You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टी-20 वर्ल्ड कप : वानखेडेवर सूर्यकुमार यादवचा झंझावात, भारताची यूएसएला हरवत विजयी सलामी
सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतानं यूएसएवर 29 धावांनी मात केली आणि टी 20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारतानं यूएसएला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या गोलंदाजांनी अमेरिकेला 20 षटकांत 8 बाद 132 धावांवरच रोखलं.
ट्वेन्टी20 मध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं आणि वरूण चक्रवर्तीनं एक विकेट काढली आणि टीम इंडियाच्या विजयात वाटा उचलला.
त्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं झंझावाती फलंदाजी करत अक्षरशः मैदान दणाणून सोडलं आणि नाबाद 84 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.
त्यामुळे भारताला डावाची काहीशी अडखळती सुरुवात होऊनही 20 षटकांत 9 बाद 161 धावांची मजल मारता आली.
दरम्यान, आज (शनिवारी) कोलंबोत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड्सवर शेवटच्या ओव्हरमध्ये निसटता विजय मिळवला. तर वेस्ट इंडीजनं स्कॉटलंडवर 35 धावांनी मात केली.
वानखेडेवर सूर्यकुमारचं राज्य
यूएसएचा कर्णधार मोनांक पटेलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा लगेचच भारत मोठी धावसंख्या उभारेल, अडीचशेचा टप्पा गाठेल अशी चर्चा इंटरनेटवर आणि स्टेडियममध्येही सुरू झाली.
पण अमेरिकन गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना सुरुवातीला काहीसं जखडून ठेवलं. अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि उत्तम फिल्डिंग यांमुळे भारतीय फलंदाजांना सेट होता आलं नाही.
अपवाद एकट्या सूर्यकुमारचा. मुंबईकर सूर्यानं आपल्या घरच्या मैदानात 49 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 84 धावा केल्या.
खरंतर सूर्यकुमार 15 धावांवर असताना अमेरिकेच्या शुभम रांजणेनं त्याचा झेल सोडला. एकेकाळी सूर्याच्या कॅप्टन्सीखाली खेळलेल्या शुभमला तो झेल सोडणं किती महागात पडू शकतं याची त्याच क्षणी जाणीवही झाली.
मूळचा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकरनं टाकलेल्या अखेरच्या षटकात तर सूर्यानं शॉट्सची बरसात केली आणि तब्बल 21 धावा कुटल्या.
आणि एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या नावानं दुमदुमणारं वानखेडे स्टेडियम तेवढ्याच जोशात सूर्यकुमारच्या नावाचा जयघोष करू लागलं.
पण सूर्याचा अपवाद वगळता भारताचे बाकीचे फलंदाज फारसे यशस्वी ठरले नाहीत. तिलक वर्मानं 25, इशान किशननं 20 आणि अक्षर पटेलनं 14 धावा केल्या.
अशा गेल्या भारताच्या विकेट्स
अली खाननं टाकलेल्या दुसऱ्याच षटकात अभिषेक भोपळाही न फोडता डीप कव्हरला झेल देऊन माघारी परतला. हे गोल्डन डक ठरलं, कारण अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
सहाव्या षटकात इशान किशन 20 धावा करून शॅडली वॅन स्कॉकविकच्या गोलंदाजीवर मिलिंद कुमारला झेल देऊन बसला.
मोनांक पटेलनं त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर तिलक वर्माचा झेल टिपला, वर्मानं 25 धावा केल्या. मग पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे शून्यावर बाद झाला, सौरभ नेत्रावळकरनं त्याचा झेल टिपला.
रिंकु सिंगलाही सहाच धावा करता आल्या. मोहम्मद मोहसीनच्या गोलंदाजीवर नरेंद्रकुमारनं रिंकुचा झेल टिपला. भारताची अवस्था पाच बाद 72 अशी झाली.
त्यानंतर हार्दिक पंड्या 5 धावांवर माघारी गेला, हरमीत सिंगच्या गोलंदाजीवर साईतेजानं त्याचा झेल टिपला.
अक्षर पटेलही हरमीतच्याच गोलंदाजीवर बाद झाला. सतराव्या षटकात अक्षरनं 14 धावांवर असताना सीमारेषेजवळ झेल दिला.अर्शदीप सिंग सहा चेंडूंत चार धावा करून बाद झाला तर अखेरच्या चेंडूवर वरूण चक्रवर्ती धावचीत झाला.
पण दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं दमदार फलंदाजी केली आणि अर्धशतक ठोकून भारताचा डाव सावरला.
बुमराऐवजी सिराज खेळला आणि...
