19 वर्षांत 36 पट वाढ, आयपीएल टीमची किंमत इतकी कशी वाढली? 19 वर्षांचा प्रवास काय सांगतो?

फोटो स्रोत, Vishal Bhatnagar/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, 2 एप्रिल 2019 च्या या फोटोमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे दिसत आहेत.
    • Author, मिर्झा एबी बेग
    • Role, बीबीसी उर्दू, दिल्ली
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत लीग आयपीएलमध्ये प्रथम विजेता ठरलेला राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि विद्यमान चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) हे दोन्ही संघ विक्रमी किमतीत विकले गेले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि त्याची प्रशासकीय संस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु भारतीय माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या सुरू आहेत.

आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखाली आरसीबी खरेदी करणाऱ्या कन्सोर्टियमनुसार, हा करार सुमारे 16 हजार 500 कोटी रुपयांमध्ये (1.78 अब्ज डॉलर) झाला.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अमेरिकन उद्योगपती काल सोमाणींच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने राजस्थान रॉयल्स खरेदी करण्यासाठी सुमारे 15 हजार 300 कोटी रुपयांची (1.63 अब्ज डॉलर) यशस्वी बोली लावली.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

अविश्वसनीय वाढः 450 कोटींची गुंतवणूक, मूल्य झाले 16 हजार 500 कोटी

आरसीबी खरेदी करणाऱ्या आदित्य बिर्ला समूहाच्या वेबसाइटनुसार, "आदित्य बिर्ला समूह, टाइम्स ऑफ इंडिया समूह, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोनच्या प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी बीएक्सपीई (ब्लॅकस्टोन) यांनी आरसीबीचा 100 टक्के मालकी हक्क मिळवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे."

या करारानुसार, पुरूष आयपीएल फ्रँचायझी आणि महिला युनायटेड लीगसाठी ब्रिटिश कंपनी डियाजियो पीएलसीची सहाय्यक कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून (यूएसएल) 100 टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

फोटो स्रोत, Pankaj Nangia/Getty Images

फोटो कॅप्शन, आरसीबी टीम आयपीएल 2025 च्या हंगामाची विजेती ठरली आहे.

दुसरीकडे, आरसीबीचे माजी मालक आणि अब्जाधीश उद्योगपती विजय मल्ल्या (ज्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे आणि अनेक वर्षांपासून त्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे) यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर या कराराबद्दल नवीन मालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी म्हटलं, "रॉयल चॅलेंज ब्रँड तयार करणं माझं एक स्वप्न होतं आणि त्याच विचाराने मी फ्रँचायझीचे नाव आरसीबी ठेवलं. माझ्या 450 कोटींच्या गुंतवणुकीला 16 हजार 500 कोटींपर्यंत वाढताना पाहून मला खूप आनंद झाला."

"आरसीबी नेहमी माझ्या डीएनएचा एक भाग असेल. त्यात सुंदर आठवणीही आहेत. यामध्ये युवा विराट कोहलीच्या निवडीचा देखील समावेश आहे, जो आता जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो."

विजय मल्ल्यानुसार पाहिलं तर, 19 वर्षांत आरसीबीचं मूल्य 36 पटीने वाढलं आहे.

जेव्हा आम्ही याबाबत बीसीसीआयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या कार्यालयाकडून उत्तर मिळालं की, संबंधित दस्तऐवज त्यांच्याकडे येताच ते याबाबत माहिती देतील.

तत्पूर्वी भारतात आयपीएलची सुरुवात करणारे आणि आयपीएलचे पहिले अध्यक्ष ललित मोदी (ज्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे) यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

राजस्थान रॉयल्सची विक्री

दुसरीकडे, 'द हिंदू' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, अमेरिकेत राहणारे उद्योगपती काल सोमाणींच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने राजस्थान रॉयल्ससाठी बोली जिंकली आहे.

या वृत्तानुसार, हा गट बिर्ला समूहाच्या पाठिंब्याने टाइम्स ऑफ इंडिया समूहाविरोधात बोली लावत होता.

असं मानलं जातं की, त्यांनी सुमारे 1.63 अब्ज डॉलरची (सुमारे 15,300 कोटी रुपये) बोली लावली आणि मालकी हक्क मिळवला आहे. परंतु, मालकीतील हा बदल जूनमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील उद्योगपती मनोज बडाले यांनी जयपूरची टीम राजस्थान रॉयल्स 67 मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये (सुमारे 620 कोटी रुपये) खरेदी केली होती. म्हणजे 19 वर्षांत टीमची किंमत सुमारे 24 पटीने वाढली आहे.

फोटो स्रोत, Pankaj Nangia/Getty Image

फोटो कॅप्शन, आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या एका सामन्यात राजस्थान रॉयल्सचे खेळाडू.

महत्त्वाचं म्हणजे, सोमाणी हे पूर्वीपासूनच राजस्थान रॉयल्सच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांना ॲड-टेक, डेटा प्रायव्हसी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीशी संबंधित व्यवसायात स्वारस्य आहे.

त्यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर राजस्थान रॉयल्समध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आहे.

या कन्सोर्टियमला वॉलमार्ट कुटुंबातील रॉब वॉल्टन आणि डेट्रॉईट लायन्समध्ये सर्वात मोठे भागधारक असलेल्या हॅम्प कुटुंबाचेही समर्थन मिळाले आहे.

