You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्हाला सेवेतून मुक्त करा', 72 रेल्वे लोको पायलटनी केली स्वेच्छानिवृत्तीची मागणी; 'हे' आहे कारण
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"प्रवाशांना सुरक्षित पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. पण आमच्याच सुरक्षिततेचं काय? आम्हाला रोज भेडसावणाऱ्या समस्या खूप आहेत आणि त्याचा त्रास होतो आहे."
अमोल (नाव बदलले आहे) हे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कार्यरत असलेल्या 72 मेल लोको पायलटांपैकी एक आहेत. त्यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे.
शारीरिक आणि मानसिक ताण, अनियमित कर्तव्ये आणि प्रशासकीय दबाव यामुळे त्यांनी एकत्रितपणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र दिलं आहे.
लोको पायलटांच्या समस्या आणि मांडणीवर योग्य कार्यवाही सुरू असून पुढील काळात लवकरच तोडगा काढला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
मी रेल्वेला आयुष्य दिलं, पण आता...
"ट्रेन वेळेवर आणि सुरक्षित पोहोचली पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. पण आम्ही स्वतः किती सुरक्षित आहोत?" असा प्रश्न 51 वर्षीय अमोल (नाव बदलले आहे) यांना पडला आहे.
ते मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल आणि एक्सप्रेस गाड्या चालवणारे लोको पायलट आहेत आणि स्वेच्छानिवृत्तीची मागणी करणाऱ्या 72 जणांपैकी एक आहेत.
तीन दशकांच्या सेवेनंतरही अनियमित शिफ्ट, कधीही येणारे कॉल आणि तासन्तास उच्च एकाग्रतेत काम करण्याचा ताण कमी झालेला नाही. ड्युटी संपली तरी ताण संपत नाही, असं ते सांगतात.
"विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं असल्याने अतिरिक्त काम करावं लागतं. सिग्नलसंदर्भात चूक झाल्यास कठोर कारवाई, वेतन कपात आणि इतर कारवाईची भीती कायम असते," असं ते सांगतात.
रनिंग रूममधील अपुऱ्या सुविधा, स्वच्छतेचा अभाव आणि अन्नाच्या दर्जाबाबतच्या तक्रारींमुळे आवश्यक विश्रांती मिळत नसल्याचं ते नमूद करतात. "ही लक्झरीची मागणी नाही, सुरक्षिततेची गरज आहे," असे ते म्हणतात. सततचा ताण आरोग्यावर परिणाम करत असून कौटुंबिक आयुष्यावरही त्याचे पडसाद उमटत असल्याचं ते सांगतात.
"मी रेल्वेला आयुष्य दिलं, पण आता आरोग्य आणि कुटुंबाकडेही बघायला हवं," असं म्हणत अमोल स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय सोपा नसल्याचं स्पष्ट करतात. देशाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ट्रेन सुरक्षित धावाव्यात, यासाठी इंजिनमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या समस्या आणि कल्याणाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहिलं जावं हीच माझी अपेक्षा आहे."
एकत्रित 72 लोको पायलटांनी सेवानिवृत्तीची केली विनंती
प्रशासकीय दबाव आणि छळ होत असल्याने सर्व लोको पायलट तणावात काम करत आहेत. अनियमित ड्युट्या आणि प्रशासकीय असंवेदनशीलतेतून शारीरिक आणि मानसिक ताण वाढत असून ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी लोको पायलट एकवटले आहेत.
लोको पायलटांना पुरवल्या जाणाऱ्या सेवाही निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि सोयीसुविधांमध्ये मोठा अभाव आहे, असे स्वेच्छानिवृत्तीच्या विनंती अर्जात नमूद करण्यात आले आहे.
लोको पायलटांनी पत्रात काय म्हटलं?
16 फेब्रुवारी 2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई विभाग, सीएसएमटी यांना सादर करण्यात आलेल्या संयुक्त अर्जात लोको पायलट (मेल) कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या विद्यमान नियमांनुसार स्वेच्छानिवृत्ती देण्याची विनंती केली आहे.
