'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' बनल्यानंतर काय म्हणाली स्मृती मंधाना?

वाचन वेळ: 11 मिनिटे

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही 2025 ची 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' ठरली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्मृती मंधाना म्हणाली की, "मला हा पुरस्कार दिल्याबद्दल बीबीसीचे आभार. 2025 हे वर्ष खूप खास होते. संघाच्या विजयात मी योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे."

यावर्षी या पुरस्कारासाठी पाच दावेदार होते - क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, नेमबाज सुरुची सिंग आणि धावपटू ज्योती याराजी.

बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर 2025 पुरस्कार मिळाला आहे आणि बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार पॅरा अॅथलीट प्रीती पाल हिला देण्यात आला आहे.

प्रीती पाल ही पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये ट्रॅक अँड फील्डमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय पॅरा अॅथलीट आहे.

नेमबाज अंजली भागवत यांना बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 मिळाला आहे.

'त्यांचा आवाज अधिक बुलंद केला जाईल' - रुपा झा

'कलेक्टिव्ह न्यूजरूम'च्या सीईओ रूपा झा या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी म्हणाल्या की, "आज, एकीकडे जेव्हा जग अस्वस्थ करणाऱ्या सत्यांशी सामना करतं आहे, जेव्हा फक्त प्रभावशाली पुरुषांची नावं आळवली जात आहेत, जेव्हा पीडित स्त्रिया मौन धारण करण्यास नकार देत आहेत, जेव्हा व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तेव्हा, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला अशा व्यासपीठांचं महत्त्व पुन्हा पुन्हा जाणवतं.

"कारण शोषणासमोर आणि अस्तित्व पुसून टाकण्याच्या प्रत्येक कथेसमोर, स्वातंत्र्य, सन्मान आणि जय यांच्या कथा उभ्या राहायलाच हव्यात. अशी स्थानं असायलाच हवीत जिथे महिलांना कमी लेखलं जाणार नाही, तर त्यांचा गौरव केला जाईल. जिथे त्यांना गप्प बसवलं जाणार नाही, तर त्यांचा आवाज अधिक बुलंद केला जाईल. आणि हो, हेच ISWOTYचे तत्त्व आहे."

स्मृती मंधाना ठरली '2025 ची बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर'

2025 ची 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' स्मृती मंधाना ठरली आहे. तिच्यावतीने हा पुरस्कार तिच्या आईनं स्वीकारला आहे.

या पुरस्कार सोहळ्यानिमित्तानं आपलं मनोगत स्मृतीनं पाठवलेलं होतं. तिने म्हटलंय की, "या पुरस्कारासाठी बीबीसीचे आभार. 2025 हे वर्ष खूप खास राहिलं आणि या यशात मी थोडं योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे."

प्रीती पाल ठरली '2025 ची पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर'

हा पुरस्कार स्वीकारताना प्रीती पालनं म्हटलंय की, "प्रत्येकाला आव्हानांचा सामना करावा लागतो. स्वतःवर विश्वास ठेवा. पराभव देखील आपल्याला खूप काही शिकवतो."

"बीबीसीचे खूप खूप आभार. हा पुरस्कार माझा नाही, माझ्या संपूर्ण टीमचा आहे."

क्रीडाक्षेत्र पुढे नेणं ही सर्वांची जबाबदारी - रक्षा खडसे

भारताच्या क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही या सोहळ्यास उपस्थिती लावली आहे.

त्या म्हणाल्या की, "आज इथे येऊन खूप आनंद होतोय. मला वाटतं की आज आपल्याला आपल्या खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर तो खेळातूनच शिकता येतो. आपल्या महिला खेळाडूंना पाहून खूप आनंद होतो."

"क्रीडा मंत्रालयही सर्व फेडरेशनमध्ये 33 टक्के आरक्षण ठेवण्यात यावं आणि लहान-लहान जिल्ह्यांमध्ये जाऊन क्रीडेला प्रोत्साहन दिलं जावं या दिशेने प्रयत्न करत आहे. क्रीडाक्षेत्र पुढे नेणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, जेणेकरून ते जागतिक पातळीपर्यंत पोहोचू शकेल," असंही त्या म्हणाल्या.

अंजली भागवत यांना मिळाला 'बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025'

हा पुरस्कार स्वीकारताना अंजली भागवत म्हणाल्या, "नेमबाजी हेच माझं जीवन आहे. मी शूटिंग रेंजवर नसले तर काहीतरी सुटल्याची, चुकल्याची कुणभुण लागून असते. माझं काम आणि कामतील सातत्य हेच मला प्रेरणा देतं. "

"समर्पण आणि दृढनिश्चयामुळे मला हे यश मिळालं आणि अनेक महिलांसाठी असलेली एक भिंत मी तोडू शकले. भारतीय नेमबाजी आज शिखरावर पोहोचली आहे, मात्र, यशासाठी कष्टाला पर्याय नाही असं मी म्हणेन."

