कोरोना महाराष्ट्र : गणेशोत्सवामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली का ?

फोटो स्रोत, ANI

  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दर 24 तासाला रेकॉर्डब्रेक आकडे समोर येत आहेत.

राज्यात दररोज 22,500 - 23,000 नवीन रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रात 6 सप्टेंबरपर्यंत कोरोनाचे 2 लाख 35 हजार 857 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.

गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येने हा उच्चांक गाठला आहे. ऑगस्टमध्ये स्थिर झालेले कोरोनाचे आकडे अचानक एवढे का वाढू लागले? यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? राज्य सरकारचा कारभार, प्रशासन, अनलॉक, गणेशोत्सव की इतर काही? याचा आढावा आपण घेणार आहोत.

गणेशोत्सवानंतर कोरोनाचे आकडे वाढले यात किती तथ्य?

महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. गंभीर बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत आहे.

सप्टेंबरमध्ये अनलॉकचा चौथ्या टप्पा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आला. राज्य सरकारच्या नियमावलीनुसारही अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले.

दुकानं, हॉटेल्स सुरू करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवली, राज्यांतर्गत रेल्वे प्रवासही सुरू झाला आणि ईपासची अट रद्द करण्यात आली.

चार महिन्यांपासून घरी बसलेला एक मोठा वर्ग घराबाहेर पडू लागला.

शिवाय, 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे दहा दिवस राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. राज्य सरकारकडून यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात सर्व ठिकाणी त्याचे पालन झालेले नाही.

गणेशोत्सवात खरेदासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. लोक घराबाहेर पडले तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढली.

फोटो स्रोत, Getty Images

राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 दिवसातली आकडेवारी पाहिली तर रुग्णसंख्या कशी वाढत गेली याचा अंदाज येतो.

  • 24 ऑगस्टला महाराष्ट्रात दिवसभराची नवीन रुग्णसंख्या ही 11,015 इतकी होती. तर 6 सप्टेंबरला हीच संख्या 23,350 इथपर्यंत पोहचली.
  • 24 ऑगस्टला 24 तासांत होणाऱ्या मृत्यूचा आकडा 212 इतका होता जो आता 328 पर्यंत पोहचला आहे.
  • तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 14, 219 वरुन ढासळत 7,826 इथपर्यंत घटली आहे.
  • राज्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 61,383 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जवळपास 24 हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्याचे डॉक्टर आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "जे लोक पाच महिने घरी बसले ते अनलॉक आणि गणेशोत्सवात मोठ्या संख्येने बाहेर पडले. अनेक जण गावी गेले. लोकांचा प्रवास वाढला. याशिवाय, जे लोक रोज बाहेर पडत आहेत ते नियम पाळत नाहीत. मास्क घालत नाहीत. घोळक्याने लोक उभे असताना दिसतात. यामुळे समूह संसर्ग झालेला दिसतो."

पण राज्याचे आरोग्य विभाग याच्याशी पूर्ण सहमत नाही. आरोग्य विभागाचे कोरोना सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यानुसार, "अनलॉक, गणेशोत्सव यामुळे काही प्रमाणात रुग्ण वाढले असले तरी त्यामागे ही प्रमुख कारणे नाहीत असे त्यांना वाटते."

ते सांगतात, "सप्टेंबर महिन्यात आम्ही कोरोनाच्या टेस्ट वाढवल्या आहेत. 4, 5 आणि 6 सप्टेंबरला दर दिवशी राज्यात कोरोनाच्या 90 हजाराहून अधिक टेस्ट झाल्या आहेत. ही संख्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 75-80 हजार इतकी होती."

"तसेच रुग्णसंख्येचा आकडा वाढलेला दिसत असला तरी प्रत्यक्षात टेस्टिंगच्या तुलनेने सुरुवातीपासूनच 18-20 टक्के इतकी वाढ होत आहे," असंही आवटे म्हणाले.

राज्यात 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात सरासरी मृत्यूदर 1.74 टक्के इतका आहे.

शहरांमध्ये नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या कशी वाढली?

मुंबईत गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 20 टक्क्यांनी वाढलीय. 24 ऑगस्टला मुंबईत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 18,267 इतकी होती. दोन आठवड्यांनी हाच आकडा आता 24 हजारांपर्यंत पोहचला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यात 24 ऑगस्टला 43,065 इतके ॲक्टिव्ह रुग्ण होते आता दोन आठवड्यांनी हा आकडा 61,383 इतका आहे.

