मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवणे खरोखर शक्य आहे का? काय सांगतात तज्ज्ञ?
फोटो स्रोत, Getty Images
- Author, व्हॅनेसा क्लार्क
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
5 वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाइम दिवसाला 1 तासापर्यंत मर्यादित असावा, तर 2 वर्षांखालील मुलांनी एकट्याने स्क्रीन पाहू नये, असे सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.
पालकांनी मुलांना खूप वेगाने हालचाली किंवा गडबड-गोंधळ असलेले व्हीडिओ दाखवणे टाळावे आणि शक्य असल्यास मुलांसोबत बसूनच स्क्रीन पाहावी. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्क्रीनला पर्याय शोधणे गरजेचे आहे. म्हणजेच, स्क्रीन (मोबाईल किंवा टीव्ही) बाजूला ठेवून त्याऐवजी मुलांसोबत गोष्टी वाचणे किंवा जेवताना साधे खेळ खेळणे अधिक फायदेशीर ठरेल.
हे मार्गदर्शन म्हणजे सरकारने पुराव्यांच्या आधारावर दिलेला पहिला व्यावहारिक सल्ला आहे. मात्र, जसे जसे नवीन पुरावे किंवा माहिती समोर येईल, तसतशी या नियमांमध्ये सुधारणा केली जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
"अनेक बाबतीत या विषयावर अद्याप पूर्ण माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे," असे शिक्षण मंत्री ब्रिजेट फिलिप्सन यांनी म्हटले.
इंग्लंडच्या चिल्ड्रन्स कमिशनर डेम रॅचेल डी सूझा आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे बालरोगतज्ज्ञ प्राध्यापक रसेल विनर यांनी मिळून नुकत्याच समोर आलेल्या माहितीचा अभ्यास केला आहे.
त्यांच्या मते, मुलांनी एकट्याने स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या त्यांच्या झोपेवर आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
यात कॉम्प्युटर, टॅब्लेट, मोबाईल फोन आणि टेलिव्हिजन अशा सर्व प्रकारच्या स्क्रीनचा समावेश आहे.
जवळपास 98 टक्के मुले ही वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच दररोज स्क्रीन पाहतात, असे सरकारने यापूर्वीच म्हटले आहे.
पण या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, सर्व प्रकारचा स्क्रीन टाइम सारखा नसतो. एकट्याने स्क्रीन पाहण्यापेक्षा एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत मिळून स्क्रीन पाहिल्यास मुलांच्या बौद्धिक विकासावर चांगला परिणाम होतो.
पालकांनी मुलांसमोर स्वतःचा आदर्श ठेवला पाहिजे. कारण मुलांचा मेंदू हा एखाद्या स्पंजसारखा असतो. तुम्ही जशी स्क्रीन वापरता, मुले अगदी तशीच तुमची नक्कल करतात. त्यामुळे मुलांसोबत असताना त्यांच्यासोबत पूर्णपणे सहभागी व्हा, असे सुचवण्यात आले आहे.
यूकेने सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या पावलावर पाऊल ठेवून 16 वर्षांखालील मुलांना अनेक सोशल मीडिया साइट्स वापरण्यावर बंदी घालावी का? या संदर्भात सरकार सध्या सल्लामसलत करत आहे.
5 वर्षांखालील मुलांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध होण्यापूर्वी बीबीसी न्यूजने मँचेस्टरमधील माँटास्टियर कुटुंबाचा एक आठवडा मागोवा घेतला. या कुटुंबाने आपला स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
"आम्ही रोज स्क्रीन पाहतो त्यामुळे त्याबद्दल रोज चर्चाही होते," असे ॲलेक्सिस सांगतात. त्यांची दोन्ही मुले रोमी (4 वर्षे) आणि मार्लो (1 वर्ष) हे तंत्रज्ञानाच्या वातावरणात वाढत असल्याने कुटुंबाचा स्क्रीन टाइम कमी व्हावा यासाठी त्या खूप प्रयत्न करत आहेत.
या योगा शिक्षिकेचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांना शाळेची बॅग भरणे किंवा स्वयंपाक करणे अशी काही कामे पटकन उरकायची असतात, तेव्हा त्या सहसा स्क्रीनचा वापर करतात. कधीकधी रोमी लवकर उठला किंवा मुलांची चिडचिड आणि रडारड टाळण्यासाठी त्या स्क्रीन वापरतात.
"स्क्रीन दाखवल्यामुळे मला अपराधी वाटते, पण रोज सकाळी 6 वाजता उत्साहाने उठून मुलांसोबत खेळणे किंवा त्यांना चित्रकला-हस्तकला शिकवणे नेहमीच शक्य नसते. या नवीन नियमांचे पालन करणे अजिबात सोपे नव्हते," असे ॲलेक्सिस म्हणतात.
"आठवड्याच्या सुरुवातीला मला खात्री होती की, आम्ही स्क्रीन पूर्णपणे बंद करू आणि सगळं व्यवस्थित होईल, पण तसं झालं नाही. तरीही या आठवड्यात आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न नक्कीच केला."
त्या सांगतात की, स्क्रीनला दुसरे पर्याय शोधण्यात खूप वेळ जातो, खास करून सकाळी, मुलं शाळेतून आल्यावर आणि जेव्हा त्यांना घरची कामं उरकायची असतात.
त्या म्हणतात, "मला तो वेळ स्वतःच्या कामासाठी हवा असतो. त्यामुळे मुलांसोबत बसून पुस्तक वाचत बसणं मला जमत नाही, कारण ते प्रॅक्टिकल नाही."
