You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पात्र' शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडकी बहीण योजना सुरूच, अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (6 मार्च) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला गेला.
राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि तरुणांसाठी विविध घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने 'पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी म्हटलं आहे की, "राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले."
या अर्थसंकल्पात झालेल्या काही महत्त्वाच्या घोषणा आपण जाणून घेणार आहोत.
अजित पवारांच्या नावाने भव्य स्मारक होणार
अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करतानाच सभागृहात 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हे भाषण करताना मन जड झाले आहे. वित्त विभागाची धुरा सांभाळलेले माननीय अजित पवार नाही. प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसंच त्यांच्या नावे गतीमान नागरी पुरस्कार दिला जाईल."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनी कार्याचा गौरव करण्यासाठी समिती स्थापन करून विविध उपक्रम राबवले जातील. संत गाडगेबाबा 150 वी जयंती यानिमित्त कार्यक्रम राबवले जातील. डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या या महत्त्वाच्या वर्षाच्यादृष्टीने सामाजिक कार्य राबवण्याच्यादृष्टीने काम केले जाईल."
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
मुख्यमंती देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले, "30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जाची थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित कर्जफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्तीसाठी समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत."
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेच्या अंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. राज्याच्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून जागतिक बाजारपेठसाठी साखळी तयार करण्यात येईल. महाविस्तार एआय (AI) प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आलं आहे. यात हवामान बदल आणि याची माहिती देण्यात येईल. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात येईल."
फडणवीस म्हणाले, "30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव यांची माहिती दिली जात आहे. चारही कृषी विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत तयार झाले आहेत. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार नवीन योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना या योजनांचा समावेश आहे.
चौथी मुंबई ते बुलेट ट्रेन, शहरांसाठी बरंच काही
मुंबई आणि राज्यातील इतर शहरांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "2047 पर्यंत राज्यातील शहरी लोकसंख्या 70 टक्के होणार आहे. त्यामुळे विविध शहरांच्या विकासासाठी १० विकास प्राधिकरणे बनवली जाणार आहेत. 10
फडणवीस म्हणाले, "मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल. तसेच पालघर जाळण्यात वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे. मुंबईमध्ये नवीन झोपडपट्ट्या होऊ नये म्हणून आराखडा (No new slum framework) तयार करण्यात येईल. अटल सेतू ते मुंबई- पुणे उन्नत मार्ग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे व्हिजन आहे."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,"वाढवण बंदर जोडणीकरीता उत्तन ते विरार सागरी सेतूचे काम हाती घेणार. तसेच अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडलं जाणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबईचं विमानतळ मेट्रोने जोडलं जाणार आहे. पुणे लोणावळा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगाव या औद्योगिक पट्ट्याला लाभ होईल."
राज्यातील मेट्रोचं जाळ वाढवण्याबाबत देखील अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग आणि 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. 2029 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील. लातूर, बारामती इथं रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा कार्यरत केली जाईल. मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार."
मुख्यमंत्री म्हणाले, "2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट गाठायचं आहे. मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी 32 हजार 756 कोटींचा खर्च झाला आहे. यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.