'अंतिम मुदतीचा इशारा, गोल्फ आणि एल्विस प्रिस्लेच्या घराला भेट' ; युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे कोणते प्रयत्न सुरू आहेत?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांनी ग्रेसलँडला भेट दिली असताना, एल्विस प्रेस्लीच्या एका गिटारच्या प्रतिकृतीवर सही केली
    • Author, अँथनी झुर्कर
    • Role, उत्तर अमेरिका प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सध्या अमेरिका हा देश इराणविरुद्धच्या युद्धात अडकलेला आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गेल्या काही दिवसांमधील हालचालींमध्ये मुत्सुद्देगिरी आणि दिशा बदलणं, या गोष्टींचं मिश्रण होतं. त्यात अधूनमधून काही विचित्र गोष्टी करण्याचाही समावेश होता.

शुक्रवारी (20 मार्च) ट्रम्प म्हणाले की अमेरिकेचं इराणविरुद्धचं युद्ध 'संपतं आहे'. तर शनिवारी (21 मार्च) रात्रीपर्यंत त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला 48 तासांची मुदत दिली होती. नाहीतर इराणला अमेरिकेच्या नवीन हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल, असा इशारा दिला होता.

दुसऱ्याच दिवशी ते गोल्फ खेळले आणि त्यांनी दुपारचा वेळ फ्लोरिडातील त्यांच्या मार-ए-लागोतील रिसॉर्टवर घालवला.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

सोमवारी (23 मार्च) सकाळपर्यंत, जागतिक मार्केट कोसळत असताना, ट्रम्प म्हणाले की इराणची अमेरिकेबरोबर 'रचनात्मक' चर्चा सुरू आहे.

मग ते टेनेसीमधील मेम्फिसला गेले. तिथे त्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर ते ग्रेसलँडला गेले. 'ग्रेसलँड' हे संगीताच्या क्षेत्रातील दिग्गज कलावंत एल्विस प्रिस्ले याचं ऐतिहासिक निवासस्थान आहे.

इराणला ट्रम्प यांचा अंतिम इशारा

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरील हवाई हल्ले सुरूच आहेत. इराण, अमेरिकेचं सैन्य आणि मध्य-पूर्वेतील त्यांच्या मित्रराष्ट्रांवर क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचे हल्ले करतो आहे. अर्थात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मर्यादित वाहतूक सुरू आहे.

त्यावेळी, ट्रम्प यांनी शनिवारी (21 मार्च) रात्री इराणला दिलेला अंतिम इशारा हा अगदी स्पष्ट स्वरुपाचा वाटत होता. जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी खुली केली नाही, तर अमेरिका इराणमधील ऊर्जेशी निगडीत पायाभूत सुविधांवर हल्ले करून त्यांना अंधारात लोटेल, असा तो इशारा होता.

फोटो स्रोत, Celal Gunes/Anadolu via Getty Images

तो अतिशय कडक इशारा होता. त्यावर इराणनं प्रत्युत्तर दिलं होतं की जर अशा हल्ला झाला, तर ते आखातातील ऊर्जा आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील.

तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा आणखी भडका लवकरच उडण्याची शक्यता आता वाटत होती. या वाढत्या संघर्षाचे नागरिकांवर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.

हल्ले तात्पुरते स्थगित आणि इराणशी चर्चा सुरू असल्याचा दावा

मात्र, सोमवारी (23 मार्च) सकाळपर्यंत ट्रम्प यांनी हे हल्ले रद्द केले होते. किमान तात्पुरत्या स्वरुपात तरी ते रद्द झाले होते.

इराणमधील एका निनावी नेत्याशी अमेरिकेनं संपर्क केला होता. हा संपर्क हे इशारा दिलेले हल्ले 5 दिवस स्थगित करण्यासाठी पुरेसा ठरला, असं ट्रम्प म्हणाले. अर्थात इराणनं मात्र याप्रकारचा संपर्काबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही.

त्या दिवसभर ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबाबत आशावादी सूर लावला. याच दरम्यान ते विमानानं टेनेसीला गेले. त्यांनी सांगितलं की ही भेट काही आठवड्यांपूर्वीच ठरली होती.

फोटो स्रोत, Fatemeh Bahrami/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमधील अमेरिका आणि इस्रायलविरोधातील आंदोलन (फोटो: 20 मार्च 2026)

अमेरिका आणि इराण यांच्यात 'सहमतीचे अनेक प्रमुख मुद्दे' आहेत, असं ट्रम्प यांनी रवाना होण्यापूर्वी विमानाच्या धावपट्टीवरून बोलताना सांगितलं.

