दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भारत विश्वचषकातून बाहेर होईल का? समीकरणं काय सांगतात?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

    • Author, प्रवीण
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

10 नोव्हेंबर 2022... हा तो दिवस होता ज्या दिवशी भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा ट्वेन्टी-20 विश्वचषकात शेवटचा पराभव झाला. त्यानंतर सुमारे चार वर्षांनी म्हणजे काल (22 फेब्रुवारी) भारतीय संघाला विश्वचषकात पराभवाचं तोंड बघावं लागलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या पराभवाने भारताचा टी-20 विश्वचषकातला सलग 12 विजयांचा वारू रोखला गेला आहे. यादरम्यान भारताने 2024 मध्ये तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टी-20 विश्वचषक आपल्या नावे केला होता.

अखेर 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताची ही विजयी मालिका रोखली. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात धावांच्या पराभवाने झालेला हा भारताचा सर्वात मोठा पराभव आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर-8 फेरीतला हा भारताचा पहिला सामना होता. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी 188 धावांचा लक्ष्य ठेवलं होतं.

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 111 धावांवरच आटोपला. भारतीय संघ पूर्ण 20 देखील फलंदाजी करू शकला नाही आणि अखेर भारताला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

कर्णधार सूर्यकुमार यादवने 'आम्ही पॉवरप्लेमध्येच हा सामना हरलो' अशी कबुली दिली. त्यानं म्हटलं की, "कधीकधी तुम्हाला असा विचार करावा लागतो की जर तुम्ही 180-185 धावांचा पाठलाग करत असाल तर तुम्ही पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, तर पॉवरप्लेमध्ये तुम्ही सामना गमावू शकता."

टी-20 विश्वचषकात याआधी भारताचा कधीही 50 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभव झाला नव्हता.

साखळी फेरीत भारताने चारही सामने जिंकले असले, तरी या पराभवाने भारतीय संघाचे कमकुवत दुवे समोर आले आहेत. भारताचा संघ हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात असला तरी यापुढचे सामने भारतासाठी सोपे असतील असं नाहीये.

सलामीच्या फलंदाजांची 'ढिसाळ' कामगिरी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

18, 6, 0, 0, 31, 8, 25, 1, 0 आणि 0 मागच्या दहा सामन्यांमध्ये भारतीय संघाने या धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे. याचा दुसरा अर्थ असा की अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन असे आक्रमक पर्याय उपलब्ध असूनही भारताने मागच्या दहा सामन्यांमध्ये एकदाही सलामीला 50 धावांचा आकडा गाठलेला नाही.

खरं म्हणजे सलामीच्या जोडीवरून बराच काथ्याकूट याआधीही झाला होता. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सलग तीन शतकं झळकावणाऱ्या संजू सॅमसनला अंतिम 11 मध्ये संधी न देता ईशान किशनचा समावेश केल्याने बरीच चर्चा झाली होती. पण या प्रयोगाचा फारसा फायदा झालेला दिसून आला नाही. तसेच ज्याला भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जातं त्या शुभमन गिलला तर अंतिम 15 मध्ये देखील जागा मिळाली नाही.

आता सुपर-8 फेरीत भारतीय संघाच्या सलामी जोडीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अभिषेक शर्माला याआधीच्या तीन सामन्यांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता, अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशाबशा 15 धावा करून तो तंबूत परतला.

सलामीच्या फलंदाजीचा गुंता तर आहेच पण दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूची कामगिरी देखील भारतासाठी चिंतेची बाब आहे. साखळी सामन्यात तिलक वर्माने 120 च्या सरासरीने फक्त 106 धावा काढल्याने त्याच्यावरही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

फोटो स्रोत, Manan VATSYAYANA / AFP via Getty Images

शनिवारी (21 फेब्रुवारी) सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवला तिलकबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, तुम्ही तिलकबाबत प्रश्न कसे उपस्थित करू शकता?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नेमकी हीच भीती खरी ठरली आणि तिलक वर्मा दोन बॉल्समध्ये केवळ एक धाव काढून बाद झाला. तो बाद होण्याआधीच भारताने सात बॉल्समध्ये दोन विकेट गमावल्या होत्या. या पडझडीनंतर भारतीय संघ सामन्यात पुनरागमनच करू शकला नाही.

