'टी-20 वर्ल्ड कप खेळू, पण भारताविरुद्ध नाही' म्हणणाऱ्या पाकिस्तानवर ICC ने काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 6 मिनिटे

पाकिस्तान क्रिकेट टीम टी-20 वर्ल्ड कपमधील 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकणार आहे, असं पाकिस्ताननं जाहीर केलं आहे.

भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे.

पाकिस्तान सरकारने एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट टीमला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट टीम 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही."

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

पाकिस्तान सरकारचे हे निवेदन अशा वेळी आले आहे, जेव्हा भारताविरुद्ध सामना खेळू न देण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

गेल्या आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले होते, "पंतप्रधानांनी सर्व पर्यायांचा विचार करून हा प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले आहेत."

फोटो स्रोत, X

पाकिस्तानने बांगलादेशला दिला होता पाठिंबा

सुरक्षा कारणांमुळे बांगलादेशने भारतात टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी स्पर्धेत स्कॉटलंडला सहभागी करण्यात आले.

यानंतर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आयसीसीचा निर्णय चूक आणि दुटप्पीपणा असल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, X/MOHSIN NAQVI

फोटो कॅप्शन, मोहसीन नक्वी यांनीही शाहबाज शरीफ यांची भेट घेतली

ते म्हणाले होते, "बांगलादेशवरही तेच नियम लागू झाले पाहिजेत, जे इतर कोणत्याही देशावर होतात. जर एखादा देश सुरक्षा कारणांमुळे दुसऱ्या देशात खेळण्यास नकार देतो, तर बांगलादेशलाही तो अधिकार असायला हवा."

"या परिस्थितीत सरकार वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेत टीम पाठवण्याचा निर्णय घेईल. जर बांगलादेशला न्याय मिळाला नाही, तर आयसीसीने हवे असल्यास 22 व्या टीमला सहभागी करून घेऊ शकते."

मोहसिन नक्वी यांना विचारण्यात आले, "जर पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप खेळत नसेल, तर प्लॅन बी काय आहे?" यावर त्यांनी उत्तर दिले होते, "आधी निर्णय होऊ द्या. आमच्याकडे प्लॅन ए, बी, सी आणि डी आहेत."

'अंतिम सामना भारत-पाकिस्तानमध्ये झाला तर?'

या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी या निर्णयावर एक्सवर पोस्ट केली.

ते म्हणाले, "जर पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला, पण भारताविरुद्ध सामना खेळला नाही, तर आयसीसीची प्रतिक्रिया पाहणे रंजक ठरेल. याची कायदेशीर स्थिती काय आहे हे मला माहिती नाही. मागील उदाहरणांवरून हा विषय कसा निकाली निघेल, हेही सांगता येत नाही. पण ब्रॉडकास्टर्सचे नुकसान भरून काढण्यासाठी आयसीसी पाकिस्तानच्या उप्तन्नातून रक्कम वसूल करू शकते. असे झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. जर अतिम सामना भारत-पाकिस्तानमध्ये झाला तर काय होईल?"

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्यावर्षी आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व सामने यूएईमध्ये खेळले गेले होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "मोठी बातमी: पाकिस्तानने सांगितले आहे की, ते टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. माझ्या मते यासाठी आयसीसीने पाकिस्तानविरोधात कारवाई केली पाहिजे. बांगलादेशकडे नाराज होण्याची काही कारणे होती, पण पाकिस्तानने आधीच हायब्रिड मॉडेलला संमती दिली होती. आता मागे हटण्याचे कारण नाही."

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 वेळा सामना झाला आहे. त्यापैकी एका सामन्यात पाकिस्तानला विजय मिळाला असून उर्वरित 7 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.

वनडे वर्ल्ड कपमध्येही दोन्ही संघांमध्ये 8 वेळा सामना झाला आहे. या सर्व आठही सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलंय की, पाकिस्तान सरकार आणि पीसीबी असा निर्णय घेऊन 'स्वतःचंच क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत'.

पुढे ते म्हणाले की, "यामुळे त्यांच्या समस्या सुटणार नाहीयेत. कुणीतरी असा असावा, जो योग्य विचार करेल. सध्या ते अजिबातच योग्य विचार करत नाहीयेत. त्यांना बांगलादेशला पाठिंबा द्यायचा आहे. तुम्ही बांगलादेशला पाठिंबा देत रहा, त्यात काही आम्हाला अडचण नाही. पण सरतेशेवटी, यातून बांगलादेश आणि पाकिस्तानचंच नुकसान होईल. वास्तव असं आहे की, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटमधील मोठे देश आहेत, जे प्रेक्षकांना आकर्षित करतील आणि स्पॉन्सरशीपदेखील तिथेच जाईल."

पाकिस्तानविरोधात कोणती कारवाई होऊ शकते का?

'इंडियन एक्सप्रेस'ने वृत्त दिलेलं होतं की, जर पाकिस्तानने टी-20 वर्ल्डकप खेळला नाही तर आयसीसी त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'हिंदुस्तान टाईम्स'ला सांगितलं होतं की, जर पाकिस्तानने खेळण्यास नकार दिला तर आयसीसीकडून पीसीबीला मिळणारा वार्षिक निधी थांबवला जाऊ शकतो.

