जर्मनीच्या अथांग गुहांमध्ये सापडलेल्या या कोडमुळं 40 हजार वर्षं जुना कोणता इतिहास उलगडला?

फोटो स्रोत, University of Tübingen / Hildegard Jensen

फोटो कॅप्शन, 40 हजार वर्षे जुनी मॅमथची मूर्ती, ज्यावर फुली आणि ठिपक्यांच्या ओळी कोरलेल्या आहेत.
    • Author, जॉर्जिना रॅनार्ड
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

आजवर संशोधकांचा असा समज होता की, लेखनाची कला केवळ 5 हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमियाच्या वाळवंटात जन्माला आली.

पण, जर्मनीच्या अथांग गुहांनी आता एका अशा सत्याचा उलगडा केला आहे ज्याने संपूर्ण जगाचा इतिहासच हादरवून टाकला आहे.

मानवी संवादाचा एक असा 'कोड' जो चक्क 45 हजार वर्षांपासून एका गुहेत दडलेला होता.

आपले विचार आणि भावना लिहून ठेवण्याचा इतिहास आत्तापर्यंत मानल्या जाणाऱ्या काळापेक्षा हजारो वर्षांनी जुना असू शकतो. या शोधामुळे पुरातत्वशास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

संशोधकांना जर्मनीतील गुहांमध्ये सापडलेल्या 45 हजार वर्षांपूर्वीच्या मॅमथच्या म्हणजे हत्तीसारख्या अजस्त्र प्राण्याच्या सुळ्यांवर रेषा, खाचा, ठिपके आणि फुली यांसारख्या खुणा सापडल्या असून त्या विशिष्ट अर्थ दर्शवणाऱ्या असल्याचं दिसून आलं आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

इतिहासकार यापूर्वीच्या पुराव्यांनुसार पहिल्या लिखित शब्दांची नोंद साधारण 5 हजार वर्षांपूर्वीची मानत आले आहेत.

मेसोपोटेमिया म्हणजे आत्ताच्या इराकमध्ये 'प्रोटो-क्युनिफॉर्म' लिपीच्या स्वरूपात हे लिखाण तयार झाले होते.

जर्मनीमध्ये सापडलेल्या या चिन्हांचा नेमका अर्थ काय आहे, हे अजून एक रहस्यच आहे.

या वस्तू अशा काळातील आहेत जेव्हा होमो सेपियन्स म्हणजे आधुनिक मानव आफ्रिकेतून युरोपमध्ये नुकतेच स्थलांतरित झाले होते आणि तिथे त्यांचा निएंडरथल मानवांशी संपर्क आला होता.

अजून बरेच शोध बाकी

आतापर्यंत असं मानलं जात होतं की लेखनाचा विकास इसवी सन पूर्व 3 हजारच्या सुमारास मेसोपोटेमियामध्ये झाला, त्यानंतर इजिप्तमध्ये चित्रलिपी आणि नंतर चीन आणि मेसोअमेरिकामध्ये लेखणाचा विकास झाला.

या नवीन संशोधनाचे लेखक आणि सारलँड विद्यापीठाचे प्राध्यापक ख्रिश्चन बेन्झ म्हणतात की, "अश्मयुगातील चिन्हांचा हा क्रम म्हणजे लेखनाचा असलेला सुरुवातीचा एक पर्याय आहे."

बर्लिनच्या 'म्युझियम ऑफ प्रीहिस्ट्री अँड अर्ली हिस्ट्री'मधील संशोधक इवा ड्युटकिएविझ यांच्या मते, अश्मयुगातील लोक आजच्या आधुनिक मानवाइतकेच हुशार होते, असं यातून सुचित होतं.

फोटो स्रोत, Landesmuseum Württemberg / Hendrik Zwietasch

फोटो कॅप्शन, अडोरंट' नावाच्या या कलाकृतीवर मानवी आकृतीसह ठिपके आणि खाचांच्या ओळी कोरलेल्या आहेत.

त्या म्हणतात की, "विविध प्रकारच्या कलाकृतींवर सापडणाऱ्या चिन्हांच्या क्रमाच्या बाबतीत आपण आतापर्यंत केवळ वरवरचीच माहिती मिळवली आहे. म्हणजेच अजून बरेच शोध बाकी आहेत.

कल्पना करा, दक्षिण जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग येथील 'लोनेटाल' नावाचा तो 37 किलोमीटर लांब पसरलेला गुहांचा अथांग समूह!

या काळोख्या गुहांनी हजारो वर्षे आपल्या पोटात मानवी संस्कृतीचा सर्वात जुना ठेवा जपून ठेवला होता. संशोधकांच्या एका चमूने चक्क 260 वस्तूंवरील 3,000 पेक्षा जास्त गूढ वर्णांचे विश्लेषण केले.

