डिजिटल रुपया काय आहे? यूपीआय आणि क्रिप्टोकरन्सीपेक्षा तो वेगळा कसा?

डिजिटल रुपया

फोटो स्रोत, AFP via Getty Images

वाचन वेळ: 5 मिनिटे

रोख रकमेच्या वापराला ऑनलाईन व्यवहारांचा पर्याय समोर आला आणि आता त्यानंतर डिजिटल रुपयाच्या संदर्भातही चर्चा होत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा (आरबीआय) डिजिटल रुपया काय आहे? तो यूपीआय आणि क्रिप्टोपेक्षा वेगळा कसा आहे? याच्या पायलट योजनेत (प्रायोगिक स्वरुपात) कोणत्या बँकांचा समावेश आहे, यात कशाप्रकारे सहभागी होता येईल?

गेल्या काही काळापासून डिजिटल रुपयाच्या संदर्भात हे प्रश्न इंटरनेटवर विचारले जात आहेत. हा डिजिटल रुपया भारतात कॅशची जागा घेईल का? हा प्रश्नदेखील याबाबतीत विचारला जातो आहे.

या सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी पैशांची देवाण-घेवाण सोपी करण्याच्या उद्देशानं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) ऑफलाइन डिजिटल रुपया (e₹)आणला आहे.

रिझर्व्ह बँकेनुसार, डिजिटल रुपया किंवा e₹ ही भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सीबीडीसी आहे. डिजिटल रुपयासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेऊया.

डिजिटल रुपया काय आहे?

डिजिटल रुपया किंवा e₹ हे भारतीय चलनाचं म्हणजे रुपयाचं (₹)डिजिटल स्वरुप आहे.

रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) ते डिजिटल स्वरुपात जारी केलं जातं. e₹ किंवा डिजिटल रुपया रोख रकमेप्रमाणेच काम करतो. त्याचं मूल्य तेच म्हणजे समान असतं. त्याला रिझर्व्ह बँकेची हमी असते.

तुम्ही हा डिजिटल रुपया फोनच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवू शकता. पैसे पाठवण्यासाठी, घेण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

रिजर्व्ह बँकेचा लोगो

फोटो स्रोत, Getty Images

ज्याप्रमाणे तुम्ही चलनी नोटांचा किंवा रोख रकमेचा वापर करता, त्याचप्रमाणे तुम्ही डिजिटल रुपयाचा देखील वापर करू शकता.

डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहक भागीदार बँकांनी दिलेल्या डिजिटल वॉलेटचा वापर करू शकतात.

डिजिटल रुपया कोण जारी करतं?

रिझर्व्ह बँक, डिजिटल रुपया जारी करते. चलनी नोटांचा वितरण किंवा हाताळणी बँका ज्याप्रकारे करतात, त्याचप्रमाणे डिजिटल रुपयाचं वितरणदेखील केलं जातं.

रिझर्व्ह बँक डिजिटल रुपया बनवते आणि त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरुपात बँका आणि अधिकृत बिगर-बँकिंग संस्था किंवा कंपन्यांना पाठवते.

त्यानंतर या बँका आणि अधिकृत बिगर-बँकिंग संस्था किंवा कंपन्या, ग्राहकांना याच्याशी जोडण्यासाठी (ऑनबोर्डिंग) आणि मोबाईल फोनवर e₹ वॉलेट तयार करण्यासाठी मदत करतात.

दैनंदिन देवाण-घेवाण करण्याची e₹ चा वापर 1 डिसेंबर 2022 पासून पायलट टप्प्यात म्हणजे प्रायोगिक टप्प्यात सुरू आहे.

सध्या देशभरातील निवडक बँका आणि अधिकृत बिगर-बँकिंग संस्था किंवा कंपन्यांशी जोडलेले ग्राहक आणि व्यापारी डिजिटल रुपयाचा वापर करू शकतात.

e₹ कशाप्रकारे बाळगायचा आणि त्याचा वापर कसा करायचा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बँका आणि अधिकृत बिगर-बँकिंग संस्था किंवा कंपन्यांनी दिलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही e₹ ची साठवणूक करू शकता आणि वापर करू शकता. या वॉलेटद्वारे तुम्हाला एखाद्या व्यक्ती किंवा व्यापाऱ्याला थेट पेमेंट करण्याची सुविधा पुरवली जाते.

डिजिटल रुपयाचा वापर सुरू करण्यासाठी, प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून e₹ वॉलेट ॲप डाउनलोड करा. मग ॲपमध्ये देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करा.

यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमची बँक किंवा वॉलेट प्रोव्हायडरशी देखील संपर्क साधू शकता.

व्यापारी किंवा दुकानदाराला सीबीडीसी क्यूआर कोड किंवा स्टोअरवर उपलब्ध असलेल्या यूपीआय क्यूआर कोडला स्कॅन करून तुम्ही डिजिटल रुपयानं पेमेंट करू शकता.

e₹ चा वापर करण्यासाठी बचत खातं (सेव्हिंग्स अकाउंट) असणं आवश्यक आहे का? हादेखील एक प्रश्न उपस्थित होतो.

सध्या e₹ वॉलेट सुरू करणं, ग्राहकाच्या बचत खात्याशी जोडण्यात आलेलं आहे. यामुळे ग्राहकाची ऑनबोर्डिंग म्हणजे या वॉलेटचा वापर सुरू करण्याची प्रक्रिया सोपी होते. त्याचप्रमाणे यासाठी स्वतंत्रपणे केवायसी प्रक्रिय पूर्ण करण्याची आवश्यकता नसते.

रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, ग्राहकांकडून आलेले 'फीडबॅक आणि वापर करताना समोर आलेल्या अडचणींच्या आधारे, ग्राहकांना याच्याशी जोडून घेण्याचे (यूजर ऑनबोर्डिंग) नवीन मॉडेलदेखील शोधले जात आहेत.'

डिजिटल रुपया सध्या पायलट म्हणजे प्रायोगिक टप्प्यात असल्यामुळे, फक्त निवडक बँका आणि अधिकृत बिगर-बँकिंग संस्थांचे ग्राहक आणि व्यापारीच याचा वापर करू शकतात.

डिजिटल रुपयाचा वापर सुरू करण्यासाठी त्यांना e₹ ॲप डाउनलोड करावं लागेल. तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर ते वॉलेटचा वापर सुरू करू शकतात.

डिजिटल रुपया, यूपीआयपेक्षा वेगळा कसा?

डिजिटल रुपयाची प्रक्रिया यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारासारखीच वाटू शकते. मात्र दोन्हीमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत. यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ही पैशांच्या देवाण-घेवाणीची किंवा पेमेंट करण्याची एक पद्धत आहे.

यूपीआय हे माध्यम आहे, ते चलन किंवा पैसा नाही.

यूपीआय फक्त एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा पुरवतं.

डिजिटल लोगो

फोटो स्रोत, Getty Images

सोप्या भाषेत सांगायचं, यूपीआय बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतं. तर डिजिटल रुपया मात्र स्वत:च एक चलन आहे. तो रुपयाच आहे, फक्त डिजिटल स्वरुपात आहे. तुम्ही यूपीआयनं पेमेंट केलं, की तुम्ही बँक खात्यातून पैसे कापले जातात.

मात्र जेव्हा तुम्ही e₹ चा वापर करता, तेव्हा तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये असलेला डिजिटल रुपया किंवा डिजिटल कॅश ट्रान्सफर करता. म्हणजेच ज्याप्रमाणे तुम्ही रोख रक्कम किंवा चलनी नोटांचा वापर करता, तसंच हे डिजिटल स्वरुपात असतं.

याव्यतिरिक्त, यूपीआयचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी म्हणजे वापर करण्यासाठी बँकेची एक भूमिका किंवा एकप्रकारची मध्यस्थी असते. तर डिजिटल रुपयाची देवाणघेवाण मात्र रोख रकमेप्रमाणे असते.

यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला थेट पैशांची देवाणघेवाण करतो. भविष्यात हा व्यवहार ऑफलाइन स्वरुपातदेखील शक्य होऊ शकतो.

डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे?

बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सी रेग्युलेटेड नाहीत. म्हणजे त्यांचं अधिकृतपणे नियमन होत नाही. डिजिटल रुपया मात्र रिझर्व्ह बँकेकडून जारी केला जातो. तसंच रिझर्व्ह बँकेकडून याचं नियमनदेखील केलं जातं.

डिजिटल रुपया हे एक वैध चलन आहे. मात्र भारतात क्रिप्टोकरन्सीला वैध चलनाचा दर्जा मिळालेला नाही.

सध्या या सीबीडीसी इकोस्टिममध्ये 19 बँकांचा समावेश आहे. या बँका e₹ वॉलेटची सुविधा पुरवत आहेत.

यात, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, कर्नाटक बँक, इंडियन बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि युको बँक या बँकांचा समावेश आहे.

रुपयाचा लोगो

फोटो स्रोत, Getty Images

या बँका मोबाईल ॲपद्वारे सीबीडीसी वॉलेट उपलब्ध करून देतात. या वॉलेटचा वापर करून ग्राहक डिजिटल रुपयाची साठवणूक करू शकतात. तसंच त्याची देवाण-घेवाण करू शकतात.

सध्या, डिजिटल रुपया सरसकट सर्वांसाठी उपलब्ध नाही. तो नियंत्रित पद्धतीनं पायलट म्हणजे प्रायोगिक टप्प्यात वापरला जातो आहे. जर ही सेवा पुरवणाऱ्या बँकेचे तुम्ही ग्राहक असाल तर तुम्ही यात सहभागी होऊ शकता. म्हणजे डिजिटल रुपयाचा वापर करू शकता.

बँकदेखील निवडक ग्राहकांना यात सहभागी करू शकतात किंवा हळूहळू सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात.

यासाठी तुम्हाला बँकेचं सीबीडीसी वॉलेट ॲप डाउनलोड करावं लागेल. केवायसी आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर बँक खातं त्याच्याशी लिंक करावं लागेल आणि वॉलेटमध्ये e₹ जमा करावा लागेल.

डिजिटल रुपया भारतात रोख रकमेची जागा घेईल का?

डिजिटल रुपयांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं स्पष्टपणे सांगितलं आहे की सध्या अस्तित्वात असलेल्या चलनाचं स्वरुप बदलणं हा याचा उद्देश नाही. तर अस्तित्वात असलेल्या चलनाला कॉम्लिमेंट करणं म्हणजे त्याला जोड देणं हा यामागचा उद्देश आहे.

भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात कॅशचा वापर केला जातो. विशेषकरून ग्रामीण भाग आणि असंघटित क्षेत्रांमध्ये (इन्फॉर्मल सेक्टर) रोख रकमेचा वापर केला जातो. रोख रकमेची विश्वासार्हता कायम राखत डिजिटल रुपया, डिजिटल पेमेंटची सुविधादेखील उपलब्ध करून देईल.

रोख रकमेवरील म्हणजे चलनी नोटांच्या व्यवस्थापनासाठीचा खर्च कमी करण्यासाठी, पैशांच्या देवाण-घेवाणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यात ऑफलाइन डिजिटल पेमेंट शक्य करण्यासाठी, डिजिटल रुपयाची मदत होऊ शकते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.