'सूर्य दिसत नाही, तीव्र वास'; अमेरिका-इस्रायलच्या सलग 2 आठवड्यांच्या हल्ल्यानंतर इराणची स्थिती दाखवणारे 'हे' 10 फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोमवारी अमेरिका-इस्रायलच्या लष्करी मोहिमेदरम्यान निवासी भागात झालेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या घराच्या बाहेर हताशपणे सोफ्यावर बसलेली इराणी महिला
वाचन वेळ: 5 मिनिटे

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणचं जनजीवन प्रचंड विस्कळीत झालेलं आहे.

अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत 28 फेब्रुवारी रोजी इराणवर पहिला हल्ला केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या तसेच मुलांच्या शवपेट्या चौकात आणण्यात आल्यानंतर शोक करणाऱ्यांनी इराणी झेंडे हातात घेतले, प्रार्थना केली आणि घोषणा दिल्या. शोक करणाऱ्या महिलेचे दु:खावेगानं पाणावलेले डोळे.

या हल्ल्यामध्ये इराणची राजधानी तेहरान आणि तसेच देशभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, लष्करी स्थळे आणि नेत्यांनाही लक्ष्य करण्यात आलं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

या पहिल्या हल्ल्याला आता दोन आठवडे उलटून गेले असले तरी हा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 1989 पासून इराणचे नेतृत्व करणारे इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे यामध्ये मारले गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पूर्व तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे शहराचा प्रचंड विनाश झाला आहे. रिसालत स्क्वेअरजवळील ढिगाऱ्यांमधून चालत निघालेली महिला...

अमेरिका आणि इस्रायल अशा दोन्ही देशांनी एकत्र मिळून केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्यासमवेतच इतरही अनेक वरिष्ठ सैन्य कमांडर मारले गेले आहेत.

या हल्ल्यांमध्ये इराणमधील महत्त्वाच्या इमारतींचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणमधील तेहरानमध्ये एका निवासी भागात झालेल्या हल्ल्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचं दृश्य.

अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराणमध्ये सत्ताबदल होण्याच्या इच्छेबाबतचे संकेत दिलेले आहेत.

त्यांनी इराणी जनतेलाही सध्याचं सरकार उलथवून टाकण्याचं आवाहन केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमधील बेहेश्त-ए-जहरा स्मशानभूमीत इराणवरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कार समारंभात शोक व्यक्त करताना इराणी नागरिक...

मात्र, इराणच्या सत्तेची यंत्रणाच अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की, ती टिकाऊही राहिल आणि ती सहजासहजी कोसळणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात.

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणची राजधानी तेहरानच्या आजूबाजूच्या किमान 4 तेल प्रकल्पांवर हल्ले झाल्याची पुष्टी झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 12 मार्च 2026 रोजी इराणमधील तेहरान येथील बेहेश्त-ए-जहरा स्मशानभूमीत अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कारावेळी इराणी स्त्रिया शोक व्यक्त करत आहेत.

स्थानिकांच्या मते, शहरातील काही भागात धूर आणि प्रदूषण इतकं वाढलं आहे की सूर्यही दिसत नाही आणि जळण्याचा तीव्र वास येत आहे.

हवेत प्रदूषण करणारे घटक मोठ्याप्रमाणात वाढले आहेत, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 9 मार्च रोजी एका निवासी भागात हल्ला झाल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या अवशेषांवर नेस्तनाबूत झालेल्या वाहनांसमोर एक इराणी अग्निशामक दलातील जवान बसला आहे.

तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दिला आहे.

तेहरान आणि आसपासच्या भागात वायू प्रदूषण खूप वाढले आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे आणि आसपासच्या परिसरातही लाखो लोक राहतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणच्या पूर्व तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर रिसालत स्क्वेअरजवळील नष्ट झालेल्या इमारतीमध्ये एका घरातील टेबलावर शूज आणि एक टेडी बेअर दिसत आहे. या घरात राहणाऱ्या चिमुकल्याचा हा टेडी असावा.

तेल रिफायनरींवर झालेल्या हल्ल्यांमुळे हवेचे प्रदूषण मोठ्याप्रमाणात वाढू शकते, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे रसायनं असतात.

जेव्हा तेल पूर्णपणे जळत नाही, म्हणजेच पुरेसा ऑक्सिजन नसतो, तेव्हा कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याऐवजी कार्बन मोनॉक्साइड आणि काळे कण हवेत पसरू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमधील पूर्व तेहरान भागात अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त झालेल्या निवासी इमारतींच्या ढिगाऱ्यात कामगार आणि नागरिक उभे आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी देशाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या संघर्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इराणे होर्मुझच्या सामुद्रधुनीला लक्ष्य करण्याची रणनीती सुरू ठेवायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचे हे वक्तव्य इराणच्या सरकारी टीव्हीवरून वाचून दाखविण्यात आले.

ही त्यांनी केलेले पहिले सार्वजनिक वक्तव्य आहे.

बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार खामेनी यांनी म्हटलं आहे की, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा पर्याय वापरणे सुरू ठेवले पाहिजे.

त्यांनी असेही म्हटले की, शेजारी देशांबरोबर इराणची धोरणं मैत्रीपूर्ण आहेत. मात्र त्याचवेळी त्यांनी या देशांना अमेरिकेचे लष्करी तळ बंद करण्याचा सल्ला दिला.

इराण या तळांना लक्ष्य करणं सुरूच ठेवेल, असं खामेनींनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या लष्करी कारवाईचं कौतुक केलं आहे. इराणचं नौदल आणि हवाई दल अमेरिकेच्या लष्कराने काही तासांतच उद्धवस्त केल्याचे त्यांनी सांगितलं.

ट्रम्प म्हणाले, 'आम्ही जिंकलो. पहिल्या तासांतच सर्व काही संपुष्टात आलं होतं.'

अमेरिकेने दोन दिवसांत इराणची 54 जहाजं नष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र काही क्षणांनंतर त्यांनी ही संख्या 58 असल्याचं सांगितलं.

हा आकडा यापूर्वी समोर आलेला नव्हता आणि बीबीसीनेही त्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.

'ऑपरेशन एपिक फ्युरी' तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि यामुळे जगाला असलेला धोका देखील कमी होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)