You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'एवढ्या कमी वयात मुलगा जाणं धक्कादायक', सुखोई विमान अपघातात जीव गमावलेल्या पूर्वेशचे वडील काय म्हणाले?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"आम्हाला सकाळीच फोन आला की पुर्वेश आता या जगात नाही. त्याला गेल्यावर्षीच प्रमोशन मिळालं होतं. त्याला देशासाठी आणखी सेवा द्यायची होती. त्याची खूप स्वप्न होती. एवढ्या कमी वयात पूर्वेश आमच्यातून निघून जाणं आमच्यासाठी धक्कादायक आहे."
भारतीय वायुसेनेच्या सुखोई विमानात मृत्यू झालेले फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचे वडील रविंद्र दूरगकर स्वतःला सावरत बोलत होते.
आसाममधल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे एक सुखोई विमान कोसळले. त्यात 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पूर्वेश दूरगकर महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी आहेत.
गुरुवारी (5 मार्च) रात्री भारतीय हवाई दलाने एक सुखोई विमान कोसळल्याची माहिती दिली होती.
पुर्वेश यांचं कुटुंब शहरातील न्यू सुभेदार लेआऊट इथं राहतेय. पूर्वेश यांचा सुखोई विमान अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केलेली होती. प्रत्येकजण त्यांच्या आठवणी सांगत होत्या.
रविंद्र दूरगकर रेल्वेत स्टेशन मास्टर होते. आपली दोन्ही मुलं सेटल झाली की आपण निवृत्ती घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार पूर्वेश चार वर्षांपूर्वी फ्लाईट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली.
पूर्वेशचे वडील रविंद्र दूरगकर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "माझ्या मुलानं आठवीत असतानाच सांगितलं की, पायलट व्हायचं आहे. ते पण साधं पायलट नाहीतर फायटर पायलट व्हायचं आहे.
त्यामध्ये कशी मेहनत असते हे मी त्याला समजावून सांगितलं. त्यादृष्टीनं त्यानं प्रयत्न देखील केले आणि पहिल्याच प्रयत्नात माझा मुलगा फायटर पायलट झाला. तो क्षण आमच्यासाठी सर्वात अभिमानाचा होता. आपला मुलगा देशाची सेवा करतोय याचा अभिमान होता."
मुलगा पूर्वेश फायटर पायलट झाला त्यावेळी रविंद्र यांनी स्वप्नपूर्ती म्हणून मोठा कार्यक्रम केला होता. तसेच त्यावेळी त्यांच्या घरात प्रचंड आनंदाचं वातावरण होतं. त्यांनी संपूर्ण परिसरात मिठाई वाटली होती, अशा आठवणीही शेजारी सांगत होते.
पूर्वेश यांची देशसेवा करायची इच्छा होती. त्यामुळे ते स्वयंप्रेरनेने एअरफोर्समध्ये गेले होते. सुरुवातीला ते फ्लाईट ऑफिसर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांना प्रमोशन मिळालं.
आता फ्लाईट लेफ्टनंट या पदावर ते कार्यरत होते. त्यांची पोस्टींग सध्या आसाममध्ये होती.
'मुलगा ऑपरेशन सिंदूरमध्ये होता याचा अभिमान'
भारतानं पाकिस्तानविरोधात जे ऑपरेशन सिंदूर केलं होतं त्यामध्ये पूर्वेश सहभागी होता, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
ऑपरेशनच्या 20 दिवसानंतर सुट्ट्या घेऊन तो घरी आला होता, तेव्हा आम्हाला त्यानं काही गोष्टी सांगितल्या. त्या कायम आठवणीत राहतील.
माझा मुलगा इतक्या मोठ्या ऑपरेशनमध्ये होता याचा नेहमी अभिमान वाटतो. त्याला कमी वयात युद्धात सहभागी होता आलं.
कमी वयात त्याला फायटर पायलट म्हणून युद्धाचा अनुभव घेता आला ही त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी मोठी गोष्ट होती, असं त्यांचे वडील सांगत होते.
पूर्वेश यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण नागपुरातील साऊथ पॉईंट स्कूल इथं झालं, तर बीएसस्सी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून केलं.
पण, त्यांना फायटर पायलय बनायचं होतं. त्यामुळे दहावीनंतरच भंडाऱ्यातील शाहपूर इथल्या डीएसए अकादमीमध्ये टाकलं. तिथूनच अकरावी बारावीचं शिक्षण सुद्धा घेतलं. पहिल्याच प्रयत्न उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचं हैदराबादमध्ये ट्रेनिंग झालं होतं.
साऊथ पॉईंट स्कूलच्या प्रिंसिपल डॉ. मृणालिनी दस्तुरे या पूर्वेश यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षिका आहेत.
"आमचा विद्यार्थी जेव्हा फायटर पायलट झाला तेव्हा आम्हाला इतका आनंद झाला की मीच पायलट झाले असं वाटलं. तो इतक्या मोठ्या पदावर पोहोचला. पण, शाळेला कधीच विसरला नाही.
आताही नागपूरला आला की शाळेत यायचा. गेल्या 15 ऑगस्टला आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा तो आला होता" असं डॉ. मृणालिनी यांनी सांगितलं.
विद्यार्थ्याच्या आठवणी सांगताना त्या भावूक झाल्या होत्या.
या शाळेत अजूनही वॉल ऑफ फेममध्ये पूर्वेश यांचा फायटर प्लेनसोबतचा मोठा फोटो लागलेला आहे.
पूर्वेश शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला होता. त्यामुळे त्याच्यानंतरचे विद्यार्थी सुद्धा आम्हाला पूर्वेश दादासारखं भारतीय संरक्षण दलात जायचं आहे असं म्हणत एअरफोर्ससाठी तयारी करत आहेत.
शाळेतील सगळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पूर्वेश यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली.
दोन वर्षानंतर होणार होतं लग्न
आई, वडील, पूर्वेश आणि एक बहीण असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं. बहिणीचं गेल्यावर्षी लग्न झालं असून ती अमेरिकेला राहते.
पुढच्या दोन वर्षांत पूर्वेश यांचंही लग्न करणार होते. आपला मुलगा गेलाय हे समजलं तेव्हापासून त्यांच्या आईनं जेवण सोडलंय.
पूर्वेश यांनी तीन दिवसांपूर्वी घरी फोन केला होता. जेवण झालं का? तब्येत कशी आहे? व्यायाम केला का? अशी सगळी विचारपूस केली होती. तेच आई-वडिलांसोबतचं शेवटचं बोलणं ठरलं.
हवाई दलाने काय म्हटलं?
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार Su-30 MKI हे सुखोई विमान प्रशिक्षण मोहिमेवर होतं. हे विमान जोरहाटपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग परिसरात कोसळले.
शुक्रवारी (6 मार्च) सकाळी भारतीय वायुसेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती देताना म्हटलं की, या अपघातात दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, "देशासाठी त्यांनी दाखवलेले धैर्य आणि सेवा कायम अभिमान आणि कृतज्ञतेने स्मरणात ठेवली जाईल. या दु:खाच्या क्षणी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे उभा आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)