बीबीसी स्टार परफॉर्मर ऑफ द इयर 2025

बीबीसी स्टार परफॉर्मर ऑफ द इयर 2025 चे मानकरी

  • भारतीय महिला क्रिकेट संघ
  • भारतीय अंध महिला क्रिकेट संघ
  • भारतीय महिला कबड्डी संघ
  • सिमरन शर्मा
  • एकता भयान
  • दीप्ती जीवनजी
  • प्रीती पाल

आमच्यासाठी हा खूप मोठा क्षण - हरमनप्रीत कौर

भारतीय महिला क्रिकेट संघ हा 'बीबीसी स्टार परफॉर्मर ऑफ द इयर'चा मानकरी ठरला आहे.

याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, "भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वतीने मी बीबीसीचे आभार मानते. आमच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे. मैदानावरील आमच्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद."

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय.

ती म्हणाली की, "संपूर्ण संघाच्या वतीने बीबीसीचे आभार. 2025 आमच्यासाठी अप्रतिम वर्ष ठरलं आहे. मुलींच्या या अद्भुत संघाला हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद आहे."

'महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन द्या' - राजीव शुक्ला

महिला क्रिकेट संघातर्फे पुरस्कार स्वीकारताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, "महिला क्रिकेट संघ अतिशय उत्तम कामगिरी करतोय. बीसीसीआयमध्ये आम्ही महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहोत.

त्यांच्या वेतनात समानता आणली आहे आणि त्यांच्या सामन्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपण महिला क्रिकेट पाहायला सुरुवात करा. तुमची ही सुरुवात महिला क्रिकेटपटुंसाठी पुरुष क्रिकेटच्या तोडीस तोड ठरेल."

बीबीसी चेंजमेकर्स ऑफ द इयर

भारतीय महिला आइस हॉकी संघ: एका अपारंपरिक खेळात अडचणींना तोंड देत मिळवलं प्रावीण्य

राजबीर कौर: भारतीय हॉकीपटू आणि भारतीय राष्ट्रीय महिला संघाची माजी कर्णधार.

सविता पुनिया: भारतीय हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाची सध्याची सदस्य.

पाणी देवी: तळागाळातील क्रीडा जगतात तिच्या प्रभावी योगदानाबद्दल.

2025 भारतीय महिला खेळाडूंसाठी विशेष ठरलं आहे - जोनाथन मन्रो

या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करताना बीबीसी न्यूज अँड करंट अफेयर्सचे सीईओ जोनाथन मन्रो म्हणाले की, "2025 हे वर्ष भारतीय महिला खेळाडूंसाठी विशेष ठरलं आहे."

"याच वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला. याचबरोबर, अंध महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघानंही तितकंच उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यश मिळवलं आहे."

पुढे ते म्हणाले की, "या वर्षीच्या पुरस्कारांची संकल्पना 'एव्हरीबडी कॅन प्ले' ही आहे. यामध्ये क्रीडाक्षेत्रात यश मिळवण्यासाठी शारीरिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक अडथळे पार केलेल्या महिलांवर विशेष भर देण्यात आला आहे."

"2020 मध्ये बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर पुरस्कारांची सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत कठीण परिस्थितींवर मात करून अतुलनिय कामगिरीने देशाची मान उंचावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. या महिला जगभरातील कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणा असून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात भारताची ओळख अधिक मजबूत केली आहे," असंही ते म्हणाले.

देशातील क्रीडा विश्वातील महिलांच्या कामगिरीचा गौरव

या वर्षासाठीच्या नामांकनांची घोषणा 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यामध्ये पाच आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे- क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, नेमबाज सुरुची सिंह आणि ॲथलीट ज्योती याराजी.

या पुरस्काराद्वारे, भारतीय महिला खेळाडूंनी 2025 मध्ये क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे. देशातील क्रीडा विश्वाशी संबंधित सर्व महिलांच्या कामगिरीचा गौरव यातून केला जातो.

बीबीसीनं निवडलेल्या पॅनेलनं 5 भारतीय महिला खेळाडूंची अंतिम यादी तयारी केली आहे. यासाठीच्या ज्युरींमध्ये भारतातील काही सर्वात मान्यताप्राप्त आणि विश्वसनीय क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे.

बीबीसीनं पहिल्यांदाच, ग्रँड ज्युरीची नियुक्ती केली आहे. हे ग्रँड ज्युरी या पुरस्काराच्या विजेत्यांची निवड करतील.