मोहम्मद सिराज अगदी अचानक टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आणि यूएसएविरुद्ध भारताच्या विजयाचा शिल्पकार बनला.
2024 नंतर म्हणजे साधारण दोन वर्षांनी सिराज ट्वेन्टी20 सामन्यात खेळला आहे.
अगदी 24 तासांपूर्वी सिराज घरात आराम करत होता. रणजी ट्रॉफीतून त्याला थोडी विश्रांती मिळाली होती, 15 फेब्रुवारीला रियाल माद्रिदची फूटबॉल मॅच पाहण्यासाठी तो जाणार होता. आराम करायचा म्हणून त्यानं व्हॉट्सअपही पाहायचं नाही असं ठरवलं होतं.
पण मग त्याला खेळण्यासाठी तयार राहा असं सांगण्यात आलं. सिराजला आधी वाटलं कुणी मजा करतंय. पण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्याला फोन केला आणि निघायला सांगितलं.
कारण स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताला सराव सामन्यात हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला होता आणि त्याच्या जागी सिराजचा संघात समावेश झाला.
मग शनिवारी जसप्रीत बुमराची तब्येत बिघडल्यानं सिराजला खेळण्याची संधी मिळाली.
सिराजनं अमेरिकेच्या डावाला खिंडार पाडत चार षटकांत 29 धावा देत तीन विकेट्स काढल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.
अमेरिकन संघातल्या मुंबईकरांची कामगिरी
बऱ्याच वर्षांनी मुंबईत खेळणाऱ्या नेत्रावळकरला गोलंदाजीत अपयश आलेलं दिसलं.
त्यानं 4 षटकांमध्ये 65 धावा दिल्या. ट्वेन्टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यात कोणत्याही गोलंदाजांनी दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. याआधी सनथ जयसूर्यानं 2007 साली 64 धावा देऊ केल्या होत्या.
शुभम रांजणेनं 2 षटकांत सोळा धावा दिल्या. त्यानं सूर्यकुमारला दिलेलं जीवदान अमेरिकेला महागात पडलं, तर भारताच्या पथ्यावरच पडलं.
उदघाटन सोहळ्यात रोहितचा गजर
7 फेब्रुवारीला मुंबईतल्या सामन्याआधी वानखेडे स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही रंगला. त्यात नोरा फतेही, बादशाह अशा कलाकारांच्या परफॉर्मन्सनी रंगत आणली.
या सोहळ्यात वर्ल्ड कपची ट्रॉफी मैदानात घेऊन येण्याची जबाबदारी जेटपॅक लावून उडणाऱ्या एका परफॉर्मरनं पार पाडली.
पण रोहित शर्माची उपस्थिती हे या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं. रोहित मैदानात आला, तेव्हा वानखेडे स्टेडियमवरच्या चाहत्यांनी 'मुंबईचा राजा... रोहित शर्मा' अशी त्याच्यासाठीची खास घोषणाही दिली.
दोन वर्षांपूर्वी रोहितच्याच नेतृत्त्वाखाली भारतानं या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं.
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील नियम काय?
हा विश्वचषक 20 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. प्रत्येक डावात सहा षटकांचा पॉवरप्ले असेल.
सामना तीन तास दहा मिनिटांच्या आत पूर्ण करावा लागेल. प्रत्येक डाव एक तास 25 मिनिटांचा असेल आणि ब्रेक 20 मिनिटांचा असेल.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉप असतं. म्हणजेच एक ओव्हर संपल्यानंतर दुसरी ओव्हर सुरू होण्यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये.
जर 20-20 षटकांच्या सामन्यांत दोन्ही संघांच्या धावा समान असतील तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. तिथे प्रत्येक संघाला एक ओव्हर खेळण्यासाठी मिळेल.
सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता ठरेल. सुपर ओव्हर देखील बरोबरीत राहिली तर विजेता मिळेपर्यंत सुपर ओव्हर सुरू राहील.
नॉकआउट सामन्यांसाठी राखीव दिवस असेल की नाही ,याबद्दल आयसीसीने अद्याप माहिती दिलेली नाही.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आजवरचे विजेते
आतापर्यंत एकूण नऊ टी-20 विश्वचषक खेळले गेले आहेत आणि त्यात 6 संघांनी विजेतेपद मिळवलं आहे.
- 2007 : भारत
- 2009 : पाकिस्तान
- 2010 : इंग्लंड
- 2012 : वेस्ट इंडिज
- 2014 : श्रीलंका
- 2016 : वेस्ट इंडिज
- 2021 : ऑस्ट्रेलिया
- 2022 : इंग्लंड
- 2024 : भारत
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.