ब्रिटिश गुप्तचर संस्था MI6 चं प्रमुखपद प्रथमच महिलेकडे, ब्लेझ पूर्वी होत्या 'Q'

    • Author, ख्रिस मेसॉन आणि फ्रँक गार्डनर
    • Role, राजकीय संपादक आणि सुरक्षा प्रतिनिधी
    • Author, रिच प्रेस्टन
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

हॉलिवूडचे बाँडपट हे चाहत्यांसाठी पर्वणी असतात. गुप्तचर संस्था आणि त्यांचे एजंट कसे काम करतात याचं थ्रिल त्यात अनुभवता येतो. या चित्रपटांमध्ये 007 शिवाय एम नावाचं पात्रंही चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. एम म्हणजे जेम्स बाँडचा बॉस किंवा गुप्तहेर संस्थेचा प्रमुख.

1995 मध्ये आलेल्या बाँडपटात एम म्हणजेच गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी एक महिला दाखवली होती. पण चित्रपटाप्रमाणे प्रत्यक्षात ब्रिटिश गुप्तचर संस्थेला आजवर महिला बॉस मिळालेली नव्हती.

आता 116 वर्षांनंतर ही परिस्थिती बदलली आहे. युकेची प्रसिद्ध गुप्तहेर संस्था MI6 च्या प्रमुखपदी एका महिलेची नियुक्ती झाली आहे.

MI6 च्या 116 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होतं आहे. MI6 च्या नव्या प्रमुखांचं नाव आहे- ब्लेझ मेट्रिवेली.

ब्लेझ 1999 मध्ये या सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस म्हणजे गुप्तहेर संस्थेत रुजू झाल्या होत्या.

MI6 चे विद्यमान प्रमुख सर रिचर्ड मूर यावर्षी निवृत्त होत आहेत. ब्लेझ मेट्रिवेलीत्यांच्याकडून MI6 ची सूत्रं हाती घेतील. त्या MI6 च्या 18 व्या प्रमुख असतील.

सध्या त्यांच्यावर MI6च्या टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन विभागाची जबाबदारी आहे.

MI6 च्या प्रमुखपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर ब्लेझ यांनी म्हटलं की, नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे.

युकेचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी म्हटलं आहे की, "ही नियुक्ती ऐतिहासिक आहे. ती अशावेळी झाली आहे, जेव्हा आपल्या गुप्तचर संस्थांचे काम कधीही इतकं महत्त्वाचं नव्हतं."

युकेच्या सुरक्षेला बळ देण्यासाठी परदेशातील गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी MI6 ला देण्यात आलेली आहे. त्यांचं मुख्य उद्दिष्टं दहशतवाद थांबवणं, शत्रू राष्ट्रांच्या कारवायांना खीळ घालणं आणि सायबर-सुरक्षा मजबूत करणं आहे.

MI6 च्या प्रमुखांना सामान्यपणे 'सी' म्हणून संबोधलं जातं. सार्वजनिकरित्या नाव येणारे या गुप्तचर संस्थेचे ते एकमेव सदस्य असतात.

ब्लेझ मेट्रेवेली यांची कारकीर्द

47 वर्षांच्या ब्लेझ मेट्रिवेलीसध्या MI6 मध्ये महासंचालक 'Q' आहेत. त्या टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या अत्यंत महत्त्वाच्या विभागाच्या प्रमुख आहेत.

MI6 च्या गुप्तहेरांची ओळख गुप्त ठेवणं आणि शत्रूंपासून बचाव करणाऱ्यासाठी चीनच्या बायोमेट्रिक सर्व्हेलान्ससारखे नवे मार्ग शोधणं हे या विभागाचं उद्दिष्ट आहे.

"MI 5 आणि जीसीएचक्यू या गुप्तेहर संस्थांसह ब्रिटिश नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात आणि परदेशात युकेचे हितसंबंध पुढे नेण्यात MI6 महत्त्वाची भूमिका बजावते," असं ब्लेझ म्हणाल्या.

"MI6 चे धाडसी अधिकारी आणि गुप्तहेर तसंच आमचे अनेक आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्यासोबत हे काम पुढे सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

ब्लेझ मेट्रेवेली यांनी प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातून मानववंशशास्त्राचा अभ्यास केला आहे. यापूर्वी त्यांनी MI6 प्रमाणेच गुप्तहेर संस्था असलेल्या MI 5 मध्ये संचालक स्तरावरील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

ब्लेझ यांनी त्यांच्या कारकिर्दीतील बराचसा काळ मध्यपूर्व आणि युरोपात काम केलं आहे.

MI6 वर ज्याप्रमाणे परदेशातील हेरगिरीची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे MI 5 वर युकेमधील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.

2024 मध्ये त्यांना ब्रिटिश परराष्ट्र धोरणात दिलेल्या सेवेसाठी 'कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकल अँड सेंट जॉर्ज' (सीएमजी) या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

डिसेंबर 2021 मध्ये 'टेलिग्राफ'शी बोलताना ब्लेझ यांनी म्हटलं होतं की, युकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला खरोखरंच खूप वेगवेगळ्या स्वरुपाचे धोके आहेत. त्यावेळेस ब्लेझ एमआय5 मध्ये 'डायरेक्टर के' या टोपणनावानं काम करत होत्या.

त्या म्हणाल्या होत्या, "आम्ही जे धोके प्रामुख्यानं पाहत आहोत, त्यामध्ये सरकारचं रक्षण करणं, राष्ट्रीय गुपितं सुरक्षित ठेवणं, आमच्या लोकांचं रक्षण करणं, आमची अर्थव्यवस्था, संवेदनशील तंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या ज्ञानाचं रक्षण करणं यांचा समावेश आहे."

त्या पुढे म्हणाल्या होत्या की, "रशियन सरकारकडून केल्या जाणाऱ्या कारवाया यांचा धोका अजूनही आहे चीनही जगाला बदलू पाहतो आहे आणि त्यामुळे युकेला संधी आणि धोके आहेत."

'सी' काय करतात?

  • 'सी' एमआय6 चे प्रमुख असतात. अधिकृतपणे त्याला सीक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस (गुप्तहेर संस्था) म्हणून ओळखलं जातं आणि ते थेट परराष्ट्र सचिवांना रिपोर्टिंग करतात.
  • सी इतर विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह संयुक्त गुप्तहेर समितीचेदेखील सदस्य असतात. ते गोपनीय अहवाल मिळवतात, चालू परिस्थितीचं विश्लेषण करतात आणि पंतप्रधानांना सल्ला देतात.
  • 'सी' म्हणजे चीफ किंवा प्रमुख असं समजण्याची चूक नेहमी केली जाते. मात्र तसं नाही. ब्रिटनच्या पहिल्या गुप्तहेर संस्थेला सीक्रेट सर्व्हिस ब्युरो असं म्हटलं जायचं. त्याची स्थापना 1900 च्या दशकात झाली होती. त्याचे प्रमुख रॉयल नेव्ही अधिकारी कॅप्टन मॅन्सफिल्ड कमिंग होते. ते नेहमीच सही करताना 'सी' अक्षरावर करायचे. त्यातून हे कोडनेम किंवा गुप्तनाव पडलं आणि ते अजूनही आहे.
  • कॅप्टन कमिंग हिरव्या शाईनं लिहायचे. आजदेखील MI 6चे प्रमुख हे व्हाईटहॉलमधील एकमेव व्यक्ती आहेत, जे हिरव्या शाईनं लिहितात. युकेमध्ये व्हाईटहॉल म्हणजे लंडनमधील असा परिसर जिथे अनेक सरकारी विभाग आणि मंत्रालयं आहेत.
  • सी त्यांच्या गुप्तहेरांना 'हत्या करण्याची परवानगी' देऊ शकतात का? तर नाही. मात्र अशी परवानगी परराष्ट्र सचिव देऊ शकतात. इंटेलिजन्स सर्व्हिसेस ॲक्ट 1994 च्या कलम 7 अंतर्गत, एमआय6 च्या गुप्तहेराला अशा कारवाया करण्याची अधिकृत परवानगी दिली जाऊ शकते, ज्या एऱ्हवी बेकायदेशीर असतील. यात प्राणघातक शक्तीचा वापर करण्याचाही समावेश आहे. मात्र ती एक प्रदीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

नव्या युगात MI6 ची भूमिका

ब्लेझ ज्या संस्थेचे (MI6) नेतृत्व करणार आहेत, त्या संस्थेला सध्या अभूतपूर्व आणि अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे.

