बालविवाहः 'आग लावायची कामं करू नका असंही ऐकायला मिळालं, तरीही आम्ही बालविवाह थांबवून दाखवले'

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, रामकुवर खरात आणि अनिता खंडागळे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, बीड

बीबीसी मराठी 'कणखर बायांची गोष्ट' ही मालिका घेऊन येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिला आपला जाहीरनामा सादर करत आहेत. आदर्श समाजासाठी एक आदर्श जाहीरनामा कसा असावा याचा वस्तुपाठ या महिलांनी आपल्या कार्यातूनच दिला आहे. अशा महिलांची ओळख तुम्हाला या मालिकेतून आम्ही करुन देत आहोत. 

"लग्न झालं असतं तर मला लेकरं झाले असते, माझे काहीच स्वप्न पूर्ण झाले नसते."

18 वर्षांची पायल सोळुंके बीड जिल्ह्यातल्या ढाकेफळमध्ये राहते. आम्ही तिच्या घरा पोहचलो तेव्हा ती अभ्यास करत होती. 

पायलचे आई-वडील घिसाडी समाजातून येतात. ते शेतीची अवजारं जसं की, कुऱ्हाडी, विळे, खुरपे बनवतात आणि त्याची बाजारात विक्री करतात. 

पायल दहावीत असतानाच त्यांनी तिच्या लग्नाचा विचार केला होता.

पायल सांगते की, "मी दहावीला होते त्यावेळेस म्हणत होते की लग्न करायचं म्हणून. पण मी म्हटलं मला शिकायचंय, मला लग्न नाही करायचंय. पप्पा म्हणाले माझी परिस्थिती नाही तुला शिकवण्यासारखी."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

पण पायलच्या पालकांनी असा निर्णय का घेतला? हा प्रश्न विचारल्यावर तिची आई संगीता सोळुंके म्हणाल्या, "आमच्या समाजामधी 12 वर्षामध्येच करत्याती लग्न. मुलगी जास्त दिवस ठेवीत नाहीत.

"कारण आम्हाला रोज उठून गावं फिरायला जावं लागतं. मग त्या मुलीला बघायसाठी कोण नसतंय मागं. आम्हाला रोज उठून 4 गावं तरी फिरावं लागत्येत. त्यामुळे मग तिचं लग्न 12 व्या वर्षीच करावं वाटत होतं."

त्यानंतर पायल ही रामकुवर खरात आणि अनिता खंडागळे यांच्या संपर्कात आली. त्यांनी पायलच्या पालकांची समजूत काढली आणि त्यांचं मनपरिवर्तन झालं. पायल सध्या बारावीत शिकत आहे आणि तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे.

रामकुवर आणि अनिता 2018 पासून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बालविवाह रोखण्यासाठी काम करत आहेत.

बालविवाह थांबणाऱ्या या दोघींचीच गोष्ट आपण 'कणखर बायांची गोष्ट' सीरिजमधील या बातमीतून जाणून घेणार आहोत.

अशी झाली कामाची सुरुवात

बालविवाह थांबवण्याच्या कामाची सुरुवात कशी झाली? यावर रामकुवर सांगतात, "बालविवाह रोखण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी महिलांच्या बैठका चालू केल्या. माझ्या वयातल्या ज्या महिला आहेत त्यांचेसुद्धा बालविवाह झालेले होते. मग आपण त्यांचीच उदाहरणं द्यायची त्यानला. की बाबा आपलं बालवयात लग्न झालं, आपुण कितव्या वर्षी आई झालात. आई होताना आपल्याला किती त्रास झाला.

"मग त्या मुलीची शारीरिक वाढ झालेली नसती, मानसिक वाढ झालेली नसती.आणि त्या वयात हा एकप्रकारचा समाजमान्य बलात्कार करा म्हणून आपण त्या वयात स्वत:हून मुलीचं लग्न लावून देतो. ही अशी पालकांशी, महिला गटाशी चर्चा करायचो."

पालकांची मानसिकता बदलण्यासाठी कायद्याचाही धाक दाखवत असल्याचं रामकुवर सांगतात.

"पालकांना समजून सांगताना आम्ही कायद्याची पण भीती दाखवतो. की बाबा, बालविवाह झाला तर कायद्यानं हा गुन्हा आहे. तुम्हाला जेल होऊ शकते. तुम्ही 1 वर्षं, 2 वर्षं कारावासाची शिक्षा भोगू शकता. 2 लाख दंड भरावा लागू शकतो. असा कायद्याचा पण आम्ही धाक दाखवतो."

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, पायलच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधताना रामकुवर खरात आणि अनिता खंडागळे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बालविवाह रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अनिता आणि रामकुवर यांना गावागावातील शाळकरी मुलांसोबतही सेशन्स घेतले आणि त्याचीही त्यांना मदत झाली. पण, बालविवाह थांबवताना त्यांच्यासमोर आव्हानंही होती.

रामकुवर सांगतात "चॅलेंजेस होते की, गावामध्ये जरी बालविवाह व्हायला लागला तरी कुणी सांगत नव्हतं. आणि आमच्या कानावर आलं आणि आम्ही विचारायला गेलो की लोक उडवाउडवीची उत्तरं द्यायचे."

अनिता सांगतात, "मुलांबरोबर आपण मैत्रीचं नातं तयार केलं होतं. गावात अशी घटना (बालविवाह) घडत असेल तर तुम्ही 1098 ला फोन करा किंवा तिथं नाही करावं वाटला तर मग आम्हाला करा.

"असाच एक किस्सा गावामध्ये घडला होता. मुलांकडून फोन आला आणि आम्हाला कळलं की असा असा विवाह आहे. तर मी जेव्हा गावात जात होते, तेव्हा मला त्या गावचे ग्रामसेवक भेटले. मी त्यांना विचारलं की तुम्ही इकडं काय करताय? तर त्यांनी मला विचारलं की, मॅडम एवढ्या सकाळी कुठं निघालाय तुम्ही. मी म्हटलं तुमच्याच गावामध्ये चाललेय आणि तुम्ही पण सोबत चला, असा असा मुद्दा होतोय गावामध्ये. तर त्यांनी तिथं मला असं सांगितलं की, मॅडम तुम्ही कशाला याच्यामध्ये पडताय. आग लावायची कामं करू नका."

स्थलांतर आणि इज्जत जाण्याची भीती

स्थलांतर आणि प्रतिष्ठा जाण्याची भीती ही बालविवाहांमागची प्रमुख कारणं असल्याचं आजपर्यंतच्या कामातून रामकुवर यांना लक्षात आलंय.

रामकुवर सांगतात, "बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. इथं सुरक्षेचा प्रश्न आहे. कारण ऊस तोडायला भटकंतीला जायचं म्हटल्यावर मुली कुठं ठेवायच्या? विशेष म्हणजे मुलीला शिक्षणाचा वाव नसायचाच. मुलाला कुठंही पाठवायचे पण मुलींना पाठवत नसे. का तर यांची सुरक्षा कोण करील?

"श्रीमंत लोकांच्यातही बालविवाह झालेले आहेत, का तर आपली इज्जत जाऊ नये. नाक जाऊ नये. यासाठी सतत धडपडतोय समाज."

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, बीडमधल्या सोनीजवळा गावातील महिलांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगताना रामकुवर आणि अनिता

रामकुवर आणि अनिता केज तालुक्यातील 20 गावांमध्ये काम करतात. आतापर्यंत 13 बालविवाह रोखण्यात त्यांच्या टीमला यश आल्याचं त्या सांगतात. बालविवाहाचे दुष्परिणाम अधिक प्रकर्षानं लोकांना समजून सांगायला हवेत, असं त्यांना वाटतं.

रामकुवर सांगतात, "बालविवाह केल्यामुळे मुलींच्या शरीरावर त्याचा परिमाण होतो. मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. कोणती गोष्ट अॅक्सेप्ट करायला तिच्या बुद्धीची एवढी वाढ पण झालेली नसती. परत मग मातामृत्यूचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे."

अनिता यांच्या मते, "जनजागृती फक्त बालविवाह करू नका आणि कायदाच सांगा, एवढ्यापर्यंतच होते. पण जे तोटे असतात ते सांगितले जात नाही. ते तोटे पण सांगितले पाहिजेत."

सरकारनं काय करायला हवं?

ग्लोबल डेव्हलपमेंट अजेंड्यानुसार 2030 पर्यंत बालविवाहासारख्या प्रथा पूर्णपणे बंद करण्याचं देशाचं ध्येय आहे. भारतात दरवर्षी 15 लाख मुलींचे बालविवाह होतात, असं तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, bbc

बालविवाह झालेल्या मुली अल्पवयीन असतानाच बाळाला जन्म देतात. महाराष्ट्र सरकारने बालविवाह रोखण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचं प्रशिक्षण घेण्यात आल्याचं सांगितलं.

पण मोठ्या प्रमाणावर बालविवाह रोखण्यासाठी सरकारनं काय करायला हवं? याबद्दल रामकुवर आणि अनिता यांच्या सरकारकडे काही मागण्या आहेत.

रामकुवर यांच्या मागण्या-

  • गावपातळीवर ग्राम संरक्षण समिती सक्षम झाली पाहिजे आणि त्या लोकांना कायद्याचं पूर्ण प्रशिक्षण दिलं पाहिजे. यात बालविवाह कसे घडतात ते सांगितलं पाहिजे. त्यांनाच माहिती नसतं की मी बाल समितीचा सदस्य आहे, पण माझं काम काय आहे. हे शासनानं करायला पाहिजे.
  • गावामध्ये ग्रामपंचायतीत बऱ्याच समित्या असतात. शाळा व्यवस्थापन समिती आहे, त्याला पण बजेट असतं. पाणी समिती आहे, त्याला पण बजेट असतं. परत बऱ्याच समित्या आहेत, त्यांना बजेट असतं. पण बाल संरक्षण समितीला शासनानं असं कोणतंच बजेट तयार केलेलं नाहीये. ते जर बजेट असलं तर गावातले लोक थोडंसं त्याच्यावर लक्ष केंद्रित करत्येल. शासनानं बाल संरक्षण समितीला बजेटची तरतूद करावी.

फोटो स्रोत, bbc

अनिता यांच्या मागण्या-

  • मुलींच्या मासिक पाळीवर, त्या वयात आल्यावर त्यांच्यासोबत जी चर्चा केली जाते, तर ती चर्चा आपण फक्त मुलींबरोबर करत राहतोय. ती मुलांबरोबर, युवकांबरोबर करत नाही. तसे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे.
  • ग्रामपंचायतींनी बाल धोरण तयार केलं पाहिजे. त्यात बालकं, त्याचं कुटुंब, गाव,  समाज यांचं सर्कल असायला पाहिजे. हे त्या धोरणात समाविष्ट असायला पाहिजे.

दरम्यान, बालविवाह थांबवण्यासाठीच्या सरकारच्या उपाययोजनांविषयी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितलं होतं की, "बालमृत्यूच्या कारणांमध्ये बालविवाह हे एक कारण असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय वेगवेगळी कारणंही आहेत. पुढच्या काळात बालमृत्यू दर कमी करण्यावर आमचं लक्ष असणार आहे. जिथं बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे अशा तालुक्यांमध्ये लक्ष देऊन काम करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत."

शिक्षणामुळे घरातलं वातावरण बदललं

पायल सोळुंकेच्या एका मैत्रिणीचं सातवीत असतानाच लग्न झालं. परिस्थिती किंवा इतर कारणं पुढे करून जे पालक मुलींचे बालविवाह करतात, त्यांच्यासाठी पायलचा एक मेसेज आहे.

"मी त्यांना एवढचं सांगू शकते की, माझ्यासारख्या अनेक पायल शिकल्या पाहिजेत. अनेक पायलला अशी संधी भेटली पाहिजे."

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारचा हेल्पलाईन क्रमांक 1098.

पायलला शिक्षणाची संधी दिल्यामुळे साळुंके कुटुंबातलं वातावरण बदललं आहे.

पायलची आई संगीता सोळुंके सांगतात, "आमच्या समाजात काही नाही. नुसता रोज दंगा असतो. संध्याकाळी बाप दारू पिऊन येतो. मुलावरती संस्कार शिव्यागाळीचे राहत्यात. आता तसं काही नाही आमच्या घरामध्ये. सगळं शिक्षणाचंच लेकरांच्या आणि आमच्या डोक्यात आहे."

(या लेखासाठी अत्त दीप या ग्रासरुट लिडरशीप अकॅडमीच्या रिसर्चची मदत झाली.)