किरीट सोमय्यांचा विरोध करून महाविकास आघाडीने त्यांना राजकीयदृष्ट्या मोठं केलंय का?

किरीट सोमय्या, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किरीट सोमय्या
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

गेल्या दोन दिवसांमध्ये सातत्याने एकच नाव मराठी वृत्तवाहिन्यांवर झळकताना दिसतंय, ते म्हणजे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं. आता अनिल परब यांनी त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा ठोकला आहे.

मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या किरीट सोमय्यांचीच जिकडे तिकडे चर्चा झाली. त्यांच्या निवासस्थानाजवळ शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याचं सर्वांनी पाहिलं, त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या.

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरमध्ये जाण्यापासून रोखलं. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना कोल्हापूर हद्दीत येण्यास मनाई केली.

तशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना मुंबईत रोखलं होतं. त्यानंतरही ते महालक्ष्मी एक्सप्रेसने पुढे निघाल्यानंतर सोमय्या यांना कराडमध्ये थांबवण्यात आलं.

या सगळ्या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं. पण किरीट सोमय्या यांच्यामागे फौजफाटा लावून महाविकास आघाडी सरकारने काय सिद्ध केलं? सोमय्या यांना यामुळे अधिक प्रसिद्धी मिळण्यास फायदा झाला का? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा आढावा....

100 कोटींचा दावा

दरम्यान या सगळ्या घडामोडी सुरू असताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरिट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानिचा दावा ठोकला आहे.

"किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचं सूचित केलं होतं. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात माननिय उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे," अशी माहिती परब यांनी ट्वीट करून दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नेमकं प्रकरण काय?

14 सप्टेंबरला किरीट सोमय्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप केला आहे.

त्याचबरोबर 127 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खोटे असून किरीट सोमय्या यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं. या आरोप प्रत्यारोपांनंतर कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ समर्थकांकडून किरीट सोमय्यांचा विविध प्रकारची आंदोलनं करून निषेध करण्यात आला.

19 सप्टेंबरला किरीट सोमय्या याबाबतीतली अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापूरला जायला निघाले. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारी नोटीस काढली.

ती नोटीस घेऊन पोलिसांनी किरीट सोमय्या यांना मुलुंडच्या घरात स्थानबध्द केलं. तरीही पोलीसांना न जुमानता सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले. पहाटेच्या सुमारास किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखलं.

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि हसन मुश्रीफांवर नव्या घोटाळ्याचे आरोप केले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, "मला सहा तास कोंडून ठेवण्यात आले मी हात जोडून विनंती केली की, मला ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो. पण तरीही मला रोखलं गेलं. सीएसटीएम स्टेशनवरती मला धक्काबुक्कीही करण्यात आली. मुंबईबाहेर मला जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वीकारावी."

पोलिसांनी एवढा फौजफाटा का वापरला?

किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी इतका मोठा फौजफाटा का वापरण्यात आला? याबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "कालची कोल्हापूरमधली परिस्थिती बघता, जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं की, दोन्ही पक्ष जर समोरासमोर आले तर संघर्ष होऊ झाला असता."

किरीट सोमय्या, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किरीट सोमय्या

हा संघर्ष रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या हद्दीत येण्यापासून सोमय्या यांना प्रतिबंध करणारी नोटीस काढली. त्याची अंमलबजावणी म्हणून पोलीसांनी त्यांना रोखलं. तरीही ते जायला निघाले म्हणून त्यांना हद्दीबाहेर थांबवलं. त्यांना अटक केली नाही किंवा ताब्यात घेतलं नाही.

त्यांना विश्रामगृहावर नेण्यात आलं. पुढे मुख्यमंत्र्यांना याची माहिती होती की नाही याबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, "हा निर्णय गृहमंत्र्यालयाने घेतला. मुख्यमंत्र्यांना अश्या परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी माहिती देत असतात पण याबाबत त्यांना माहिती दिली की नाही हे मला माहिती नाही."

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत काहीही कल्पना नसल्याचं विधान केलं होतं. यामुळे याला वेगळं राजकीय वळण लागलं.

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "किरीट सोमय्यांचे आरोप हे खोटे आहेत असं नेते म्हणत असतील तर एवढा फौजफाटा का वापरला गेला? जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी करण्याइतकी खरंच वेळ आली होती का? हे प्रश्न उपस्थित होतात. याची ठोस उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतला विसंवाद समोर आला. "

सरकारच्या भूमिकेमुळे सोमय्यांना फायदा?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व लक्ष किरीट सोमय्यांना रोखल्यामुळे त्यांच्याकडे गेलं. किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे मला रोखण्याचे आदेश आहेत असा दावा केला.

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "सोमय्या प्रकरणात सरकारची भूमिका संभ्रमाची दिसली. जर त्यांना कोल्हापूरमध्ये जाऊ द्यायचं नव्हतं तर घरीच का स्थानबद्ध केलं. जर घरीच स्थानबद्ध करायचं होतं, मग त्यांना सोडलं का? पुन्हा स्टेशनवर अडवण्याचा प्रयत्न का केला. हा सगळा संभ्रम दिसून आला. त्याचा फायदा निश्चितपणे किरीट सोमय्या यांना झाला. सोमय्यांच्या आरोपांना या प्रकारामुळे गांभीर्य प्राप्त झाले."

किरीट सोमय्या, भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, किरीट सोमय्या

काही दिवसांपासून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारमध्ये दिसून येते. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

त्यानंतर नारायण राणेंनी पुन्हा थेट टीका करणं टाळलं. अशीच रणनीती किरीट सोमय्यांच्या बाबतीतही वापरली गेली का?

याबाबत बोलताना लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "ज्यांचं सरकार असतं त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेचा वापर केला जातो."

"जर विरोधक खूप आक्रमकपणे टीका करत असतील आणि सरकार शांत असेल तरीही ते आरोप खरे आहेत असा संदेश सामान्य जनतेत जाऊ शकतो. यासाठी महाविकास आघाडी सरकार आक्रमक होत असावं. पण आताच्या प्रकरणात किरीट सोमय्या यांना माध्यमांमधून अधिक प्रसिद्धी मिळाली हे मात्र खरं आहे. त्यात सोमय्या सरस ठरले," असं प्रधान सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)