भौगोलिकदृष्या, ही आव्हानं प्रामुख्यानं रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरियाकडून आहेत. युके आणि पाश्चात्य देशांच्या जगभरातील हितसंबंधांना कमकुवत करण्यासाठी हे चारही देश एकमेकांना अतिशय जवळून सहकार्य करतात.

त्याचबरोबर MI6 समोर तांत्रिक आव्हानंदेखील आहेत.

MI 6 ब्रिटनच्या शत्रूंकडून गुप्त माहिती हस्तगत करण्यासाठी मनुष्यबळाची म्हणजे गुप्तहेरांची भरती करते. यात शत्रू राष्ट्रं आणि अल-कायदासारख्या संघटना या दोघांचा समावेश आहे.

डिजिटल क्षेत्रात वेगानं होत असलेल्या नाविन्यपूर्ण बदलांच्या काळात ऑनलाइन स्वरुपात आणि अंतराळातून प्रचंड प्रमाणात गुप्त माहिती गोळा केली जात असताना, शत्रूंच्या पुढे राहण्यासाठी आणि प्रासंगिक राहण्यासाठी MI 6 ला वेगानं पावलं टाकावी लागत आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात, सीआयए(अमेरिकेची गुप्तहेर संस्था) प्रमुख विलियम बर्न्स यांच्यासह MI 6 चे मावळते प्रमुख सर रिचर्ड यांनी इशारा दिला होता की जग, "शीत युद्धानंतर कधीही न पाहिलेल्या धोक्याला सामोरं जातं आहे."

फायनान्शियल टाइम्समध्ये लिहिताना या दोघांनी (बर्न्स आणि रिचर्ड) म्हटलं होतं की, युक्रेन युद्धाच्या पलीकडे जात रशियन गुप्तचर यंत्रणेनं युरोपमध्ये बेधडकपणे चालवलेल्या विध्वंसक मोहिमेला उधळून लावण्यासाठी या दोन्ही गुप्तहेर संस्था एकत्रितपणे काम करत आहेत.

सर रिचर्ड आणि बर्न्स यांनी पुढे म्हटलं होतं की, हेरगिरी आणि भूराजकीय आव्हानाचा विचार करता चीनचा उदय हे या शतकातील सर्वात प्रमुख आव्हान आहे.

त्यांनी असंही म्हटलं होतं की मध्यपूर्वेत शांतता राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी त्यांनी 'प्रचंड' प्रयत्न केले आहेत.

'ब्लेझ अत्यंत निपुण गुप्तहेर अधिकारी'

सर रिचर्ड या वर्षीच्या अखेरीपर्यंत निवृत्त होतील. ते पाच वर्षांपासून ही जबाबदारी सांभाळत होते. रविवारी (15 जून) ते म्हणाले की, त्यांच्या सहकारी ब्लेझ यांच्या ऐतिहासिक नियुक्तीने त्यांना अतिशय आनंद झाला आहे.

"ब्लेझ या अत्यंत निपुण, कुशल गुप्तहेर अधिकारी आहेत. त्यांच्यात नेतृत्वगुण आहेत. तंत्रज्ञानासंदर्भातील त्या आमच्या सर्वात महत्त्वाच्या अधिकारी आहेत," असं ते म्हणाले.

सर रिचर्ड पुढे म्हणाले, "MI6 च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे."

MI 6 च्या नव्या प्रमुख म्हणून ब्लेझ युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांना रिपोर्टिंग करतील.

डेव्हिड लॅमी म्हणाले की MI6 च्या प्रमुख म्हणून त्या 'आदर्श' उमेदवार आहेत.

ते म्हणाले, "गेल्या वर्षभरात मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. आमच्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि ब्रिटिश जनतेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो."

सर किएर यांनीदेखील सर रिचर्ड यांच्या 'समर्पित सेवे'साठी त्यांचे आभार मानले.

"ब्लेझ देशाचं रक्षण करण्यासाठी आणि आमच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं उत्कृष्ट नेतृत्व देत राहतील," असं ते पुढे म्हणाले.

(होली कोल यांचं अतिरिक्त वार्तांकन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.