तेल महागलं, शेअर बाजारात गुंतवणूकदारांची धावपळ; अमेरिका-इस्रायलच्या इराणविरुद्ध युद्धाचे काय परिणाम ?

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सौदी अरामकोच्या रास तनुरा तेल शुद्धीकरण कारखान्याच्या आसपासचा परिसर कामगारांनी रिकामा केला.
    • Author, डॅनियल थॉमस, बेन हॅटन, पीटर हॉस्किन्स आणि डियरबेल जॉर्डन
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने पश्चिम आशियात हल्ले सुरू केले. त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

जगभरात तेलाच्या किमती ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडच्या दरात सोमवारी (2 मार्च) 10 टक्क्यांनी वाढ झाली आणि ते प्रति बॅरल 82 डॉलरच्या (सुमारे 7 हजार 516 रुपये) पुढे गेले.

आठवड्याच्या अखेरीस होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ किमान 3 जहाजांवर हल्ले झाल्यानंतर ही वाढ झाली. याचबरोबर नैसर्गिक वायूचे दरही तब्बल 25 टक्क्यांनी वाढले आहेत.

इराणने आपल्या देशाच्या दक्षिणेकडील अतिशय महत्त्वाच्या जलमार्गातून जहाजांनी जाऊ नये, असा इशारा दिला आहे. या मार्गावरून जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि वायूची वाहतूक केली जाते.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

जागतिक शेअर बाजारात घसरण

लंडनमध्ये एफटीएसइ 100 शेअर निर्देशांक (इंडेक्स) 1 टक्क्यांनी घसरला . यात पश्चिम आशियातील हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ब्रिटिश एअरवेजची मालक कंपनी सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांपैकी एक ठरली.

फोटो स्रोत, Getty Images

ऊर्जेच्या किमती सातत्याने वाढल्यास महागाई वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँका व्याजदर कपात कमी करू शकतात, या चिंतेमुळे बार्कलेज, स्टँडर्ड चार्टर्ड आणि एचएसबीसीसारख्या बँकांच्या शेअर्सच्या किमतीही घसरल्या.

युरोपमधील प्रमुख शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. फ्रान्समधील सीएसी-40 निर्देशांक 1.8 टक्क्यांनी घसरला, तर जर्मनीचा डॅक्स निर्देशांक सोमवारी दुपारपर्यंत 2.1 टक्क्यांनी घसरला.

सोन्याच्या किमतीत वाढ

दरम्यान, अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीतही वाढ झाली.

सोन्याचे दर 2 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 5,388 डॉलरपर्यंत (सुमारे 4 लाख 93 हजार 917 रुपये) पोहोचले आहेत.

होर्मुज सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळ आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. हा संघर्ष लांबला, तर ऊर्जा दर आणखी वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने (यूकेएमटीओ) सांगितलं की, दोन जहाजांवर थेट हल्ले झाले. तसेच तिसऱ्या जहाजाबाबत एका 'अज्ञात क्षेपणास्त्राचा' (प्रोजेक्टाइलचा) 'स्फोट अगदी जवळ' झाला असल्याचे वृत्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोन्याच्या वाढत्या दरांमागे भू-राजकीय संघर्ष हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे

'सध्या भीती नाही, पण...'

सुरुवातीच्या जोरदार वाढीनंतर ब्रेंट क्रूडचे दर घसरून प्रति बॅरल 79 डॉलरवर (सुमारे 7 हजार 241 रुपये) आले. मात्र अमेरिकेत व्यवहार होणाऱ्या तेलाच्या किमतीत सुमारे 7.6 टक्क्यांची वाढ होऊन दर 72.20 डॉलरपर्यंत (सुमारे 6 हजार 618 रुपये) पोहोचला.

"बाजारात सध्या भीती नाही," असे एमएसटी मार्की या संस्थेतील ऊर्जा संशोधन प्रमुख सौल कावोनिक यांनी बीबीसीला सांगितलं.

"आतापर्यंत कोणत्याही बाजूने तेल वाहतूक किंवा तेल उत्पादनाची यंत्रणा थेट लक्ष्य झालेली नाही, हे आता स्पष्ट होत आहे," असंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होते का, याकडे बाजाराचं लक्ष असेल. तसं झालं तर तेलाच्या किमती पुन्हा कमी होतील," असं तज्ज्ञ सांगतात.