अनेक वर्षे प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि समर्पित सेवा बजावल्यानंतरही काही कायमस्वरूपी आणि प्रणालीगत समस्या न सुटल्यामुळे आरोग्य, सुरक्षा, सन्मान आणि एकूणच कल्याणावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या मुद्द्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी आणि तोंडी मांडणी करूनही प्रभावी किंवा दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सेवा सुरू ठेवणे शारीरिकदृष्ट्या थकवणारे, मानसिकदृष्ट्या तणावपूर्ण आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्थिर ठरत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार ड्युटीदरम्यान आणि रनिंग रूममध्ये दिले जाणारे अन्न वारंवार निकृष्ट, अस्वच्छ आणि सेवनास अयोग्य असल्याने सुरक्षा श्रेणीतील कर्तव्यांसाठी आवश्यक तंदुरुस्तीवर परिणाम होत आहे. रनिंग रूम आणि संबंधित विश्रांती सुविधांमध्ये मूलभूत स्वच्छता, योग्य देखभाल आणि आवश्यक सोयींचा अभाव असल्याने दीर्घ आणि कष्टदायक ड्युटीनंतर किमान विश्रांती मिळत नाही.
लॉबी, ट्रिप शेड आणि रनिंग रूमकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षित प्रवेशाची कमतरता असल्याने विशेषतः रात्री आणि प्रतिकूल हवामानात गंभीर सुरक्षा धोके निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
अनेक रिक्त पदे
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे 240 मेल लोको पायलट कार्यरत आहेत, तर सुमारे 230 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कर्तव्यावरील जादा काम करावे लागते.
मुंबईतून मध्य रेल्वेवर रोज 200 पेक्षा अधिक मेल एक्सप्रेस गाड्या ये जा करतात. तर दुसरीकडे मुंबई लोकलमध्ये 950 आसपास लोकल पायलट असून तिथेही रिक्त पदांचा अभाव जाणवतो.
मेल गाड्या चालविताना काही वेळा सिग्नलचे नियम नकळत मोडले जातात. सिग्नलबाबतच्या चुकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सक्तीची निवृत्ती (सीआरएस) ची कारवाई केली जाते.
काही वेळा वेतनात कपात किंवा पदाची श्रेणी कमी केली जाते. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी आर्थिक नुकसान होते, त्यामुळे सेवानिवृत्ती घेतलेलीच बरी अशी भूमिका सध्या लोको पायलटमध्ये आहे.
50 वर्षांपुढील काही लोको पायलट स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी इच्छुक आहेत, असे 72 लोको पायलटांमधील एका लोको पायलटने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
लोको पायलटांच्या मागण्यांचा विचार व्हावा
रनिंग स्टाफ, लोको पायलट, गार्ड आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस युनियनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपाई यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
बीबीसी मराठीशी बोलताना प्रवीण बाजपाई म्हणाले, "या लोको पायलटांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. प्रशासन त्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. आमचे कर्मचारी मानसिक आणि इतर ताणाखाली काम करत आहेत. रिक्त पदे भरून काढण्यासह लोको पायलटांनी केलेल्या सर्व मागण्यांवर तात्काळ प्रशासनाने विचार करावा, अशी आमची मागणी आहे."
लोको पायलटांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांबाबत बीबीसी मराठीने रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
बीबीसी मराठीशी बोलताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले की, लोको पायलटांच्या मागण्यांवर रेल्वे प्रशासनाकडून योग्य कार्यवाही सुरू आहे.
प्रशासनाकडून सकारात्मक विचार सुरू असून काही पायलटांनी सेवानिवृत्ती न घेण्यासंदर्भात पुन्हा लेखी पत्र दिले आहे. लोको पायलटांच्या समस्या आणि मांडणीवर पुढील काळात लवकरच तोडगा काढला जाईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.