या स्पर्धेत भारतीय फलंदाजी ढेपाळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताचे 77 धावांवर 6 खेळाडू बाद झाले होते. पण त्या सामन्यात सूर्यकुमारने 49 बॉल्समध्ये 84 धावा काढून भारताला 29 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला देखील धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. या स्पर्धेत त्याने पाच सामन्यांमध्ये 180 धावा काढल्या आहेत. पण त्याचा स्ट्राईक रेट मात्र 127 चाच राहिला आहे. टी-20 सामन्यांमध्ये त्याची सरासरी 162 धावांची आहे.

टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने सूर्यकुमार यादवसह इतर फलंदाजांवर दबाव येतोय.

केशव महाराजने 15 व्या ओव्हरमध्ये तीन भारतीय फलंदाजांना बाद करून फिरकी गोलंदाजी खेळायला भारतीय संघाला अडचण येत असल्याचं दाखवून दिलं,

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने देखील हे म्हटलं आहे की या स्पर्धेत भारतीय फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकलेले नाहीत.

इरफानने एक्सवर लिहिलंय की, "भारतीय संघाने मोठी निराशा केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना उघडं पाडलं आहे. अजूनही भारतीय फलंदाजांना सूर गवसलेला नाही."

कर्णधाराच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या निर्णयांची देखील चर्चा होऊ लागली आहे. अक्षर पटेल उपकर्णधार असूनही त्याला संघात का ठेवलं नाही यावर देखील मोठी चर्चा आहे.

याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे भारताच्या सुरुवातीच्या 6 फलंदाजांमध्ये तब्बल पाच फलंदाज डावखुरे आहेत. हा सामना सुरु असताना समालोचकांनी भारताच्या या रणनीतीवर टीका केली.

तज्ज्ञांना वाटतं की भारतीय संघाने हा निर्णय घेतल्यामुळे विरोधी संघातील गोलंदाजांना भारताविरुद्ध रणनीती आखण्यास मदत झाली. यामुळे त्यांना त्यांच्या गोलंदाजीत विशेष बदल करावे लागले नाहीत.

पहिल्या डावाच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराने दोन ओव्हर्समध्ये दोन विकेट पाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्याच्या हातात बॉल देण्यास एवढा उशीर का झाला याबाबत देखील प्रश्न विचारले जात आहेत.

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, "आम्ही 21 धावांमध्ये त्यांच्या तीन फलंदाजांना बाद केलं होतं. पण त्यानंतर 7 ते 15 ओव्हरमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तिलक वर्माच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भारतीय संघासाठी सेमीफायनलचा रस्ता किती अवघड?

आता सुपर-8चे पुढचे दोन सामने फक्त जिंकून भारतीय संघाचं काम होणार नाही. तर हे सामने त्यांना चांगल्या फरकाने देखील जिंकावे लागणार आहेत.

एवढंच नाही तर नवीन समीकरणांमध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला इतर संघांवर देखील अवलंबून राहावं लागू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जसप्रीत बुमराने दोन ओव्हर्समध्ये दोन विकेट घेतल्यानंतरही, पुढील 13 ओव्हर्समध्ये त्याला पुन्हा गोलंदाजी करायला बोलावण्यात आले नाही.

भारताचे पुढील दोन सामने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्ध आहेत. जर भारताने हे दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेनेही त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर टीम इंडियाचे 4 गुण होतील आणि दक्षिण आफ्रिकेचे 4 गुण होतील, ज्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवणं सोपं होईल.

जर भारताला आणखी एक पराभव पत्करावा लागला तर त्यांना विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा धोका आहे. जर भारताने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचा एक सामना गमावला तर दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील.

शिवाय, जर दक्षिण आफ्रिका एखाद्या संघाविरुद्ध हरली तर भारतासाठी हे महत्त्वाचं असेल की तो संघ त्याच्या पुढच्या सामन्यात पराभूत व्हावा.

उदाहरणार्थ, जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर. अशा परिस्थितीत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा होईल. त्यानंतर भारताला आशा करावी लागेल की झिम्बाब्वे वेस्ट इंडिजला हरवेल. या प्रकरणात, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे प्रत्येकी दोन गुण राहतील, अशा परिस्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी चार गुणांसह पात्र ठरतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.