मात्र संघर्ष जास्त काळ सुरू राहिला, तर तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या (सुमारे 9 हजार 166 रुपये) पुढे जाऊ शकतात, असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला. असं झाल्यास महागाई वाढू शकते आणि व्याजदरांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

दुबई येथील कमर एनर्जी या सल्लागार संस्थेचे प्रमुख आणि तेल कंपनी शेलचे माजी अधिकारी रॉबिन मिल्स म्हणाले, "तेलाच्या किमतीत झालेली वाढ जवळपास लगेचच जाणवेल, कारण तेल व्यापारीही सतत घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत."

"सध्या तेलाच्या किमती फार जास्त नाहीत. त्या 2 वर्षांपूर्वी ज्या पातळीवर होत्या, त्याहीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे आत्ता तरी आपण मोठ्या तेल संकटाच्या स्थितीत पोहोचलेलो नाही," असं त्यांनी सांगितलं.

रविवारी (1 मार्च) ओपेक+ या तेल उत्पादक देशांच्या गटाने दररोज 2 लाख 6 हजार बॅरल तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाच्या किमती वाढू नयेत, यासाठी हा प्रयत्न आहे. परंतु, काही तज्ज्ञांच्या मते, यामुळे फारसा फरक पडेल असं नाही.

'तर महागाई वाढणार'

ही गडबड कायम राहिली, तर जगभरात पेट्रोलचे दर वाढू शकतात, असा इशारा एडमंड किंग यांनी दिला आहे.

"पश्चिम आशियातील अस्थिरता आणि बॉम्बहल्ले हे जागतिक पातळीवर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम करतील. त्यामुळे तेलाच्या किमती वाढणारच," असं ते म्हणाले.

"संघर्ष लांबला, तर पेट्रोल-डिझेल जास्त महाग होईल आणि जास्त काळ महाग राहील."

सरासिन अँड पार्टनर्स या संस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूक धोरण प्रमुख सुबिथा सुब्रमण्यम म्हणाल्या की, तेलाच्या किमती दीर्घकाळ जास्त राहिल्या तर त्याचा परिणाम इतर वस्तूंवरही होईल.

"अन्नधान्य, शेतीमाल, औद्योगिक वस्तू अशा इतर गोष्टी महाग होतील आणि यामुळे महागाई आणखी वाढेल," असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रिटनमध्ये महागाईचा वेग हळूहळू कमी होत असल्याने बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुब्रमण्यम यांनी म्हटलं की, यापूर्वी आणखी व्याजदर कपातीचे संकेत दिले असले तरी, सध्या तरी बँक ऑफ इंग्लंड 3.75 टक्के व्याजदर तसाच ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते.

अमेरिका-ब्रिटनच्या तेल टँकरवर हल्ला?

रविवारी (1 मार्च) इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (आरजीसी) दावा केला की, ब्रिटन आणि अमेरिकेच्या 3 तेल टँकरवर 'क्षेपणास्त्रांनी हल्ले झाले असून ती जहाजं जळत आहेत'.

मात्र या दाव्यावर अद्याप ब्रिटन आणि अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यूकेएमटीओने म्हटलं आहे की, अरबी समुद्राच्या परिसरात आणि ओमानच्या आखातात अनेक सुरक्षा भंगाच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जहाजांनी या भागातून जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

जहाजांची हालचाल नोंदवणाऱ्या केप्लरच्या माहितीनुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीपलीकडे खुल्या आखाती पाण्यात किमान 150 तेल टँकरांनी नांगर टाकून थांबण्याला प्राधान्य दिलं आहे. परंतु, काही इराणी आणि चिनी जहाजांनी हा मार्ग ओलांडला आहे.

होमयुन फलाकशाही यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "इराणच्या धमक्यांमुळे होर्मुजची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंदच झाल्यासारखी आहे."

"धोका खूप जास्त असल्याने आणि विम्याचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे जहाजांनी सुरक्षिततेच्या कारणाने आत प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे," असं सांगण्यात आलं.

ते म्हणाले की, अमेरिका जहाजांचे मार्ग सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेल. तो प्रयत्न यशस्वी झाला, तर तेलाच्या किमती फार वाढणार नाहीत. पण होर्मुजची सामुद्रधुनी दीर्घ काळासाठी बंद राहिली, तर तेलाचे दर 'खूपच जास्त' पातळीवर जाऊ शकतात.

डॅनिश कंटेनर शिपिंग कंपनी मार्स्कने रविवारी (1 मार्च) जाहीर केलं की, ते सुरक्षेच्या कारणांमुळे बाब अल-मंडेब सामुद्रधुनी आणि सुएझ कालव्यातून होणारी जहाजांची वाहतूक तात्पुरती थांबवतील. त्याऐवजी जहाजांना आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप मार्गे वळवण्यात येणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)