ग्रँड ज्युरीमध्ये ख्यातनाम टेनिसपटू लिअँडर पेस, लाँग जम्प अ‍ॅथलीट अंजू बॉबी जॉर्ज आणि पॅरा-ॲथलीट दीपा मलिक यांचा समावेश आहे.

विजेत्यांना 16 फेब्रुवारीला होणाऱ्या पुरस्कार समारंभात हे पुरस्कार दिले जातील. त्याचबरोबर बीबीसी ज्युरीनं नामांकित केलेल्या इतर 3 महिला खेळाडूंचाही सन्मान करणार आहे. यासाठीच्या श्रेणी आणि हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेतः

  • पॅरा-खेळांमधील उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित करण्यासाठी 'बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार
  • तरुण ॲथलीटच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी 'बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार
  • क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल एका दिग्गज खेळाडूचा गौरव करण्यासाठी 'बीबीसी लाईफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार.

ISWOTY म्हणजे काय?

ISWOTY हा बीबीसी इंडियन लँग्वेजेसचा एक उपक्रम आहे. भारतातील क्रीडा क्षेत्रातील रूढी मोडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या यशस्वी कामगिरीवर प्रकाश टाकणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमाचा उद्देश भारतीय महिला खेळाडूंना अधिक प्रसिद्धी मिळवून देणं हा आहे, कारण आतापर्यंत क्रीडा बातम्यांमध्ये पुरुष खेळाडूंनाच जास्त महत्त्व दिलं गेलं आहे.

फक्त पुरस्कार देणं यापुरतं मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रात महिलांना समान संधी आणि योग्य प्रतिनिधित्व कसं मिळेल, यावरही ISWOTYमुळे महत्त्वाची चर्चा घडते.

नामांकन मिळालेल्या खेळाडूंविषयी अधिक जाणून घ्या.

1. दिव्या देशमुख (बुद्धिबळ)

जुलै महिन्यात या 20 वर्षांच्या बुद्धिबळपटूने इतिहास घडवला. दिव्या देशमुख फिडे महिला विश्वचषकाची आतापर्यंतची सर्वात तरुण विजेती ठरली. तसंच, हा चषक पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

या विजेतेपदामुळे तिला ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला. अंतिम फेरीत, एकप्रकारे या खेळातील बॅटन एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे दिलं जाण्याचा क्षण होता. कारण दिव्या देशमुखनं कोनेरू हम्पीचा पराभव केला. कोनेरू हम्पी ही भारताची पहिली ग्रँडमास्टर आहे.

दिव्या देशमुखचा जन्म 2005 मध्ये नागपूरमध्ये झाला होता. दिव्यानं वयाच्या 5 व्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांमध्ये ती अंडर-7 वयोगटातील राष्ट्रीय विजेती बनली. तर 2017 मध्ये तिनं अंडर-12 श्रेणीतील मुलींच्या गटात जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचं (वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिप) विजेतेपद पटकावलं.

दिव्यानं 2022 मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला कांस्य पदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोन वर्षांनी दिव्यानं आणखी मोठं यश संपादन केलं. तिनं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं. तसंच, अव्वल स्थान पटकावणाऱ्या संघाचाही ती एक भाग होती.

2. हरमनप्रीत कौर (क्रिकेट)

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरनं नोव्हेंबरमध्ये देशाला पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघासमोर 339 धावा करण्याचं मोठं लक्ष्य होतं. मायदेशात खेळताना तिनं या लक्ष्याचा पाठलाग करताना, 88 चेंडूंमध्ये 89 धावांची खेळी केली.

तर 2017 मध्ये विश्वचषकाच्या आणखी एका उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळताना तिनं 171 धावांची नाबाद खेळी केली होती. तिची ही खेळी आजही महिला क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक मानली जाते.

हरमनप्रीतचा जन्म 1989 मध्ये पंजाबमधील क्रीडाप्रेमी पालकांच्या पोटी झाला. त्याच दिवशी तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एक टी-शर्ट विकत आणला होता. त्यावर लिहिलं होतं, 'गुड बॅटींग'.

हरमनप्रीतनं 2009 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय संघाचा फलंदाजीतील आधारस्तंभ बनून हे भाकित खरं करून दाखवलं.

तिचा समावेश, टाइम मासिकाच्या 2023 च्या टॉप 100 उदयोन्मुख नेतृत्वांच्या आणि बीबीसीच्या 100 सर्वात प्रेरणादायी महिलांच्या यादीत झालेला आहे. हरमनप्रीतला 2017 मध्ये अर्जुन पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च सन्मान आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरला 2026 च्या क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.

3. स्मृती मंधाना (क्रिकेट)

स्मृती भारताच्या महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार आहे. स्मृती आधीच महिला क्रिकेटमधील सर्वकालिन महान खेळाडूमध्ये स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहे. या 29 वर्षांच्या डावखुऱ्या फलंदाजानं महिला एक दिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. तर सध्याच्या खेळाडूंमध्ये ती धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्मृतीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली शहरात झाला आहे. तिला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा वडील आणि भावाकडून मिळाली. हे दोघेही जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत. विभागीय अंडर-19 स्पर्धेत खेळताना, 2013 मध्ये देशांतर्गत एकदिवसीय सामन्यामध्ये दुहेरी शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, तिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं 50 षटकांच्या सामन्यात केलेलं हे सर्वात वेगवान शतक होतं. ही खेळी करताना स्मृतीनं विराट कोहलीचा विक्रम मोडला होता.

स्मृतीला 2018 आणि 2021 मध्ये दोनदा आयसीसी वीमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आलं आहे. तसंच तिला 2019 मध्ये भारत सरकारकडून प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

4. सुरुची सिंह (नेमबाजी)

सुरुची सिंह, नेमबाज तयार करण्याचा समृद्ध इतिहास असलेल्या हरियाणातील आहे. सुरुची सिंहनं 2024 मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 7 सुवर्णपदकं जिंकून प्रसिद्धी मिळवली.

त्यानंतर एक वर्षांपेक्षा कमी कालावधीत या 19 वर्षांच्या नेमबाजानं वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं. तिनं जागतिक स्तरावर लवकरच स्वत:चं स्थान निर्माण केलं.

सुरुचीनं 2025 मध्ये ब्युनोस आयर्स, लिमा आणि म्युनिक इथं झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकून एक दुर्मिळ सुवर्ण त्रिकूट पूर्ण केलं. लिमामध्ये तिनं मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.

कझाकस्तानमध्ये 2025 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत, सुरुचीनं मनू भाकर आणि पलक गुलिया यांच्यासोबत महिलांच्या सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं.

सप्टेंबरमध्ये, सुरुचीनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन) 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात महिला नेमबाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला.

5. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

भारतात वरच्या स्तरावरील ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमधील यश खूपच दुर्मिळ असताना ज्योती याराजीनं घवघवीत यश मिळवून दाखवलं आहे. ज्योती याराजी, 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी 100 मीटर हर्डल्स (अडथळा) शर्यतीत पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

अडथळ्यांवर मात करणं ही याराजीसाठी कधीच समस्या नव्हती. कारण ही 26 वर्षांची खेळाडू बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील आहे. ज्योती याराजीचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते तर आई घरकाम करत असे.

ज्योती याराजीनं 2022 मध्ये 100 मीटर हर्डल्स (अडथळा) शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यावेळेस तिनं 13.23 सेकंदांची वेळ नोंदवली होती. तेव्हापासून तिनं अनेक वेळा स्वत:चाच विक्रम मोडला आहे.

तिनं 2022 च्या राष्ट्रीय खेळांमध्येदेखील उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळेस तिनं स्प्रिंट आणि हर्डल्स प्रकारांमध्ये अनेक सुवर्णपदकं जिंकली होती. तसंच जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. तर 2022 च्या आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं.

ज्योतीनं 2013 मध्ये, एशियन इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 60 मीटर हर्डल्स प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तर एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. ही कामगिरी करून तिनं आशियातील अव्वल हर्डल्स म्हणजे अडथळा धावपटू म्हणून स्वत:चं स्थान निर्माण केलं. तिनं गुमी इथं झालेल्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये 100 मीटर हर्डल्स प्रकारात देखील सुवर्णपदक पटकावलं होतं.

ज्योतीला, 2024 मध्ये प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. भारतातील महिला खेळाडूंच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि दखल घेण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू या पुरस्काराची पहिली विजेती ठरली होती.

तर 2020 मध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोनेरू हम्पीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2021 आणि 2022 मध्ये वेटलिफ्टर मिराबाई चानूनं हा पुरस्कार जिंकला होता. नेमबाज मनू भाकर 2024 च्या पुरस्काराची विजेती ठरली होती.

ॲथलीट पी. टी. उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज, वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी, हॉकीपटू प्रितम सिवाच आणि क्रिकेटपटू मिताली राज यांना यापूर्वी 'जीवनगौरव' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

टेबल टेनिसपटू भाविना पटेल आणि नेमबाज अवनी लेखरा यांना 'बीबीसी इंडियन पॅरा-स्पोर्ट्सवुमन' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

तसंच क्रिकेटपटू शेफाली वर्मा, नेमबाज मनू भाकर आणि तिरंदाज शीतल देवी यांना यापूर्वी 'बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.