'ऑपरेशन सिंदूर' वरून भारत आणि पाकिस्तानमध्ये शाब्दिक चकमक, कोण काय म्हणालं?

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत केलेल्या वक्तव्याला पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पाकिस्ताननं पुन्हा एखादं धाडस केलं केलं, तर भारतीय सैन्य 'अभूतपूर्व कारवाई' करेल असं राजनाथ सिंह म्हणाले होते.
ते म्हणाले होते, 'ऑपरेशन सिंदूर' सुरू आहे.
तर ख्वाजा आसिफ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याची वर्षपूर्ती जवळ येत असताना वारंवार केल्या जात असलेल्या वक्तव्यांमधून ताकद नाही तर, एक स्पष्ट व्यूहरचनात्मक अस्वस्थता दिसून येते आहे.
त्याआधी बुधवारी (1 एप्रिल) मुंबईत भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी म्हणाले होते की गेल्या वर्षी मे महिन्यात, ज्यावेळेस पाकिस्ताननं शस्त्रसंधीची विनंती केली होती, त्यावेळेस भारतीय नौदल समुद्रातून पाकिस्तानविरोधात फक्त 'काही मिनिटांतच' कारवाई करणार होतं.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात, 22 एप्रिल 2025 ला पर्यटकांना लक्ष्य करून कट्टरतावादी हल्ला करण्यात आला होता. यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर 6-7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांच्या तळांना भारतीय सैन्यानं लक्ष्य केलं होतं.
या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता.
त्यानंतर 10 मे ला शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर हा संघर्ष थांबला होता. त्यावेळेस पाकिस्ताननं भारताची '5 लढाऊ विमानं पाडल्याचा' दावा केला होता. भारतानं हा दावा पूर्णपणे नाकारला होता.
'पुन्हा धाडस केलं, तर अभूतपूर्व कारवाई'
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (2 एप्रिल 2026) केरळमधील एका लष्करी सन्मान सोहळ्यात 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत, पाकिस्तानला इशारा दिला.
"मग ती अंतर्गत सुरक्षा असो की बाह्य शत्रूंपासून करायची सुरक्षा असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेला नवीन बळ दिलं आहे," असं ते म्हणाले.
"राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रत्येक मुद्द्याबाबत सरकारची भूमिका आणि कारवाई दोन्हींमध्ये बदल झाला आहे. संपूर्ण जगाला हा बदल अलीकडेच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहायला मिळाला आहे."
राजनाथ सिंह म्हणाले, "पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे लोकांना धर्म विचारून लक्ष्य केलं, त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता.
भारताची सामाजिक एकता आणि रचना यावर करण्यात आलेला हा एक खूप मोठा हल्ला होता. याच्याविरोधात भारतानं मोठी आणि कठोर कारवाई करत, पाकिस्तानातील दहशतवादी तळ आणि त्याच्याशी संबंधित इतर पायाभूत सुविधा नष्ट केल्या होत्या."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "दहशतवादाच्या मुद्द्याबद्दल बोलायचं तर, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या सरकारच्या काळात कशी परिस्थिती होती, हे आठवून पाहा.
देशाच्या कोणत्यातरी भागात सतत दहशतवादी घटना घडायच्या किंवा शहरांमध्ये बॉम्बस्फोट होत होते. पुराव्यांचे अनेक दस्तऐवज डोजियर दिले जायचे, ज्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती."
या घटनांबाबत नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, "उरी हल्ल्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक असो की पुलवामा हल्ल्यानंतर झालेला एअर स्ट्राईक असो की मग पहलगामच्या घटनेनंतर करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर असो. आम्ही दहशतवादावर जबरदस्त प्रहार केला आहे. यात आम्ही यशस्वीदेखील झालो आहोत."
ते म्हणाले, "आजचा भारत दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स बाळगून आहे. याच्याविरोधात तो सीमेच्या या बाजूनं आणि आवश्यकता भासल्यास सीमेच्या पलीकडे देखील कारवाई करण्यापासून मागे हटत नाही."
राजनाथ सिंह म्हणाले, "पहलगामच्या घटनेनंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला फक्त 22 मिनिटांत गुडघे टेकायला लावले होते. दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या लष्करी इतिहासातील हे आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन होतं. मला तुम्हाला सांगायचं आहे की, हे ऑपरेशन संपलेलं नाही. जर पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य करण्यात आलं, तर आपले सैनिक त्यांना असं सडेतोड प्रत्युत्तर देतील की ते कधीही विसरू शकणार नाहीत."
ते म्हणाले, "मी एकाच वाक्यात सांगू इच्छितो की यावेळेस आमचं सैन्य अभूतपूर्व कारवाई करेल. हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे."
'अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धाला वाव नसतो'
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी एक्स या सोशल मीडियावर राजनाथ सिंह यांच्या एक्स अकाउंटला टॅग करत लिहिलं, "वारंवार केल्या जाणाऱ्या वक्तव्यातून शक्ती नाही, तर स्पष्टपणे व्यूहरचनात्मक चिंता दिसून येते. विशेषकरून पहलगाममध्ये झालेल्या तथाकथित 'फॉल्स फ्लॅग ऑपरेशन'ची वर्षपूर्ती जवळ येत असताना. हे एक असं प्रकरण आहे, जे आंतरराष्ट्रीय तपासासमोर टिकू शकलं नाही. ज्यामुळे भारताचं कृत्रिम संकटावरील अवलंबित्व उघड झालं."
त्यांनी लिहिलं, "याप्रकारची धमकावण्याची भाषा नवीन नाही. हा एक ठरलेल्या पॅटर्नचा भाग आहे. अंतर्गत कमकुवतपणातून बाह्य गोष्टींकडे लक्ष वेधणं आणि वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी निराधार आरोपांद्वारे तणाव वाढवण्याचा प्रयत्न करणं, असा पॅटर्न."

फोटो स्रोत, Lintao Zhang/Getty Images
ख्वाजा आसिफ यांनी लिहिलं, "चुकीच्या मूल्यमापनाचे परिणाम भोगावे लागतात, याची इतिहास आपल्याला आठवण करून देतो. मरका-ए-हक आजदेखील आमच्या स्मरणात ताजं आहे. पुढील वेळेस आमची प्रतिक्रिया आणखी कठोर आणि निर्णायक असेल."
त्यांनी लिहिलं, "काहीही भ्रम बाळगू नका. पाकिस्तान शांतता आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र आपलं सार्वभौमत्व जपण्याचा निर्धार अढळ आहे. आम्ही सज्ज असून प्रत्युत्तर वेगवान, संतुलित आणि निर्णायक असेल."
"मी, राजनाथ सिंह यांना आठवून करून देऊ इच्छितो की दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धाला वाव नसतो. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारतानं आपल्या व्यूहरचनात्मक आणि डिप्लोमॅटिक क्षेत्रातील वाढत्या अस्वस्थेला स्वत:च तोंड देणं अधिक योग्य ठरेल."
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, "भारत, पाकिस्तानपेक्षा 5-6 पट मोठा देश आहे. त्याच्याकडे संसाधनंदेखील अगणित आहेत. ही वेगळी बाब आहे की आजदेखील लाखो भारतीय फुटपाथवर उपाशी झोपतात."
"राजनाथजी अशीच वक्तव्यं करत आले आहेत. चर्चेत राहता येण्यासाठी ते असं करतात. पण पाकिस्तान जगाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. भारताकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही."
"राजनाथजी, आता तुम्ही तुमच्या कुवतीनुसार वक्तव्यं देण्यास सुरुवात करावी, याची वेळ आली आहे. जर तुम्ही कोणतीही अडचण निर्माण केली, तर देवाच्या कृपेनं आमचं सैन्य तुम्हाला आधीपेक्षाही अधिक अपमानास्पद पद्धतीनं धडा शिकवेल."
भारताचे नौदल प्रमुख काय म्हणाले?
बुधवारी (1 एप्रिल) भारतीय नौदलप्रमुख, ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी म्हणाले की गेल्या वर्षी मे महिन्यात, जेव्हा पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी विनंती केली होती, त्यावेळेस भारतीय नौदल समुद्रातून पाकिस्तानविरोधात फक्त 'काही मिनिटांतच' कारवाई करणार होतं.
नौदल प्रमुख बुधवारी (1 एप्रिल) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नौदल सन्मान समारंभात बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले," 'ऑपरेशन सिंदूर'मधून भारताच्या नौदलाची उत्तम तयारी आणि दृढनिश्चय दिसून आला. यादरम्यान नौदलाच्या तुकड्यांनी वेगानं तैनाती केली आणि संपूर्ण काळ अत्यंत आक्रमक भूमिका कायम ठेवली."
ॲडमिरल त्रिपाठी म्हणाले, "आम्ही काही मिनिटांतच समुद्रातून पाकिस्तानवर हल्ला करणार होतो, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. त्याचवेळेस त्यांनी लष्करी कारवाई थांबवण्याचं अपील केलं होतं."
ते म्हणाले, "'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळेस वेगवान आणि निर्णायक पावलांद्वारे भारताच्या नौदलानं आपल्या क्षमतांवरील देशाचा विश्वास आणखी दृढ केला."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























