इराणच्या युद्धभूमीत कुर्दिश महिलांची गुप्त बटालियन? त्यांचं काम कसं चालतं?

फोटो स्रोत, Valentina Sinis

फोटो कॅप्शन, उत्तर इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशात, इराणच्या सीमेजवळ एका टेकडीवर पीजेएके सदस्यांचा एक गट दिसत आहे.
    • Author, कावोन खामोश
    • Role, प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, इरबिलहू (इराक)
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला एक महिना पूर्ण झाला आहे.

या युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने बॉम्बफेक सुरू केली. त्यावेळी इराकमधील इराणी कुर्दिश सशस्त्र गट सीमा ओलांडून इस्लामिक रिपब्लिक राष्ट्राविरुद्धच्या लढाईत सामील होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

या हल्ल्याला उत्तर देताना इराणने अनेक कुर्दिश गटांवर हल्ले केले. त्यात एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचाही समावेश होता. या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला होता.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुर्दांनी इराणमध्ये लढू नये, अशी इच्छा 7 मार्चला व्यक्त केली होती.

बीबीसीला कुर्दिश गुरिल्ला गटांपैकी एका गटाला भेटण्याची दुर्मिळ संधी मिळाली. विशेष म्हणजे ही पूर्णपणे महिला बटालियन आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

खोल गुहा आणि भूमिगत बोगद्यांमध्ये जाण्यास परवानगी मिळवण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली, चर्चा करावी लागली. ही ठिकाणं उत्तर इराकमध्ये इराणी कुर्दिश गुरिल्ला गटांसाठी तळ म्हणून वापरली जातात.

ते एक गुप्त कम्युनिकेशन नेटवर्क चालवतात आणि अर्ध-स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशात अधिकृत प्रणालीच्या नजरेपासून दूर राहतात.

केवळ एका महिला फोटोग्राफरला या परिसरात जाण्याची परवानगी मिळाली. तिने कुर्द लोकांसोबत तब्बल दहा दिवस घालवले.

ट्रम्प काय म्हणाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मागील काही दशकांमध्ये अनेक कुर्दिश बंडखोर गट इराणमधून सीमा ओलांडून इराकच्या पर्वतांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

ते इराणच्या गुप्तचर संस्था, इराकमधील त्यांचे शिया सहयोगी दल आणि तुर्कीच्या सैन्यापासून लपून राहतात.

अलीकडेच, अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरुद्धच्या युद्धापूर्वी, उत्तर इराकमध्ये प्रमुख इराणी कुर्द गटांनी एक संघटना तयार केली.

नंतर अशी चर्चा सुरू झाली की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांना युद्धात सहभागी होण्याची विनंती केली. पण त्यावर विविध कुर्दिश गटांनी ते कोणत्याही देशाचे सैन्य बनणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

5 मार्च रोजी, ट्रम्प यांनी रॉयटर्सला टेलिफोनवर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी कुर्दिश लोकांच्या इराणमधील हल्ल्याचे समर्थन करत असल्याचे म्हटले. त्याचबरोबर "कुर्दिशांना तसं करायचं असेल तर हे खरंच जबरदस्त असेल," असंही त्यांनी पुढे म्हटलं होतं.

परंतु, नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी कुर्दिशांनी इराणमध्ये जाऊ नये अशी आपली इच्छा असल्याचे पत्रकारांना सांगितलं.

"आम्हाला युद्ध आणखी कठीण आणि गुंतागुंतीचे बनवायचं नाही," असं ते यावेळी म्हणाले.

गुप्त लष्करी तळ

कुर्दिस्तान फ्री लाइफ पार्टी (पीजेएके) हा सर्वात संघटित गटांपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून आपलं सैन्य इराणमध्ये पाठवण्याची तयारी करत असल्याचं या गटाने म्हटलं आहे.

"वर्षानुवर्षे अत्याचार होत असलेल्या माझ्या कुटुंबासाठी आणि कुर्दिश लोकांसाठी मी लढत आहे," असं 21 वर्षांची आरियन सांगते.

ती पीजेएकेच्या महिला संरक्षण दलातील एका युनिटची सदस्य आहे.

आरियन म्हणते की, कुर्द म्हणून मला इराणमध्ये अन्याय आणि भेदभावाचा सामना करावा लागला. हातात शस्त्र घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. दोन वर्षांपूर्वी मी पीजेएकेमध्ये सहभागी झाले.

हे बोगदे सुरक्षित आश्रयस्थान आहेत. तिथे अन्नधान्य, रोख रक्कम आणि दारूगोळा यांचा साठा आहे.

पीजेएके आपल्या सैनिकांची संख्या अत्यंत गोपनीय ठेवते, परंतु सुमारे 60 लोक आहेत, त्यात बहुतांश महिला आहेत.

हे लोक अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरुद्धच्या युद्धापूर्वीपासूनच या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत.

