You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋतुनुसार बदलते स्पर्मची प्रवासाची क्षमता, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबाबत संशोधनातून काय समजलं?
- Author, जो मॅकफॅडन
- Role, आरोग्य प्रतिनिधी
- वाचन वेळ: 2 मिनिटे
एका नवीन अभ्यासानुसार, स्पर्म म्हणजे वीर्याची गुणवत्ता उन्हाळ्यात सर्वाधिक आणि हिवाळ्यात सर्वात कमी असते.
ब्रिटिश, कॅनडा आणि डेन्मार्कमधील संशोधकांनी डेन्मार्क आणि फ्लोरिडातील 18 ते 45 वयोगटातील 15 हजार 581 पुरुषांच्या स्पर्मचे नमुने तपासले, त्याचं विश्लेषण केलं.
त्यांच्या अभ्यासात दिसून आलं की, जून आणि जुलैमध्ये वीर्याची पोहण्याची म्हणजेच त्याच्या प्रवासाची क्षमता सर्वाधिक होती, हे जगाच्या दोन्ही भागांमध्ये सारखंच होते.
हे हंगामी पॅटर्न्स समजल्यास प्रजनन उपचार अधिक प्रभावी बनवता येतील, कारण उपचार आणि तपासणीचा वेळ योग्य ठरवून गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं.
स्पर्मच्या प्रवासाची क्षमता हंगामानुसार बदलते
हा अभ्यास रिप्रॉडक्टिव्ह बायोलॉजी अँड एंडोक्राइनोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यातून असं दिसून येतं की, स्पर्मची प्रवास करण्याची क्षमता हवामानावर नाही तर हंगामानुसार बदलते.
फ्लोरिडा वर्षभर उबदार असतानाही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये स्पर्मची पातळी सर्वात कमी होती.
पण शास्त्रज्ञांना आढळून आलं की, हंगाम बदलला तरी वीर्यातील शुक्राणूंची एकूण संख्या किंवा वीर्याचं प्रमाण (जे स्खलनादरम्यान बाहेर येतं) बदलत नाही.
याचा अर्थ, स्पर्मची पोहण्याची किंवा प्रवासाची क्षमता हंगामानुसार बदलते, पण वर्षाच्या कोणत्याही काळात तयार होणाऱ्या शुक्राणूंची संख्या बदलत नाही.
या अभ्यासातून असं सूचित होतं की, फक्त तापमानामुळे नाही तर हंगामाच्या बदलामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर जास्त परिणाम होऊ शकतो.
सामान्यतः वीर्य तयार होणाऱ्या अंडकोषाचे तापमान शरीराच्या 37 अंशापेक्षा 2 ते 4 अंश कमी असावं.
जर तापमान यापेक्षा जास्त किंवा कमी झाले, तर स्पर्मची पोहण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
प्रजनन परिणाम सुधारण्यास मोठी मदत
अभ्यासाचे सह-लेखक आणि मँचेस्टर विद्यापीठाचे प्राध्यापक ॲलन पेसी म्हणाले, "दोन वेगळ्या हवामानातही हंगामी पॅटर्न किती समान होता, हे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं."
"फ्लोरिडा सारख्या उबदार प्रदेशातही, वीर्याची पोहण्याची क्षमता उन्हाळ्यात जास्त आणि हिवाळ्यात कमी झाली, याचा अर्थ फक्त बाह्य तापमानामुळे हे बदल होत नाहीत."
त्यांनी पुढे सांगितलं, "हा अभ्यास सांगतो की, वीर्याची गुणवत्ता तपासताना हंगाम किंवा ऋतू लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तसेच, उबदार प्रदेशातही वीर्याची पोहण्याची क्षमता ऋतूनुसार बदलते.
हे निष्कर्ष पुरुषांच्या प्रजनन आरोग्याबद्दल आमची समज वाढवतात आणि प्रजनन परिणाम सुधारण्यास मदत करू शकतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)