You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स आणि मद्यपानाशी संबंधित गुन्ह्यांसाठी जोडप्याला 140 फटक्यांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
- Author, हिदायतुल्लाह, बीबीसी इंडोनेशियन आणि कोह इव्ह
- वाचन वेळ: 2 मिनिटे
इंडोनेशियातील एका जोडप्याला छडीनं 140 फटके देण्याची शिक्षा देण्यात आली. विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल आणि मद्यपान केल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आली. या दोन्ही कृती शरिया किंवा इस्लामिक धार्मिक कायद्याचं उल्लंघन करतात, असं यावेळी सांगण्यात आलं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील आचेह प्रांतात सार्वजनिकरित्या ही शिक्षा देण्यात आली. यात आतापर्यंतचे सर्वाधिक फटके देण्यात आले. ही शिक्षा देण्यात आलेली 21 वर्षांची महिला बेशुद्ध पडली.
या शिक्षेची अंमलबजावणी करताना 3 महिला अधिकाऱ्यांनी आळीपाळीनं वेताच्या छडीनं या महिलेला फटके दिले. त्यावेळेस ही महिला रडत होती. बेशुद्ध होऊन ती कोसळल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी तिला शिक्षेच्या ठिकाणाहून उचलून रुग्णवाहिकेत नेलं.
फटक्यांची शिक्षा देण्याची पद्धत कुठे आहे?
गुरुवारी (29 जानेवारी) या जोडप्याला इतर 4 जणांसोबत छडीचे फटके देण्यात आले. यात इस्लामिक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. या सर्वांना शरीया कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं.
इंडोनेशियातील आचेह प्रांत हा धार्मिकदृष्ट्या पुराणमतवादी आहे. या प्रांतात इस्लामिक कायदे मोडल्यावर किंवा त्यांचं उल्लंघन केल्यावर छडीनं फटके देणं ही एक सामान्य शिक्षा आहे. अर्थात ही शिक्षा क्रूर असल्याचं म्हणत मानवाधिकार गटांकडून त्यावर दीर्घकाळापासून टीका होते आहे.
आचेहच्या इस्लामिक फौजदारी संहितेनुसार, विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास छडीच्या 100 फटक्यांची शिक्षा होते. तर मद्यपान केल्यास 40 फटक्यांची शिक्षा होते.
अझहरुल हुस्ना, 'कॉन्ट्रास' या इंडोनेशियन मानवाधिकार संघटनेचे आचेहमधील समन्वयक आहेत. ते म्हणतात की छडीनं फटके देण्याच्या शिक्षांचं योग्य नियमन केलं जात नाही.
ते पुढे म्हणाले की शिक्षा झालेल्या लोकांना नंतर आधार देण्यासाठी अशा शिक्षांच्या संदर्भातील नियमांमध्ये 'सुधारणा' झाली पाहिजे.
पोलीस अधिकाऱ्याला फटक्यांची शिक्षा आणि नोकरीतून करणार बडतर्फ
इस्लामिक पोलीस दलातील त्या अधिकाऱ्याला 23 वेळा छडीनं फटके देण्यात आले. त्याच्या महिला साथीदारालाही तितकेच फटके देण्यात आले. एका खासगी ठिकाणी ते एकमेकांच्या जवळ असलेल्या स्थितीत सापडल्यानं ही शिक्षा देण्यात आली.
त्या महिलेच्या घरात हा अधिकारी तिच्यासोबत एकटा सापडला होता. या अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असं मुहम्मद रिझाल यांनी बीबीसीला सांगितलं. ते आचेहच्या इस्लामिक पोलीस दलाचे प्रमुख आहेत.
शरिया कायदा लागू करणारा, आचेह हा मुस्लीम-बहुल इंडोनेशियातील एकमेव प्रांत आहे. अनेक गुन्ह्यांबद्दल या प्रांतात सार्वजनिकरित्या फटके देण्याची शिक्षा दिली जाते.
अस्तुदेस्त्र अजेंगरास्त्री यांचं अतिरिक्त वार्तांकन.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)