त्यांचे पती मार्शिएल म्हणतात, "जेव्हा तुम्ही स्वतः स्क्रीन वापरत असता, तेव्हा मुलांना करू नका असं सांगणं खूप कठीण असतं."
कामासाठी त्यांना बराच वेळ स्क्रीनवर राहावे लागते.
ते म्हणतात, "कामाच्या वेळी दिवसभर वारंवार फोन बघण्याची जी घाई असते, ती काम संपल्यानंतरही तशीच सुरू राहते."
"यामुळे मला नक्कीच जास्त जाणीव झाली आहे. ज्या गोष्टी मी नेहमी फक्त बोलून दाखवायचे की 'अरे आपण हे करायला हवं', त्या गोष्टी मी आता प्रत्यक्षात करायला सुरुवात केली आहे," असे ॲलेक्सिस सांगतात.
लहान मुले स्क्रीनवर नक्की काय बघतात, यावर लंडनच्या एका युनिव्हर्सिटीत शास्त्रज्ञ यावर अभ्यास करत आहेत.
शास्त्रज्ञ सध्या 5 वर्षांखालील मुलांच्या स्क्रीन सवयींचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या मते, जेव्हा व्हीडिओमधील दृश्ये खूप पटापट बदलतात, तेव्हा मुलांचा मेंदू गोंधळून जातो.
माहितीचा वेग इतका जास्त असतो की, तो मुलांच्या मेंदूला पकडता येत नाही आणि हाच त्यांच्या अभ्यासाचा मुख्य भाग आहे.
ते म्हणतात, "जर स्क्रीनवरच्या गोष्टी खूपच वेगाने आपल्यासमोर येत असतील, तर आपल्या शरीरातील 'फाईट-ऑर-फ्लाईट' (लढा किंवा पळा) नावाची तणाव यंत्रणा सक्रिय होते. यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि स्नायूंमध्ये अचानक खूप ऊर्जा निर्माण होते."
खरं तर शरीरात निर्माण होणाऱ्या या ऊर्जेचा आता काहीच उपयोग नसतो, कारण मुले एका खुर्चीवर शांत बसून स्क्रीन पाहत असतात.
'बीबीसी रेडिओ 4'च्या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक वास म्हणाले की, 'फेस-टू-फेस' म्हणजे समोरासमोर बसून शिकण्याइतकी प्रभावी स्क्रीन नसते, हे आता सिद्ध झाले आहे.
पण मुले स्क्रीनकडे इतकी का ओढली जातात, याचे नेमके कारण शोधणे अजून बाकी आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
संशोधकांचे म्हणणे आहे की, गेल्या 20 ते 30 वर्षांत मुलांसाठी बनवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी मुलांचे कार्यक्रम खूप सावकाश असायचे, पण आजचे व्हीडिओ खूप वेगवान झाले आहेत. त्यात हालचाली आणि बोलणे खूप जास्त आणि पटापट असते.
वास म्हणतात की, या बदलाचा मुलांवर नक्की काय परिणाम होतोय, याबद्दल अजून जास्त माहिती नाही. पण एका गोष्टीचे भक्कम पुरावे आहेत. जर मुले खूप वेगाने बदलणारे आणि अनपेक्षित व्हीडिओ पाहत असतील, तर त्यांच्या भावनांवर ताबा मिळवण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
ते म्हणतात, "या विषयाकडे आपल्याला खूप लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे."
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असलेली खेळणी किंवा साधनांचा वापर टाळावा.
ऑनलाइन सुरक्षिततेसाठी काम करणारे कार्यकर्ते इयान रसेल यांनी बीबीसीच्या न्यूजनाईट कार्यक्रमात बोलताना सांगितले, "ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे खूप सकारात्मक आहेत. तसेच हे सल्ले पुराव्यांवर आधारित आहेत आणि मला वाटते की, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे."
रसेल यांची 14 वर्षांची मुलगी मॉली हिने इंटरनेटवर घातक मजकूर पाहिल्यानंतर स्वतःचे आयुष्य संपवले होते.
ते म्हणतात, "किशोरवयीन मुले ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करतात, ती समाजासाठी कदाचित जास्त चिंतेची बाब आहे, पण या संदर्भात असे पुरावे आहेत की, जितक्या लवकर आपण यावर काहीतरी उपाय करू, तितके ते फायदेशीर ठरेल."
मुलांना इंटरनेटवर सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या 'पॅरेंट झोन'च्या संस्थापक विकी शॉटबोल्ट यांच्या मते, आजच्या काळात तंत्रज्ञान पूर्णपणे टाळणे अशक्य आहे. पालकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, असे त्या सांगतात.
जर घरात AI स्पीकरसारखी साधने असतील, तर लहान मुले साहजिकच ती वापरणार, हे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे मुलांना तंत्रज्ञानापासून पूर्णपणे लांब ठेवता येईल, हा विचार कदाचित चुकीचा असू शकतो, पण ही एक चांगली सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे आहेत."
शॅडो एज्युकेशन सेक्रेटरी लॉरा ट्रॉट यांनी या नियमांचे स्वागत केले, पण त्या पुढे म्हणाल्या, "सरकारने अजून कडक पावले उचलली पाहिजेत. जसे की शाळांमध्ये स्मार्टफोनवर कायदेशीर बंदी घालणे आणि 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करणे."
लिब डेम पक्षाचे नेते सर एड डेव्ही म्हणाले, "या नवीन नियमांबद्दल मला सरकारबद्दल सहानुभूती आहे, पण सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या मोठ्या धोक्यांकडे सरकारने वेळीच लक्ष दिले नाही आणि यावर कारवाई करायला त्यांनी खूप वेळ लावला आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही