घाबरू नका, तुमचं मुल सतत मोबाईल वापरत असेल, तर 'हे' 5 सोपे उपाय जाणून घ्या
फोटो स्रोत, Getty Images
- Author, एमर मोरो
- Role, बिझनेस रिर्पोटर
- वाचन वेळ: 4 मिनिटे
हल्ली मुलांच्या जीवनात फोन आणि टॅब्लेट प्रत्येक ठिकाणी दिसतो. पालक म्हणून त्यांचा स्क्रीन टाइम कमी करणे हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे.
सोशल मीडिया, गेम्स आणि ॲप्समुळे मुलं सतत त्यात गुंतलेले राहतात, पण तज्ज्ञ सांगतात की, योग्य मार्गदर्शन आणि साधे नियम वापरल्यास आपण मुलांच्या मनावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो.
दरम्यान, तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचेल अशा प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा आणि गुगलने हेतूपूर्वक बनवल्याचे मत अमेरिकेच्या न्यायालयाने नोंदवलं.
जर तुम्ही पालक असाल तर या बातमीमुळे तुम्हाला दिलासा मिळाला असेल.
इन्स्टाग्रामचे काही फीचर्स, जसं की सततचे स्क्रोलिंग (न संपणारे स्क्रोलिंग), जाणूनबुजून लोकांना व्यसनात टाकण्यासाठी बनवलेले आहेत, असं कॅली नावाच्या तरुणीच्या वकिलांनी सांगितलं.
सोशल मीडिया कंपन्यांसाठी न्यायालयाचा निर्णय म्हणजे मोठा बदल (गेम चेंजिंग) म्हणता येईल. पण जगभरातील पालकांना तो मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी फारसा उपयोगी ठरताना दिसत नाही.
आम्ही काही पालकत्व तज्ज्ञांचा (पॅरेंटिग एक्स्पर्ट्स) सल्ला घेतला. मुलांच्या हातातून काही काळासाठी तरी फोन कसा दूर ठेवता येईल, याबाबत त्यांच्याकडून काही टिप्स जाणून घेतल्या.
1. छोटी सुरुवात करा आणि वास्तववादी व्हा
बर्याच पालकांनी आपल्या मुलांना टॅब्लेट किंवा स्मार्टफोन दिले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या हातातून हे सर्व काढून टाकणं सर्वोत्तम उपाय वाटतो.
परंतु, बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. जेन गिल्मोर यांना हा नेहमीच उपयोगी पडणारा पर्याय वाटत नाही.
फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणतात, 'सवय बदलणं सोपं नसतं.' म्हणून, मुलांच्या फोन वापरावर किंवा स्क्रीन टाइमबद्दल वाद होत असताना यावर बोलू नये. शांत वेळेत बदल करायला सुरुवात करा. 'शांत मनाने बोलल्यानं संवादही व्यवस्थित होतो'.
स्क्रीन टाइम कमी करण्याचा पहिला सोपा उपाय म्हणजे घरात फोन आणि टॅब्लेट ठेवण्यासाठी ठराविक जागा ठरवणं, जसं एखादं कपाट.
"चार्जरसाठी एकच जागा ठेवा. जेव्हा फोन वापरत नसेल, तेव्हा ते फक्त चार्जरवर ठेवा, बाकी काही नाही."
2. एकत्र काम करा
बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. मॅरिहॅन बेकर म्हणतात की, मोठी मुले आणि किशोरवयीन (टीनएजर्स) मुलांवर नियम लादण्याऐवजी त्यांना स्क्रीन टाइमविषयीच्या चर्चेत सहभागी करून घेतलं तर त्याचा फायदा होतो.
त्या सांगतात की, मुलांच्या सोशल मीडिया दबावाला मान्यता देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांना म्हणू शकता: "मला कळतं तुम्ही मित्रमैत्रिणींशी इथेच जोडलेले असता. जर तुम्ही यावर नसाल, तर तुमच्यावर कोणता दबाव येतो हे मी समजू शकतो."
"म्हणून आपण दिवसभरात फोन न वापरता काही वेळ कसा घालवता येईल, यावर चर्चा करुयात."
फोटो स्रोत, Getty Images
पालकत्व प्रशिक्षक ऑलिव्हिया एडवर्ड्स सांगतात की, मुलांशी किंवा टीनएजर्सशी मजबूत नातं निर्माण केल्यास स्क्रीन वापरावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं.
"आपण मुलांशी चांगलं नातं ठेवायला हवं, कारण त्यातूनच सहकार्य आणि टीमवर्क साध्य होऊ शकतं."
