न राहण्याची शक्यता वाढलेली असते."

PMD ची क्लिनिकल तपासणी कशी होते?

तपासणीची सुरुवात सविस्तर माहिती घेण्यापासून होते. ड्रिब्लिंग कधी होतं, किती प्रमाणात होतं, जळजळ किंवा वेदना आहेत का, यामुळे दैनंदिन जीवनावर किती परिणाम होतो. त्यानंतर शारीरिक तपासणी, आवश्यक असल्यास प्रोस्टेट मूल्यांकन, तसेच मूत्र तपासणी, यूरोफ्लोमेट्री आणि पोस्ट-वॉइड रेसिड्यू मोजणे यांचा वापर केला जातो. चेतावणीसदृश लक्षणं असल्यास सिस्टोस्कोपी किंवा इमेजिंगचा सल्ला दिला जातो.

पीएमडी सतत होत असेल, वाढत असेल, त्रासदायक असेल किंवा जळजळ, वेदना, रक्तमूत्र किंवा कमजोर प्रवाहासारख्या इतर लक्षणांसह असेल तर तपासणी आवश्यक आहे. विशेषत: तरुण पुरुषांनी याकडे दुर्लक्ष करू नये.

हलका पीएमडी धोकादायक नसतो, पण जर तो मोठ्या समस्येचं लक्षण असेल तर निदान उशिरा होऊन त्रास वाढू शकतो. अनेकदा मानसिक अस्वस्थता आणि जीवनमानात घट हीच मोठी समस्या ठरते.

घरी करता येणारं निरीक्षण

पीएमडी असलेल्या व्यक्तींना साधी 'ब्लॅडर डायरी' ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. ड्रिब्लिंग कधी होतं, किती वेळा होतं, पाण्याचं प्रमाण आणि प्रतीक्षा करून फरक पडतो का ही माहिती नोंदवता येते.

मात्र या नोंदी केल्या म्हणजे डॉक्टरांची तपासणी करणं गरजेचं नाही असं होत नाही. लक्षण वाढत असली तर डॉक्टरांची मदत आवश्यकच आहे. याबाबत डॉ. वर्मा सांगतात, " ही डायरी उपयोगी ठरते, कारण पॅटर्न स्पष्ट होतो. पण लक्षणं टिकून राहिली तर केवळ स्वतः निरीक्षण करून चालत नाही तपासणी आवश्यकच आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पेल्व्हिक फ्लोअरसाठी व्यायाम

ते पुढं म्हणाले, "फक्त काही थेंब पडण्यामागे एखादं मोठं कारण असेल, तेव्हाच औषधोपचाराची गरज भासते. स्वतंत्र पीएमडी साठी औषधं देणं विरळच असतं. पेल्विक फ्लोअर ट्रेनिंग आणि यूरेथ्रल मिल्किंग ही पीएमडी साठी सर्वांत उपयोगी आणि पुराव्यांसह योग्य असलेली तंत्रं आहेत."

डॉ. वर्मा सांगतात, किगल्स व्यायाम करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

ते म्हणाले, "यात सर्वात मोठ्या चुका केल्या जातात त्या म्हणजे चुकीचे स्नायू घट्ट करणं, पोटाचे, नितंबाचे किंवा मांड्यांचे स्नायू जास्त वापरणं, श्वास रोखून व्यायाम करणं, व्यायाम अनियमितपणे करणं किंवा काहीच दिवसांत त्वरित परिणाम मिळतील अशी अपेक्षा बाळगणं. अनेक पुरुष 'स्क्वीझिंग' प्रकारचे व्यायाम करतात, पण योग्य पेल्विक फ्लोअर संकुचन कसं करायचं हे त्यांना शिकवलेलंच नसतं. किती तीव्रतेने व्यायाम करताय यापेक्षा त्याचं व्यायामाचं तंत्र अधिक महत्त्वाचं असतं."

PMD चे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम

वैद्यकीयदृष्ट्या तितकं गंभीर नसले तरी पीएमडीमुळे अनेक पुरुषांमध्ये लाज, चिंता आणि आत्मविश्वास कमी होणं दिसून येतं. कपड्यांवर डाग पडण्याची भीती असल्यामुळे सामाजिक प्रसंग टाळण्याची प्रवृत्तीही दिसते.

या संदर्भात डॉ. वर्मा म्हणाले,"अनेक रुग्ण पीएमडीबद्दल बोलायला कचरतात. पण हा सामान्य आणि उपचारयोग्य त्रास आहे यात लाज वाटण्याचं काही कारण नाही."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)