नाशिकमध्येही 24 ऑगस्टला रुग्णसंख्या 500 वरुन 29 ऑगस्टपर्यंत 900 एवढी झाली.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या वजा करून आणि एकूण कोरोना रुग्णांपैकी किती जणांचा मृत्यू झाला यावरुन अॅक्टिव्ह केसेसची आकडेवारी काढली जाते.

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या स्थिर झाली होती पण गेल्या दोन आठवड्यांपासून ग्राफ वाढत चालला आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार, "कोरोना टेस्ट वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. मे आणि जूनमध्ये दर 24 तासाला जवळपास 4000 टेस्ट होत होत्या. ऑगस्टमध्ये कोरोना टेस्ट वाढवून ती 7 हजारापर्यंत पोहचली. तर सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत दर दिवशी जवळपास 10,000 टेस्ट केल्या जात आहेत."

निर्बंध शिथिल झाल्यावर संख्या वाढत गेली का?

9 मार्चला महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली. एप्रिलपर्यंत कोरोनाचे महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केले. मार्चमध्ये लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर सबंध महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले होते.

प्रशासनाची पकड मजबूत होत गेली आणि एक मोठी संपर्क यंत्रणा स्थानिक प्रशासनाकडून उभी करण्यात आली.

पण जसजसे निर्बंध शिथिल झाले तसे लोकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आणि प्रशासनाची मजबूत पकड ढासळताना दिसू लागली. या सगळ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

'या' कारणांमुळे महाराष्ट्रात वाढला संसर्ग -

राज्यात कोरोनाची संख्या सातत्याने वाढण्याचे काय कारण आहे याबाबत आम्ही डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांना विचारले. त्यांनी ही कारणं सांगितलं.

  • अनलॉक - अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत राज्यात दुकानं, हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठा खुल्या झाल्या. त्यामुळे प्रवास वाढला, दुकानांमध्ये ग्राहक जाऊ लागले, खरेदी होऊ लागली.
  • गणेशोत्सव - दहा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक पूर्वीपेक्षा जास्त
  • रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचणीत दिरंगाई - सुरुवातीच्या काळात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला की त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती प्रशासन घेत होते. त्यांना क्वारंटाईन करून त्यांची कोरोना टेस्ट केली जात होती. पण आता या कामात खंड पडताना दिसत आहे.
  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी - डॉक्टर्स सांगतात, एखादा लक्षण नसलेला रुग्ण आमच्याकडे आला तर आम्ही त्याला संबंधित कोरोना हॉस्पिटलमध्ये पाठवतो. अशा अनेकांना हॉस्पिटलकडून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात येतो. पण त्या रुग्णाचे पुढे काय होते? त्याने क्वारंटाईन पूर्ण केले का ? कुठे प्रवास केला का ? त्याची टेस्ट निगेटिव्ह आली का ? याकडे प्रशासन आता लक्ष देत नाही आणि आम्हालाही कळवत नाही.
  • मास्क न वापरणे - महाराष्ट्रात मास्क वापरला नाही तर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही नागरिक मास्क तोंडाला लावत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
  • सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करणे - पावसाळा असल्याने आणि हवामानात सतत बदल होत असल्याने सर्दी,खोकला,ताप होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापैकी अनेकांना कोरोनाचीही लागण झालेली असते. पण अनेकजण असे आजार अंगावर काढतात. ते दवाखान्यात जाईपर्यंत त्यांच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झालेली असते.
  • आरटी पीसीआर टेस्ट न करणे - अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा कोरोनाची आरटी पीसीआर ही टेस्ट करणं अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही.
  • सॅनिटायझेशन न होणे - एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण आढळळा की त्या भागाचे सॅनिटायझेशन होणे गरजेचे आहे. पण याचे प्रमाणही आता कमी झाले आहे.

भारतात गेल्या पाच दिवसांपासून दररोज कोरोनाचे 75 हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. सध्या इतर कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झालेले रूग्ण नाहीत. दैनंदिन रुग्णवाढीची संख्या भारतात सर्वाधिक आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गात भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण दर 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)