जणू काही ते मानवी संवादाचा सर्वात 'प्राचीन डीएनए' उलगडत होते.

40 हजार वर्षांआधीचा संवाद

जेव्हा संशोधकांनी मॅमथच्या सुळ्यापासून कोरलेल्या एका चिमुकल्या हत्तीच्या मूर्तीचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना त्यावर अतिशय बारकाईने कोरलेल्या फुल्या आणि ठिपक्यांच्या रांगा आढळल्या. हे केवळ नक्षीकाम नव्हते तर जाणीवपूर्वक कोरलेला एक 'कोड' होता.

तसेच आच्टल व्हॅलीमधील 'गायसेनक्लॉस्टरले' गुहेतील "अडोरंट" नावाच्या एका हस्तिदंताच्या पाटीवर ज्यावर सिंह-मानव सदृश आकृती आहे, त्यांना ठिपके आणि खाचांच्या ओळी आढळल्या.

त्यांचा असा विश्वास आहे की या खुणांची मांडणी विशेषतः पाठीवर असलेले ठिपके हे दर्शवतात की या गोष्टींचा वापर संवाद साधण्यासाठी केला जात असे.

फोटो स्रोत, Staatliche Museen zu Berlin, Vorderasiatisches Museum / Olaf M. Tesmer

फोटो कॅप्शन, सुमारे 3,350 वर्षांपूर्वीची प्रोटो-क्युनिफॉर्म लिपी असलेली एक प्राचीन मातीची पाटी

संशोधकांना असे वाटते की, अश्मयुगातील लोकांनी संदेश आणि विचार व्यक्त करण्यासाठी मुद्दाम हे प्रतीक कोरले होते.

"आमच्या संशोधनातून असे निष्कर्ष समोर आले आहे की, अश्मयुगातील लोक शिकार करून आपले पोट भरत असत, तरीही त्यांनी संदेश देण्यासाठी चिन्हांची एक अतिशय प्रगत पद्धत तयार केली होती. या चिन्हांमध्ये साठवलेली माहिती इतकी सविस्तर आणि दाट होती की, त्याची तुलना 5 हजार वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियातील पहिल्या लेखनाशी होऊ शकते. विशेष म्हणजे, अश्मयुगातील हे लोक मेसोपोटेमियाच्या संस्कृतीपेक्षा पूर्ण 40 हजार वर्षं आधी अशा प्रकारे संवाद साधत होते.

"या चिन्हांमधून नेमका काय संदेश दिला आहे, हे ओळखण्यासाठी संशोधकांनी त्या चिन्हांच्या 'गर्दी'कडे लक्ष दिले. बेन्झ यांच्या मते, या वस्तूंच्या अंगावर ठराविक चिन्हे पुन्हा-पुन्हा वापरली गेली आहेत. एका चिन्हा नंतर दुसरे कोणते चिन्ह येईल, यात एक विशिष्ट पॅटर्न दिसून येतो.

संदेश जपून ठेवण्याचे माध्यम

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशीच शिस्त आणि असाच पॅटर्न साधारण 5,000 वर्षांपूर्वीच्या पहिल्या अधिकृत लिपीमध्ये (प्रोटो-क्युनिफॉर्म) पाहायला मिळतो.

संशोधकांच्या नजरेतून आणखी एक रंजक बाब सुटली नाही. त्यांना असे आढळले की, रोजच्या वापराच्या साध्या दगडी अवजारांपेक्षा, हस्तिदंतापासून बनवलेल्या मानवी किंवा प्राण्यांच्या देखण्या मूर्तींवर ही चिन्हे जास्त दाटीवाटीने आणि अत्यंत विचारपूर्वक कोरलेली होती.

यावरून असे समजते की, त्या काळातील मानवासाठी या मूर्ती केवळ खेळणी नव्हती, तर ते त्यांचे विचार आणि संदेश जपून ठेवण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम होते.

संशोधक गटाचे म्हणणे आहे की, माहितीची देवाणघेवाण करणे पुरापाषाण काळातील लोकांसाठी खूप महत्त्वाचे होते, असे यातून दिसून येते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संशोधक गटाचं म्हणणं आहे की, माहितीची देवाणघेवाण करणे पुरापाषाण काळातील लोकांसाठी खूप महत्त्वाचे होते, हे दर्शवतं. (प्रातिनिधिक छायाचित्र)

ड्युटकिएविझ म्हणतात की, "ते कुशल कारागीर होते. हे स्पष्टपणे सांगता येते की ते या वस्तू स्वतःसोबत बाळगत असत. त्यातील अनेक वस्तू हाताच्या तळव्यात अगदी व्यवस्थित बसतात. त्यांचा आकार अगदी त्याप्रमाणे आहे."

हे क्रांतिकारी संशोधन 'PNAS' या जागतिक कीर्तीच्या विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)