"त्यांना (इराण) करार करण्याची अतिशय इच्छा आहे. आम्हालाही हा करार करायचा आहे," असं ते म्हणाले.

ग्रेसलँडमध्ये एल्विस प्रिस्लेच्या घराला भेट

काही तासांनी, मेम्फिसमध्ये जमलेल्या यूएस नॅशनल गार्डच्या जवानांसमोर भाषण करताना ते म्हणाले की, अमेरिकेची इराणबरोबर 'अतिशय, अतिशय चांगली चर्चा सुरू' आहे.

"अमेरिका आणि आमच्या मित्रराष्ट्रांना देत असलेल्या धमक्या थांबवण्याची इराणला आणखी एक संधी आहे. आम्हाला आशा आहे की ते या संधीचा लाभ घेतील," असं ट्रम्प म्हणाले.

त्यानंतर ट्रम्प ग्रेसलँडला गेले. ते मेम्फिसमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे त्यांनी शहरातील गुन्हेगारीच्या दरात घट झाल्याचं श्रेय स्वत:ला दिलं. शहरातील रस्त्यांवर नॅशनल गार्डचे जवान त्यांनी तैनात केल्यामुळे हे करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडातील पाम बीच येथे विमानात चढण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत आहेत.

एल्विसच्या घरात वावरत असताना, ट्रम्प या 'किंग ऑफ रॉक एन रोल'च्या फॅशन आणि डिझाईनच्या आवडीनिवडींचं निरीक्षण करत होते. त्याच वेळेस, राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन केल्याच्या आणि या आठवड्याच्या अखेरीस इराणच्या अधिकाऱ्यांबरोबर संभाव्य थेट चर्चा होणार असल्याच्या बातम्या येत होत्या.

एल्विस कधीकाळी संशयावरचं गाणं गायला होता, त्याप्रमाणे वाटत होतं की मुत्सद्देगिरीच्या हालचालींना गती मिळाली होती. मात्र त्यासंदर्भातील तपशीलांच्या अभावामुळे जगभरात अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला होता.

युद्ध संपण्याच्या आशेनं शेअर मार्केट वधारलं, मात्र इराणनं चर्चेचा मुद्दा नाकारला

ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर टाकलेल्या पोस्टचा पुरावा म्हणून संदर्भ देत, इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दावा केला की, धमक्यांमुळे राष्ट्राध्यक्षांनी माघार घेतली आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांमध्ये कोणतीही ठोस चर्चा झाल्याची बाब नाकारली. डोनाल्ड ट्रम्प 'कराराच्या 15 मुद्द्यां'बद्दल बोलले असले तरीदेखील त्यांनी त्याचे अधिक तपशील देण्यास नकार दिला.

अर्थात, चर्चेच्या फक्त शक्यतेमुळेच अमेरिकेच्या शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली. तसंच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांसाठी निराशाजनक ठरू पाहणाऱ्या या दिवसामध्ये, युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग पाहण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणुकदारांना आशेचा किरण दिसत होता.

ट्रम्प वॉशिंग्टनमध्ये परतले आहेत. आता तिथून इराणच्या विजेशी संबंधित पायाभूत सुविधांवर अमेरिकेचा हल्ला होण्याच्या नवीन 5 दिवसांच्या मुदतीची उलट गणना सुरू होईल.

फोटो स्रोत, Getty Images

अनेक चढ-उतार आणि अगदी एका प्रसिद्ध दिवंगत रॉक स्टारच्या घराला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कदाचित एका खऱ्या प्रगतीचे पहिले संकेत दिले असावेत.

किंवा, आपण दिलेल्या अंतिम इशाऱ्यामुळे आपण अडचणीत सापडलो आहोत, हे या राष्ट्राध्यक्षांच्या लक्षात आल्याचं फक्त एक ताजं उदाहरण असू शकतं. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी स्वत:ला अधिक वेळ मिळावा यासाठी हे पाऊल उचलणं त्यांना भाग पडलं आहे.

ट्रम्प यांनी ग्रेसलँडला भेट दिली, तेव्हा ते म्हणाले होते की ते एल्विसचे मोठे चाहते आहेत. द 'हर्ट' हे त्यांचं आवडतं गाणं आहे.

मात्र, सद्यपरिस्थिती लक्षात घेता, एल्विसचंच 'इट्स नाऊ ऑर नेव्हर' हे गाणं हाच अधिक योग्य पर्याय ठरला असता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)