मतदानाआधी विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

वाचन वेळ: 4 मिनिटे

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. नालासोपारा मतदारसंघात तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. नालासोपारा पूर्व येथे असलेल्या विवांता हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यानंतर बविआचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी येथे जाऊन पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या घटनेचे व्हीडिओ वृत्त वाहिन्या तसेच इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.

विवांता हॉटेलमध्ये हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला होता.

या प्रकारानंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "नालासोपारा येथे मतदानासंदर्भात नियमांचे पालन व्हावे यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. महायुतीला मिळत असलेल्या व्यापक पाठिंब्यामुळे हताश झालेल्या विरोधकांनी असे कोणताच पाया नसलेले आरोप करुन त्याला एक निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी माझी विनंती आहे."

या व्हीडिओत लोक हात उंचावत काहीतरी जोरात बोलत आहेत तसेच वृत्तवाहिन्यांचे माईकही दिसत आहेत.

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक्स प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे.

ते लिहितात, “भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!”

विनोद तावडे यांचे निवेदन काय सांगतं?

या घटनेबद्दल विनोद तावडे यांनी संध्याकाळी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

त्यात ते म्हणतात, "वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले.

मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली.

हितेंद्र ठाकूर व क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी."

या व्हीडिओवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. ते एक्स प्लॅटफॉर्मवर लिहितात, "भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून ठेवण्यासाठी आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विनोद तावडे यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे."

बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली, "भाजपाच्या नेत्यांनी विनोद तावडे तिकडे 5 कोटी रुपये घेऊन आल्याचं कळवलं होतं. आधी एवढे मोठे नेते हे लहान काम करणार नाहीत असं वाटलं. पण नंतर इथे येऊन आम्ही पाहिलं. आम्हाला काही डायऱ्या सापडल्या, त्यात काय आहे हे तपासत आहोत. ते आले तेव्हा हॉटेलचे सीसीटीव्ही बंद असल्याचं लक्षात आलं. ते आता सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेल प्रशासनाचीही चौकशी झाली पाहिजे."

बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे, "भारतीय जनता पक्षाने सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी अतिशय खालची पातळी गाठल्याचं या ठिकाणी दिसतंय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्य केले जात आहे आणि पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेला विनोद तावडेसारखा नेता पैशांसोबत हॉटेलमध्ये पकडला जातो ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

एकीकडे धनदांडगे आणि जातदांडग्या पक्षांकडून पैशाचा पाऊस पाडून निवडणुक फिरवण्याचा प्रयत्न होतोय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घामाच्या कष्टाच्या पैशाने निवडणूक लढत आहेत. पण आमच्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत.

आम्ही या धनदांडग्या पक्षांचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आमच्या उमेदवारांवर हल्ले होत असताना हातावर हात ठेऊन बसलेल्या पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो. जनता 20 तारखेला या धनदांडग्या पक्षांना योग्य धडा शिकवेल."

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "विनोद तावडेजी हे नालासोपारा, वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसे थांबावं यासाठी बैठक घेत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं.

विनोद तावडे आरोप यांच्यावर करण्यात आले, विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार आणि नालासोपारा भागात वाटणार आहेत. विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं. आणि विनोद तावडे यांना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आले."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)