ते गुरिल्ला लष्करी प्रशिक्षण घेतात, वैचारिक बैठकांमध्ये भाग घेतात आणि स्नायपर शूटिंग व ड्रोन रणनीती यांसारख्या विविध कौशल्यांचा सराव करतात.

फोटो स्रोत, Valentina Sinis

फोटो कॅप्शन, या संघर्षामुळे कुर्दिश महिला म्हणून आपली ओळख पुन्हा मिळवण्याची संधी मिळते, असं आरियन म्हणते.

अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्यास त्यांना सीमेजवळ तैनात करता यावं यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

"हे युद्ध सुरू होण्याची दीर्घकाळापासून अपेक्षा होती," असं 40 वर्षीय गॅलाविझ आवरीन यांनी बीबीसीला सांगितलं.

आवरीन इराणमधील उर्मिया शहरात भूगोलाचे शिक्षण घेत होत्या. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी हे शिक्षण सोडले आणि त्या पीजेएकेमध्ये सैनिक म्हणून सामील झाल्या. नंतर त्या या गटाच्या प्रवक्ते बनल्या.

गॅलाविझ आवरीन एका गुप्त गुहेतून बोलत होत्या. त्या म्हणतात, मी माझं अर्धे आयुष्य या पर्वतांमध्ये घालवलं आहे आणि इराण सोडल्यापासून आपलं कुटुंबही पाहिलेलं नाही.

त्या म्हणतात की, 2022 पासून संपूर्ण इराणमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनांनी, इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूपूर्वीच, इस्लामिक रिपब्लिक कमकुवत केले होते.

22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या अशांततेच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. महसा एक कुर्दिश महिला होती. तिने हिजाबशी संबंधित नियम पाळले नाही, असे सांगत इराणी पोलिसांनी तिला अटक केली होती.

एकमेव पर्याय

या विरोधी आंदोलनाचे 'महिला, जीवन, स्वातंत्र्य' चळवळीत रुपांतर झाले. परंतु, अधिकाऱ्यांनी त्यावर प्राणघातक दडपशाही करत प्रतिसाद दिला. हाच तो क्षण होता ज्यामुळे पीजेएकेच्या काही नवीन सदस्यांना प्रेरणा मिळाली.

18 वर्षीय बिगेन पीजेएकेमध्ये सहभागी होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात विरोधी आंदोलनात सहभागीत होत असत. नियमांचे उल्लंघन करत तिने शाळेत हिजाब घालण्यास नकार दिला होता.

"महिलांसमोर जास्त पर्याय नसतात," बिगेन एका सहकाऱ्याच्या केसांचा गुंता सोडवत म्हणाली.

"एकतर आपल्याला कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक बंधनं सहन करावी लागतात, किंवा क्रांती करून स्वतःला वाचवावं लागतं," असं ती म्हणाली.

फोटो स्रोत, Valentina Sinis

फोटो कॅप्शन, पीजेएकेचे सदस्य टीव्हीवरील बातम्या पाहून बोगद्याच्या बाहेरील घटनांवर लक्ष ठेवतात.

कुर्दिश बंडखोर गटांवर अनेकदा मुलांची भरती करण्याचे आरोप केले जातात आहेत. बिगेन जेव्हा तीन वर्षांपूर्वी या गटात सामील झाली, तेव्हा ती खरोखरच इराणमधील शाळेची विद्यार्थीनी होती. सशस्त्र प्रतिकार हाच बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता, असं तिथे असलेले अनेक गुरिल्ला म्हणतात.

डलाल, एक दंत चिकित्सक आहे. वयाच्या 23 व्या वर्षी ती एक गुरिल्ला बनली. "माझा संघर्ष कुर्दिश लोकांच्या पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आहे," असं ती म्हणते.

ती पुढे म्हणते, "कुर्दिश लोकांसाठी, गेली 200 वर्षे दडपशाही आणि हिंसाचाराने भरलेली आहेत."

पीजेएकेची स्थापना 2004 मध्ये झाली होती आणि त्याचा संबंध कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीशी (पीकेके) आहे. पीकेके ही तुर्कीयेची एक अलिप्ततावादी संघटना आहे. या संघटनेने मागील वर्षी तुर्कीये सरकारसोबत चर्चा करून चार दशकांच्या संघर्षानंतर आत्मसमर्पण केलं होतं.

पीजेएकेने म्हटलं आहे की, ते या निर्णयाचा आदर करतात. परंतु, कुर्दिश इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणविरोधात आपला सशस्त्र प्रतिकार सुरूच ठेवतील.

तुर्कीये आणि इराण दोघेही या गटाला एक दहशतवादी संघटना मानतात.

तुर्कीयेच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की, ते 'दहशतवादी गट पीजेएके' च्या कृतीवर लक्ष ठेवून आहेत. ते या गटावर जातीय अलिप्ततावाद पसरवण्याचा आणि प्रदेशातील शांतता व स्थिरता धोक्यात आणल्याचा आरोप करतात.

