अमेरिकन सैन्याचं हवेतच इंधन भरणारं विमान कोसळून 6 जणांचा मृत्यू; आतापर्यंत काय माहिती समोर आली?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ही घटना शत्रूच्या गोळीबारामुळे किंवा आपल्याच सैन्याच्या गोळीबारामुळे घडली नसल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांड म्हटलं आहे. (फाइल फोटो)
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेच्या सैन्याचे हवेतच इंधन भरणारे (री फ्युलिंग) केसी-135 हे विमान पश्चिम इराकमध्ये कोसळलं.

या घटनेत विमानात उपस्थित 6 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडंटकडून करण्यात आली आहे.

यापैकी 4 जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. उर्वरित 2 जणांचा शोध सुरू आहे.

लष्कराच्या मते जिथे विमान कोसळले ते ठिकाण 'मित्र राष्ट्राचा हवाई प्रदेश' (एअर स्पेस) होता.

या अपघातात 2 विमान होते, पण दुसरे विमान सुरक्षित उतरले. री-फ्युलिंग विमान हवेतच दुसऱ्या लढाऊ विमानात इंधन भरते.

केसी-135 विमान कसे कोसळले हे अद्याप बीबीसीला कळू शकलेलं नाही. पण विमान हवेत एकमेकांना धडकले असावे असा संशय आहे.

ही घटना शत्रूच्या गोळीबारामुळे किंवा आपल्याच लष्कराच्या गोळीबारामुळे घडली नसल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे म्हणणं आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

ही घटना इराकच्या हवाई प्रदेशात घडली, पण हे ठिकाण इराणपासून किती अंतरावर आहे, हे स्पष्ट झालेलं नाही, असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटलं आहे.

री-फ्युलिंग टँकर विमानं युद्धात खूप महत्त्वाचे असतात. हे लढाऊ आणि बॉम्ब फेकणाऱ्या विमानांना हवेतच इंधन पुरवतात. त्यामुळे ते जास्त अंतरापर्यंत उडू शकतात आणि युद्धात महत्त्वाचे ठरतात.

लढाऊ विमानात हवेतच इंधन कसं भरलं जातं?

हे एक मोठे लॉजिस्टिक ऑपरेशन असते, ज्यात एकाच वेळी अनेक विमान हवेत असतात आणि त्यांना इंधनाची गरज असते.

हवेत इंधन भरण्याच्या प्रक्रियेत लढाऊ विमानाला टँकर विमानाच्या खूप जवळून उड्डाण करावं लागतं.

यानंतर टँकर विमानातून एक इंधनाचा पाइप (प्रोब) बाहेर काढून खालच्या बाजूला नेला जातो.

इंधन घेणारे विमान त्या पाइपजवळ येते. पाइप विमानात बसवण्यासाठी ते विमान 'टँकर विमाना'खालील लाइट्स सिस्टिमच्या मदतीने आपलं स्थान अचूक करतं.

जेव्हा संपर्क होतो तेव्हा इंधन हस्तांतर होऊ लागतं आणि ही प्रक्रिया काही मिनिटे चालू राहू शकते.

फोटो स्रोत, HUM Images/Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, हवेत एका विमानातून दुसऱ्या विमानात इंधन भरणे एक प्रमुख आणि महत्त्वाचे लॉजिस्टिक ऑपरेशन मानले जाते.

यावेळी विमान टँकरच्या अवघ्या काही फूट अंतरावरच उडत असते. अनेकदा हे काम रात्री केलं जातं.

या वेळी पायलटला पाइप किंवा कधी-कधी शटल कॉकसारख्या साधनाशी संपर्क ठेवण्यासाठी खूप कौशल्य लागतं. जेव्हा आजूबाजूला इतर अनेक विमान उडत असतात, त्यावेळी वैमानिकांचं कसब महत्त्वाचं असतं.

अनेकवेळा शत्रूपासून बचावासाठी विमानांचे लाइट्सही पूर्णपणे बंद ठेवले जातात.

साधारणपणे केसी-135 विमानात 3 जणांची टीम असते. यात 1 पायलट, 1 को-पायलट आणि 1 बूम ऑपरेटर (जो हवेत इंधन भरण्याची प्रक्रिया हाताळतो) असतो.

अमेरिकेच्या वायूसेनेनुसार, एअर मोबिलिटीकडे सुमारे 400 टँकर विमानं आहेत.

इराण म्हणतो, 'युद्धाच्या इतर आघाड्याही उघडू'

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल आणि अमेरिकेने एकत्रित येत इराणवर हल्ला केला होता.

या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या लष्कराचे अनेक मोठे अधिकारी मारले गेले होते.

आयतुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोज्तबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाली आहे.

मोज्तबा खामेनी यांनी त्यांच्या अलीकडील संदेशात 'होर्मुजच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी सुरू ठेवण्यावर' आणि 'मिनाब शाळेतील विद्यार्थ्यांसह मारल्या गेलेल्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यावर' भर दिला आहे.

"जिथे शत्रूला कमी अनुभव आहे, अशा ठिकाणी आघाड्या उघडण्याबाबत विचार सुरू असल्याचेही" त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी जिथे शत्रूला फारसा अनुभव नाही अशा नव्या ठिकाणीही आघाड्या (युद्ध) उघडू, असं म्हटलं आहे.

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख करत खामेनी यांनी हल्ले सुरूच ठेवण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना उत्तर देताना इराणने अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या आखाती देशांवर हल्ले केले आहेत.

या युद्धामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे प्रादेशिक तणावही वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत प्रति बॅरल सुमारे 120 डॉलरपर्यंत (सुमारे 11 हजार रुपये) पोहोचली होती.

मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरच संपेल, असं म्हटलं होतं. त्यानंतर तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून आली, पण ते अजूनही प्रति बॅरल सुमारे 100 डॉलरच्या (सुमारे 9 हजार 200 रुपयांच्या) आसपास आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)