'फारूख अब्दुल्ला यांच्या पाठीवर रिव्हॉल्वर ठेवून गोळी चालवली'; विवाह सोहळ्यात नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर एक विवाह सोहळ्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला.
वाचन वेळ: 3 मिनिटे

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी (11 मार्च) सायंकाळी एका विवाह सोहळ्यात 'प्राणघातक हल्ला' झाला.

यावेळी त्यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हेही होते. या हल्ल्यातून दोघेही थोडक्यात बचावले आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील तो व्हीडिओ शेअर केला आहे.

या व्हीडिओत एक व्यक्ती फारूख अब्दुल्ला यांच्या अगदी जवळ जाताना दिसतो, आणि त्याच्या हातात पिस्तूलही दिसत आहे.

यानंतर लगेचच फारूख अब्दुल्ला यांचे सुरक्षा कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेले लोक हल्लेखोराला ताब्यात घेताना दिसत आहेत.

'फारूख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे,' असं पीटीआय या वृत्तसंस्थेने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे. "अल्लाहचे आभार, माझे वडील थोडक्यात बचावले," असं त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर लिहिलं की, "अल्लाहचे आभार. माझे वडील थोडक्यात बचावले. सध्या घटनेची संपूर्ण माहिती समजू शकलेली नाही, पण एक व्यक्ती लोडेड पिस्तूल घेऊन खूप जवळ आला आणि त्याने गोळी मारली, इतकं माहीत आहे."

त्यांनी लिहिलं, "केवळ जवळच्या सुरक्षा टीमच्या सतर्कतेमुळे गोळीची दिशा बदलली आणि हत्येचा प्रयत्न अपयशी ठरला. सध्या उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त आहेत. झेड प्लस आणि एनएसजी सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ एक व्यक्ती शस्त्र घेऊन पोहोचला कसा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे."

पोलिसांनी सांगितलं की, फारूख अब्दुल्ला जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागातील रॉयल पार्कमध्ये एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते, आणि त्या वेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, जेव्हा फारूख अब्दुल्ला विवाह सोहळ्यात होते, त्यावेळी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरीत कारवाई करून हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.

संशयित आरोपी जम्मूचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

सुरिंदर चौधरी यांनी सांगितलं की, ते फारूख अब्दुल्ला यांच्यासोबत होते. ही घटना जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात घडली. पण या घटनेत कोणीही जखम झालेले नाही.

ते पत्रकारांना म्हणाले की, "इतका मोठा निष्काळजीपणा कसा झाला हे पोलिसांना विचारा. त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा एकही प्रतिनिधी किंवा कर्मचारी नव्हता. ज्या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सल्लागार उपस्थित होते. तेथे एक व्यक्ती शस्त्र घेऊन जात असेल तर, यावरून तुम्ही सुरक्षा व्यवस्था कशी होती, याचा अंदाज लावू शकता. सल्लागारसाहेब मागच्या गाडीत आहेत, तुम्ही त्यांच्याकडून याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता."

फारूख अब्दुल्ला एका समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला, असं जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार एजाज अहमद जान यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हेही फारूख अब्दुल्ला यांच्याबरोबर उपस्थित होते. (फाइल फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले, "फारूख अब्दुल्ला एका समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत होतो. जेव्हा आम्ही समारंभातून बाहेर निघत होतो, तेव्हा मागून एक व्यक्ती खूप वेगाने आला आणि डॉक्टर साहेबांच्या (फारूख अब्दुल्ला) पाठीवर रिव्हॉल्वर ठेवून गोळी चालवली, पण त्याची गोळी चुकली."

"डॉक्टरसाहेबांसोबत असलेल्या सुरक्षाकर्मचाऱ्यांनी लगेचच हल्लेखोराला ताब्यात घेतले, तो खाली पडला आणि त्याला पकडण्यात आलं. मोठ्या कष्टाने त्याच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेण्यात आली. त्यानंतर आम्ही तेथून घरी परतलो."

"विवाह सोहळ्याच्या आतपर्यंत शस्त्र पोहोचणे, ही खूपच दुर्दैवी घटना आहे. पण सुदैवाने सर्व लोक सुरक्षित आहेत. फारूख अब्दुल्ला पूर्णपणे ठीक आहेत आणि विश्रांतीसाठी ते आपल्या खोलीत गेले आहेत."

त्यांनी सांगितलं, "हल्लेखोर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्याबद्दल फक्त पोलीसच माहिती देऊ शकतात. त्याचे केस थोडे पांढरे होते. सध्या त्याच्याबद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही. या घटनेत कोणीही जखम झालेले नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)