2023 मध्ये महसूल वाटून घेण्याच्या निर्णयाच्या वेळी, इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलचे एकूण उत्पन्न 60 करोड डॉलर इतकी होती. डरबनमध्ये झालेल्या त्या बैठकीत, 2024 ते 2027 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 38.5 टक्के महसूल दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता.

इंग्लंड क्रिकेट मंडळाला सात टक्के महसूल मिळेल, तर ऑस्ट्रेलियाला सहा टक्के महसूल मिळेल, असाही निर्णय घेण्यात आला होता.

फोटो स्रोत, Ryan Lim/Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून आयसीसीला खूप पैसे मिळतात.

पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, पाकिस्तानला या कालावधीत आयसीसीकडून दरवर्षी 3 कोटी 45 लाख डॉलर्स मिळतील.

वरिष्ठ क्रीडा विश्लेषक नीरू भाटिया यांचं असं म्हणणं होतं की, जर पाकिस्तानने बहिष्कार घातला तर हा देश भविष्यातील आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आणि टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतूनही बाहेर पडू शकतो.

पाकिस्तानी क्रीडा विश्लेषक डॉ. नौमन नियाज यांनी सोशल मीडियावर एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं की, पाकिस्तानने या वर्ल्डकपमध्ये सहभाग न घेतल्यास वर्ल्डकपचं संपूर्ण आयोजन हादरून जाईल.

त्यांनी असा दावा केला होता की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामन्यादरम्यान, भारतातील जाहिरातींचा एअरटाइम 4800 अमेरिकन डॉलर्सपर्यंत विकला जातो.

ते म्हणाले, "या व्यतिरिक्त, आयसीसीने अनेक प्रकारचे करार केले आहेत, ज्यात ग्राउंड ब्रँडिंग आणि टायटल स्पॉन्सरशीप यांचाही समावेश आहे."

भारत आणि पाकिस्तान टी-20 वर्ल्डकपमध्ये आठवेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे, तर भारताने उर्वरित सात सामने जिंकले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला, वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी सर्व आठही सामने पाकिस्तानने गमावले असून भारताने सर्व सामने जिंकले आहेत.

आयसीसीने काय म्हटलं?

पाकिस्तान सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाच्या काही तासांनंतर आयसीसीने एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

आयसीसीने म्हटलंय की, पीसीबीने त्यांना अद्याप अधिकृतपणे काहीही कळवलेलं नाही. तसेच, पाकिस्तानच्या या निर्णयाचा जागतिक क्रिकेटच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो.

आयसीसीने आपल्या वक्तव्यात म्हटलंय की, "आयसीसीने पाकिस्तान सरकारच्या त्या वक्तव्याची दखल घेतली आहे. ज्यामध्ये त्यांनी आयसीसी पुरूष टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये आपल्या राष्ट्रीय संघाला निवडक पद्धतीनं सहभागी होण्याचा आदेश दिल्याचं म्हटलंय."

पुढे त्यात म्हटलंय की, "आयसीसीला आतापर्यंत तरी पीसीबीकडून अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. 'सिलेक्टीव्ह पार्टीसिपेशन'चा असा पवित्रा कोणत्याही जागतिक क्रीडा आयोजनाच्या मूळ भावनेशी मेळ खात नाही. कारण, अशा आयोजनात क्वालिफाय करणाऱ्या सगळ्या संघांनी नियोजित वेळापत्रकानुसार समसमान पातळीवर खेळणं अपेक्षित असते."

"आयसीसीच्या स्पर्धा या खेळातील प्रामाणिकपणा, स्पर्धा, सातत्य आणि निष्पक्षतेवर आधारित असतात. अशा निवडक सहभागामुळे स्पर्धांमधील या भावना आणि विश्वासार्हताच कमकुवत होईल."

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, पीसीबी योग्य तोडगा काढेल अशी आशा आयसीसीने व्यक्त केली आहे.

"आयसीसी राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत सरकारच्या भूमिकांचा आदर करते. परंतु, हा निर्णय जागतिक क्रिकेट तसेच जगभरातील चाहत्यांच्याही हिताचा नाहीये. शिवाय, यामध्ये पाकिस्तानमधीलही लाखो चाहत्यांचा समावेश आहे."

पुढे आयसीसीने या वक्तव्यात असा इशारा दिला आहे की, "आयसीसीला अशी आशा आहे की, पीसीबी या निर्णयामुळे होणारे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम विचारात घेईल. कारण, यामुळे पीसीबी ज्या जागतिक क्रिकेटच्या संरचेनाचा सदस्य आणि लाभार्थी आहे, त्यावरच परिणाम होऊ शकतो."

या निवेदनाच्या शेवटी योग्य तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करत म्हटलंय की, "आयसीसीचे प्राधान्य आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्डकप यशस्वीरित्या पार पाडणं आहे. ही जबाबदारी पीसीबीसह सर्व सदस्य मंडळांवर देखील आहे. आयसीसीला आशा आहे की, पीसीबी सर्व भागधारकांच्या हिताचं रक्षण करेल आणि परस्पर सहमतीने तोडगा काढेल."

दरम्यान, लाहोरमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचे सलमान अली आगा यांना भारताविरुद्ध सामना न खेळण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावर ते म्हणाले की, "हा आमचा निर्णय नाहीये. आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. आमचं सरकार, आमचे चेअरमन आम्हाला जे काही सांगतील, ते आम्हाला करावंच लागेल. ते जे म्हणतील तसं आम्ही करू."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)