गृहयुद्धाची भीती

कुर्दिश गुरिल्लांना त्यांच्यासमोर किती मोठे आव्हान आहे, याची जाणीव आहे. त्यांना थेट इस्लामिक रिपब्लिकच्या सुसज्ज सैन्याशी सामना करावा लागण्याची शक्यताही आहे.

'गृहयुद्ध ही अशी गोष्ट आहे, ज्याचा सामना आम्ही करु इच्छित नाही,' असं गॅलाविझ आवरीन यांनी बीबीसीला सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही शक्य ते सर्व केले पाहिजे, जेणेकरुन युद्ध आमच्याकडे वळवण्याऐवजी आणि भविष्यात आपापसांत लढण्यास भाग पाडण्याऐवजी, सरकारच्या पतनाकडे नेईल."

त्या म्हणतात, "मध्य पूर्वेचा नकाशा पुन्हा तयार केला जात आहे आणि इराणच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या भविष्याचा निर्णय घेतला पाहिजे."

फोटो स्रोत, Valentina Sinis

फोटो कॅप्शन, या गुरिल्लांना युद्धासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पण त्यांना गृहयुद्धाचा सामना करण्यास भाग पाडलं जाणार नाही, अशी त्यांना आशा आहे.

इराण सरकारविरोधी गटांना आशा आहे की, या युद्धानंतर इराण या प्रदेशात लोकशाहीचे मॉडेल बनू शकेल. पण त्यांना भीतीही आहे की, जर राष्ट्रवादी शक्तींचे वर्चस्व वाढले, तर देश धोकादायक अधोगतीच्या चक्रात अडकू शकतो.

इराणच्या 9 कोटी लोकसंख्येपैकी कुर्द हे सुमारे 10 टक्के आहेत. अनेक दशकांपासून त्यांना वाटतं की, इस्लामिक रिपब्लिकने त्यांना उपेक्षित ठेवलं आणि त्यांच्याबरोबर भेदभाव केला आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून तेहरानने इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशातील इराणी कुर्दिश गटांविरोधात हल्ले वाढवले आहेत.

बीबीसीने नवीन संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या त्यांच्या संपर्काबद्दल विचारणा केली. पण त्यांनी यावर कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आणि त्यांच्या सैन्याने आधीच सीमा ओलांडून इराणमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त नाकारले आहे.

तरीही, त्यांचं सशस्त्र दल 'मोठ्या संख्येने' आधीच इराणमध्ये आहे आणि योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असा दावा पीजेएकेने केला आहे.

"आमचा लष्करी सहभाग आगामी काळात परिस्थिती कशी पुढे जाईल यावर अवलंबून असेल," असं या गटाच्या एका नेत्याने सांगितले.

अमेरिकेवर विश्वास ठेवावा की नाही

इतर इराणी कुर्दिश विरोधी गट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि वेगवेगळ्या पर्यायांचा विचारही करत आहेत.

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराणी कुर्दिस्तानच्या एका नेत्याने सांगितलं की, त्यांचं ध्येय "संक्रमण काळात इराणी कुर्दिस्तानचे प्रशासन चालवणं" आहे. त्यांनी त्यांच्या समर्थकांना सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारे कोणतेही प्रतिशोधात्मक पाऊल टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, काही कुर्दिश गुरिल्ला आगामी कोणत्याही संभाव्य युद्धात अमेरिकेच्या मदतीवर विश्वास ठेवता येईल की नाही. याबाबत साशंक आहेत.

ज्यावेळी अमेरिकेच्या हवाई दलाचा खात्रीपूर्वक पाठिंबा मिळेल, तेव्हाच विरोधी गट आपलं सैन्य मैदानात उतरवेल, असं इराणी कुर्दिश गटांमधील परिस्थिती माहीत असलेल्या एका स्त्रोताने बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Valentina Sinis

फोटो कॅप्शन, डलाल एका सहकारीसोबत आपल्या ठिकाणाजवळील एका छोट्या सरोवराच्या काठावर बसली आहे.

इराणचे सैन्य अजूनही मजबूत आहे आणि जर कुर्दिश गुरिल्ला गटाच्या सदस्यांनी जमिनीवरून हल्ला केला तर त्यांना 'भयानक' परिणामांना सामोरे जावं लागेल, असा त्यांना वाटतं.

महिला संरक्षण दलाचे सदस्य त्यांना हव्या असलेल्या 'स्वातंत्र्याची' खूप दीर्घकाळापासून वाट पाहत आहेत.

डलालला आता प्रशिक्षण ठिकाण सोडून सीमेजवळ तैनात करण्यात आलं आहे. जर कुर्दिश लोक इस्लामिक रिपब्लिकविरुद्धच्या युद्धात उतरले, तर ही लढाई किती दिवस चालेल आणि त्याचा काय परिणाम होईल, हे सांगणं कठीण आहे.

(अतिरिक्त वार्तांकन: व्हेलेंटिना सिनिस)

(महिला गुरिल्लांनी आपली खरी ओळख उघड केलेली नाही. सुरक्षेच्या कारणांसाठी त्यांच्या लष्करी नावांचा वापर करण्यात आला आहे.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.