You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्लामाबादमधील 'आत्मघातकी बॉम्बस्फोटा'तील सूत्रधाराबाबत पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी काय सांगितलं?
इस्लामाबादच्या इमामबाडा येथे झालेल्या स्फोटाच्या सूत्रधाराला अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी दिली.
इस्लामाबादमधील तरलाई परिसरातील इमामबाड्यात शुक्रवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी झाले.
दरम्यान, शनिवारी (7 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत नक्वी यांनी सांगितलं की, या स्फोटाचा मास्टरमाइंड आयएसआयएसशी संबंधित एक अफगाण नागरिक आहे.
शिया मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात मदत केल्याच्या संशयावरून 4 जणांना अटक करण्यात आली असून या चौघांमध्ये हल्ल्याच्या मास्टरमाइंडचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
हल्ल्याचे सर्व नियोजन आणि प्रशिक्षण अफगाणिस्तानात झाल्याचा आरोप नक्वी यांनी केला.
ते म्हणाले, "आमच्या ताब्यात असे लोक आहेत, ज्यांनी हल्लेखोराला कसे आणले आणि प्रशिक्षण कसे दिले याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे."
पाकिस्तानमधील दहशतवादाची मुळं अफगाणिस्तानात असल्याचा आरोप नक्वी यांनी केला. मात्र अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार पाकिस्तानचे हे आरोप सातत्याने फेटाळत आले आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानसह भारतावरही आरोप केले आहेत.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नक्वी यांनी आरोप केला, "अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कला भारताकडून निधी दिला जात आहे.' मात्र या दाव्यांचं समर्थन करणारे कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नाहीत."
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी निवेदन जारी करत म्हटलं की, "इस्लामाबादमधील मशिदीत झालेला बॉम्बस्फोट निषेधार्ह आहे आणि घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करतो."
"आपल्या सामाजिक समस्यांना गांभीर्याने सोडवण्याऐवजी, पाकिस्तान आपल्या देशांतर्गत समस्यांसाठी इतरांना दोषी ठरवून स्वतःचीच फसवणूक करत आहे. भारत अशा निराधार आरोपांना फेटाळून लावतो."
31 मृत्यू, शेकडो जखमी; आतापर्यंत काय घडलं?
इस्लामाबादच्या तारलाई भागातील इमामबाडा येथे झालेल्या स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला आहे तर 160 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी हा हल्ल्याला 'आत्मघातकी हल्ला' असं म्हटलं आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 15 जणांना विविध रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले आहे.
प्रशासनाच्या मते, शहरातील तीन रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींवर उपचार करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना तैनात करण्यात आलं आहे.
जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्फोटाचे ठिकाण पूर्णपणे सील करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या सूचनेनुसार, गृह राज्यमंत्री तलाल चौधरी यांनी इस्लामाबादमधील पिम्स रुग्णालयाला भेट दिली, जिथे त्यांनी जखमींची भेट घेतली.
यावेळी तलाल चौधरी यांनी सांगितलं की, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय मदत केली जाईल.
रेस्क्यू 1122 नुसार, जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे, तर इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांनी शहरात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.
तारलाई येथील इमामबारगाह खादीजातुल कुब्रा येथे हा स्फोट झाला.
गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या सूचनेनुसार, सरकार पुढील मदत आणि कारवाई करत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या निवेदनात मृतांबद्दल तीव्र दुःख आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींची त्वरित ओळख पटविण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधान शरीफ यांनी आरोग्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले.
शाहबाज शरीफ यांनी सांगितले की स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना शोधलं जाईल आणि त्यांना कठोर शिक्षा केली जाईल.
ते म्हणाले की, देशातील परिस्थिती बिघडवण्याची संधी कुणालाही आम्ही देणार नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.