यामध्ये मुलं ऑनलाईन काय पाहतात, त्यात खरंच लक्ष देणं महत्वाचं आहे.
3. स्क्रीन टाइमला शिकण्याच्या संधींमध्ये बदला
बर्याच पालकांना सोशल मीडियावरील बदलत चाललेले ट्रेंड्स समजायला अवघड वाटतात. पण स्क्रीन टाइमविषयी मोकळ्या चर्चेतून पालक आणि मुलं एकमेकांकडून शिकू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
ऑलिव्हिया म्हणतात, "तुम्ही मुलाला असं विचारू शकता: 'तुला काय वाटतं, सोशल मीडिया कसं काम करतं? हे ॲप लोकांना सतत पाहत राहण्यासाठी कसं बनवलं आहे? तुला माहिती आहे का, लोक जास्त वेळ घालवतात म्हणून त्यांना पैसे मिळतात?'"
डॉ. जेन म्हणतात, "पालक आपल्या मुलांना डिजिटल ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून शिकवू शकतात. तुम्ही काही गोष्टी एकत्र पाहू शकता. तसेच 'ठीक आहे, तुला वाटतं हे खरं आहे का? हे खरं आहे की नाही हे मला कसं समजेल?' असं विचारू शकता."
4. पालकांचं वर्तन आणि अनुकरण
मुलं त्यांच्या पालकांच्या वर्तनाचं अनुकरण करतात हे आता गुपित राहिलेलं नाही. त्यामुळे मुलांमध्ये चांगल्या स्क्रीन सवयी रुजवायच्या असतील, तर पालकांनी आधी स्वतःवर लक्ष (आत्मचिंतन) देणं गरजेचं आहे.
मॅरिहॅन सुचवतात की, यावर हलक्या आणि मजेशीर पद्धतीने बोलणं फायदेशीर आहे. उदाहरणार्थ, मुलांशी असं बोलू शकता: "आपण सर्वजण यासाठी थोडे थोडे दोषी आहोत, माझा फोन वापर माझ्या अपेक्षेइतका चांगला नाही."
फोटो स्रोत, Getty Images
फोन आणि टॅब्लेटमुळे सर्व वयोगटातील लोकांना सतत मनोरंजन मिळत असलं तरी, डॉ. जेन म्हणतात की मुलं आणि पालक दोघांनीही थोडासा कंटाळा अनुभवायला हवा.
स्क्रीनवर राहिल्याने आपण बाहेरच्या जगात अडकतो. पण जेव्हा आपण स्क्रीन सोडून शांत बसलो की, भूतकाळाचा विचार करू शकतो, भविष्यासाठी कल्पना करू शकतो आणि त्यामुळे कल्पकतेला (क्रिएटिव्हीटी) चालना मिळते.
"म्हणून जेव्हा मुलं म्हणतात, काहीही करायचं नाही आणि फक्त आकाशाकडे बघत बसतात - तर हे ठीक आहे. खरं सांगायचं तर, ही खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे."
5. घाबरू नका
पालक होणं कधीच सोपं नव्हतं. पण आजकाल सगळीकडेच स्क्रीन आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आपण अजून शिकत आहोत. अशावेळी मुलं मोठी करणं खूप काळजीचं ठरू शकतं.
पालकांनी घाबरून जाऊ नये, असं एसेक्स विद्यापीठामधील डिजिटल कम्युनिकेशनचे शिक्षक डॉ. टोनी सॅम्पसन सांगतात.
ते म्हणतात, "काही पालक घाबरतात. माध्यमांत चाललेल्या भीतीदायक गोष्टींमध्ये ते अडकतात आणि सर्व टीनएजर्सचे मेंदू फक्त सोशल मीडियाच्या व्यसनासाठीच तयार होत आहेत असं त्यांना वाटतं."
फोटो स्रोत, Getty Images
पण मुलं आणि किशोरवयीन मुलांना म्हणजे टीनएजर्सला 'न्यूरोप्लास्टिसिटी' असते - त्यांचे मेंदू प्रौढांच्या मेंदूपेक्षा जास्त लवकर बदलतात आणि पुन्हा सावरतात.
"सोशल मीडिया लोकांचं लक्ष कसं वेधून घेतात याबद्दल आपण बऱ्याचदा वाचतो," असं ते सांगतात.
"परंतु, सोशल मीडिया लक्ष कमी करत नाही. ते आकर्षित करतं आणि लोकांना जाहिराती आणि कमर्शियल गोष्टींकडे वळवतं."
"तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर केल्यास मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. त्यामुळे मुलं जास्त क्रिएटिव्ह, शोधक आणि शिकायला उत्सुक होतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही