You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहम्मद दीपक आणि वकील अहमद : कोटद्वारमधील 'त्या' घटनेनंतर पहिल्यांदाच दोघेही आले समोरासमोर
- Author, आसिफ अली
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
एक जिम ट्रेनर आणि एक वृद्ध दुकानदार. दोघेही वेगवेगळ्या पिढ्यांतील आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेली माणसं. पण एका घटनेने या दोघांना एकमेकांसमोर आणून उभं केलं.
26 जानेवारी 2026 रोजी कोटद्वारमध्ये कपड्यांच्या दुकानाच्या नावावरून झालेल्या वादानंतर हे दोघेही देशभर चर्चेत आले आहेत.
ही घटना रस्त्यांवर, सोशल मीडियावर आणि राष्ट्रीय माध्यमांत चर्चेत होती. तसेच याचे पडसाद पोलीस ठाण्यांपासून राजकीय क्षेत्रातही उमटत आहेत. पण एवढ्या गोंधळातही त्या घटनेनंतर हे दोघेही एकत्र दिसले नव्हते.
त्या घटनेचा परिणाम या दोघांच्या आयुष्यावर वेगवेगळ्या पद्धतीने झाला.
बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना हे दोघे एकत्र आले. 26 जानेवारीच्या घटनेदरम्यान ज्यांनी आपलं नाव 'मोहम्मद दीपक' सांगितलं ते दीपक कश्यप आणि 'बाबा कलेक्शन' या दुकानावरून वाद सुरू झालेले वकील अहमद.
या दोघांची भेट ज्या दिवशी झाली, त्यादिवशी दीपक यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आणि या सगळ्या घडामोडींनंतर वकील अहमद यांना पाहून आपल्याला हायसं वाटलं, असं दीपक सांगतात.
दीपक म्हणाले, "त्यांची तब्येत आता पूर्वीपेक्षा चांगली वाटते. खरंच बरं वाटत आहे."
दीपकसाठी ही केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर त्या दिवशी अर्धवट राहिलेलं संभाषण पुढे नेण्याची ही एक संधी होती.
वकील अहमद यांनाही असंच वाटतं. ते म्हणाले की, घटनेनंतर दोघेही घाबरलेले होते, त्यामुळे भेट होऊ शकली नाही. घटनेनंतर आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ठीक नव्हतो, म्हणून ही भेट पुढे ढकलली जात होती, असंही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "आज तब्येत थोडीशी बरी वाटल्यामुळे मी दीपकला भेटायला आलो आहे. त्या दिवशी जे घडलं, तो क्षण अजूनही मला आठवतो."
'त्या दिवशी वातावरण अचानक बदललं'
26 जानेवारी रोजी वकील अहमद आपल्या दुकानात बसले होते. त्या दिवशी काही तरुण त्यांच्या दुकानात आले आणि दुकानाच्या नावावरून प्रश्न विचारू लागले.
ते म्हणाले की, सुरुवातीला नाव बदलण्यावरून बोलणं सुरू झालं, पण बोलण्याच्या पद्धतीमुळे आणि दबावामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली.
त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलाने परिस्थिती समजून घेत दुकानाचं नाव बदलण्यासाठी वेळ मागितला, पण समोरून लगेच बदल करण्याचा दबाव आणला गेला. यामुळे परिस्थिती हळूहळू बिघडत गेली.
वकील अहमद सांगतात की, त्याच वेळी दीपक तिथे आले. त्यांना वाटलं की, एक वृद्ध व्यक्ती दबावाखाली आहे आणि त्यांची तब्येतही ठीक नाही.
त्या दिवसाबद्दल दीपक सांगतात की, तिथे त्यांनी समोर एक वृद्ध माणसाला पाहिलं. त्या वृद्ध व्यक्तीसमोर मोठ्या संख्येने लोक होते.
दीपक म्हणतात, "अनेक तरुण एका वयोवृद्ध व्यक्तीशी ज्या पद्धतीने बोलत होते, ते मला योग्य वाटलं नाही. म्हणूनच मी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला."
वकील अहमद म्हणतात की, त्या वेळी गर्दीतून कोणीही पुढे येऊन बोलायला तयार नव्हतं.
"तो जमाव ज्या पद्धतीने आला होता, ते पाहता आपली मागणी लादण्यासाठी ते काहीही करतील असं वाटत होतं. आम्ही घाबरलो होतो."
'त्यावेळी दीपकचा आधार मिळाला'
या घटनेदरम्यान दीपक यांना त्याचं नाव विचारलं असता, त्यांनी आपलं नाव 'मोहम्मद दीपक' असल्याचं सांगितलं होतं.
हा नंतर वादाचा मुद्दा ठरला, पण दीपक म्हणतात की ती कोणतीही युक्ती किंवा रणनीती नव्हती, तर त्या क्षणी ती गरजेची गोष्ट होती.
ते म्हणाले की, त्या वेळी वातावरण धर्म आणि अस्मितेभोवती फिरत होतं. माणुसकी ही कोणत्याही एका अस्मितेवर अवलंबून नसते, हेच त्यांना दाखवायचं होतं.
दीपक सांगतात की, वकील अहमद यांच्याशी त्यांची आधी फारशी ओळख नव्हती. ते फक्त वयाने मोठे आहेत, म्हणून रस्त्यात दिसले की ते नमस्कार करत असत.
वकील अहमद हेही दीपक यांना इतकं ओळखत नव्हते.
त्यांच्यासाठी तो असा क्षण होता की, एक व्यक्ती कोणताही विचार न करता त्यांच्यासाठी उभा राहिला.
दोघांचंही मत होतं की, त्या दिवशी जे घडलं ते असामान्य होतं, कारण अशा वेळी लोक सहसा गप्प बसतात.
आधार, भीती आणि पुढचा मार्ग
या घटनेनंतर दीपक सोशल मीडियावर व्हायरल झाले.
फोन कॉल्स, भेटायला येणारे लोक, फोटो, हे सगळं त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं.
दीपक सांगतात की, साध्या हस्तक्षेपाचाही एवढा मोठा विषय होईल, असं कधीच वाटलं नव्हतं.
त्यांच्या मते, जे योग्य वाटलं तेच त्यांनी केलं.
मदत करणाऱ्यांनाच त्रास सहन करावा लागला, तर लोक पुढे येण्यास घाबरतील, अशी भीती वकील अहमद यांना वाटते.
मात्र, ते हेही मान्य करतात की या घटनेमुळे काही लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे.
आज लोक एकमेकांसाठी पुढे का येत नाहीत, या प्रश्नावरही दोघांनी चर्चा केली.
"आज आपण शांत बसलो, तर उद्या आपली मुलंही गप्प बसणंच शिकतील," असं दीपक यांना वाटतं.
वकील अहमद म्हणतात की, माणुसकी ही कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसते.
स्वप्नातील भारत
दीपक म्हणतात की, हे काही खास किंवा मोठं वचन नाही, तर नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पुढे पुन्हा अशीच परिस्थिती आली, तरी त्यांची भूमिका बदलणार नाही. त्या दिवशी जसं पुढे आले, तसेच ते पुन्हा समोर येतील.
त्या दिवशी परिस्थिती कुठल्या दिशेला गेली असती, याचा विचार केला तरी अस्वस्थ वाटतं, असं वकील अहमद म्हणतात. त्यांच्या मते, त्या वेळी दीपक तिथे नसते, तर हे प्रकरण फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिले असते की नाही, हे सांगणं कठीण आहे.
संभाषण हळूहळू अशा टप्प्यावर पोहोचते जिथे प्रश्न घटनेच्या पलीकडे भविष्याकडे जातो - त्यांच्या दोघांच्या स्वप्नातील भारताकडे.
दीपक म्हणतात की, ते अशा देशाची कल्पना करतात जिथे ओळखीपेक्षा माणूस महत्त्वाचा असेल, जिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतील, एकत्र चालतील आणि एकमेकांना आदराने वागवतील.
वकील अहमद यांच्यासाठी भारताचं चित्र यापेक्षा वेगळं नाही. त्यांच्या मते, चांगला माणूस तोच असतो जो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो, तो कोण आहे, कुठून आला आहे याची पर्वा करत नाही.
चर्चा संपत असताना दीपक म्हणाले की, ही भेट इथेच थांबणार नाही. जेव्हा जेव्हा ते या रस्त्यावरून जातील, तेव्हा वकील अहमद यांची भेट घेऊनच ते पुढे जातील. ते म्हणतात की, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते.
एकत्रित अपेक्षा
दीपक हसत सांगतात की ते 'जिम लव्हर' आहेत, "बाहेरून मजबूत, आतून संवेदनशील."
दीपकला पाहून आपल्याला ऊर्जा मिळते, असं वकील अहमद हसत सांगतात.
भविष्यातही एकमेकांना भेटत जाऊ असं दोघेही म्हणतात.
कोटद्वारची ही भेट कुठल्याही वादावर तोडगा नाही, पण यातून दिसून येतं की, गोंधळानंतरही संवादाला वाव असतो.
या चर्चेची सर्वात महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजे, ही कोणत्याही वादाची किंवा आरोपाची गोष्ट नाही. ही दोन लोकांची सामायिक आठवण, सामायिक भीती आणि सामायिक आशेची गोष्ट आहे.
एक जिम ट्रेनर आणि एक वयस्कर दुकानदार - जे आज एकत्र बसून सांगत आहेत की माणुसकी अजूनही जिवंत आहे, फक्त तिला आवाज देण्याची गरज आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
26 जानेवारी रोजी एक व्हीडिओ व्हायरल झाला, त्यावेळी दीपक कश्यप चर्चेत आले. या व्हीडिओत ते कोटद्वारच्या पटेल रोडवर बजरंग दलाशी संबंधित कार्यकर्त्यांशी वाद घालताना दिसत होते.
प्रजासत्ताक दिनी, बजरंग दलाचे काही कार्यकर्ते कोटद्वारच्या 'बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर' या दुकानात गेले होते.
हे लोक 75 वर्षीय वकील अहमद यांच्यावर दुकानाच्या नावातील 'बाबा' शब्द हटवण्यासाठी दबाव आणत होते.
त्यावेळी दीपक यांनी या वादात हस्तक्षेप केल्याने ते लोक परत गेले होते. परंतु, पुन्हा 31 जानेवारी रोजी बजरंग दलाशी संबंधित लोक मोठ्यासंख्येने कोटद्वार येथे आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.
नंतर पोलिसांनी दोन्ही गटांवर एफआयआर दाखल केला. ज्यात दीपक यांच्या नावाचाही समावेश आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)