फोर्ड कुटुंबाशी संबंधित शीला फोर्ड हॅम्प देखील या समूहाशी जोडले गेलेल्या आहेत. फोर्ड कुटुंबाकडे फोर्ड मोटर्स कंपनीत मोठा हिस्सा आहे.

सोमाणी हे मोटर सिटी गोल्फ क्लबचे सह-मालक आहेत. यावरून त्यांचा खेळाशी असलेला संबंध स्पष्ट होतो. त्याचबरोबर ते टीएमआरडब्ल्यू स्पोर्ट्स आणि टीजीएल गोल्फ लीगसारख्या प्रोजेक्ट्सच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणुकीतही सहभागी होते.

शेन वॉर्नचा हिस्सा

दरम्यान, भारतीय माध्यमांमध्ये असंही वृत्त आहे की, ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी होण्यासाठी वार्षिक फी कमी ठेवली होती. पण त्याने वार्षिक 0.75 टक्के शेअरची मागणी केली होती.

फिरकीच्या या जादुगाराने आपली खरी व्यावसायिक क्षमता आरआर सोबतच्या करारात दाखवली होती, असं राजस्थान रॉयल्सच्या विक्रीनंतर स्थानिक माध्यमांमध्ये बोललं जात आहे.

तो 4 हंगाम या टीमसोबत होता आणि त्या माध्यमातून त्याला 3 टक्के हिस्सा मिळाला, जो 460 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही रक्कम त्याच्या वारसांना मिळेल. कारण 2022 मध्ये त्याचं निधन झालं.

फोटो स्रोत, Vishal Bhatnagar/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, शेन वॉर्न आयपीएलच्या चार हंगामापर्यंत राजस्थान रॉयल्ससोबत होता.

काही माध्यमांनी त्याच्या कमाईची तुलना 18 हंगाम खेळणारे विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या कमाईशी केली आहे. त्यांची कमाई अनुक्रमे 230 कोटी, 211 कोटी आणि 192 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असं सांगितलं जातं.

परंतु, राजस्थान रॉयल्स किंवा बीसीसीआयने शेन वॉर्नसोबतच्या अशा कोणत्याही कराराला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

आयपीएलचे एकूण मूल्य

या खरेदीनंतर दिसून येतं की, खेळांच्या जगात इंडियन प्रीमियर लीगचे किती महत्त्व आहे आणि त्यातून किती नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट आणि 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, मागील वर्षापर्यंत आयपीएलची एकूण किंमत अंदाजे 18.5 अब्ज डॉलर (सुमारे 1 लाख 74 हजार 140 कोटी 50 लाख रुपये) होती, तर त्याचा महसूल अंदाजे 9.5 अब्ज डॉलर (89 हजार 423 कोटी) इतका होता.

आयपीएलची किंमत दरवर्षी सुमारे 13 टक्क्यांनी वाढत आहे, असं 'द इकॉनॉमिक टाइम्स'ने इन्व्हेस्टमेंट बँक 'हूलिहान लोकी'च्या रिपोर्टनुसार म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Pankaj Nangia/Getty Images

फोटो कॅप्शन, आयपीएल ही क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत लीग आहे. हा फोटो 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वीचा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचा आहे.

रॉयटर्सच्या या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू (मूल्य) 3.9 अब्ज डॉलर (सुमारे 32 हजार 370 कोटी रुपये) आहे. यामुळे ती प्रत्येक सामन्याच्या दृष्टीने जगातील दुसरी सर्वात महागडी लीग ठरते. फक्त एनएफएल (नॅशनल फुटबॉल लीग) या लीगच्या वर आहे.

दुसरीकडे, आयपीएलच्या कमाईचा सर्वात मोठा भाग त्याच्या मीडिया राइट्समधून येतो. 2023 ते 2027 पर्यंत हे राइट्स 6.2 अब्ज डॉलरमध्ये (सुमारे 51 हजार 500 कोटी रुपये) विकले गेले आहेत.

28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 19 व्या हंगामात 10 संघ भाग घेत आहेत आणि एकूण 84 सामने होणार आहेत, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत.

प्रत्येक टीम दुसऱ्या टीमसोबत दोन-दोन सामने खेळेल.

धोनी मैदानात दिसेल का?

सनरायझर्स हैदराबादने आपल्या टीममध्ये सर्वात जास्त बदल केले आहेत, तर ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपये मोजले आहेत.

विदेशी खेळाडूंमध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सने कॅमेरून ग्रीनला 25 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. या टीमने श्रीलंकेचा खेळाडू मथिशा पथिरानाला 18 कोटी रुपयांत विकत घेतलं आहे.

अनकॅप्ड खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) प्रशांत वीर आणि कार्तिक शर्माला प्रत्येकी 14 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ही आतापर्यंतची कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूसाठी लावलेली सर्वात मोठी बोली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंह धोनी या स्पर्धेत काय भूमिका बजावेल, हे अद्याप स्पष्ट नाही.

भारताचा माजी कर्णधार आणि सीएसकेचा दीर्घकाळ कर्णधार राहिलेला महेंद्रसिंह धोनी या टूर्नामेंटमध्ये काय भूमिका निभावेल, हे अजून स्पष्ट नाही. कारण त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तरीही, धोनी मैदानात दिसण्याची अपेक्षा आहे.

धोनी 44 वर्षांचा आहे आणि आयपीएलमध्ये सहभागी होणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तर बिहारचा वैभव सूर्यवंशी 15 वर्षांचा असून तो सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने मागील वर्षी 14 वर्षे 23 दिवसाचा असताना आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)